स्मरण साहित्यिकांचे

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 26 February, 2023 - 23:25

नमस्कार मायबोलीकर.

यंदा ज्यांची जन्मशताब्दी आहे, अशा काही साहित्यिकांचे स्मरण केल्याशिवाय मायबोलीचा मराठी भाषा गौरव दिन उपक्रम पूर्ण होणार नाही.

गंगाधर गाडगीळ - जन्म २५ ऑगस्ट १९२३ मृत्यू १५ सप्टेंबर २००८. घटनाचित्रणापेक्षा मनोविश्लेषणावर भर देऊन मराठी कथेला नवे वळण देणारे नवकथाकार. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील 'दुर्दम्य' ही चरित्रात्मक कादंबरी, 'गोपुरांच्या प्रदेशात' आणि 'सातासमुद्रांपलीकडे' ही प्रवासवर्णनपर पुस्तके , 'खडक आणि पाणी', 'साहित्याचे मानदंड' ही समीक्षापर पुस्तके , 'खरं सांगायचं म्हणजे' आणि 'बंडू' हे हलके फुलके विनोदी लेखन आणि अर्थशास्त्रविषयक लेखन ही त्यांची काही साहित्यसंपदा.

जी. ए. म्हणजेच गुरुनाथ आबाजी कुलकर्णी - जन्म १० जुलै १९२३ मृत्यू ११ डिसेंबर १९८७. हयात असेतो आपले छायाचित्र कुठे प्रसिद्ध होऊ न देणारा, इंग्रजी आद्याक्षरे लावणारा हा विलक्षण कथाकार. त्यांच्या कथासंग्रहांची नावेही कशी वेगळी - निळासावळा, हिरवे रावे, पिंगळावेळ, रमलखुणा, सांजशकुन इ. नियतीच्या अतर्क्य वावटळीत सापडलेल्या माणसामाणसांमधील भावबंधाचे काव्यात्म चित्रण करणार्‍या त्यांच्या कथा वाचकांना झपाटून टाकतात. द. भि. कुलकर्णी म्हणतात, "विश्वाचा स्थलकालसापेक्ष व निरपेक्षही - विस्तार, मानवाच्या बेबंद आणि गुदमरलेल्या परस्परविरुद्ध वासना आणि या दोहोंतून जाणवणारे कार्यकारणरहित, योगायोगप्रधान घटनासंपन्न अनुभवविश्व हा जी.ए. यांच्या कुठल्याही कथेचा गाभा असतो." जी. एं.च्या पत्रसंवादालाही वाचकांची पसंती लाभली.

वसंत सबनीस - जन्म ६ डिसेंबर १९२३ मृत्यू १५ ऑक्टोबर २००२. विनोदकार आणि नाटककार. सौजन्याची ऐशी तैशी, गेला माधव कुणीकडे ही त्यांची काही गाजलेली नाटके. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याद्वारे त्यांनी वग या कलाप्रकाराला आधुनिक रूप दिले.
दादा कोंडक्यांच्या सोंगाड्या या चित्रपटासाठी सबनीसांनी कथा, पटकथा आणि संवादलेखन केलेच, पण 'राया चला घोड्यावरती बसू' , 'राया मला पावसात नेऊ नका' यांसारख्या सदाबहार लावण्याही लिहिल्या. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाचेही लेखन सबनीसांचेच.

शांताबाई कांबळे - १ मार्च १९२३ - २५ जानेवारी २०२३. शिक्षणासाठी कठोर संघर्ष करणार्‍या शांताबाईंनी शिक्षिका म्हणून सुरुवात करून शिक्षणाधिकारी या पदापर्यंत मजल मारली. त्यांचे 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे दलित स्त्रीने लिहिलेले मराठीतील पहिले आत्मचरित्र.

सदानंद रेगे - जन्म २१ जून १९२३ मृत्यू २१ सप्टेंबर १९८२ - श्रेष्ठ मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक

या व्यतिरिक्त अन्य कोणा मराठी साहित्यिकाची जन्मशताब्दी अथवा स्मृतिशताब्दी या वर्षी असेल तर त्याचीही नोंद वाचकांनी करावी.
या साहित्यिकांच्या लेखनाबद्दल कोणाला लिहायचे असेल तर त्याचे स्वागत आहे. मराठी भाषा गौरव दिन २०२३ या ग्रुपमध्ये वेगळा धागा काढून आपण लिहू शकता.

या उपक्रमाअंतर्गत जीएंच्या साहित्याबद्दल आम्ही काही मायबोलीकरांना लिहिते केले. स्वाती_आंबोळे यांनी 'रमलखुणा' या संग्रहातील 'इस्किलार' या दीर्घकथेवर लिहिले आहे. टवणे सर यांनी 'पिंगळावेळ' या संग्रहातील काही कथांवर लिहिले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम !
प्रस्तुत वर्ष हे ' लीळाचरित्रकार" श्रीचक्रधरांचे
अष्ट-जन्मशताब्दी वर्ष आहे.

कुणी शांताबाई कांबळे यांच्याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल. संयोजनामुळे मला जमेल असं वाटत नाही.