नमस्कार मायबोलीकर !
सन २०२३च्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमात सर्वांचे स्वागत! २०१३च्या शासन निर्णयापासून दर वर्षी २७ फेब्रुवारीला, म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. याशिवाय पूर्वीपासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तो, म्हणजे १ मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपणा मायबोलीकरांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब म्हणजे मायबोलीवर आपण २०१० पासून मराठी भाषा दिवस साजरा करत आलो आहोत. २०१५ आणि २०२१ मध्ये आलेला खंड धरून गेल्या चौदा वर्षांतला मायबोलीवर साजरा होणारा हा मराठी भाषेचा बारावा वार्षिक कौतुक सोहळा!
मराठी भाषेचा गौरव हा केवळ तिच्या इतिहासाचा गौरव नसून ती भाषा समृद्ध करणार्या सर्वच घटकांचा गौरव आहे. मराठी भाषा कोणत्याही एका विशिष्ट प्राकृत वा संस्कृत भाषेपासून उगम पावली नसून निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या मिश्रणातून बनली असे मानले जाते. माहाराष्ट्री आणि अपभ्रंश या दोन भाषांचे अवशेष मराठीत पुष्कळ सापडतात. नारदस्मृतींतल्या उल्लेखावरून मराठी भाषेची उत्पत्ती पाचव्या शतकात होऊन सातव्या शतकापर्यंत ती उत्क्रांत होत गेली असे समजते. अभ्यासकांना खास मराठी वळणाचे असे शब्दविशेष शक ६०५ पासूनच्या ( इ.स.६८३ पासूनच्या) शिलालेखांत व ताम्रपटांत सापडले आहेत; तर मराठी शिक्क्यांचे पहिले वाक्य श्रवणबेळगोळच्या शक ९०५ (इ. स. ९८३) मधील शिलालेखात सापडते, जे कदाचित आपल्यापैकी काहींनी पाहिलेही असेल. उत्तम दर्जाच्या मराठी वाङ्मयाची निर्मिती बाराव्या शतकात सुरू झालेली आढळते. मुकुंदराजांचा विवेकसिंधू, चक्रधरादिकांचे मानभावी (महानुभावी) वाङ्मय हे ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीच्या पूर्वीचे असल्याचे समजले जाते.
बदलत्या काळात आणि राजवटींत मराठी भाषेत कसे बदल घडत गेले याची ही लहानशी झलक -
१. यादवकालीन
ऐसे ते महाराष्ट्रराये सुंदरू। वरी महाराष्ट्रभाषाचतुरु । तेही वसविले गंगावीरू । क्षेत्र त्र्यंबजूवेर्ही ॥
माझा मर्हाटा चि बोलु कवतिके । परि अमृतातें ही पैजेसीं जीके। ऐसी अक्षरे चि रसिकें । मेलवीन॥
२. बहामनीकालीन -
माझा मर्हाटाचि बोलु कौतुकें। परि अमृते हि पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन|| ( ज्ञानेश्वरी - एकनाथी प्रत)
३. शिवकालीन -
जावळी खाली करोन, हात रुमालें बांधोन, भेटीस येवोन हुजूरची चाकरी करणें! इतकियावरी बदफ़ैली केलिया मारले जाल!
परम शास्त्र जगीं प्रघटावेया । बहुतां जनां फळासिद्धि होवावेया । भासा बांधोनि मराठिया । कथा निरोपिली - फादर स्टीव्हन्स
जैसी हरळांमाजी रत्नकिळा । की रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजीं चोखळा। भाषा मराठी ||- फादर स्टीव्हन्स
४. पेशवेकालीन
अभिमन्यू स्मरत नामावळी । जवळी आले कृष्ण वनमाली । उकसा बुकसी ते वेळी । पार्थवीर स्फुंदत|| - श्रीधर
भाऊसाहेब याजप्रमाणे पराक्रमी दुसरा होणें हे असाध्य गोष्ट. पूर्वी युद्धांत अतिरथी, महारथी झुंजले, त्याप्रमाणे भाऊसाहेबीं विरथीपणें शर्थ केली.
५. आंग्लकालीन
जो आकाशांत राहतो त्या तुजकडे मी आपली दृष्टि वर लावितों.
मराठी अशी ज्ञानदेवी जयाची असे मायबोली मराठीच तो,
हृदी रक्त दे साक्ष तो बंधु माझा, कुठेंही असो उच्च वा नीच तो. - माधव जूलियन
कालौघात पुढे अनेक थोर संत, पंडित, शाहीर, कवी, लेखक, वक्ते, नाट्यकार, गीतकार इत्यादींनी या भाषेला समृद्ध केले आहे. इतकेच नाही, तर राज्यव्यवहार कोष बनवून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, या भाषेला मुख्य प्रवाहात आणणारे नेते, व्याकरणकार , कोशकार, अगदी धर्मप्रसारासाठी आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी मराठीचा अभ्यास करून शब्दकोश निर्माण करणारे ब्रिटिश मिशनरी/ अधिकारी इत्यादिकांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचा उल्लेख करावा तो म्हणजे या भाषेचा अहोरात्र वापर करणार्या, आपापल्या खुबीप्रमाणे भाषासौंदर्य आणि वैशिष्ट्य जपणार्या आणि त्यात नवनवीन शब्दांची भर घालणार्या खेड्यापाड्यांतील, शहरांतील, भारतातील आणि भारताबाहेरच्याही मराठीभाषकांचा - म्हणजेच तुम्हां-आम्हां सर्वांचा !
यंदाच्या मराठी भाषा गौरव दिना निमित्त आम्ही काही उपक्रम आणि काही खेळ घेऊन आलो आहोत. आपणा सर्वांच्या सहभागाने हा उपक्रम एक लेखन-वाचन-मनन आनंदसोहळा ठरेल अशी आशा आहे!
- संयोजक,
मराठी भाषा गौरव दिन २०२३
संदर्भ -१. मराठी भाषा उद्गम व विकास - कृ. पां. कुलकर्णी
२. वाचू आनंदे - माधुरी पुरंदरे
३. आठवणीतल्या कविता
वा! अभ्यासपूर्ण लेख. मराठी
वा! अभ्यासपूर्ण लेख. मराठी भाषा गौरव दिनाला अगदी साजेसा.
सुंदर मभागौदि२०२३ संयोजकीय
सुंदर मभागौदि२०२३ संयोजकीय मनोगत.
६. सध्याची परिस्थिती
६. सध्याची परिस्थिती
आज मराठी लँग्वेज डे आहे.
मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.
म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.
थोडे एफर्टस् घ्यावे लागले,
पण आफ्टर ऑल मराठी आपली मदरटंग आहे,
तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.
तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.
लाँग लिव्ह मराठी..
सगळ्यांना हॅप्पी मराठी डे हं !!
छान लेख, आवडला!
छान लेख, आवडला!
छान लेख, आवडला!
छान लेख, आवडला!
मराठी भाषेतले बदल टिपणारे
मराठी भाषेतले बदल टिपणारे मनोगत. फार आवडले.
मनोगत फार आवडले. काळाच्या
मनोगत फार आवडले. काळाच्या ओघातील बदल एकत्र केलेले वाचायला मजा आली. पुढची पिढी लोकसत्ता मराठी बोलेल ... वर मटा मराठी आलेलीच आहे. अर्थात काळाचा महिमा.
अतिशय सुंदर माहितीपूर्ण मनोगत
अतिशय सुंदर माहितीपूर्ण मनोगत. आवडलंच!
(सरस्वती पाच आकड्यांची का म्हणे?)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदाची बातमी.
त्यानिमित्ताने लोक मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल शोधू लागले, असे दिसते.
म्हणजे बदलला काय म. भा. गौ.
म्हणजे बदलला काय म. भा. गौ. दि.? कुसुमाग्रजांची गरज संपली?
कसली बोडख्याची अभिजात भाषा? सरकार म्हणतं म्हणून? का? कशाला हवी आम्हाला ही सरकारी लेबलं? कुणाला हवी आहेत असली थेरं?
नाही, म्हंजे असेलही हां, इतके थोरथोर लोकं खूष झाले म्हंजे असणारच अभिजात! किंबहुना आहेच!!
सरकार दरबारी असली लेबलं लागली म्हणजे मिळणार की आता या बोरूबहाद्दरांना चंदा! मग का नाही खूष होणार? आता आणखी टुकार प्राध्यापक नवनव्या भिकार महाविद्यालयात खुर्च्या उबवत स्वतःची तुंबडी भरून घेणार. अधिकाधिक (रिकाम्या) लायब्रऱ्या यांची न खपणारी, फडतूस पुस्तकं विकत घेणार. स्वतःचीच टिमकी वाजवत, एकमेकांच्या पाठी खाजवत सरकारकडून आणखी फुकाची पारितोषिकं मिळवणार. सुमारांची सद्दी आता पैशांचा दिमाख मिरवणार.
या व्यतिरिक्त काय होणारेय? असल्या या अनुदानांनी काय उत्तम ग्रंथ निर्मिती होणार, कप्पाळ? रोजच्या व्यवहारातून बाद होत चाललेली ही भाषा, तरूणांच्या तोंडातून लुप्त होणारी ही भाषा, काय पैशांच्या भरवशावर तगणार आहे? आजकालचा तरूण वर्ग वापरतो का हो ही भाषा त्यांच्या भावनांची आंदोलनं मांडायला? मग कशी तरणार ही भाषा, त्या सरकारनं पाळलेलल्या कूपमंडूकांच्या पदरी आणखी पैसा ओतून? पैसे फेकून सुटणारा प्रश्न आहे का हा?
माझ्या संस्कृतीच्या भाषेला, माझ्या विचारांच्या भाषेला, माझ्या उद्गारांच्या भाषेला, असं बेगडी सजवू नका हो. ती कोंडली जाईल, गुदमरेल, आणि, आणि मग काय उरेल?
“काय फरक पडतो” असे म्हणायचा
“काय फरक पडतो” असे म्हणायचा मोह फक्त एका कारणाने आवरला - अभिजात म्हणून मान्यता मिळवलेल्या पहिल्या भारतीय भाषेचा, तमिळ भाषकांचा आणि त्यांच्या नीती निर्धारकांचा अल्प का होईना प्रत्यक्ष संपर्क !
अनेक दशकांच्या पाठपुराव्यानंतर २००४ साली त्यांनी ‘अभिजात’ भाषा म्हणून मान्यता मिळवली. . (१९६० साली सुरुवात सर्व “सरकारी” पदाधिकाऱ्यांनी फक्त तमिळ भाषेतच सही करावी अशा आग्रहाने झाली होती)
ठरवले तर सामान्यजन,-भाषाविद्वान, कवी, सिनेमा-नाट्यजगत आणि त्याहीपेक्षा “सरकार” नामक यंत्रणा भाषेसाठी काय करु शकते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
अर्थात भाषाप्रेम, भाषाभिमान आणि भाषेबद्दलची सर्वपक्षीय सर्वस्तरीय आस्था copy-paste करण्यासारखे नाही, पण आपल्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठीजनांसाठी हजारोच्या संख्येने बंद पडणाऱ्या मराठी शाळा, हमालीच्या दराने राबवून घेतले जाणारे शिक्षक उर्फ शिक्षण सेवक, मराठीत दहा अचूक वाक्येही न लिहू शकणारे लाखो साक्षर मराठी युवक याबद्दल काही अभिजात दर्ज्याच्या निमित्ताने करता आले- झाले तर खूप आनंद होईल.
मराठी भाषेला मोदीजींनी काय
गचु
Abuva
Abuva
पोस्ट अगदी पटली. भाजपाची अगदी टरकलेली. काय करू नि काय करू नको अशी परिस्थिती झाली आहे. आधी लाडकी बहिण, मग १०० फुटी पुतळा. आणि आता अभिजात मराठी. मी अगदी हेच म्हणतोय. पैसा वाटला कि भाषा समृद्ध कशी होणार? अर्थशास्त्र असे सांगते कि चलन फुगवटा होतो. काही दिवसांनी पुनश्च जैसे थे ! आताही तुम्ही लिहिलंय त्या प्रमाणेच होणार आहे. जाहिरात ज्यादा आणि ....असे दिवाळी अंक पुन्हा येणार आहेत.