*माझे जो रा सिटी हायस्कूल चे अनूभव*
माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा. पाचवी चे मूलं बारीक नी सडपातळ असल्याने गेट खालून निघून जायचे. पण मोठ्या मुलांना गेट वर चढून मग पलीकडे ऊडी मारावी लागायची. एकाच वेळी दहा लोक पलिकडे ऊडी मारायचे त्यांच्या मागे आणखी दहा वर चढत असायचे. बर्लीन ची भिंत ओलांडावी असे वातावरण असायचे. शंभर दिडशे मुलं एकदम गेट वर तुटून पडल्यामुळे यंत्रणा कोलमडायची. प्रचंड धुळ ऊडायची. गेट वरून पलीकडे ऊडी मारनार्यांकडे स्टेज वरील पाहुणे नाकाला रूमाल लावून पहात असायचे. दोन चार मास्तर लाठ्या काठ्या घेऊन त्या गर्दीत घुसायचे. खुप उडत असलेल्या धुळीत अंधाधूंद लाठीमार करायचे. पांढरे कपडे घातलेले मास्तर धुळीने काळे व्हायचे, गर्दीतून खोकलत बाहेर पडायचे. जे गेट क्राॅस करण्यात अयशस्वी झाले त्यांच्या वर प्रचंड लाठीचार्ज करून कार्यक्रमस्थळी बळजबरीने चांगले विचार एकवण्यासाठी बसवले जायचे. पाठ चोळत पुन्हा युध्दभूमीवर परतनारे मिळेल ती जागा पकडून बसायचे.
प्रमुख पाहुण्यांचं नेहमी एकच भाषण असायचं “हे जे गेट कुदुन पळाले ना. हे आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीत, यशस्वी हे समोर बसलेलेच होतील.” (जे गेट कूदण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत ते जीवनात काय डोंबलं यशस्वी होनार होते?)
ह्या सर्वात गेट कूदून पळनार्यांची काहीही चूकी नसायची. कारण ३ वाजता सुरू झालेला कार्यकर्म पाच वाजताच संपेल ह्याची काहीही शाश्वती नसायची. घ्यायला आलेल्या रिक्षा पाच वाजताच निघून जायच्या. प्रमूख पाहूना एकदा सूसाट सूटला तर तो सहापर्यंत देखील भाषणंच करत असायचा. विद्यार्र्थ्यांच्या गैरसोयीशी त्याला काही देणंघेणं नसायचं. रिक्षा गेली तर घरापर्यंत पायपीट करावी लागेल हे ओळखून मूलं जीवावर ऊदार होऊन गेट कूदायचे. चांगले विचार ऐकण्यापेक्षा पायपीट न होणे महत्वाचे आहे हा प्रॅक्टीकल विचार त्या मागे असायचा.
मी कधी हे करायचो नाही. कारण आम्ही हिस्ट्री शिटर होतो. दर पंधरा दिवस- महानाभरांत पोलिस स्टेशनला ( मुख्याध्यापक कॅबीन) भेट असायचीच. त्यामुळे जवळपास सर्व शिक्षक नावानीशी ओळखायचे. गेट कूदताना एखाद्या ओळखीच्या मास्तरने पाहीलं तर दुसर्या दिवशी प्रचंड धुलाई व्हायची. तसंच आमची वर्गशिक्षीका पाचशे मूलांच्या गर्दीत मी नाही हे परफेक्ट ओळखून दुसर्या दिवशी रपारप पाठीत फटके मारायची. शिक्षा डिस्ट्रीब्यूट व्हावी म्हणून गेट कूदताना एखादा वर्गमित्र दिसला असेल तर प्रामाणीकपणे त्याचं नाव सांगीतलं जायचं.
- अमरेंद्र बाहुबली.