इकडे घर सेट करत असतानाच दुसरी महत्वाची गोष्ट करायची होती ती म्हणजे शाळेची ऍडमिशन. तेव्हा छोटा किंडरगार्डन आणि मोठा तिसरीला होता. म्हणजे आम्ही भारतात त्यांची शाळा संपवून इकडे आलो होतो. पण तेव्हा इकडचे शैक्षणिक वर्ष चालूच होते. इकडे शाळेचे शैक्षणिक वर्ष साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर ते जून किंवा जुलै असतं. तर इकडची शाळा चालू असल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश घेणे आवश्यक होते.
खर सांगायचं तर शाळेचं ऍडमिशन म्हंटल कि पोटात गोळाच येतो. कारण मी दोनदा हा अनुभव घेऊन बसलेले. ठराविक तारखांच्या आत फॉर्म्स भरायचे, मग आपल्या मुलाचं नाव लिस्ट मध्ये लागावं म्हणून साकडं , इंटरव्यू वगैरे ठेवला असेल तर ते पोरगं नीट बोलेल ना, व्यवस्थित उत्तर देईल ना म्हणून एक टेन्शन, लिस्ट मध्ये नाव लागलं तर मोठी डोनेशन किंवा डिपॉझिट, फी , युनिफॉर्मस, रिक्शा/ स्कूलबस/व्हॅन, पुस्तकं, वह्या , डबे, बाटल्या … ही लांबलचक न संपणारी यादी आणि गळती लागलेला खिसा.
आधी आता थोडं इकडच्या शाळांविषयी सांगते. अमेरिकेत साधारण ९०% मुलं पब्लिक शाळांमध्ये जातात. पब्लिक शाळा K -१२ म्हणजे किंडरगार्डन ते बारावी पर्यंत असतात. तर ह्या शाळा, एलिमेंटरी स्कूल K -५, मिडल स्कूल ६-८, आणि हाय स्कुल ९-१२ वी अशा असतात. त्यांचा खर्च मुख्यत्वे फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि स्थानिक टॅक्सेस असे तिघे मिळून उचलतात. एका स्कुल डिस्ट्रिक्ट च्या एरियात साधारण ८-१० एलिमेंटरी शाळा आणि ३-४ मिडल स्कूल असतात. हाय स्कुलचे स्कूल डिस्ट्रक्ट वेगळे असते. एका डिस्ट्रक्ट मध्ये ४-५ हाय स्कुल्स येतात. प्र्त्येक शाळेची एक बॉउंडरी असते आणि त्या एरियात राहणाऱ्या मुलांनाच त्या शाळेत ऍडमिशन मिळते.
ह्या सगळ्या शाळांना १-१० मध्ये ग्रेट स्कुल रेटिंग असते. १० म्हणजे अत्यंत उत्तम शाळा. तर हे रेटिंग दर काही वर्षांनी बदलू शकते. मुलांची आभ्यासातील तयारी, प्रगती, ऑफर केलेले विषय अशा बऱ्याच निकषांवर हे रेटिंग्स दिले जातात.
म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल, की इकडे चांगल्या शाळेत जायचं असेल तर त्या शाळेच्या बाऊंड्री एरियामध्ये तुमचं घर असावं लागत. साहजिकच चांगल्या शाळेच्या एरिया मध्ये घराच्या किमती आणि भाडी खूप जास्त असतात.
आम्ही आधीच इकडे राहणाऱ्या मित्र मैत्रिणीना विचारून ही माहिती मिळवली होती. त्यानुसार गुगलवर search करून चांगली शाळा, त्या एरियातील चांगली आणि परवडणारी घरे शॉर्टलिस्ट करून मग हे आताचे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. फक्त कधी कधी मिड इयर ऍडमिशन असली आणि शाळा खूपच डीमांडमध्ये असेल तर मग ते तुम्हाला दुसऱ्या शाळेत जिथे सीटस अव्हेलेबल असतील तिकडे पाठवू शकतात. त्यामुळे थोड टेन्शन होतच.
तर आम्ही सकाळी साधारण नऊच्या दरम्यान स्कुल डिस्ट्रिक्टच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. त्यांना जरुरी असलेली कागदपत्रे दाखवली, जस की, पास्पोर्ट्स, अड्रेसप्रूफ .
“येल्लो कार्ड ?” त्या क्लार्क ने विचारले
“आता ते काय असतं ?” एव्हढा सगळा होमवर्क करून आलो आणि हे येलो कार्ड कस माहित नाही आपल्याला? वगैरे वगैरे विचार येण्याआधीच तिने आम्हाला थोडक्यात सांगितलं .
इथे बाळ जन्माला आलं कि त्याच येल्लो कार्ड बनवतात, त्यात जन्मापासून सगळ्या लसी, इंजेकशन ह्यांची नोंद असते. शाळेत जायच्याआधी सगळ्या आवश्यक लसी घेतल्यात ना हे तपासायचे आहे. शिवाय टीबी टेस्ट करून घ्यायला लागेल. हे सर्व झाल्याशिवाय शाळेत नाही जाता येणार.
पण इतर कागदपत्रे असल्यामुळे तिने आम्हाला , म्हणजे आमच्या मुलांना ऍडमिशन दिली असल्याचे सांगितले.
“वा!” खरं तर ऍडमिशनचे फॉर्म्स, वेटिंग लिस्ट, interviews, झालच तर डोनेशन, डिपॉझिट, भरमसाठ फी काहीही कटकटी न होता अर्ध्या तासात हव्या त्या शाळेत ऍडमिशन मिळाली ह्यावर विश्वासच बसत नव्हता.
“झालं … अर्धा गड तरी सर झाला” ह्या आनंदात आम्ही घरी आलो.
पण आता खरी गोम होती ते येल्लो कार्ड कसं बनवायचं ? टेस्ट कुठून आणि कशी करायची ? इंजेकशन कुठे घ्यायची?
परत गूगलला कामाला लावल्यावर, १५-२० फोन केल्यावर आणि त्यामागे अर्धा दिवस घातल्यावर आम्हाला शेवटीचं एक क्लिनिक मिळालं, जे घरापासून ३-४० मिनिटांच्या (ड्रायविंग) डिस्टन्स वर होतं, त्यांची दुसऱ्या दिवशीची चार वाजताची अँपॉन्टमेन्ट मिळाली ती घेतली.
दुसऱ्या दिवशी दुपारी बरोबर चार वाजता ते ऑफिस ( डॉक्टरांच्या क्लिनिकला इकडे ऑफिस म्हणतात’) गाठलं. मग आमच्या कडच्या जुन्या फाइल्स बघून त्यांनी ते येल्लो कार्ड बनवले. त्यात त्यांना एक-दोन लशी मिसिंग असल्याचे वाटले. त्या लशी ताबडतोब मुलांना दिल्या. त्यांची टीबी टेस्ट केली. आणि आमचे तत्कालीन इन्शुरन्स हे कव्हर करत नसल्याने ३००-४००डॉलर्स ( २१-२८००० रुपये ) नी आमचा खिसा हलका केला.
तरी आता आम्ही आमच्या पसंतीच्या (म्हणजे १० रेटिंग असलेल्या ) शाळेत जायला मिळणार म्हणून खुशहोतो. तर मुले सुद्धा उद्या नवीन शाळेत जायचं, ती शाळा कशी असेल, टीचर्स कसे असतील, नवीन मित्र मिळतील ना ह्या उत्साहात रममाण होती.
पुढच्या भागात शाळा, शिक्षक, वर्ग , विषय यांविषयी जाणून घेऊ या.
क्रमश:
छान लिहिताय.
छान लिहिताय.
{अमेरिकेत साधारण ९०% मुलं पब्लिक शाळांमध्ये जातात}
हे किती छान आहे!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अमेरीकेच्या शाळांबद्दल
अमेरीकेच्या शाळांबद्दल तिथल्या मित्रमैत्रीणींकडून हे माहीत होते. छान सिस्टीम आहे. शालेय शिक्षणाची चिंता मिटते असे ते सांगत होते. पण उच्चशिक्षण महाग पडते तिथे. तेव्हा मुलांना घराबाहेर पडावे लागते.
खूप छान मालिका ! छान
खूप छान मालिका ! छान हलकेफुलके तरीही रोचक लिहीत आहात.
{अमेरिकेत साधारण ९०% मुलं पब्लिक शाळांमध्ये जातात}
उरलेली 10% मुले कशा प्रकारच्या शाळेत जातात ?
छान लिहिलंय. यल्लो कार्ड हे
छान लिहिलंय. यल्लो कार्ड हे तुम्ही राहाणार्या स्टेट ची गरज असेल. आम्ही डॉक्टरचे सर्टिफिकेट घेउन गेलो होतो त्यामुळे त्यान्ही काही विचारले नाही. ज्या काही लशी घेतल्या न्हवत्या त्या कंपनीचे इन्शुरन्स मिळाल्यावर फुकट घेतल्या.
उरलेली 10% मुले कशा प्रकारच्या शाळेत जातात ?
खाजगी शाळेत जातात, home schooling करतात. खाजगी शाळेची फी खुप जास्त असते, १० वर्षापुर्वी साधारणतः $३०००० होतआ, बसचे वेगळे.
((खाजगी शाळेत जातात, ))
((खाजगी शाळेत जातात, ))
भारतात सरकारी शाळांमधले मोफत शिक्षण सोडून खाजगी शाळेत सशुल्क प्रवेश घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे मुख्य कारण इंग्रजी माध्यम, विदेशी बोर्डाचे शिक्षण आणि त्या शाळांच्या दर्जेदार भौतिक/शैक्षणिक सुविधा ,मनुष्यबळ व आकर्षक सहशालेय उपक्रम हे आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणत्या कारणासाठी खाजगी शाळांचा पर्याय निवडला जातो ?
बरीच कारणे असतात. चार
बरीच कारणे असतात. चार महत्वाची कारणे....
१> तुमच्या school district मधली शाळा चांगली नसेल आणि घर बदलायचे नसेल.
२> पैसा / स्टेटस
३> धार्मिक शिक्षण देण्यार्या शाळा.
४> खाजगी शाळा आपल्या सिलॅबस घेउ शकतात . जसा की कॅब्रिज, आय बी. मी ज्या स्टेट मध्ये होतो त्या ठिकाणी ह्या दोन्ही सिलॅबसच्या खाजगी शाळा होत्या. आमच्या ओळखीच्या काही देशी डॉक्टरानी चांगला सिलॅबस मिळतो म्हणुन खाजगी शाळेत घातले होते.
@ साहिल
@ साहिल
चांगली माहिती, धन्यवाद !
<<अमेरिकेसारख्या प्रगत देशात
<<अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणत्या कारणासाठी खाजगी शाळांचा पर्याय निवडला जातो ?>>
वर दिलेल्या फायद्यात आणखी एक.
सहसा या शाळेत राजकारणी, उद्योगपती अश्या लोकांची मुले असतात. त्यांच्या ओळखी लहानपणापासून असल्या की पुढे फार फायदा होतो.
मी १९६७ साली मास्टर्स करत असताना निरनिराळ्या कंपनीचे लोक नोकरी वर सिलेक्ट करण्यासाठी येत. त्यांचा महत्वाचा प्रश्न तुमच्या काही राजकीय किंवा औद्योगिक समूहात ओळखी आहेत का? कारण तुम्हाला इंजिनिअरिंग येते हे उघड आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे वशिला पाहिजे.
अमेरिकेतहि तेच. काही फरक नाही. लॉबीइस्ट म्हणजे काय? भक्कम मजा असते त्यांची. क्वालिफिकेशन एकच - ओळख.
लॉबीइस्ट म्हणजे काय? भक्कम
लॉबीइस्ट म्हणजे काय? भक्कम मजा असते त्यांची. क्वालिफिकेशन एकच - ओळख.≤<<<< त्याच्यावर्तीच तर ह्यांची बरीच धोरणे अवलंबून असतात. सगळं पद्धतशीर केलय त्यांनी.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणत्या कारणासाठी खाजगी शाळांचा पर्याय निवडला जातो? <<<<<अजून एक कारण म्हणजे त्यांचा अभ्यासाचा आवाका जास्त असतो, काठिण्य जास्त असते, असं साधारण त्यांचे पालक म्हणतात.
आणि त्यांना सहज परवडण्यासारखे असते.
आमच्या ओळखीत काही लोकांनीं प्रायव्हेट मधून punlicla घातले पब्लिक मधून परत प्रायव्हेट का घातले.
यल्लो कार्ड हे तुम्ही राहाणार्या स्टेट ची गरज असेल.<<<<<असेल त्या बाईंनी आम्हाला अशी जाणीव करून दिली की हा इथल्या सिस्टिमचा भाग आहे.
उच्चशिक्षण महाग पडते<<< खूप जास्त
लेख वाचल्या बद्दल आणि
लेख वाचल्या बद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
वाचतोय
वाचतोय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
वाह!! आवडले.
वाह!! आवडले.
अनिंद्य , SharmilaR ,
अनिंद्य , SharmilaR , सामो, धन्यवाद!
भारी लिहिलंय. तुमच्या
भारी लिहिलंय. तुमच्या लशीकरणाच्या कार्डचं वाचून पुलंच्या अपूर्वाईमधला प्रसंग आठवला. ते परदेश प्रवासाच्या आधी हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये कॉलराचं इंजेक्शन घ्यायला गेले होते.
'कुठे जायचं आहे?'
'कॉलर्याला ....'
'काय?'
'.. हे .. आपलं ... इंग्लंडला.'
'बरं. पासपोर्ट?'
कॉलर्याचं इंजेक्शन घ्यायला सोबत पासपोर्ट लागतो हे कुणीही सांगितलेलं नव्हतं.
छान लिहिताय. आवडलं.
छान लिहिताय. आवडलं.
स्कुल डिस्ट्रिक्ट ची पद्धत
स्कुल डिस्ट्रिक्ट ची पद्धत वेगवेगळ्या स्टेट्स मधे वेगवेगळी आहे. ग्रेट स्कूल रँक ही ऑफिशियल गोष्ट नाही. ते एक nonprofit organization आहे. स्टेट्स चे इंटर्नल स्वतःचे रँकिंग पण असते.
चार्टर स्कूल हा पण एक शाळेचा प्रकार असतो नि त्याची पद्धत स्टेट नुसार बदलते.
स्टेट्स चे राहू द्या
स्टेट्स चे राहू द्या, मुन्शिपाल्टी ते मुन्शिपाल्टी नियम, कायदे (bylaws) वेगवेगळे असतात.
कपाळ बडवणारी स्मायली कल्पावी !
अमेरिकेतील शाळांच्या
अमेरिकेतील शाळांच्या फंडिंगबद्दल माहिती शोधत होतो. ४४ % फंड प्रॉपर्टी टॅक्समधून येतो. फेडरल गव्हर्नमेंट खूप कमी म्हणजे ८% भार उचलतं असं दिसलं.
म्हणजे ज्या भागात प्रॉपर्टीचे दर चढे तिथे शाळांवर अधिक खर्च होणार. त्या चांगल्या ठरणार. आणि चांगल्या शाळा आहेत म्हणून त्या भागातल्या प्रॉपर्टीला मागणी असणार आणि vice versa असं होतं का?
हो.
हो.
यामुळेच अमेरिकेत शाळांत देसी आणि एशियन बहुल भांगांत प्रचंड सेग्रिगेशन होते. चांगल्या शाळा, देसी/ एशियन लोक त्या शाळांच्या झोन मध्ये घरं घेणार, त्या शाळा आणखी चांगल्या होणार, इतर अनेकांना तिकडे घरं घ्यायला परवडणार नाही. डायव्हार्सिटी नाहीशी होणार. मग अनेक चांगले कमावणाऱ्या देसी पालकांना ही तिकडे घरं परवडणार नाहीत, मग ते प्रायव्हेट स्कूल्स ना टाकणार कारण तिकडच्या दोन मुलांच्या १२ वर्षाच्या फी पेक्षा कूपरटिनो बाहेर रहाणे स्वस्तात पडते. मग खाजगी शाळांचे पेव फुटणार. तिकडे ही डायव्हरसिटी नाहीच. आणि देसी एशियन पालक rat रेस चालू करणार... हा सापळा आहे, जो avoid करायला तर अमेरिकेत आलो. हे अर्थात सगळीकडे नाही, मोठ्या शहरात जास्त करून असेल.
हो
हो
याचा आणखी एक परिणाम म्हणजे ज्या भागात कृष्णवर्णीय जास्त आहेत तिथल्या घरांच्या किमती कमी असतात, आपसूकच प्रॉपर्टी टॅक्स कमी असतो. मग शाळांना बजेट कमी मिळते, शाळांची क्वालिटी घसरते, मुलांना नीट शिक्षण मिळत नाही, व हे दुष्ट्चक्र होते.
आणि देसी एशियन पालक rat रेस
आणि देसी एशियन पालक rat रेस चालू करणार... हा सापळा आहे, >> +१००
त्यात कुमॉन आणि रशियन मॅथ सारखे क्लासेस अॅड करा. ह्यांचे पार्किंग लॉट्स एशियन टायगर पेरेंट्स च्या गाड्यांनी सतत वाहत राहतात. अगदी शनिवारी सुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून क्लासेस.
कुमॉनची जाहिरातबाजी ज्यात हताश पालकांना कुमॉन ने कसे तारले ह्याचे विडिओ असतात, ते पाहून तर त्या पालकांच्या मुलांची कीव यायला लागते.
हो भरत.
हो भरत.
जर स्कूल डिस्ट्रिक्ट चांगले असेल तर घरांच्या किमती वाढून बसतात. कारण तुम्ही जिथे रहाता तिथेच शाळेत घातलं तर स्कूल बसची सोय व इतर सवलती वगैरे असतात. आम्ही तर घरही स्कूल डिस्ट्रिक्ट रेटिंग बघून घेतलं. आमच्याकडे डायव्हर्सिटी नाही. (६४%गोरे,३५%हिस्पॅनिक) बाराशे मुलांत माझा मुलगा एकटाच देशी होता, रेसिझमचा अनुभव नाही. शिवाय आम्ही इतके बावळट आहोत की आम्हाला लवकर लक्षात येत नाही.
पण इथली शाळा अतिउत्तम आहे, शाळेला फन्डिग भरपूर आहे, म्हणून घेशील किती दोन कराने इतके कोर्सेस उपलब्ध आहेत. थिएटर, कलिनरी, क्वायर, कार्पेन्टरी, इंजिनिअरींग, न्युट्रिशन, ओशन सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी , फॅशन डिझायनिंग, जगातल्या जवळजवळ प्रत्येक कोर्सचे endorsement आमच्या शाळेत नववीपासून available आहे. त्यातून जो हवा तो करिअर पाथ निवडून स्वतःची आवडनिवड जोखता येते. काऊन्सलर मुलांना बोलत उत्तेजन देत रहातात म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा काही तरी करून दाखवावे वाटेल. अर्थात हे एक उच्चभ्रू स्कूल डिस्ट्रिक्ट आहे, इथे प्रचंड सेक्युरिटी व पोलीस दिसत रहातात. युवाल्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर अधिच वाढवलेली आहे. युवाल्डी गरीब स्कूल डिस्ट्रिक्ट होते.
ट्रंपने कंप्युटर सायन्स वर पैसा खर्च केला होता. कारण टेक्सास त्याचं वोटर राज्य आहे. मिशेल ओबामांनी कॅफेटेरियात हेल्दी पर्याय ठेवले होते, म्हणजे मुलांना चांगले पर्याय रहावेत. ओबामाज् गेले की बर्गर- फ्राईज परत आले. आमच्या शाळेत गणितावर जास्त भर असावा अशी शिक्षणपद्धती आहे असं मला वाटतं. कॅनडात इंग्रजीवर भर होता, पण हे दोन्ही फायदे मुलाला मिळाले. आम्ही कुमॉन वगैरे काहीही लावलं नाही मीच घरी घेतला अभ्यास.
आमच्याकडे डायव्हर्सिटी नसल्याने व शाळा उत्तम असल्याने कुमॉन/अबॅकस/ट्युटरींग वगैरे बंद पडले, इथं कुणीही कुठल्याही अशा अभ्यासाच्या क्लासला जात नाही. शाळा इतर राज्यांपेक्षा एक पिरियड जास्त आहे. प्रचंड अभ्यास असतो पण पालकांवर काही ताण नाही. किंवा मी तरी घेत नाही.
आमच्याकडे bay area migration
आमच्याकडे bay area migration चालू झाल्याने प्रचंड प्रमाणात देसी आणि एशियन जनता वाढली आहे. परिणामी माझ्या धाकट्या मुलीच्या Montessori वर्गात 100% देसी एशियन मुले आहेत. जराही diversity नाही kg मधली काही मुले kumon la जातात म्हणे. त्यांच्या आया स्टेटस वर मुलांचे सर्टिफिकेट लावतात. अरे देवा (कपाळावर हात)
वरचे सगळे मुद्दे आम्ही गेली
वरचे सगळे मुद्दे आम्ही गेली दोन वर्षे जवळून अनुभवतोय.
दोन वर्षांपूर्वी आम्ही फक्त एक ब्लॉक सोडून अजून चांगले स्कूल डिस्ट्रक्ट म्हणून cupertino स्कूल डिस्ट्रिक्ट मध्ये आलो.
आणि जाणवलं दुनिया उलट्याची पलटी झाली.
आधीच्या शाळेत मुलं गणितात एक लेव्हल पुढे जायची, काही मुल RSM करायची. इन general रिलॅक्स असायची, खुश असायची. इकडच्या मिडल शाळेत त्यांना थोडेफार electives होते.
पण ह्या नवीन डिस्ट्रिक्ट मध्ये बरीचशी मुलं दोन लेव्हल्स पुढे आहेत , वर्ल्ड language middle स्कूल पासूनच घेऊ शकतात.
इकडच्या मिडल स्कूल्स ला इतके जास्त इलेक्टिव्हस आहेत, वरती अस्मिताने सांगितल्या प्रमाणे wood वोर्कशॉप, मीडिया प्रोडूक्शन , drama , financial लिटरसी, reasearch प्रोग्रॅम्स ....खूप सारे आफ्टर स्कूल clubs, स्पोर्ट्स आणि सगळं एकदम कॉम्पिटिटिव्ह.
आणि हाय स्कुल, आम्हाला नंतर कळलं कि इथे एक ब्लू रिबन स्कूल्स म्हणतात त्यातले आहे. त्यांचा एकच ध्यास दिसलं मूल कि त्याला तासून काढ. bio , physics , chemistry , math . history , इंग्लिश म्हणाल त्या विषयात AP आणि HNs classes घेतात मुलं.
मग मीटिंगना ह्यांच्या पालकांचे प्रश्न, "जुनिअरलाच शाळेत शिकवत असणाऱ्या गणिताच्या सगळ्या लेव्हल्स संपून गेल्यात, आता काय कार्यच आमच्या मुलांनी ?" कितीतरी मुलं सिनियर ला त्यांचे सगळे कलासीस करून संपल्यामुळे शाळा न करता कॉलेज मध्यच जातात. त्याला मिडल कॉलेज म्हणतात.
IIT prep च जस वर्णन ऐकतो (कोटा फॅक्टरी ) तास तासन्तास अभ्यास करत असतात.
शाळेत मुख्याध्यापक, counselors कौतुकाने सांगत असतात आमच्या मुलांना झोप मिळाली पाहिजे, त्यांना माहित असत कि मुलं रात्री नित्यनेमाने १-२ ला झोपतात.
स्पोर्ट्स टीम मधली मुलं रोज २-३ तास शाळेनंतर प्रॅक्टिस करतात, सकाळी आठ ते रात्री आठ. मग घरी जाऊन अभ्यास.
मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीतच पुढचा अभ्यास शिकून येतात, त्यामुळे शाळेत खूप फास्ट जातात. पण ह्यांचं सगळं आधीच झालेलं असत शिकून. फक्त गणित नाही सगळ्या विषयांसाठी असच.
अमेरिकेत ट्युशन ही गोष्ट सर्रास आढळत नाही अपवाद ह्या अशासारख्या शाळा.
आणि हे कलासीस चालवणारे सगळे IIT ians . PHD झालेले लोकं पण हाय स्कूल ना शिकवतात, कलासीस घेतात.
सगळं overwhelming वाटलेलं.
आणि शाळेची demography बघितली
आणि शाळेची demography बघितली तर <१% स्पॅनिश / ब्लॅक , <१२% white , बाकी सगळे Asian ( सौथ asians , चिनी, japnese , korean इतकं )
आणि शाळेची demography बघितली
सगळं overwhelming वाटलेलं. >> छ्या! फारच लवकर थकलात बाई तुम्ही.
आणि शाळेची demography बघितली तर <१% स्पॅनिश / ब्लॅक , <१२% white , बाकी सगळे Asian ( सौथ asians , चिनी, japnese , korean इतकं ) >> AP कमी की काय म्हणून ड्युअल एनरोलमेंट सुद्धा घ्यायचे. हायस्कूल मध्ये असतांनाच कॉलेजचे विषय घेऊन परीक्षा देऊन टाकायच्या आणि पालकांचे वेळ व पैसा दोन्ही वाचवायचे. मग वेळ आहे म्हणून फेन्सिंग, एक्वेस्ट्रिअन, सेलिंग अशी जगावेगळी महागडी स्पोर्ट्स निवडून त्या फ्रंटवर सुद्धा काँपिटिटिव रहायचे. तेवढेही कमी काय... make world a better place बनवण्यासाठी नॉन प्रॉफिट्स चालू करून काँटॅक्स आणि नेटवर्क वापरून ईफ्ल्युएन्शिअल लोकांकडून देणग्या मिळवत ती एखाद्या हॉस्पिटल वगैरेला देऊन त्यांच्याकडून मोठ्ठे रिकमेंडेशन मिळवून फ्युचर लीडर म्हणून केस स्ट्राँग करायची. ह्यात पुन्हा एखाद्या स्टार्टअपच्या ऑपरेटिंग कमीटीवर नाव लाऊन ते सुद्धा अॅप्लिकेशमध्ये अॅड करायचे. आणि हो दोनेक महिने अफ्रिका किंवा भारत, विएतनाम वगैरे मधल्या मागास भागात कंबर कसून काम सुद्धा करून यायचे. पुन्हा एखादे प्रेसिडेंशिअल ईलेक्शन आले की एखाद्या नेत्यासाठी काम करून तिथेही अनुभव आणि नेटवर्क कमवायचे.
आणि हो ह्या सगळ्या प्रवासाचे यूट्यूब ईन्स्टावर व्लॉग्ज करून मिळालेले लाईक्स आणि व्यूज सुद्धा कॉलेज अॅप्लिकेशमध्ये लिहायचे असतात बरं.
आणि हे सगळं कमावलं की पोरगी/पोरगं स्वीट/सुपर सिस्क्टीन येण्याआधीच फुल स्कॉलरशिप घेऊन स्टॅनफर्ड, बर्कली सहित मल्टिपल आयवी लीगचे अॅडमिट्स हातात घेऊन... 'आता कुठं कुठं जाऊ मी नांदायला' म्हणून डोक्याला हात लाऊन बसलेला आहे अशी स्वप्न सतत पडत असतील ह्या टायगर पॅरेंट्सना असे मला वाटते.
मी अश्विनी, खरं आहे.
मी अश्विनी, खरं आहे.
एक्सट्रा कररिक्युलर मध्ये एक बर्कलीचा मुलगा => २०० तास वगैरे गरजू मुलांना रोबोटिक्स शिकवून सोशल सर्विस केली. आणि एक वर्ष आधीच
कॉलेज ऍडमिशन घेतली
हो ड्युएल एनरोलमेंट तेही एक आहेच.
मी असाही बघितलंय की आईवडील त्यांच्या सोशल एनगेजमेंट्स, सगळा वेळ मुलांचं सोशल सर्विस आणि एक्सट्रा कॅर्रीक्युलर तयार करायला खर्च करतात, कॉलेज ऍडमिशन साठी. आता तुम्ही विषय काढलात तर सांगते असही बघितलंय
-अक्ख नाटक बसवायचं आपल्या मुलाला १०/११ वीच्या समर मध्ये असिस्टंट डायरेक्टर कॉलेज रेझुमे टाकता यावं म्हणून
- क्रिकेट क्लब चालवायचे , इकडे क्रिकेट जास्त पॉप्युलर नाही, मग आपल्या मुलाला वर वर चढवायचे आणि ते प्रोजेक्ट करायच नॅशनल लेवल स्पोर्ट खेळला म्हणून
दोनेक महिने अफ्रिका किंवा भारत, विएतनाम वगैरे मधल्या मागास भागात कंबर कसून काम सुद्धा करून यायचे. <<< त्यात पण चायना मध्ये ते असे प्रोजेक्ट्स विकत घेतात असं कुठेतरी वाचनात आलं होतं
पुन्हा एखादे प्रेसिडेंशिअल ईलेक्शन आले की एखाद्या नेत्यासाठी काम करून तिथेही अनुभव आणि नेटवर्क कमवायचे.<< हे मी अनुभवले. पालक खूप पुश करत होते इतर पालकांना.... मुलांना टाका ह्यात, बेस्ट संधी आहे वगैरे
वाचतोय सिरीज. छान लिहीले आहे.
वाचतोय सिरीज. छान लिहीले आहे. आमचेही काही वर्षांपूर्वीचे अनुभव आठवले. मात्र आम्ही दोन राज्यांमधे शाळांचा अनुभव घेतला असल्याने दोन्हीत खूप फरक जाणवला.
शाळांचा दर्जा, जागेच्या किमती व डेमोग्राफिक यांचे परिणाम अमेरिकेत सर्वत्रच आहेत. पण बे एरियामधे किमान ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत ते अगदी टोकाचे होते. साउथ बे मधल्या प्रचंड देशी व इथे ज्याला "एशियन" म्हणतात (चायनीज, कोरियन, व्हिएटनामीज, जपानी ई) अशा लोकांनी भरलेल्या भागांपैकी एकच स्कूल डिस्ट्रिक्ट हा चांगला समजला जायच (कुपर्टिनो). त्याच्या सीमारेषांमधल्या जागांना प्रचंड मागणी असे (अजूनही आहे). त्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांमधे शाळा अगदी काही सगळ्याच वाईट नव्हत्या, पण पब्लिकला हाच स्कूल डिस्ट्रिक्ट हवा असे. या "पब्लिक" मधे आम्हीही होतो
पण आता असे ऐकले की हे डेमोग्राफिक आजूबाजूला पसरल्याने आजूबाजूचे अनेक स्कूल डिस्ट्रिक्ट्स आता चांगले झाले आहेत. कुपर्टिनो मधे एका मर्यादेनंतर घरेच उपलब्ध नसल्याने लोकांना इतरत्र राहावेच लागले व त्यामुळे आपोआप ते स्कोअर्स उचलले गेले.
त्यामानाने इतर राज्यांतील देशीबहुल भागांत सुद्धा वस्त्या विखुरलेल्या आहेत. त्यामुळे बर्याच शाळा चांगल्या आहेत. तेथे लोकसंख्याही डायव्हर्स असल्याने सगळे कुमॉन टाइप पब्लिक आहे असेही नसते.