असे ही काही दिवस असतात !! भाग १

Submitted by रेव्यु on 3 July, 2022 - 21:52

ही हकिकत पस्तिस वर्षांपूर्वीची 1988 सालची- आहे. माझ्य़ा नोकरीच्या निमित्ताने मला भारतात आणि परदेशात खूप फिरती असे. दर दोन ते तीन महिन्यांनी पायाला भोवरा लागत असे. अशाच प्रवासातील ही एक चित्तरकथा!
मी साधारण सहा आठवड्याच्या भेटीसाठी दिल्ली-पॅरिस-डेट्रॉइट-रोम-पॅरिस-दिल्ली अशा दौर्‍यावर होतो. पहिले सहा आठवडे पुर्ण करून मी रोमला पोहोचलो. दुपारी 2 ची वेळ होती अन शनिवार होता. माझे काम सोमवारी ट्युरिन जवळ (रोम हून रात्री ट्रेन ने प्रवास केल्यास 8 तास) आल्प्सच्या पायथ्याशी असलेल्या ट्रियोनी या गावात आमच्या कोलॅबरेटरच्या फॅक्टरीत माझे काम होते आणि म्हणून शनिवार रविवार रोम पहायचे आणि मग रविवारी रात्री ट्रेनने ट्युरिनला जायचे. सोमवारी काम उरकायचे, परत रात्रीच्या ट्रेनने रोमला यायचे अन सकाळी दहाच्या विमानाने रोम-पॅरिस-दिल्ली हा प्रवास करायचा कार्यक्रम होता.
मी रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-Rome-–Fiumicino International Airportचे इमिग्रेशन पार करून बाहेर पडलो अन नको असलेली मोठी सुटकेस क्लोक रुम मध्ये टाकून हातात फक्त एक बॅग घेऊन रोम गावात जायचे ठरवले. क्लोक रूम-लेफ्ट लगेज कक्षात आल्यावर ३ रात्रीचे किती पैसे लागतील ते विचारले, त्याला इंग्रजी येत नसल्याने त्याने दूरवरच्या पुसट बोर्डाकडे बोट दाखवले. त्यावर Uno(1) notti = ९00 Lira म्हणजे तीन रात्रींस 2७00 लिरा असा मी हिशेब केला. त्या काळी एक डॉलर 1300 लिरा असा दर होता. हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. त्या काळी विदेशी चलन नियंत्रित होते. दिवसाला फक्त 40 डॉलर मिळायचे. त्यात हॉटेल, वाहतूक सर्व काही खर्च करावा लागायचा. माझ्याकडे एकूण १९० डॉलर शिल्लक होते परंतु माझी सर्व तिकिटे काढून झाली होती. मला रोमच्या हॉटेलच्या 2 रात्रींचे अंदाजे 50 डॉलर, रोम साइटसीइंगचे अंदाजे ८० डॉलर व शनिवार व रविवारच्या खाण्याचा थोडा (अंदाजे 25 डॉलर) असा खर्च एकूण अंदाजे १७० डॉलरचा खर्च होता. एकंदरित थोडॆ कठीण असले तरी निभावून जाण्यासारखे होते. बॅग टाकली अन विमानतळाच्या बाहेर पडलो व रोम ते रोमा टर्मिनी मह्णजे रोम रेल्वे स्टेशन अशी बस घेतली. फक्त 1 डॉलर तिकीट होते साधारण 30 मिनिटांचा प्रवास होता. स्टेशन येताच उतरलो, जरा उकडत असल्याने कोट खांद्यावर टाकला, एका हातात ब्रीफ केस होती. स्टेशनवरच हॉटेल बुक करता येत होते. काऊंटरवर साधारण 5 मिनिटात एका रात्रीस 22 डॉलर या दराने खोली बुक केली. बरोबरच रोम बाय नाईट ही 25 डॉलर्सची (पिझ्झा डिनर समाविष्ट) टूर बुक केली. दुसर्‍या दिवशीची पूर्ण रोमची टूर 50 डॉलर्स मध्ये बुक केला. टुरचे मात्र त्याने रोख पैसे घेतले (त्या काळी फॉरेक्स क्रेडिट कार्ड्स वगैरे भारतात नव्हती-फक्त ट्रॅव्हलर्स चेक असत!).
हॉटेल अगदी जवळच असल्याचे त्याने मला सांगितले. पण झाले तर टॅक्सी करा किंवा अगदी सावधानपूर्वक जा असे तो म्हणाला. कारण जवळच युगोस्लाव अन रोमानियन भिकारी मुले सतावतील अशी त्याने मला चेतावणी दिली पण मला भिती नव्हती कारण माझा पासपोर्ट, पैसे इ. सर्व ब्रीफ केस मध्ये होते. वर फक्त 80 डॉलर ठेवले होते त्यातील 75 आताच खर्च झाले होते. हॉटेलची पेमेंट हॉटेलच्या काऊंटर वर करायची होती. मी दिलेल्या दिशेनुसार बाहेर पडलो. वाटेत त्याच्या म्हणण्याप्रमाणे खरुज झालेली अत्यंत किळसवाणी, पाहताच झिडकारावी लागतील अशी मुले भिक मागत हिंडत होती. मी त्यांना तिरस्काराने हाकलून लावले. हातातील ब्रीफकेस सुरक्षित होती, खांद्यावरचा कोट माझ्याकडेच होता त्यामुळे चिंतेचे कारण नव्हते. 10 एक मिनिटांच्या पायपीटीनंतर एका जुनाट सरदार छाप वाड्याच्या देवडीवर -होय मोठ्ठ्या देवडीवर पोहोचलो. अन ते हॉटेल होते. कोण्या एके काळच्या इटालियन सरदाराचा वाडा आता हॉटेल बनला होता पण त्याची रया आपल्या देशातील हेरिटेज प्रॉपर्टीज सारखी मुळीच नव्हती. पाच सहा रिकामटेकडे सिगरेट फुंकत बसले होते. त्यांनी माझ्याकडून 44 डॉलर्स आगावू घेतले अन मला खोली दाखवली. अगदीच खुराडे होते. बाथरुम मध्ये कबुतरांचा मुक्त संचार होता. आलिया भोगासी म्हणून झोपी गेलो कारण 6-30 वाजता रोम बाय नाइट टूर बुक केली होती. साधारण 5 च्या सुमारास जाग आली. सर्वकाही नीट आहे ना हे पाहण्यासाठी ब्रीफ केस उघडली, पैसे शाबूत होते, पासपोर्ट होता. परतीचे विमान तिकिट दिसेना! सगळी ब्रीफ केस उलटी केली. कामाच्या फाईली जीवाच्या आकांताने शोधल्या पण तिकिट दिसेना अन मग डोक्यात प्रकाश पडला की क्लोक रुम मध्ये सुट्केस ठेवताना त्याने तिकिट दाखवा म्हणून सांगितले होते अन ते मी कोटाच्या बाहेरच्या खिशात ठेवले होते. मग कोटात पाहिले तर तिकिट नव्हते. कुठेही नव्हते अन मग मला अक्कल आली की ते त्या युगोस्लाव पोरांनी पैसे असलेले कागदी पाकिट समजून उडवले असावे. माझी तर हार्टफेलची वेळ आली. कसाबसा काऊंटर वर गेलो. तो म्हणाला. एक काम करा. ही पोरं वाह्यात असतात. त्याना हवे असलेले पैसे किंवा काही मौलयवान मिळले नाही तर ते मिळलेले रागाने डस्ट बिन्स मध्ये फेकून देतात. तुम्ही हॉटेल बुक केले त्याच्या आसपासच्या कचर्‍याच्या कुंड्यात पहा शोधून! अडला हरी! काय करणार आणखी एक तास भर चक्क उकिरडा फुंकत हिंडलो, हाती काही मिळाले नाही.
हॉटेलवर परत आलो अन त्याच्याशी बोललो. तो म्हणला, आज शनिवार आहे. गावातील एअर फ्रान्सचे ऑफिस बंद आहे तुम्हाला एअरपोर्टवर कदाचित ते उघडे मिळू शकेल. अशा परिस्थितीत काय करायचे तेच सांगू शकतील, तुम्ही तिथे जा. एव्हाना 6-20 झाले होते आणि आमची रोम बाय नाइटची माझी भलतीच टूर सुरू झाली होती. पहिले 25 डॉलर्स अन बरोबरचा पिझ्झा यांना चुना लागला होता.
मी बाहेर पडलो अन रोम एअर्पोर्टची बस घेतली. नशिब म्हणजे रिटर्न ट्रिप 2 नव्हे तर दीड डॉलर्स होती. एअर्पोरट वर गेलो. तिथे तसा शुकशुकाट होता. फक्त एअर फ्रान्सच्या बाहेर एक इंटरकॉम होता व तो लावता येत होता. मी रिसिव्हर उचलता क्षणीच त्या बाईने मला सांगितले की अशा बाबतीत तिला पोलिस कंप्लेंटची कॉपी लागेल मग पुढे काय करायचे ते ती सांगेल. मी तिथलाच कागद घेतला अन एक अर्ज पोलिसांच्या नावाने जमेल तशा इंग्रजीत लिहिला. एअरपोर्टवर पोलिस स्टेशन शोधत साधारण 2 मैल पायपीट केली अन ते सापडले. आत एक बेंच होता, तिथे गुन्ह्यात पकडलेले, वैध कागदपत्रे नसलेले अशी मंडळी हवालदार साहेब बोलावण्याची वाट पाहत बसले होते. मी देखील बसलो. अर्ध्या एक तासाने मला आत बोलावले. मी त्याला खाणाखूणांनी, मोडक्या इंग्रजीत-- कारण त्याला अस्खलित इंग्रजी कळत नव्हते अन मला अस्खलित इटालियन येत नव्हते- झाली हकिकत सांगितली. महाराज दोन पेग मारून बसले होते.... त्यांच्या बदनशिबाने शनिवारची शिफ्ट मिळाली होती. शेवटी त्याला हा बहुभाषिक खेळ झेपेना अन माझ्या हातातला कागद घेतला, शिक्का मारला, सही केली अन फूट आता म्हणत त्याने परत केला. दोघेही सुटलो.
मी पुन्हा एअर फ्रान्सच्या काऊंटर वर आलो अन बोललो. त्या बाईंनी माझ्या दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटला फोन लावायला सांगितले आणि त्याच्याकडून विनंती आल्यास मला सोमवारी ट्युरिनच्या ऑफिसात डुप्लिकेट तिकिट मिळेल असे सांगितले. काळजी करू नकाम्हणाल्या.जरा दिलासा मिळाला.
परत हॉटेलवर पोहोचलो. अन हकिकत हॉटेलच्या काऊंटरवर सांगितली- अशा प्रसंगी कुणाशी तरी बोलल्याने बरे वाटते! हॉटेलवाल्याने सर्व काही ऐकून घेतले. मी त्याला विचारले की आपल्या भारतात असते तसे काही एसटी डी बुथ वगैरे जवळ आहे का? अमेरिकेतील बूथशी जवळिक व परिचय होता. तो म्हणाला आहे, पण लांब आहे आणि तुम्हाला इटालियन नाणी लागतील. तुम्ही इथूनच दिल्लीला फोन लावा मी अगदी वाजवी पैसे घेईन. अशा वेळी माणसाने माणसाला मदत केली नाही तर काय उपयोग ? इत्यादि अन त्याच्या बाजूला त्याला होकार देणारा एक चमचा. माझा अंदाज होता साधारण पाच ते सहा डॉलर लागतील कारण भारतातून असा कॉल साधारण 100 रुपयांच्या आत व्हायचा अन तेव्हा डॉलर 16.50 रुपयांचा होता. मी माझ्या ट्रॅव्हल एजंटला फोन केला. भारतात पहाटेचे 3.30 वाजायला आले होते. खन्नाजींनी फोन घेतला, सगळी हकीकत ऐकली अन म्हणाले मी व्यवस्था करतो. तुम्हाला ट्युरिन मध्ये तिकिट मिळेल. मी फोन ठेवला अन जरा रिलीफ वाटला. फोनचे पैसे किती विचारले अन तो पठ्ठ्या म्हणाला 20 डॉलर्स. झालं! माझ्या अडचणींना अंत नव्हता! माझा हिशेब चुकत चालला होता. दिले पैसे अन खाली पिझ्झा खाऊन वर आलो
सकाळी उठलो अन मग ब्रेकफास्ट कुठे म्हणून काऊंटर वर विचारले. तो अजून जागा झाला नव्हता अन त्याची शनिवार रात्रीची मौज अजून उतरलेली नव्हती. त्याने एका मोठ्या हॉलकडे पाठवले आणि फोनवरून कुणाला तरी ’ही ब्याद कटव’ असे सांगितले असावे. मी तिथे गेल्यावर साधारण 20 25 मिनिटे शुकशुकाट होता मग आत कुठून तरी गुहेतून एक मानव कळकट्ट कपबशीत काळी कॉफी अन एक वाळका बन घेऊन आला. माझ्यासमोर आदळला अन अंतर्धान पावला. अजून शनीची सावली गेलेली नव्हती
दुसरा दिवस जरा बरा उजाडला. रोम साईट सीइंग झाले. दिवसाभरात अघटित काही घडले नाही. माझ्याबरोबर पाकिस्तान लष्कराचे 2 कर्नल या सहलीत होते. त्यांनीच माझ्या खाण्यापिण्याचा अगत्याने खर्च केला. मी देखील फारसे आढेवेढे घेतले नाहीत (अर्थातच-झाकली मूठ सवा लाखाची). ते हॉविट्झर गन्सच्या इन्स्पेक्शन साठी स्विटझर्लॅंडला आले होते हे टॉप सिक्रेट मला कळले. त्यांनीही भारत प्लेबिसाइट का मानत नाही हे मला विचारून आपल्या परीने पाकिस्तानची देशसेवा केली.
संध्याकाळी ट्रेन पकडण्यासाठी रोमा टर्मिनी स्टेशनवर पोहोचलो. स्लीपर बुक्ड होता. छान झोपेच्या तयारीत होतो अन अचानक आमच्या कूपेवर टकटक झाली अन मला एकट्याला प्लॅटफॉर्मवर उतरायला सांगितले. मी त्या ट्रेनवरील परदेशी अशा 30-40 प्रवाशांपैकी एक होतो. ट्रेनवर खून...... होय खून झाला होता.

आणखी एक भाग येतोय!!!

पिक्चर अभी बाकी है दोस्त!!!
असे ही काही दिवस असतात !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंटरेस्टींग !
वाचतोय... डोळ्यासमोर येतेय सारे

आता वाचताना मजा आली पण स्वतः वर असा प्रसंग ओढवला असता तर काय झाले असते कुणास ठाउक.
'एखाद्या रहस्यकथेसारखे उत्कंठावर्धक वाटले.
कुणातरी सुजाण कर्तव्यदक्ष नागरिकाला तुमचे परतीचे विमान तिकीट मिळाले आणि नागरिकाचे कर्तव्य म्हणून त्याने शोध घेऊन/ पोलिसांची मदत घेऊन ते तुमच्यापाशी आणून दिले ' असा शेवट असेल तर छान वाटेल.