दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता
जात्याच रुक्ष त्या एकच त्या आकांक्षा
तव आंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा.. !
-कुसुमाग्रज
मराठी भाषेची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी काही म्हणजे यातील पद्य प्रकार. तुम्हाला कविता करायला आवडते का ? कविता वाचायला आवडते का? मग ह्या शीघ्रकवितांच्या खेळात भाग घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना असे पद्याचे लक्षण माधवराव पटवर्धन ह्यांनी आपल्या छंदोरचना ह्या ग्रंथात दिले आहे.
तर आपला हा खेळ असा आहे की दिलेल्या विषयावर किंवा संकेतावर (थीमवर) आधारित शीघ्रकाव्य करायचे आहे. दर दिवशी एक (किंवा अधिक) नवे संकेत आम्ही देऊ आणि त्यानुसार वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही काव्य रचायचे आहे. अभंग, ओवी, श्लोक, साकी,सुनीत, गझल , हायकू , चारोळी, विडंबन, विनोदी कविता असे अनेक परंपरागत व आधुनिक काव्य प्रकार आहेत. अगदी लावणी, पोवाडा हे गीतांचे प्रकारही या खेळात थीमच्या किंवा संकेताच्या स्वरूपात येतील. फार ततपप होऊ लागले तर मधेच कुठेतरी क्रियापद टाकूनही काव्य तयार करू शकता. हा खेळ मजा घेण्यासाठीच आहे.
वरच्या उपोद्घातातल्या कुसुमाग्रजांच्या ओळींत काव्याचे सार वेचले आहे. चला तर मग, आपल्या आतल्या शीघ्र कवी वा कवयित्रीला जागे करा, कळफलक सरसावून होऊन जाऊ द्या !
१. २७ फेब्रुवारी - महाराष्ट्र गौरव गान