काय? गोंधळात पडलात ना? जॉन स्नोने सनीची युक्ती वापरली? कुठली युक्ती? कुठल्या सीझनमध्ये? कुठला एपिसोड? हे काय गौडबंगाल आहे?
सांगते. सगळ्यात पहिल्यांदा हे सांगते की हा जॉन स्नो काही तो जॉन स्नो नाही काही! हा जॉन स्नो हा तो who knew nothing वाला नाही, हा तर अठराव्या शतकात होऊन गेलेला 'डॉ.' जॉन स्नो who did know things पण मग यांनी कुठली युक्ती वापरली? ती पण सनीची? आणि सनी म्हणजे नक्की कोण? सनी लिओनी? सनी गावस्कर? की सनी देओल? उलगडेल हे ही रहस्य लवकरच. अर्थात एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की लेखाचं शीर्षक अगदी लोकसत्ता स्टाईल क्लिकबेट आहे. पण आता इथे आलाच आहात तर पूर्ण लेख वाचूनच टाका की, जरा थोडीफार आकडेवारी आहे ती सहन कराल अशी आशा आहे!
ही गोष्ट आहे १८५४ ची. झालं असं, साधारण ऑगस्टच्या शेवटाला लंडन मधल्या सोहो परगण्यात कॉलराच्या साथीचा मोठा उद्रेक झाला. विशेषतः ब्रॉड स्ट्रीट या भागात ही साथ इतकी वेगात पसरली की दहा दिवसाच्या आत त्या परिसरातले तब्बल ५०० जण मृत्युमुखी पडले. या घटनेच्या दहशतीमुळे आठवडाभरात जवळपासचे सुमारे दोन तृतीयांश लोक घर सोडून दुसरीकडे निघून गेले. त्याकाळी कॉलराची साथ ही काही नवीन गोष्ट नव्हती, कॉलराच्या साथी कमीजास्त प्रमाणात कायम उद्भवत असायच्या. जॉन स्नो हे लंडनस्थित डॉक्टर होते. १८३० पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर स्नो यांनी वेळोवेळी कॉलराच्या रोग्यांवर उपचार केले होते. त्यातून त्यांनी स्वतःची निरीक्षणेही नोंदवून ठेवलेली होती.
(डॉ. जॉन स्नो १८१३-१८५८)
१८५४ सालच्या उद्रेकाची व्याप्ती तशी मोठी होती. स्नो तातडीने या घटनास्थळी पाहणी करायला गेले असता त्यांच्या असा लक्षात आले, की मुख्यतः मृत्यूंचे प्रमाण एका विशिष्ट विभागात एकवटलेले आहे. त्यांनी त्या परिसरात घडलेल्या मृत्यूंची सखोल चौकशी सुरु केली. त्यांना मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये गरीब/श्रीमंत, स्त्री/पुरुष, लहान/थोर अशा कुठच्याच बाबतीत समान धागा सापडेना. मात्र त्यांच्या लक्षात आलं, की हे सगळे मृत्यू एका विशिष्ट हातपंपावरून पाणी पिणाऱ्या घरांमध्ये झाले आहेत. त्यांनी असा अंदाज बांधला, की या साथीतल्या मृत्यूना पंपाद्वारे येणारे दूषित पाणी कारणीभूत आहे. मग त्यांनी या सगळ्या मृत्यूचा मग एक भौगोलिक नकाशा तयार केला. विशेष म्हणजे त्यांनी अपवादांचीही काळजीपूर्वक नोंद केली.
त्यांना दिसलं, त्या परिसरातल्या एका दारूच्या भट्टीत काम करणाऱ्या कोणाचाच मृत्यू झालेला नाही. शिवाय आणखी एक व्यक्ती जी या ब्रॉड स्ट्रीट परिसरापासून लांब राहत होती, तिच्याही मृत्यूची त्यांनी दखल घेतली. मात्र या दोन्ही अपवादांनी त्यांच्या संशयाला (गृहीतकाला) पुष्टीच मिळाली. दारूभट्टीतले कर्मचारी त्यांच्या स्वतंत्र विहिरीतले पाणी पीत होते, तर लांबचा रहिवासी त्या आठवड्यात काही कारणास्तव या भागात आला असून तेथील पाणी त्याने प्यायले होते. इतरही काही अशाच अपवादांची त्यांनी रीतसर तपासणी केली असता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ब्रॉड स्ट्रीट च्या हातपंपावरचे पाणी या साथीत गंभीर आजारी पडलेल्या माणसांनी प्राशन केल्याचे डॉ. स्नो यांना आढळून आले. स्नो यांनी तातडीने संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना सांगून ब्रॉड स्ट्रीट वरच्या हातपंपाचे हॅण्डल तोडून तो निकामी केला. (कळलं? हातपंप, आणि सनी देओल? अहो हेच ते! फुल्ल सनी देओल श्टाईल! ... बरं ठीक आहे. अगदी इतका ड्रॅमॅटिक नसला तरी चालवून घ्या, आधीच सांगितलं होतं की नाही शीर्षक क्लिकबेट आहे म्हणून??) याने झाले काय, की साथीच्या उगमाचा समूळ नायनाट केला नाही तरी अधिक मृत्यूंना आळा बसला, कारण आता त्या पंपावरून कोणीच पाणी पिऊ शकणार नव्हते.
(स्रोत: Essential Epidemiology 4th Edition: Webb et al.)
वरच्या आलेखात अगदी स्पष्ट होतंय की हातपंप निकामी केल्यापासून तिथे मृत्यूंचे प्रमाण घटत गेले. आता तुम्ही म्हणाल की पंप निकामी करण्याआधीच तर मृत्युदर खाली आलेला दिसतोय, त्यात आपल्या हिरोचं काय कर्तृत्व? पण असं बघा, भयापोटी तिथल्या बऱ्याचशा लोकांनी आधीच पलायन केले होते त्यामुळे मुळात तिथे लोक कमी राहिले होते. जे उरले होते त्यात मृत्यूचा दर वाढला नाही हे सगळ्यात महत्त्वाचे!
अर्थात गोष्टीतल्या हिरोला अडचणी आल्या नाहीत तरच नवल! त्यावेळी त्यांच्या 'दूषित पाण्याच्या सेवनाने कॉलरा होतो' या अनुमानाला सहजी मान्यता मिळाली नाही.
त्याचं काय आहे, की १९ व्या शतकापर्यंत युरोपात मियाझ्मा थिअरी प्रचलित होती. म्हणजे काय, तर बऱ्याच आजारांचे मूळ हे काही विशिष्ट कारणामुळे झालेली दूषित/दुर्गंधित विषारी हवा आहे असे मानले जाई. उदाहरणार्थ सडलेले/ कुजलेले प्रेत, सडलेला भाजीपाला, सांडपाणी, इत्यादींच्या दुर्गंधामुळे हवा विषारी होते आणि या विषारी हवेमुळे माणसे आजारी पडतात. नुसत्या एखाद्या पदार्थाच्या (उदा. बीफ वगैरे) वासाने माणसाला लठ्ठपणा येतो यावर लोकांचा गाढ विश्वास असे (त्यासाठी सगळ्यांची कुंभ रास - कुंभ लग्न असायची आवश्यकता नाही!) याउलट चांगली/शुद्ध हवा ही उपकारक असून उपचार म्हणून टी बी झालेल्या लोकांना हवापालटासाठी समुद्रकिनारी जाण्याचा सल्ला मिळे. (आपल्याकडेही पूर्वी काही कादंबऱ्यांत वगैरे आजारी व्यक्तीला हवापालटासाठी एखाद्या थंड व्हायच्या ठिकाणी पाठवायचे उल्लेख वाचल्याचे मला अंधुकसे आठवतात). विल्यम फार (William Farr) नावाचे समकालीन अभ्यासक, ज्यांना कॉलराचा संसर्ग कसा होतो हे जाणून घेण्यात रस होता, त्यांचा या मियाझ्मा थिअरीवर विश्वास होता.
(विल्यम फार १८०७-१८८३)
त्यांनी लंडनमधल्याच पूर्वीच्या १८४९ सालच्या कॉलराच्या साथीला बळी पडलेल्या लोकांचा अभ्यास केलेला. मात्र त्यांचा अभ्यास बऱ्याच अंशी मियाझ्मा थिअरीमध्ये तथ्य असल्याचे गृहीत धरून होता. त्यांचा असा विश्वास होता की समुद्रसपाटीपासूनची उंची आणि कॉलरामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण यांच्यात व्यस्त सहसंबंध आहे. म्हणजे समुद्रसपाटीपासून/पाण्याच्या ठिकाणापासून जागा जितकी दूर, तितके तिथे कॉलरा होण्याचे प्रमाण कमी. त्यांनी हे अभ्यासातून याचे predictive model दाखवायचा प्रयत्नही केला. खालील आलेख थेम्स नदीच्या पासूनची तुलनात्मक उंची आणि तिथे कॉलराला बळी पडलेल्यांची संख्या यांची तुलना दर्शवतो.
(स्रोत: Essential Epidemiology 4th Edition: Webb et al.)
या आलेखाकडे बघता, पुरावा सबळ मानून त्यांनी असे अनुमान काढले, की थेम्स नदीच्या जवळच्या (कमी उंच जागी) विषारी हवा जास्त आहे, ज्यामुळे मृत्यू अधिक होतात आणि जसजसे उंच ठिकाणी जाऊ तसतसे विषारी हवेचे प्रमाण कमी होऊन बळींची संख्याही घटते.
अर्थातच, डॉ. स्नो यांचे अनुमान या मियाझ्मा थिअरीच्या प्रचलित प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे असल्यामुळे त्यांना सहजी मान्यता मिळणे काही सोपे नव्हतेच. स्नो यांनी पुढील काळात कॉलरा आणि दूषित पाणी यांचा सहसंबंध अधिक बारकाईने तपासायला सुरु केला. त्याकाळी लंडन मध्ये पाइपद्वारे घरोघरी पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य कंपन्या होत्या - Southwark & Vauxhall आणि Lambeth. स्नो यांनी या दोन कंपन्यांचा पाणीपुरवठा होणाऱ्या घरांमधे कॉलरामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी तपासली. Southwark & Vauxhall कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या घरांमध्ये Lambeth कंपनीच्या घरांपेक्षा दहा पट जास्त मृत्युदर होता.
(स्रोत: Essential Epidemiology 4th Edition: Webb et al.)
अधिक तपासाअंती Southwark & Vauxhall कंपनी थेम्सच्या ज्या भागातून पाणी घेऊन पुरवठा करत होती, तिथे औद्योगिक सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले. याउलट Lambeth कंपनी शहरापासून दूर, जिथे नदीच्या पाण्यात रसायने आणि सांडपाण्यामुळे होणारे घटक अत्यल्प होते अशा ठिकाणाहून पाणी घेत असल्याचे आढळले.
स्नो यांच्या या सर्व अभ्यासातून पुढे आलेल्या निरीक्षणांची, पुराव्याची दखल पुढे मात्र निश्चित घेतली गेली. स्नो यांच्या मृत्यूनंतर विल्यम फार यांनी स्वतः पुढच्या काळात आलेल्या साथींचा अभ्यास करून कॉलरा आणि दूषित पाणी यांच्यातल्या संबंधावर निर्णायकरित्या शिक्कामोर्तब केले.
या सगळ्यामध्ये जॉन स्नोच्या उत्तर शोधण्याच्या पद्धतीकडे नीट बघूयात.
समस्या आणि संख्यात्मक वर्णन : त्यांनी भौगोलिक नकाशा तयार केला आणि मृत्यूची ताळेबंद आकडेवारी मांडली.
गृहीतक : हातपंपावरचे दूषित पाणी ग्रहण करणे हे साथीचे मूळ आहे असा अंदाज बांधला.
चाचणी : अपवादांसह सर्व मृत्यूची तपासणी केली, आणि त्यावर आधारित अनुमान काढले.
उपाय योजना : हातपंप निकामी केला, जेणेकरून अधिक मृत्यूची शक्यता रोखली गेली.
डॉ. जॉन स्नो यांचे हे अचूक निरीक्षण, संसर्गजन्य रोगांकडे चिकित्सकपणे पाहण्याची वृत्ती, विश्लेषण करताना सर्व बाजूनी केलेला नीट विचार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तात्काळ उपाययोजना यांनी 'आधुनिक परिस्थितिविज्ञान (मॉडर्न एपिडेमियॉलॉजी)' या विज्ञानशाखेची पायाभरणी केली. समस्येचे शास्त्रशुद्ध सखोल विश्लेषण कसे करावे याचे चांगले उदाहरण वैद्यकीय जगासमोर ठेवले. त्यांच्या या विशेष अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षामुळे मलविसर्जन आणि इतर औद्योगिक रसायनांमुळे होणारे पिण्याच्या पाण्याचे होणारे प्रदूषण आणि त्याचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यातले गांभीर्य समजण्यास मदत झाली. यामुळे फक्त लंडनमध्येच नव्हे, तर इतरही शहरांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यास मदत झाली. 'सार्वजनिक आरोग्य' या विषयाचे महत्त्व आज आपण सर्वजण जाणतोच. विशेषतः या करोनाच्या काळात पुन्हा एकदा आपल्याला आपल्या स्वच्छतेच्या सवयींकडे डोळेझाक ना करता योग्य काळजी घेणे अनिवार्य ठरलेच आहे. या 'सार्वजनिक आरोग्याच्या' बाबतीत मौलिक कामगिरी बजावणाऱ्या डॉ. जॉन स्नो बद्दल आपल्याला थोडी माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच.
(Image source: https://veinityfair.com/)
संदर्भ:
- https://en.wikipedia.org/wiki/John_Snow
- https://www.ph.ucla.edu/epi/snow/snowbook.html
- https://www.rcseng.ac.uk/library-and-publications/library/blog/mapping-d...
- Webb, Penny, Chris Bain, and Andrew Page. Essential epidemiology: an introduction for students and health professionals. Cambridge University Press, 2017.
- Image source: Wikipedia unless stated otherwise.
- मेघना
(https://numbersandwisdom.blogspot.com/ येथे पूर्वप्रकाशित)
(No subject)
मस्त लिहिलंय! खूपच आवडला लेख.
मस्त लिहिलंय! खूपच आवडला लेख. >>>>> +९९९९
क्लिकबेटवाल्या बातमीच्या
क्लिकबेटवाल्या बातमीच्या मथळ्याची नक्कल तंतोतंत उतरली आहे.
लिखाण नेहेमीप्रमाणेच उत्तम आहे.
आरती, शशांक, हर्पेन - धन्यवाद
आरती, शशांक, हर्पेन - धन्यवाद
आमच्या एपिडेमिओलॉजी विषयाची
आमच्या एपिडेमिओलॉजी विषयाची सुरुवातच जॉन स्नो च्या स्टडीनी होते.
राहुल बावणकुळे >> अगदी बरोबर.
राहुल बावणकुळे >> अगदी बरोबर. धन्यवाद
Pages