जी.एं. कुलकर्णींच्या 'रमलखुणा' या कथासंग्रहातील ‘इस्किलार’ या दीर्घकथेबद्दल
'त्या'ला नाव असेलच, तर कथाकार ते आपल्याला सांगत नाही. त्याचे नेमके वय, उंची, चेहरामोहरा यांबद्दलही काही कल्पना देत नाही. त्याचा जन्म कुठल्याश्या आर्शिया नावाच्या देशात झाला होता याचा उल्लेख कथेच्या ओघात कधीतरी येतो, पण ते काही त्याचे गाव म्हणता येणार नाही, तो कुठल्या एका प्रदेशाचा नाहीच. त्याचा कुठला एक असा व्यवसायही नाही. तो कोणीच नाही किंवा कोणीही आहे. खरेतर तो म्हणजे केवळ एक मूर्तिमंत तहान आहे. आपल्या ललाटलेखाचा मजकूर समजावून घेण्याच्या एकमेव ध्यासाने मार्गक्रमणा करणारा एक यात्रिक.
जो ललाटलेख कळण्याआधीच त्याच्या जन्मदात्रीचा मृत्यू झाला होता, जो वाचताच बापाने अर्भकावस्थेतच त्याचा त्याग केला होता, ज्याचे चटके त्याला सहज माणुसकीने जवळ करणार्या प्रत्येकाला बसले, ज्यात त्याच्या हातून घडणार असणार्या कुठल्याश्या महापातकाकडे निर्देश आहे, असे हे नियतीचे कोणते उफराटे दान त्याच्या पदरी पडले आहे हे त्याला जाणून घ्यायचे आहे..
त्याच्याकडे त्याचे म्हणण्यासारखे काही असेल तर फक्त हे ईप्सित, आणि तो या प्रवासाला निघताना नारिंगाच्या बागेत त्याच्या प्रेयसीने त्याच्या बोटात घातलेली अंगठी, इतकेच आहे.
देशोदेशी भटकून, पडतील ती कामे करून, भेटेल त्या ज्योतिष्याकडून काही कळते का हे पाहत आता तो शेवटी या नगरात पोचला आहे. येथील समुद्रातील बेटावरचे मंदिर तीन वर्षांतून एकदाच सातव्या महिन्यातील पौर्णिमेला प्रवाशांसाठी खुले होते आणि त्या वेळी मंदिरातील सेविका त्यांची भविष्ये वाचू शकते अशी त्याची ख्याती आहे.
मंदिरातली तिच्याआधीची सेविका भविष्याची केवळ धूसर आकृती पाहू-सांगू शकत असे आणि ते ऐकायला अपार गर्दी होत असे. आता सध्याच्या या सेविकेला पुढचे सगळे स्पष्ट दिसते, पण भवितव्याचा इतका सुस्पष्ट आराखडा पाहण्याचे धाडस असलेली माणसे फार थोडी. त्यामुळे आता आता या मंदिरात फारसे कोणी येत नाही.
ती त्याचे भविष्य सांगतेही. 'सेरिपी इस्कहार एली' या तीन शब्दांत. एवढे तीन शब्द कसेबसे उच्चारताच ती मूर्च्छित होते आणि सूर्यास्तानंतर मंदिराच्या परिसरात राहायला बंदी असल्यामुळे त्याला तेवढेच तीन शब्द झोळीत घेऊन तिथून बाहेर पडावे लागते. म्हणजे हवे होते ते मिळाले म्हणावे तर मिळाले त्याचा अर्थ शोधायचे नवीनच काम त्याच्या माथी येते.
यथावकाश त्याला त्या शब्दांचे अर्थ कळत जातात. ते सापडण्याच्या मार्गावर काही विलक्षण माणसेही भेटतात. त्यात 'माणूस इतर प्राण्यांपेक्षा अडाणी असतो म्हणून तत्त्वज्ञाने रचत बसतो' म्हणणारा गारुडी आहे, तलवारी आणि कट्यारी घडवण्याचे पिढीजात काम करणारा पण कधीतरी ते सोडून स्वतः तलवार गाजवण्याची इच्छा बाळगून असलेला, 'प्रत्येक मनुष्य स्वतःच स्वतःचा धर्मसंस्थापक आणि अनुयायीही असतो' म्हणणारा याकीर आहे, 'अनीव्हियोला' म्हणजे द्राक्षाचा साधा रस जेव्हा मद्य होतो त्या जादुई क्षणासारख्या रात्रीची त्याला शुभेच्छा देणारे क्रिसस आणि त्याचे ऐषारामी मित्र आहेत, 'गुलामगिरी तुला वाटते तितकी दुर्मिळ नाही, धर्मसंस्थापकाचे खुळचट शब्ददेखील गळ्यात घालून माणसे स्वखुशीने गुलाम होतात, जितकी प्राचीन गुलामगिरी तितका तिचा अधिकच अभिमान बाळगतात. पोटापाण्याची चिंता नाहीशी केली तर माणसे स्वातंत्र्य मिळवायची धडपड करणार नाहीत, कारण मुळात स्वातंत्र्य ही कृत्रिम कल्पना आहे' असे म्हणणारा गुलामांचा व्यापारी आहे, क्रांतिकारक बापाचा गोड गळ्याचा मद्यपी मुलगा अर्नास आहे, युद्धकैदी झाल्यावर असामान्य सौंदर्यामुळे नाही ते भोग भोगलेली, आणि आता तेच सौंदर्य शस्त्राप्रमाणे वापरून मोठमोठ्या पुरुषांना आपल्या तालावर नाचवणारी अल्थीया आहे आणि युद्धात पराभव झाल्यावर परागंदा होऊन आता धीवराचे काम करणारा राजादेखील आहे.
या सार्या माणसांचे आपापले काहीएक विचार, विवंचना, आणि विरोधाभासदेखील आहेत. ' अंगठी मी आठवणीदाखल देत नाही, कारण जी आठवण एखाद्या वस्तूवर अवलंबून असेल ती न राहिलेलीच बरी' इतका तर्ककठोर विचार करणार्या प्रेयसीला ती अंगठी बोटात असेल तर तो कधीतरी परतून येईल अशी एक अतार्किक कोवळी आशा आहेच, ती का? सापाचे भय वाटणारा माणूस गारुडी का होतो? ‘पोटापाण्याला दिले की लोक सुखाने गुलाम होतात’ म्हणणार्या व्यापार्याची पत्नी त्याच्या घरचे वैभव झिडकारून का पळून जाते? खिडकीत आलेल्या चिमण्या दचकू नयेत म्हणून लिहिताना थांबणारा आपला बाप, राजाने वध करावा इतके भयंकर काय लिहायचा हे अर्नास कदाचित जाणून घेऊ शकेलही, पण इतक्या मृदू बापाने आपल्याला कधी उघडपणे माया का दाखवली नाही हे त्याला आता कसे कळणार? राजकन्येने पूर्वी विपदेत दाखवलेल्या सहज औदार्याबद्दल वाटणार्या कृतज्ञतेचा कवडसा मनाच्या अंधाऱ्या तळघरात जपणारी अल्थीया निरपराध्यांना दिलेली क्रूर अरिबा शिक्षा कंटाळवाणा खेळ पाहावा तशा अविचल दृष्टीने कशी पाहू शकते? शत्रूच्या रक्तात आपल्या पांढर्याशुभ्र घोड्याचे पाय गुडघ्यापर्यंत माखावेत असे स्वप्न पाहणार्या याकीरला त्याने पाळलेल्या चिमुकल्या पाखराची जिवापाड काळजी कशी वाटते? तीही इतकी, की आपण गेल्यावर त्याचे हाल होऊ नयेत म्हणून बहुधा निघण्याआधी स्वहस्तेच त्याला पाखराचा जीव घ्यायचा आहे. त्याला घरादाराचा मोह नाही, पण कट्यारीच्या बदल्यात ती अंगठी हवी आहे. कशासाठी?
या सार्यांच्या प्राक्तनांच्या वाटा शेवटी ‘का? कसे? कशासाठी?!’ या तिठ्यापाशी येतात.
'कोऽहं' या चिरंतन प्रश्नाचेच हे निरनिराळ्या आवाजांत उमटलेले प्रतिध्वनी जणू.
माणसाला आयुष्य क्षणभंगूर असण्याची वाटत नाही तितकी भीती ते निरर्थक असण्याची वाटते. मग जगण्याला अर्थ आहेच, घटनांना काही कारणपरंपरा आहेच, असे आधी ठरवायचे आणि मग तो अर्थ शोधण्याची धडपड करायची, कारणांची संगती लावत बसायचे, असा स्वतःच विणलेल्या जाळ्यात स्वत:च गुरफटत जाण्याचा खेळ म्हणजेच जीवन?
पण मग अर्थ नाही हे कळणे म्हणजेतरी मुक्ती म्हणता येईल का? कारण ते कळल्यानंतर जगत राहावे लागणे हीदेखील एक शिक्षाच की!
शिवाय हा खेळ मांडण्या-न-मांडण्याचेतरी स्वातंत्र्य, कर्तेपण माणसाकडे असते का? की तोही त्याच्या अटळ नियतीचाच आलेख?
आपले भवितव्य जाणून घेण्याच्या मोहिमेवर कथानायक निघालाच नसता तर? प्रेयसीने आणाभाका देऊन त्याला थांबवून घेतले असते तर? धीवराचा आग्रह मानून त्याने रात्र त्याच्या खोपट्यात काढली असती तर? याकीरला कट्यारीच्या बदल्यात अंगठी द्यायला त्याने नकार दिला असता तर? क्रिससच्या विलासी सहवासात तो रमला असता तर? अल्थीयाचे काम त्याने नाकारले असते तर? घडणारे टळले असते?
इतक्या प्रवासात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडलेला तो, दुसर्या भेटीत सेविकेच्या गळ्यातील स्कहार रत्नाच्या लालसेने आंधळा का होतो? ते रत्न त्याने पहिल्या भेटीतही पाहिलेले असतेच की. त्याने इथवर विचारपूर्वक घेतलेले निर्णय काय किंवा क्षणिक आवेगाच्या भरात त्याच्या हातून घडलीशी वाटणारी कृती काय, सारे पूर्वनियोजितच होते? हा सारा घटनाक्रम नाकारायचे स्वातंत्र्य त्याला कधी नव्हतेच?
आणि या साऱ्या पसाऱ्याची परिणती तरी काय? निरर्थकच घेतल्यासोडल्या श्वासांचा तितकाच किंवा त्याहून अधिक निरर्थक अंत? माणूस कसा जगला याला अर्थ नाही, आणि कसा किंवा कुठे मेला यालाही? त्याला वीरमरण आले, की कुठल्या उन्मादात त्याने स्वतःला कुठल्या कड्यावरून झोकून दिले, की अंथरुणात पडल्यापडल्या आपण मेलो हेदेखील न कळण्याइतका तो अखेरीस गलितगात्र होता, कशानेच काही फरक पडत नाही? शेवटी मातीवर आणखी एक थर, इतकेच त्याचे फलित?
क्रिससचा एक मित्र 'स्किलार' या शब्दाचा उच्चार अजाणतेपणी 'इस्किलार' असा करणार्या नोकराची गंमत त्याला सांगतो. त्यांच्या भाषेत स्किलार म्हणजे नाटक, तर इस्किलार म्हणजे प्रेताभोवती मांडून ठेवलेल्या पिवळ्या पिठाच्या बाहुल्या! प्रेत रात्री उठून त्या बाहुल्या खाऊन टाकते अशी त्यांच्या प्रदेशात समजूत असते.
हे वर्णन प्रथम वाचताना कथाकाराच्याच भाषेत सांगायचे तर आपल्या आत आणखी एक डोळा उघडल्यासारखे वाटते.
अथांग काळोखाच्या पार्श्वभूमीवर एकांड्या पृथ्वीचा विशाल खुला रंगमंच, त्यावर मांडलेल्या पिठाच्या बाहुल्या, त्यांना सहज बोटाने हलवणारी नियती आणि शेवटी अचानक उठून खाऊन टाकणारा काळ - हे सारे एक अनादी अनंत नाटकच!
इस्किलार वाचताना माझ्या डोळ्यांसमोर नेहमी व्हॅन गोचे स्टारी नाइट हे पेंटिंग येते. सेन्ट रेमीतील इस्पितळाच्या मनोरुग्ण विभागात राहणारा व्हॅन गो त्याच्या खोलीच्या चिमुकल्या खिडकीतून दिसणारे रात्रीचे दृश्य निद्राहीन डोळ्यांत साठवून ते आठवत दिवसा या पेंटिंगवर काम करायचा. पेंटिंगमध्ये दिसते ते त्याच्या डोळ्यांनी नोंदवलेले दृश्य नव्हे, तर त्याच्या असंतुलित मनात उमटलेले त्याचे बिंब! त्यामुळे प्रत्यक्षातील खिडकीचे गज चित्रात नाहीत आणि चित्रात दिसणारे गाव प्रत्यक्षात तिथे नव्हतेच. खरेतर ते गाव चित्रातही जेमतेम आहे. गडद निळ्या आकाशात तेजस्वी जिवंत नक्षत्रांनी मांडलेला रिंगणखेळच पाहणार्याचे सारे लक्ष वेधून घेतो. शुक्लविवरांसारखे हे तारकापुंज आपल्याला आत खेचून घेतील अशी जवळपास भीती वाटू लागते. आणि त्यांना छेद देते काळ्या लवलवत्या अग्निशिखेप्रमाणे भासणार्या, मृत्यूचे प्रतीक असणार्या सायप्रस वृक्षाचे टोक! या सार्यापुढे त्या इवलाल्या छपरांखाली नांदणार्या माणसांची काय मातबरी असणार?
'इस्किलार'मध्ये जीएंनी मांडलेला खेळही असाच लौकिक आणि अलौकिकाच्या सीमेवरचा. त्यातील पात्रांच्या मुखी येणारी भाष्ये आणि त्यांची लखलखीत भाषा, दोन्ही त्या शुक्लविवरांसारखीच, दैनंदिन मळकट मानवी व्यवहारांपासून बुद्धीला खेचून काढून एका निराळ्या प्रतलावर नेतात. त्यांत हरवून जायचा धोका मोठा आहे, आणि त्या भोवर्यांतूनही तोल सावरता आलाच तरीही या सार्याच प्रतलांना छेद द्यायला मृत्यू त्या सायप्रससारखा पहारा देत उभा आहे. विरंगुळा म्हणून निरखण्याचा हा खेळ नव्हे.
‘विचार कर
या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकण्यापूर्वी नीट विचार कर
इथल्या वाटा पर्यटकांसाठी नाहीत
आपापल्या अश्वत्थाचे मूळ शोधण्याच्या ध्यासाने वणवण करणार्या एकाकी यात्रिकांसाठी यांची योजना झाली आहे’
जीएंच्या 'पिंगळावेळ' कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर कुठल्याश्या प्राचीन मंदिरातील शिलालेखावरचा हा इशारावजा मजकूर उद्धृत केला आहे. त्यांच्या लेखनाबद्दल याहून नेमकी टिप्पणी करता येणे अशक्य आहे!
स्वाती_आंबोळे
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
जी एं ची ही कथा एका वेगळ्याच प्रतलावरची आहे. आणि स्वाती, तू ही त्यात तसेच गडद रंग भरले आहेस.
मन भारुन गेल्या सारखे होते, नि:शब्द!
हे सारे लखलखीत शब्द वैभव आपल्या मायमराठीत आहे याचा किती अभिमान वाटतो म्हणून सांगू !
काय पत्रास त्या बाकी सर्व भाषांची हिच्यापुढे !!
आहाहा अप्रतिम लिहिलेस स्वाती!
आहाहा अप्रतिम लिहिलेस स्वाती! मूळ कथा, त्यावर तुझे विचार, तुझी भाषा सगळेच खूप सुंदर! यापेक्षा जास्त शब्द नाहीत !
इंटरेस्टिंग! ही पिंगळावेळ
इंटरेस्टिंग! ही पिंगळावेळ मधल्या कथेतच असलेली व्यक्तिरेखा आहे का?
नाही. रमलखुणा.
नाही. रमलखुणा.
खूपच सुंदर लिहिलं आहेस. जी ए
खूपच सुंदर लिहिलं आहेस. जी ए समजून घेणं खरच खूप अवघड आहे.
'गुलामगिरी तुला वाटते तितकी दुर्मिळ नाही, धर्मसंस्थापकाचे खुळचट शब्ददेखील गळ्यात घालून माणसे स्वखुशीने गुलाम होतात, जितकी प्राचीन गुलामगिरी तितका तिचा अधिकच अभिमान बाळगतात.
माणसाला आयुष्य क्षणभंगूर असण्याची वाटत नाही तितकी भीती ते निरर्थक असण्याची वाटते.>>
जी एं चं प्रत्येक वाक्य कोट करावं असं.
दर्जेदार! तुझ्या समर्थ
दर्जेदार! तुझ्या समर्थ लेखणीतून जी. ए वाचणं हा फार समृध्द अनुभव आहे. खूप खूप धन्यवाद.
सुरेख.
सुरेख.
स्टारी नाइट आणि इस्किलार... संबंधाचे सूचन या उत्तम लेखाला अधिकच उन्नत करते आहे.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
वाचायला लागलो तर सोडवेना अगदी. आता तर उत्कंठा शिगेला पोहोचली माझी. पुर्वी फार हरवून जायला व्हायचे (खरं तर आत्तापण हरवलोच) आणि तेव्हा का नाही जि एंबद्दल माहिती मिळाली अशी एक खंत वाटून गेली.
खरंतर इतक्या खोलवर पडसाद उमटवणार्या कलाकृतीची भितीच वाटते. एक काळ घालवला अशा उमटलेल्या पडसादांच्या खुणा पुसता पुसता, स्वतःला कोहं, सोहं, अहं ब्रह्मस्मि अंगी वळवून घेत असताना. काय माहित मनाच्या कुठल्याशा कोपर्याला हे वळण लागलं नसेल आणि ह्या अशा अंधाराच्या धारदार तिरिपीने जर त्याला छेद दिला तर सगळी खोलीच अंधारात गुडूप व्हायची!
जि ए छान लिहितात हे आता कळतच आहे पण म भा गौ दि च्या निमित्ताने तुम्ही लिहायला घेतलं हे फार छान झालं. त्यांच्या लिखाणाबद्दल लिहित असलात तरी त्यावर तुमची अनुभुती (?) तुमच्या शैलीत वाचताना हरवलोच अगदी.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
मला ईस्कीलार पेक्षा प्रवासी जास्त आवडते.ट्विस्ट खूप आहेत त्यात.
आवडलं. मी जीएंचं काहीच कधी
आवडलं. मी जीएंचं काहीच कधी वाचलं नाहीये. पण स्वाती तू एवढं जबरदस्त लिहीलं आहेस कि मला वाचावंसं वाटतंय.
मी जीएंची बरीच पुस्तकं
मी जीएंची बरीच पुस्तकं वाचलेली आहेत. त्यांच्यावर लिहिलेलं 'गूढयात्री' हे पुस्तकही वाचलेलं आहे. माझ्या मामी आजी डॉ विद्या सप्रे-चौधरी यांनी लिहिलेले आहे, त्या जीएंच्या मानसकन्या (?) होत्या. मी आपल्या आजीने काय लिहिले या उत्सुकतेने आणलेलं होतं. बापरे , झाले! खिन्न छाया असूनही त्या शब्दभ्रमाचे वशीकरण होते, त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. ती छाया मुरत जाते, तिची सोबत तर वाटतेच पण हे तेच आहे ज्याचा मी जन्मोजन्मी शोध घेत होते अशी हुरहूरी देणारी मोहक विमनस्कताही त्यात आहे.
लेख श्वास रोकून धरायला लावणारा झालांय. अप्रतिम !!
प्रतिक्रिया देऊन लेखाची उंची
माझी छोटीमोठी प्रतिक्रिया देऊन आभाळाएव्हढ्या लेखाची उंची कमी करावी असे वाटले नाही. "त्यांची लखलखीत भाषा" ह्या बद्दल शतशः धन्यवाद !
जबरदस्त लिहिलय!
जबरदस्त लिहिलय!
सुरेख लिहिलं आहेस स्वाती !
सुरेख लिहिलं आहेस स्वाती ! अगदी शब्दन शब्द योजलेला आहे.
सर्व अभिप्रायदात्यांचे
सर्व अभिप्रायदात्यांचे मनःपूर्वक आभार!
'इस्किलार' आणि 'प्रवासी' या दोन दीर्घकथा असलेला 'रमलखुणा' संग्रह अनेक वर्षांनी या निमित्ताने पुन्हा वाचला गेला, आणि पुन्हा नव्याने स्तिमित झाले.
अभिजात लेखनाच्या प्रत्येक पुनर्वाचनात काहीतरी नवीन हाती लागतं. लेखनातील एखादं आधी न दिसलेलं सौंदर्यस्थळ म्हणा, एखाद्या शब्दाच्या अन्वयार्थाचा एखादा निराळाच नवीन कंगोरा म्हणा, आपल्यातलीच एखादी आदिम अंतःप्रेरणा म्हणा, किंवा काळानुरुप आपल्यात झालेला एखादा अपरिवर्तनीय बदल म्हणा. असले शोध कधी हलवून सोडतात तर कधी हेलावून, पण श्रीमंत नक्की करतात.
त्यामुळे जीएंबद्दल लिहायची ही संधी दिल्याबद्दल मी संयोजकांची आभारी आहे.
माझ्या लेखामुळे काहींना जीएंचं लिखाण मुळातून वाचावंसं वाटलं याचं सुख मोठं आहे. त्यांच्याकडून जे मिळालं त्यातल्या एखाद्या ओंजळीचं त्यांना अर्घ्य दिल्यासारखं वाटलं.
>>> मनाच्या कुठल्याशा
>>> मनाच्या कुठल्याशा कोपर्याला हे वळण लागलं नसेल आणि ह्या अशा अंधाराच्या धारदार तिरिपीने जर त्याला छेद दिला तर सगळी खोलीच अंधारात गुडूप व्हायची!
वा! You responded in the same tongue, बुवा!
>>> शब्दभ्रमाचे वशीकरण होते, त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही
अगदी!
'गूढयात्री' मिळवून वाचेन आता.
वा! You responded in the same
वा! You responded in the same tongue, बुवा! >>>
सुंदर झालाय हा लेख! हे पुस्तक
सुंदर झालाय हा लेख! हे पुस्तक मी वाचलेलं नाही.
एखाद्या चित्रातील
एखाद्या चित्रातील सौंदर्यदर्शन , मग त्या चित्रातील कंटेटचे वर्णन आणि शेवटी त्या चित्रातून निघणार्या अर्थांचे विश्लेषण या क्रमाने जीएं च्या कथेचं रसग्रहण केलं आहे. कथा वाचलेली नाही पण रसग्रहण खूपच आवडलं. तुमच्याकडे ही सिद्धी आहे.
जीएंची एकच कथा वाचली होती. त्यामुळे व्हॅन गॉग (गो आहे पण ) च्या चित्राचे उदाहरण समर्पक. सगळा अॅब्स्ट्रॅक्ट मामला होता. कथा घडतेय पण इशारा भलतीकडेच. ग्रेसच्या कवितेसारखी. तुमच्या या लेखामुळे जीए वाचून काढायची इच्छा तीव्र झाली.
इस्किलार ही कथा कुठल्या
इस्किलार ही कथा कुठल्या देशातली असावी असे आपल्याला वाटते?
ग्रीस ? सायप्रस? तुर्कस्तान?
क्रिसस, अल्थीया वगैरे नावं
क्रिसस, अल्थीया वगैरे नावं ग्रीक ओरिजिनची आहेत असं दिसतंय, तर याकिर हिब्रू. पण हा थोडासा ऋषीचं कूळ शोधण्याचा प्रकार ठरेल, नाही का? ही पात्रं आणि ही तत्वज्ञानं स्थलकालातीत आहेत हेच उलट मला त्यांचं सर्वात मोठं गमक वाटतं.
ही.
हो, ते झालेच.
पण मला हा प्रश्न अशासाठी विचारावासा वाटला की..मूळ स्कहार शब्दाला ती सेविका (जी एं च्याच भाषेत बोलायचे झाले तर- पूर्वेकडून आलेले लोक म्हणतात तसे -'इ' लावून) इस्कहार असे का म्हणते?
ती तर नसते ना 'हिंद ' अथवा तत्सम पूर्वेकडील परदेशातून आलेली....!!!
चांगला प्रश्न आहे.
चांगला प्रश्न आहे.
तर्कच करायचा तर तिला बहुधा गोष्टी फक्त 'दिसतात', आणि ती त्या जशा दिसतात तशा सांगते. तिला त्यांचे मूळ उच्चार किंवा शब्दार्थ किंवा मुदलात त्या भाषा माहीत/कळत असतील का कोण जाणे!