चैतन्यदायी अनुभव

Submitted by मार्गी on 19 May, 2022 - 09:51

चैतन्यदायी अनुभव

✪ ध्यान चर्चा, ध्यान सत्र, मुलांचं फन- लर्न आणि आकाश दर्शन अशी सत्रं सलग घेण्याचा अनुभव
✪ जालन्यातल्या चैतन्य योग केंद्राचं टीम वर्क
✪ ८७* नाबाद फिट अँड फाईन तरुणाला भेटून मिळालेली ऊर्जा
✪ को-या फळ्यावर काढलेला बिंदू बघणं, कोरा फळा बघणं आणि बघणारा बघणं- दृश्य, दर्शन आणि द्रष्टा
✪ ९९% मनासह तादात्म्य आणि १% ध्यान किंवा तटस्थता- अंधा-या खोलीत पेटवलेल्या काडीचा उजेड
✪ मुलांची ऊर्जा, मुलांना येणारी मजा आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी ऊर्जा!
✪ बन्धी मुट्ठी खाक की, खुली तो लाख की!
✪ पावसामुळे चाँद छुपा बादल में, पण तरीही मुलांसाठी आया रे आया चंदा
✪ ससा व कासवाच्या गोष्टीचे पुढचे तीन अंक!

सर्वांना नमस्कार. जालना! परभणीच्या जवळचा जिल्हा. जालन्यामध्ये अनेक जण खूप ओळखीचे आहेत. लॉकडाउनच्या नंतर खूप गॅपने काही जणांसोबत जालन्यामध्ये भेट झाली. त्यातून मग तिथे ध्यानाचा छोटा कार्यक्रम घ्यायचं ठरलं. जालन्यातल्या चैतन्य योग केंद्राची टीम अतिशय उत्साही आणि सक्रिय. त्यांनी मग हे मनावर घेतलं आणि हळु हळु एक एक कार्यक्रम ठरला. परभणीमध्ये सेशन घेईन तेव्हा त्याला जोडून जालन्यात सेशन घेईन असं ठरवलं. परभणीतले सेशन्स घेऊन झाल्यावर जालन्याला गेलो. जालना शब्दावरून नेहमी मला एक गंमत वाटते! जणू जालना शहर विचारत असतं, तुम्ही "जाल ना?" म्हणजे तू पुढे जाशील ना? ४ वर्षांपूर्वी परभणी- औरंगाबाद व इतर ठिकाणी सायकलिंग केलं होतं, तेव्हाही जणू जालना विचारत होतं की, सायकल चालवत "जाशील ना?" त्यावेळेस जालन्यात झालेल्या भेटी, तिथली चैतन्य योग केंद्राची पॉवरफुल टीम, तेव्हा ८३ व्या वर्षी सायकल चालवणारे दाबके आजोबा ह्या सगळ्यांना ह्या निमित्ताने परत भेटण्याचा "योग" आला. जालन्याच्या टीमने माझ्यावर खूपच विश्वास ठेवला आणि नवख्या खेळाडूला एकदम सगळंच द्यावं तसं मला बॅटिंग- बॉलिंग- फिल्डिंग आणि कीपिंगसुद्धा दिली! अगदी चार तासांचे सेशन्स ठेवले. मी कसा खेळलो, किती रन केले ते नाही सांगता येणार मला. पण मला जे दिलं होतं, ते मी एंजॉय नक्की केलं. ह्यामध्ये झालेली चर्चा, मुलांना आलेली मजा, त्यातल्या गमती सगळ्यांसोबत शेअर कराव्यात म्हणून हे लिहीतो आहे.

ध्यान- संवाद

पहिलं सत्र ध्यानावर चर्चा हे होतं. त्यासाठी १४ मे ला सकाळी जालन्यात पोहचलो आणि दाबके आजोबा व कवडी सर ह्यांना भेटलो. अनेक कामं बाजूला ठेवून कवडी सर मला वेळ देत आहेत. दाबके आजोबांबद्दल तर काय बोलू! ८७* नाबाद आहेत. दिवसातून पाच- सहा वेळेस तरी मोठ्या पाय-या चढून वरच्या मजल्यावर जातात, अधून मधून सायकल चालवतात. शरीराने फिट आणि मनाने सॉफ्ट! कवडी सरांशी बोलताना सत्रातले मुद्दे आठवतो आहे. ध्यान संकल्पनेच्या वेगवेगळ्या छटा ह्या चर्चेत आल्या. ध्यान म्हणजे सजगता, ध्यान म्हणजे सतत दुसरीकडे किंवा बाहेर जाणारी दृष्टी वळवून स्वत:कडे वळवणे (विपश्यना = लौट के देखना) अशी चर्चा होतेय. बोलण्यातून एक एक गोष्टी समोर येत आहेत. बोलण्याच्या ओघात इतके मुद्दे आठवतात की ते बोलल्याशिवाय राहावत नाही. माझा एक मित्र मला गमतीने म्हणतो की, तू मांजरासारखा आहेस. मांजराला कुठेही फेकून दिलं तरी ते चार पायांवर उभं राहातं, तसा तू कोणत्याही गोष्टीमध्ये ध्यान बरोबर शोधून काढतोसच! ह्या भेटी होत असताना व ही चर्चा होत असताना, संध्याकाळी इतके सत्र मला सलग घ्यायचे आहेत, ह्याबद्दल मनात असलेल्या अस्वस्थतेबद्दलही मी सजग आहे. संध्याकाळच्या सत्राची वेळ ५.३० अशी आहे. देवगिरी पतसंस्थेच्या सभागृहात तीनही सत्र आहेत. वेळेच्या आधी तिथे जाऊन त्या वातावरणामध्ये थोडा वेळ बसलो. आलेल्या इतर टीम सदस्यांना भेटलो. नर्व्हज थोड्या स्थिर झाल्या. पुढच्या मुलांच्या सेशन्सचीही थोडी तयारी करून ठेवली. आणि थोडं उशीरा हे सत्र सुरू झालं.

स्वत:कडे वळवलेलं लक्ष

माझा ध्यानाचा परिचय कसा झाला, तसं वातावरण कसं मिळालं, एक एक गोष्टी कशा मिळत गेल्या, गोडी लागून त्यामध्ये एक प्रकारे अभ्यास कसा होत गेला, ध्यानामुळे मला काय बदल जाणवतात, अशा स्वरूपाची ही चर्चा आहे. धारणा- एकाग्रता म्हणजे ध्यान नाही. ध्यान म्हणजे फक्त बघणे. सजगपणे- डोळसपणे बघणे. काळ्या फळ्यावर खडूने काढलेल्या बिंदूचं उदाहरण. आपल्याला फक्त तो बिंदू मुख्यत: दिसतो. खूप डोळसपणे बघितलं तर मोकळी काळी जागा दिसते. आणि त्याहूनही डोळसपणे बघितलं तर बघणारा दिसतो. ढोबळ मानाने तो बिंदू म्हणजे दृश्य, मोकळा फळा बघता येणं म्हणजे दर्शन आणि बघणारा बघता येणं म्हणजे द्रष्टा बघता येणं. ध्यान तसं खूप सोपं आहे, पण आपल्याला सतत समोरची- बाहेरची गोष्ट बघण्याची सवय असते, त्यामुळे आपलं सगळं "लक्ष" तिकडे जात असतं. सवयीने, काही टेक्निक वापरून हळु हळु स्वत:ला ट्रेन करून हे "लक्ष" स्वत:कडे वळवणं म्हणजे ध्यान. रस्त्याने जाताना एक दारुडा मला धक्का मारून गेला आणि काही शब्द बोलून गेला. दोन क्षण माझी सगळी सजगता- माझं सगळं लक्ष त्याच्याकडे जातं. पण ते मला त्याच्यावरून काढता आलं आणि मी ज्या विचारांमध्ये होतो, ज्या गोष्टी माझ्या मनात सुरू होत्या, त्यावर परत आणता आलं, तर ते ध्यान होईल.

आणि हे सवयीने जमतं. आपल्याला पूर्ण फळा न बघता फक्त खडूने काढलेला बिंदूच बघण्याची सवय जरी असली, तरी सवयीने रिकामा फळाही बघता येतो, बघणाराही बघता येतो. मग त्यावेळी मी फक्त दारुड्याचा धक्का बघत नाही, तर माझ्या मनात आलेलं वादळ, अस्वस्थता हेही बघतो. म्हणून ध्यान शिकताना ध्यान काढून घेण्याची कलाही तितकीच महत्त्वाची आहे. अनेकदा आपण दु:ख, वेदना, ताण ह्यांवरच आपलं ध्यान देत बसतो. आणि आपण ज्या गोष्टीकडे ध्यान देऊ ती गोष्ट आणखी मोठी होत असते. कारण ध्यान देणं म्हणजे ऊर्जा देणं आहे. म्हणून तर लहान मूल खेळत असेल आणि आपण खूप वेळ "लक्ष" दिलं नाही तर ते कुरकुरतं किंवा रडतं. पण आपण त्याच्याकडे दोन सेकंद नुसतं वळून बघितलं, थोडं लक्ष दिलं, थोडं हसलो जरी फक्त, तरी ते एकदम प्रफुल्लित होतं. त्यामुळे आपल्याला आपण ध्यान कुठे व किती देतोय, हे लक्षात आलं पाहिजे. ज्या गोष्टी क्रिएटीव्ह नाहीत, त्या गोष्टींवर- ताण- वेदना- दु:ख इ. दिल्या तर त्या अजून मोठ्या होतात. त्याउलट एकदा त्या डोळसपणे- सजग होऊन बघितल्या, स्वीकारल्या की त्यातून लक्ष किंवा ध्यान काढून दुस-या क्रिएटीव्ह गोष्टींकडे वळवता येतं. आणि मग त्या दु:खाची- वेदनेची पकड सैल होते आणि आपली ध्यानाची एनर्जी दुस-या क्रिएटीव्ह गोष्टीवर गेल्यामुळे ती क्रिएटीव्ह गोष्ट मोठी होते. अशा स्वरूपाची चर्चा होत गेली.

(सेशन आयोजित करण्यासाठी व त्यातील घटकांसंदर्भात माहितीसाठी संपर्क: निरंजन वेलणकर 09422108376, www.niranjan-vichar.blogspot.com (हौशी फिटनेस व ध्यानप्रेमी. व्यवसायाने अनुवादक व मनाने लेखक. ध्यानावरील सेशनव्यतिरिक्त आकाश दर्शन सेशन आणि मुलांसाठी fun- learn सेशनचं आयोजन. मोठ्यांसाठी फिटनेस वर्कशॉपचंही आयोजन.)

मी सजग नाहीय, ही जाणीव सजगतेची सुरुवात

रागवू नये, संताप करून ये, दु:ख करू नये, हे कळतं, पण वळत का नाही? त्याचं कारण म्हणजे आपली सजगता खूप लगेच आउट ऑफ फोकस होते. कुठेही निघून जाते. ती टिकवून ठेवण्याचे मार्ग आहेत. राग आला असेल, तेव्हा वापरण्यासाठी आपल्या स्वभावानुसार- आवडीनुसार अशा टेक्निक्स वापरता येतात- खिशात चिठ्ठी ठेवायची- १ ते ५ अंक त्यावर लिहायचे. रागाची स्थिती किंवा आणीबाणीची स्थिती आली, की ती चिठ्ठी काढून वाचायची- १, २, ३, ४ आणि ५. तोपर्यंत सजगता रागाच्या विषयावरून हटेल आणि गॅप मिळेल. मग सजगता स्वत:वर टिकवता येऊ शकते. अर्थात् हे इतकं सोपं किंवा इतकं लवकर होत नाही. खूपदा तर राग येऊन गेल्यानंतरच होश किंवा सजगता येते की, मला राग आला होता. त्या क्षणी तर वेगळंच वाटत असतं (मी करतोय तेच करायला पाहिजे वगैरे). पण अशी retrospective येणारी सजगताही ध्यानाची सुरुवात आहे. विपश्यनेत तर किती तरी वेळेस "मी सजग नाही", हीच सजगता सतत येते. पण "माझं लक्ष राहिलं नाही," अशी जाणीव होणं हेही "लक्ष देण्याची" सुरुवातच आहे. एखादी गोष्ट आपण विसरलो, ही जाणीव होणं, आठवण झाल्याचाच भाग असतो.

तादात्म्य इतर गोष्टींकडे नाही तर स्वत:बद्दल

ध्यानाच्या इतर छटा म्हणजे अप्रभावित राहण्याची कला. सगळे जण एकत्र बसले असताना कोणाचा फोन कर्कश्श वाजतो. लगेच सगळ्या जणांचं "लक्ष" म्हणजेच "ध्यान" तिकडे जातं. पण तसं न जाऊ देणं आणि जो विषय मनात सुरू आहे, जे काम हातात आहे, तिथेच "लक्ष" म्हणजे "ध्यान" टिकवून ठेवता येतं. एकदम घडणा-या कोणत्याही गोष्टीसोबत तादात्म्य न होता स्वत:च्या गोष्टीवर तादात्म्य ठेवणं, ही ध्यानाची पायरीच आहे. क्रिकेटमध्ये बघितलेला एक प्रसंग आठवतो. अनेकदा बॉलर्स बॉलिंग करताना मध्येच थांबतात व मागे परत जातात. लगेच बॅटसमन आपला स्टान्स सोडतो, पुढे- मागे जातो, पिचवर बॅट टेकवतो, थोडा हलतो आणि मग परत स्टान्सवर येतो. लहानपणी एकदा सिद्धूला बघताना एक बॉलर असा मध्येच थांबला व मागे वळाला. पण सिद्धू जसा होता तसाच थांबला. अजिबात हललासुद्धा नाही. त्याची सजगता त्याच्यावरच राहिली. ध्यान म्हणजे असं तादात्म्य न होऊ देणं, सजगता न गमावणं. अशा स्वरूपाची सविस्तर चर्चा झाली. ध्यान म्हणजे मनाचा अभाव आणि मन म्हणजे ध्यानाचा अभाव.

अंधा-या खोलीत पेटवलेली काडी!

मग काही जणांनी प्रश्न विचारले की, ह्याचा उपयोग काय झाला, फरक काय पडला. त्यावर बोललो की, ध्यानाचा परिचय नसताना आधी काहीही आणीबाणी झाली- काही प्रसंग घडला तर पूर्ण मन तिकडे तादात्म्य व्हायचं. म्हणजे दारुड्याचं उदाहरणच परत घ्यायचं तर- त्याने मला धक्का मारल्यावर लगेचच माझी सगळी सजगता कोसळेल आणि मला फक्त त्याचा धक्का, त्याची शिवीच दिसेल. आणि मग मनाला पूर्ण त्रास होईल, मन संताप करेल. पण ध्यानाच्या काही टेक्निक्स वापरून हळु हळु मनाला ट्रेन करता येतं. आणि ते अगदी हळु हळु होतं. ९९.९९% मन आणि ०.०१% ध्यान असं. आणि सवयीने, हळु हळु ते १%, २% असं वाढत जातं. जर माझ्याकडे अगदी १% ध्यान- सजगता असेल, तरीही मग मला कोणताच ताण किंवा दु:ख पूर्ण विचलित करू शकणार नाही. दारूड्याने धक्का मारल्यावर माझं ९९% मन विचलित होईल, पण १% तटस्थता असेल. मी थोडा दूर गेलेलो असेन. थोडं अंतर असेल. आणि हा फरक छोटा वाटला तरी खूप मोठा आहे. अंधा-या खोलीमध्ये एक काडी पेटवली तरी अंधार अंधार राहात नाही, तसं हे होतं. मनामध्ये विचारांची- तणावाची- दु:खाची कितीही ट्रॅफिक असली तरी मी १%, २% किंवा ५% असा हळु हळु रस्त्याच्या ट्रॅफिकचा भाग म्हणून नाही तर रस्त्याच्या कडेला उभा राहून बघणारा होतो. मग मी दारूडा बघतो, त्याचा धक्काही बघतो आणि माझ्या मनामध्ये आलेलं वादळ- संतापही बघतो. आणि मग मी त्यासोबत identify करत नाही. तादात्म्य करत नाही. आपोआप त्या ताणाची माझ्यावरची पकड हलकी होत जाते. ताण असतो; दु:ख असतं, पण मी स्वत:ला दु:खी करून घेत नाही. माझी सजगता सुरक्षित ठेवतो. ह्या सत्राचं रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल:
https://drive.google.com/file/d/1fhSHGgjBJBSMHfrM4BpPbGVY0OlApK-Z/view?u...

त्यानंतर अर्ध्या तासाचं गायडेड मेडीटेशन सत्र घेतलं. त्यामध्ये श्वासावर- विचारांवर सजगता, शरीर- मन रिलॅक्स करणे अशा थोड्या सूचना आणि ध्यानासाठी अनुकूल असं संगीत वापरलं. आपल्या दु:खाचे, ताणाचे, टेन्शन्सचे विषय एक तर भूतकाळात असतात (पूर्वी किती वाईट घडलं होतं ती आठवण) किंवा भविष्याकाळाची काळजी असते. पण लाईव्ह वर्तमान काळात कोणतंच दु:ख- ताण असू शकत नाही. त्या वर्तमानाच्या लाईव्ह क्षणावर सजगता आणण्यासाठी मदत करणा-या काही सूचना त्यात आहेत. ह्या सत्राचं रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल: https://drive.google.com/file/d/1kdmQh1dloiZFpw2NmrvjiGZGQg9cF1HC/view?u...

जो भी है, बस यही एक पल है

संक्षेपात इतकंच म्हणेन की, ध्यानाच्या असंख्य पद्धती- टेक्निक्स आहेत. विपश्यनेपासून अष्टांग योग आणि इतरही अनेक प्रणालींसारख्या. पण त्या सर्वांमध्ये असलेला सारभूत घटक म्हणजे "सजगता", "जागरूकता" किंवा "होश." ती कशी ठेवता येईल- टिकवता येईल त्यासाठीच्या त्या टेक्निक्स आहेत. कोणाला खिशात चिठ्ठी ठेवून जमेल. कोणाला मोठा श्वास घेऊन जमेल. पण मुख्य घटक सजगता आणि तीसुद्धा स्वत:बद्दल असलेली सजगता- बघणा-याने बघणा-याला बघण्याची गोष्ट. बाकी ध्यानाचे एक्स्प्रेशन्स असंख्य असतात. लहान मुलांसाठी पूर्ण तल्लीन होऊन खेळणं किंवा रडणं हे ध्यानच आहे. एखाद्या मुलीसाठी नृत्य किंवा रांगोळी काढणं हेही ध्यानच आहे. किंवा कोणाला तलत महमूदचं गाणं ऐकताना भूतकाळ आणि भविष्यकाळाची कोणतीच आठवण उरत नसेल, तो वर्तमानाच्या क्षणातच तल्लीन होत असेल, तर हेही ध्यानच आहे. गाढ झोप हेही ध्यानासारखं आहे. पतंजलींनी तर म्हंटलंय सुषुप्ती समाधीच आहे जवळ जवळ. फरक इतकाच की, सुषुप्तीमध्ये सजगता नसते. त्यामुळे ही सजगता, स्वत:बद्दल सजगता हे ध्यानाचं सूत्र. लोक काय म्हणतात, तो असाच बोलला, तिने असं कसं केलं इ. सगळ्या गोष्टींमधून काढून स्वत:वर आणलेली सजगता म्हणजे ध्यान. आणि मग त्यातून स्वत:चे गुणही दिसतात, दोषही दिसतात. इतर लोक जे बोलतात, त्यात किती तथ्य हेही कळतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाची पकड सुटते आणि 'जो भी है, बस यही एक पल है' अशी जाणीव होते. असो.

मुलांसोबत आलेली मजा

मुलांच्या सत्रासाठी ७.३० ची वेळ दिली आहे. नेमका त्या आधी खूप मोठा पाऊस आला. बाकी सेशन्स घेत असतानाही एक लक्ष ढगांकडे आहे. मुलांना किमान चंद्र तरी दाखवता यायला हवा! मुलं वेळेवर आली. आधीच्या सेशन्सला थोडा उशीर झाल्यामुळे त्यांना खरं तर थांबावं लागलं. तेही थांबले आणि काही जण ध्यानाच्या सत्रातही बसले. नंतर कळालं की, एक मुलगी खरोखर ध्यानासाठी शांत बसली होती. तिला ध्यान आवडतंसुद्धा. पण शक्यतो मुलांचं ध्यान म्हणजे खेळणं, मस्ती, मजा असंच! एकदा आकाशाकडे नजर टाकून आलो आणि लगेचच मुलांसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांना परिचय करून देण्यासाठी थोडा वेळ दिला. हळु हळु मुलं खुलत गेली. त्यांना कंठ फुटला. परभणीतल्या सत्रामध्ये घेतलेल्या काही गमती घेतल्या. मनाची शक्ती किती असते, ह्याची छोटी गोष्ट सांगितली. नंतर मुलांनी पत्त्यांचा बंगलाही खूप एंजॉय केला. पत्ते कसे उभे केले हे मुलं सांगत आहेत, तेव्हा त्यातून टीम वर्कचेच सूत्र कळत आहेत. ज्याला जमत होतं, त्यालाच ते करू दिले, मुलांनी सांगितलं. पत्ते कमी होते तर काही गटांनी शेअरही केले. एका गटाचे सगळे पत्ते पडले, तरी त्यांनी त्रास न करून घेता परत प्रयत्न सुरू केले. ह्या खेळामध्ये मुलांना फार आनंद आला! कोणी जिंकलं किंवा हरलं नाही, तर सगळ्यांनी एंजॉय केलं हे मुलांना जाणवलं. त्यांच्या उत्साहामुळे सभागृह एकदम जीवंत झालं. चैतन्य योग केंद्राचे साधक, योग शिक्षक आणि काही पालकही ह्या सत्रात आहेत. मग त्यांच्यासोबतही थोड्या गमती केल्या.

गमतींमागची गंमत!

मुलांचे खुललेले चेहरे आणि उत्साह बघून असलं समाधान वाटतंय! आता फक्त निसर्गाने साथ द्यावी, मुलांसाठी किमान चंद्र तरी मोकळा व्हावा अशी इच्छा सगळ्यांच्या मनात आहे! एकीकडे हे करताना दुसरीकडे मलाही वेगळीच गंमत जाणवतेय. सोळा वर्षांपूर्वी मी Master in Social work करत असताना माझ्या एका मॅडमनी मला सांगितलं होतं की, तू मुलांसोबत काम नको करूस, तुला त्याची गती नाहीय. आणि ते खरंच होतं. तेव्हा मी होतोच तसा. पण आज मात्र मुलांसोबत अशी गंमत करू शकतोय! हे कसं काय जमतंय! त्याचं खूप मोठं श्रेय माझी मुलगी आणि दोन पुतण्यांना आहे! त्यांनी मला ही भाषा शिकवलीय, हे ट्रेनिंग दिलंय! किंबहुना त्यातल्या काही एक्टिव्हिटीजसुद्धा मी त्यांच्या कडूनच घेतल्या आहेत! अशीच एक एक्टिव्हिटी घेतली जी माझ्या पुतणीकडून मला कळाली होती. त्यामध्ये पालकांनीही सहभाग घेतला. एका मुलाला बोलावून मोठ्याने ३० शब्द वाचायला सांगितले. मुलांना सांगितलं की, तो वाचेल तेव्हा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. जेव्हा त्याचं वाचून होईल, तेव्हा जितके शब्द आठवतील तितके लिहायचे. तो वाचत असतानाच कोणी लिहायचं नाही, चीटिंग करायची नाही! ह्यामध्ये पालकही सहभागी झाले. सगळ्यांनी मस्त सहभाग घेतला. ब-याच मुलांना ३० पैकी १४- १५ शब्द आठवले. लहान मुलांना लिहीण्यासाठी मोठ्यांनी मदत केली. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या.

एका होडीत एकच मोठा किंवा दोन छोटे मावतात. दोन मोठे व दोन छोटे नदी कसे ओलांडतील?

हे कोडंही माझ्या पुतणीने घातलेलं होतं. आई- बाबा आणि मुलगा- मुलगी ह्यांना एक नदी ओलांडायची आहे. त्यांना उशीर झाल्यामुळे मोटरबोट, नावाडी वगैरे कोणी नाहीय. एक अगदी बारीकशी होडी आहे. त्यामध्ये एकावेळी एकच मोठा किंवा दोन मुलं बसू शकतात. मग ते पार कसे होतील? आणि हे कोडं बुद्धीचं आहे. लॉजिकचं आहे. तिथे पडलेल्या फळ्यांपासून तराफा बनवून ते जातील किंवा जादू होऊन नदीचं पाणी आटेल वगैरे हे पर्याय आत्ता नको! त्यांना कोणालाच पोहता येत नाही! आहे त्याच परिस्थितीमध्ये डोकं लावून ते कसे जाऊ शकतील? मोठ्यांनाही आणि मुलांनाही होडी वल्हवता येते! आणि दोघंही भाऊ- बहीण रडके नाही तर साहसी आहेत! एका मुलीने हे कोडं अगदी लगेच सोडवलं. मग सगळ्यांनी ते एंजॉय केलं! तुम्हीही थोडा विचार करून पाहा. किंवा तुमच्या जवळच्या मुलांना विचारून पाहा. त्यानंतर व्हाईट बोर्डवर मुलांसाठी लिहीलेली गोष्ट समोर ठेवली. सौ. मेघा जोशी ताईंनी खूप छान अक्षरात लिहीली आहे. त्या गोष्टीतल्या रिकाम्या जागी मग मुलांनी भर घातली. त्याही गोष्टीचा सगळ्यांनी आनंद घेतला.

बन्धी मुट्ठी खाक की, खुली तो लाख की!

अजून एक छोटा गमतीचा खेळ घेतला. सोप्या गोष्टींमध्येही घेता आली तर खूप गंमत असते. ह्यात पालकांनीही सहभाग घेतला. आधी दोन मुलांना समोर बोलावलं आणि म्हणालो की, एकाने मूठ घट्ट बंद करायची. दुस-याने ती उघडायची आहे. बघा, कसं करता. मग एकाने घट्ट बंद केली आणि दुस-याने जोर लावला. थोडा वेळ शक्तीचा प्रयोग झाला आणि मग मूठ उघडली गेली. मग विचारलं, मुली हेच काम वेगळ्या प्रकारे करू शकतील का? दोन मुली समोर आल्या. गुदगुल्या करायच्या नाही, चिमटापण घ्यायचा नाही! मग त्या मुलीने मैत्रिणीचे बोट हळु हळु ओढून पकड केली. मग पालकांना विचारलं. दोन मुलांच्या आई आल्या. त्यांनाही‌ विचारलं की, काही वेगळ्या प्रकारे जमेल का. एकीने मूठ बंद करायची व दुसरीने ती उघडायची, इतकंच काम आहे! त्यांनीही तसंच केलं. शक्तीचाच प्रयोग केला. मग मुलांना सांगितलं की, हेच अजूनही वेगळ्या प्रकारे करता आलं असतं ना! जी मैत्रीण किंवा जो मित्र मूठ उघडणार आहे, त्याने शक्ती वापरायच्या ऐवजी त्याला/ तिला फक्त सांगितलं असतं की, मूठ उघड तुझी! आणि त्याने/ तिने ती उघडलीसुद्धा असती. किंवा त्याने/ तिने शेक हँडसाठी हात पुढे केला असता तर नक्कीच उघडली असती! आपल्याला शक्तीची किंवा अवघड प्रकारांची इतकी सवय झालीय की आपण सोप्या गोष्टीही अवघड प्रकारेच करतो! एकाच प्रकारे करत असतो. ते वेगळ्याही प्रकारे करता येऊ शकतं की. शक्ती न वापरता आणि न बोलता शेकहँडच्या कृतीतूनही करता येऊ शकतं! उघडलेल्या मुठीसारखा म्हणजे ओंजळीसारखा खुलेपणा हवा फक्त! हिंदीतली म्हण थोडी बदलता येऊ शकते! बन्धी मुट्ठी खाक की, खुली तो लाख की!

कोणाच्याच हातात फुगा नको!

हा खेळ श्री. मनिष कवडी सरांनी घेतला. पण तेव्हा नेमका चंद्र दिसत होता. त्यामुळे तो मिस होऊ नये म्हणून घाई घाईत सगळे तो बघायला गेले. तरी हा खेळ इतका छान होता की, त्याची माहिती इथे शेअर करतो. सगळ्या मुलांना प्रत्येकी एक फुगा आणि एक टाचणी मिळेल. त्यांना हॉलमध्ये एका जागी भिंतीवर पडदा लावलाय, असंही सर सांगतात. सर मुलांना म्हणतात की, आज कोणाचा वाढदिवस नाहीय, आज झेंडावंदनही नाहीय, पण आपण फुगे फुगवणार आहोत. आपल्याला शेवटी इतकंच करायचंय की, कोणाच्याच हातात फुगा दिसला नाही पाहिजे. मग मुलांची लगबग सुरू होते. सगळे हसत हसत फुगे फुगवतात. त्याचा आनंद घेतात. एकमेकांशी थोडी मस्ती करतात. मग विचार करतात की, कोणाच्याच हातात फुगा दिसला नाही पाहिजे! मग करायचं काय? तर बरेचसे जण फुगा फोडतात. एखादा जण पाठीमागे फुगा लपवतो. किंवा दुस-याच्या हातातही देतो. आणि जेव्हा "टाईम अप" होतो, तेव्हा सगळ्यांचे फुगे फुटलेले असतात. तेव्हा नेमका ज्याने लपवला असतो, तो फुगा समोर धरतो आणि कोणी तरी त्या फुग्यालाही लगेचच फोडतं! मग सर मुलांना विचारतात की, अजून काही करता आलं असतं का? फुगा दुसरीकडे कुठे ठेवता आला असता का? की फोडायलाच सांगितलं होतं? मग मुलांना थोडा अंदाज येतो. मग ते म्हणतात की, मी पडद्याबद्दल सांगितलं होतं, वाढदिवसाच्या फुग्यांचीही आठवण करून दिली होती! मग मुलं हसतात. अरेच्चा! फुगे फक्त हातामध्ये नको होते! ते फोडायला सांगितलेच नव्हते. ते तर टाचणीने पडद्यालाही लावता आले असते. मग सर पुढे सांगतात की, त्यात हिरवे, पांढरे व केशरी फुगेही होते. तुम्ही त्यापासून पडद्यावर काय करू शकला असता? आणि मी तुम्हांला बोललोही होतो की, आज झेंडावंदन नाहीय! मुलांची ट्युब पेटते व ते हसतात. एक तर बराच उशीर झाला होता आणि चंद्र दिसत होता, त्यामुळे सरांना ही एक्टिव्हीटी नीट घेता आली नाही. पण तरी चंद्र बघून आल्यानंतर त्यांनी मुलांना फुग्यांसोबत थोडा वेळ साग्रसंगीत मस्तीही करू दिली!

थँक यू सर!

कवडी सर मुलांशी बोलत असताना चंद्राचा स्टेटस बघायला गेलो! तासभर मोठा पाऊस होता, पूर्ण आकाश ढगांमध्ये होतं. पण आता चंद्र दिसतोय! आणि चंद्राच्या आजूबाजूचा परिसरही नीट दिसतोय. तेव्हा इतका आनंद झाला की बस्स! आता मुलं आणखी एंजॉय करणार. आणि मग पटापट मुलांचे ५- ५ जणांचे गट करून त्यांना बोलावलं आणि शक्य तितक्या लवकर चंद्र दाखवला. कारण परत तो ढगात जाईल अशीही शक्यता आहे! मुलंही शिस्तीने आली आणि गटा गटाने त्यांनी बघितलं. मी इतक्या वर्षांपासून दुर्बिणीतून चंद्र बघतोय. तरीही मला तो इतका सुंदर दिसतो तर पहिल्यांदा बघणा-या मुलांचं कसं होत असेल! काही अवाक् होतात, काही ओरडतात! एका मुलाची चंद्र बघितल्यावरची प्रतिक्रिया होती, थँक यू सर! ही आजच्या सत्राचीच पोचपावती वाटली! घाईतच, पण सगळ्यांना चंद्र व्यवस्थित बघता येतोय! मग मुलांना चंद्राच्या बाजूला असलेली चित्रा आणि थोडी दूर असलेली स्वाती दाखवली. सप्तर्षीतले काही तारे, मघा नक्षत्र हेही दाखवलं. सगळ्यांचा व पालकांचाही चंद्र बघून झाल्यावर त्यांना विचारलं की, आता इतके खड्डे बघितल्यावर एखादा चेहरा तुम्हांला चांद सा मुखड़ा वाटू शकेल का? अशी धमाल ह्या सत्रात आली! मुलांचा आनंद सगळ्यांनाच जाणवतोय! निसर्गानेही साथ दिली! सलग चार तास सत्र घेऊन मला मात्र तुफान घाम आलाय! पण सलग इतका वेळ असं करण्याचाही माझा हा पहिलाच अनुभव! मलाही मुलांइतकीच मजा आलीय. चैतन्य योग केंद्राने दिलेल्या बॅटिंग- बॉलिंग- फिल्डिंग- कीपिंग अशा सगळ्याच संधींना न्याय देण्याचा प्रयत्न तर करता आलाय!

ह्या सर्व कार्यक्रमात चैतन्य योग केंद्राचे सगळे वरिष्ठ सदस्य खूप सहभागी होते. अगदी लोकांना- पालकांना फोन करून बोलावण्यापासून रात्री मुलांना घरी सोडण्यापर्यंत त्यांनी खूप काही केलं. चैतन्य टीमची ऊर्जाच वेगळी. मागेही सायकलिंग करताना त्यांच्या तयारीचा आणि कार्यक्षमतेचा अनुभव आलेला होताच. अनेक जण सण व लग्नाच्या दिवसांमुळे किंवा सुट्टी- प्रवासामुळे येऊ शकत नसूनही त्यांनी मनावर घेऊन ही तयारी केली आणि हा कार्यक्रम होऊ शकला. सर्व पालकांसह चैतन्यच्या सर्व सदस्यांनाही मन:पूर्वक पुन: एकदा धन्यवाद देतो. ह्या कार्यक्रमामुळे अनेकांना भेटता आलं, अनेकांशी परिचय झाला. रात्री उशीरा दाबके आजोबांकडे झोपायला गेलो. दुस-या दिवशी सकाळी त्यांच्याकडे घरगुती एक ध्यान सत्र घेतलं. त्यांनी त्यासाठीही आसपासच्या लोकांना घरी जाऊन बोलावलं. खूप मन लावून सगळे जण ध्यानासाठी बसले. आजोबा- आजींमध्ये असलेली खेळकर नोंकझोक- friendly banter बघताना मजा येते! नवथर दांपत्य जसं एकमेकांना चिडवतं, तसं ह्यांचं चाललं आहे! आजोबा आणि आजी दोघंही चैतन्याचा झरा आहेत. आयुष्यातले अनेक दु:ख पचवून खंबीर आहेत. आणि त्याही पलीकडे जीवन अगदी आनंदाने जगत आहेत. दाबके आजोबांनी तर चैतन्य योग केंद्राचा मार्गदर्शक म्हणूनही सहभाग घेतला. लोकांना फोन केले, नोंदणी केली. त्यांचं वर्तमानात जगणं, मुक्त हस्ताने जगणं, हेही ध्यानाचा एक भाग वाटतो मला! असो!

ससा व कासवाच्या गोष्टीचे पुढचे तीन अंक

दुस-या दिवशी निघण्यापूर्वी श्री. कवडी सरांसोबत गप्पा झाल्या. ते खूप गडबडीत आहेत, पण तरीही वेळ काढून भेटत आहेत. त्यांनीही पूर्वी मुलांसाठी व मोठ्यांसाठी असे सेशन्स घेतले आहेत. त्यांचे अनुभवसुद्धा छान आहेत. त्यांनी ससा व कासवाच्या गोष्टीत पुढे काय झालं हे अगदी खुलवून सांगितलं! ते म्हणाले की, हरलेला ससा खूप नाराज होता. सगळे जण त्याला हसायचे. मग नंतरच्या सशांनी ठरवलं की, आपण जिंकून दाखवायचं. मग त्याने परत एकदा कासवाला चॅलेंज केलं. रूट आधीचाच होता. रेसची‌ वेळ ठरवली. गूगल मॅपमध्ये रूट बघितला आणि गोळी झाडल्यावर लगेच निघाले. ह्यावेळी ससा एकदम सावध होता. आधीच्या सशाने केली ती चूक तो करणार नव्हता. वाटेत कुठेही त्याने डुलकी घेतली नाही, बसलाही नाही. तो वेगाने पळत पळत गेला आणि पोचला आणि जिंकलासुद्धा! कासव मागेच राहिलं. ते हरलं. सशाला आनंद झाला, पण कासव नाराज झालं.

नाराज झालेल्या कासवाने परत एकदा सशाला चॅलेंज केलं! ससा तयार झाला. ह्यावेळी रूट कासवाने आखला. त्याला हवा तसा. गोळी झाडल्यावर दोघंही निघाले. ससा लगेच पुढे गेला. रूटमध्ये एक डोंगर होता, तो ससा वेगात चढला. आणि नेमकी त्याच्या पुढे दरी होती. तिथून तो घसरला आणि समोर एक छोटी नदी होती, तिथे जाऊन अडला. त्याला काही पोहता येत नव्हतं. कासव हळु हळु डुलत आलं आणि त्याने ती नदी आरामात पोहून पार केली. नदीच्या पलीकडेच हिरवा झेंडा होता. कासव ह्यावेळी जिंकलं.

पण ससा हरल्याचं कासवालाच वाईट वाटलं. दोघांची मैत्री झाली होती ना. दोघांनीही विचार केला की, अशी रेस आता परत परत नको. एकदाच फायनल रेस खेळूया. मग त्यांनी तोच रूट ठरवला. सुरुवातीला जमीन, डोंगर आणि मग नदी असलेला. दोघंही निघाले. पण ह्यावेळी त्यांच्यात मैत्री होती, म्हणून सशाने सुरुवातीला कासवाला पाठीवर घेतलं. दोघंही वेगात निघाले. कासवाने सशाला डोंगरावर स्लो केलं, आरामात डोंगर उतरायला सांगितलं, घसरू दिलं नाही. पुढे नदी आली तिथे ससा थांबला. तिथे कासव उतरलं आणि त्याने सशाला पाठीवर घेतलं आणि दोघंही पार झाले आणि दोघंही एकाच वेळी पोहचले आणि जिंकले!

सरांनी ही गोष्ट अशी सांगितली की, ऐकतच राहावीशी वाटली. अशी ही जालन्यातली सगळी गंमत झाली. खूप "चैतन्य" मिळालं. खूप लोकांना भेटता आलं, जोडलं जाता आलं. सर्व मंडळींना पुनश्च धन्यवाद. हे सविस्तर वाचल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद! असे आकाश दर्शन, ध्यान, मुलांचं फन लर्न, फिटनेस सेशन आपल्याकडे घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.

- निरंजन वेलणकर 09422108376.

Group content visibility: 
Use group defaults

हा लेख देखील छान वाटले वाचून.. किती ती धमाल आणि किती ते शिकण्यासारखे..

बोटीचे कोडेही सुटले
आधी छोटा १ छोटा २
बोट घेऊन रिटर्न - छोटा १
मग मोठा १
रिटर्न - छोटा २
मग छोटा १ छोटा २
रिटर्न - छोटा १
मग मोठा २
रिटर्न छोटा २
फायनली छोटा १ छोटा २
अश्यातर्हेने सगळ पार
पण बिलकुल आवडले नाही कोडे,
छोट्यांकडून एवढे काम करून घेतात होय :)]

छान लेख. तुम्ही मस्त काम करत आहात. तुमचे सगळे लेख आवडतात. तुमची ती जुनी लेखमाला सुद्धा वाचली होती - सायकलवरची

वाह! छान वृत्तांत. ध्यानावरच्या परिच्छेदाने विचारात पाडलं. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल!

चित्रदर्शी वर्णन ! सुरुवात जालनाने झाल्याने मस्त वाटलं ... नॉस्टॅल्जिक! बालपणी 7-8 वर्षे जालन्यात घालवलेत ... कधीतरी चमन बघायचंय... जुनं काहीच नसेल तरीपण...
तुम्ही छान उपक्रम करताय ..... असे अनेक उपक्रम तुमच्या हातून घडत राहो ! शुभेच्छा!

वाचल्याबद्दल व प्रतिसादांबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद!! इतक्या जणांचे प्रतिसाद बघून उत्साह वाढला. आपल्या माहितीमध्ये अशा उपक्रमासाठी उत्सुक पालक व मुलांचे ग्रूप्स कुठे असतील तर तिथेही असं सेशन घ्यायला आवडेल.

@ ऋन्मेऽऽष जी, खूप धन्यवाद! Happy तुमचा प्रतिसाद वाचल्यावर आधी वाटलं की, तुम्ही स्वत:बद्दलच म्हणताय की, कोडं सोडवण्याचं किती मोठं काम मुलांना सांगितलंय! Happy मग कळालं की, तुम्ही कोड्यातल्या दोन मुलांबद्दल म्हणत होता!