जीरा पराठा

Submitted by लंपन on 13 April, 2022 - 09:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या गव्हाचं पीठ
२ टी स्पून जिरे
५ - ६ टे स्पून तेल
मीठ चवीनुसार
तूप
पाणी

क्रमवार पाककृती: 

गव्हाचे पीठ, जीरे, मीठ, तेल आणि पाणी घालून घट्ट कणिक मळावी. पराठ्याला लागेल एवढी कणिक घेऊन आधी मोठ्या पुरी इतकी लाटावी, त्यावर तूप पसरावे आणि वरून गव्हाचे पीठ पसरावे. आता त्याची घडी करावी (घडीच्या पोळीला करतो तशी) आणि मग जरा जाडसर त्रिकोणी पराठा लाटावा. तवा चांगला तापला की त्यावर दोन्ही बाजूनी पराठा शेकून घ्यावा. पराठा शेकताना तुपाचाच वापर करावा.गरम पराठ्यावर किंचित मीठ भुरभुरावे आणि थोडे लिंबू पिळावे, पराठा खाण्यास तयार. 

jeera paratha 2.jpg

माहितीचा स्रोत: 
गुज्जुबेन ना नाश्ता -यु ट्यूब चॅनेल. एकदम गोड आज्जी आहेत. :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पराठा.
त्रिकोणी लाटला बरा.माझे असे पराठे गोलच होतात.

लोक्स खूप धन्यवाद. ब्लॅक कॅट धन्यवाद. भरत , अमित एकदम खस्ता होतात तुपामुळे, अन लिंबाने एकदम मस्त चव आली, आपण असे कधी खात नाही. देवकी, गोल लाटता येत नसले की हे असे त्रिकोणी जमतात Proud अस्मिता पुढल्या वेळी ओवा न मेथी ट्राय करेन. जाई हे एकदम रिलॅक्सिंग आहे Happy किशोर दोन्ही नका वापरू, असेच एकदम मस्त झाले होते.

मस्त रेसिपी..

अस्मिता, मी पण पराठ्यांमधे कसूरी मेथी, ओवा आणि तिळ पण घालते. सकाळी कणिक मळून संध्याकाळी केले तर मेथीची चव अजून मुरते मस्त. आणि कधी कधी मेथीच्या ऐवजी सुका पुदिना घातला तरी छान चव येते.

छान फोटो व पाककृती.
(त्या गुज्जू आज्जींवर एक न्यूज पाहिली होती करोनाच्या वेळी. आता तपशील आठवत नाही पण त्या फार धीराच्या आहेत हे आठवते).

साधी भिजवलेली कणीक उरली असेल तर ओवा-मेथी / जीरा पराठा ऐनवेळीही पटकन होतो.
पुरी लाटून त्यावर हवे ते जिन्नस चिमूट-चिमूट घालून (तीळ/ काळे तीळ/कलौंजी/चिरलेली कोथिंबीर्/आलं-लसूण-मिरची पेस्ट/तिखट-मीठ) चौकोनी घडी घालायची आणि पराठा लाटायचा.
झट की पट नाश्ता !

छान रेसिपी
ललिताप्रिती +1
आणि भाजी आमटी डाळ उरली तर त्यात बसेल इतकं हे ते पीठ घालून थालिपीठ , झट की पट होतात. आणि पोटभरीचे.

छान फोटो व इतर कल्पना पण आवडल्या. खूप पुर्वी केले जायचे हे प्रकार. आता रोटीमॅटिकमुळे बंद झाले होते. पुन्हा करायला हरकत नाही. हात सुरसुरताहेत.

छान.
मी लोणच्याचा मसाला किंवा बरेचदा लोणच जर विकतचे आणले असेल आणि खुप ऑइली/खारट असेल तर ते आणि त्यात पीठ घालून अचारी पराठे करते. त्रिकोणी लाटायचे किंवा चक्राकार वळकटी करून लेअर्स वर येतील असे लाटायचे. भाजताना खरपुस भाजायचे. सोबत सावर क्रीम किंवा दही. एकदम छान होतात. भाजी नसली तरी चालते. डब्यात एकदम मस्त.

सुनिधी, रोटीमॅटीकवर फुलके करता आले?
आईने घेतला होता,त्याच्यावर पिठाचे 3 गोळे वाया ghalavalyavr माळ्यावर ठेवलाय.

स्नेहा, मृणाली, सीमंतिनी, रश्मी, वर्णिता, सुनिधी, सीमा, ललिता प्रीती, chrps धन्यवाद. सीमा, असेच लोणचे दहीभातामध्ये पण घालता येते खारट किंवा ऑईली असेल तर.

च्रप्स, रोटीमॅटिक आम्हाला आवडतो. हाताने केलेल्या पोळीची सर येणे तर शक्यच नाही पण आम्हाला चालतं. ताज्या पोळ्या चांगल्या लागतात. मी सकाळी एकदम करते व संध्याकाळी नुसत्या गॅसवर भाजते गरम करायला. पंजाबी रोटसारखी होते पोळी. अत्यंत सोयीचे आहे, वापरायला सोपे आहे, पोळ्या झाल्यावर त्याचे ३ छोटे पार्ट धुवायला अगदी सोपे आहे. कापडत गुंडाळून ठेवल्या की जास्त मऊ रहातात पोळ्या. वॉरन्टी असल्याने मशिन खराब झाले तेव्हा दुसरे पाठवले व पहिले येऊन घेऊन गेले. खूप जड आहे त्यामुळे काऊंटरवर एका जागी कायम ठेवावे लागेल.

देवकी, फुलकेच की. कधीकधी एखादी पोळी फसते, तेव्हा पीठाचा डबा स्वच्छ करायचा, मशिनचा पॅन स्वच्छ करायचा. मग होते. ऑनलाईन सपोर्ट उत्तम आहे त्यांचा. अ‍ॅपवर सगळी मदत करतात.

छान