नोव्हेंबरच्या थंडीतला दिवस होता. जेम्स मरे इंग्लंडच्या क्रॉथॉर्न येथे पोहोचले. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते आले होते त्यांचे ब्रॉडमूर नावाचे मोठे भव्य घर असावे असे त्याने गृहीत धरले होते. ते त्यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि उत्साहाने एका मोठ्या खोलीत गेले. ज्यांच्या भेटीसाठी मरे आले होते त्या माणसाचे मरेवर खूप ऋण होते.
नवीन ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे संपादक बनून मरे यांना वीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता. त्यातील सतरा वर्षे नवीन शब्दकोशाच्या निर्मितीला डॉ. डब्ल्यू सी मायनर ह्यांच्यासोबतच्या पत्रव्यवहारामुळे मोठी मदत झाली होती. त्यांनी डिक्शनरीसाठी हजारो शब्दांचे योगदान दिले होते. सगळ्यात गंमतीची गोष्ट अशी होती कि ते दोघे -मरे आणि मायनर- कधीही वैयक्तिकरित्या भेटले नसतानाही ते मरेचा जवळचा मित्र बनला होते.
मरेने ठरवले की त्याच्या मित्राचे वैयक्तिकरित्या आभार मानण्याची वेळ आली आहे. भेटीसाठी डॉ. डब्ल्यू सी मायनरही राजी झाले होते. डॉ. डब्ल्यू सी मायनर ह्यांच्या "शारीरिक परिस्थिती" मुळे त्या दोघांची लवकर भेट होऊ शकली नव्हती. मरेने हात पुढे केला आणि एका मोठ्या डेस्कच्या मागे बसलेल्या माणसाला आपली ओळख करून दिली. ते म्हणाले, “सर, तुम्ही डॉ. विल्यम मायनर असणार. हो ना. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आहे.” डेस्कच्या मागे बसलेल्या माणसाने मरेकडे पाहिले आणि त्याला सांगितले की तो डॉ. मायनर नाहीये. डॉ. मायनर ह्या संस्थेच्या आवारातच आहेत, “मी ब्रॉडमूर क्रिमिनल लुनॅटिक एसायलमचा अधीक्षक आहे. डॉ. मायनर हे अमेरिकन आहेत. आणि ते आमच्या संस्थेत सर्वात जास्त काळ राहणाऱ्या कैद्यांपैकी एक आहेत. त्यांनी कधी काळी वेडाच्याभरात खून केलेला होता. तो खूप वेडा माणूस आहे.”
मार्च १८७९ मध्ये मरेची नवीन ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे. डिक्शनरीचे काम एकट्याने पूर्ण करणे शक्य नाही याची मरे यांना पूर्ण कल्पना होती. मरेने घेतलेला एक निर्णय असा होता इंग्रजी भाषेतील सर्व शब्द एकत्रित जमा करण्यासाठी सर्वसामान्य लोकांची मदत घ्यायची.
१८७९ मध्ये त्यांनी वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये स्वयंसेवकांसाठी आवाहन केलं, बुकशॉप्स आणि न्यूजस्टँड्सना प्रेस रिलीझ पाठवले आणि ग्रंथपालांना पाठवण्याची विनंती बुकमार्कच्या स्वरूपात छापली होती. एकूण कल्पना अशी होती की लोकांनी पुस्तके वाचावीत, "कॅचवर्ड्स" म्हटल्या जाणाऱ्या शब्दाची नोंद कागदाच्या एका छापील स्लिप वर करावी, तो शब्द आणि ज्या पुस्तकात आणि वाक्यात आढळला ती माहिती कागदाच्या स्लिपवरलिहावी आणि या स्लिप्स डिक्शनरीच्या संपादकांना पाठवाव्यात. संपादक ह्या शब्दांची तपासणी करतील, योग्य वाटल्यास असे शब्द नवीन शब्दकोशात सामावून घेतले जातील. असा अंदाज आहे की १८८० च्या दशकाच्या सुरुवातीस मायनरने स्वयंसेवकांसाठीची ही विनंती वाचली आणि त्वरीत प्रतिसाद दिला. त्यांच्याकडे साहित्य होते आणि भरपूर वेळही होता.
त्याचं असं झालं की, १७ फेब्रुवारी १८७२ रोजी पहाटे २ नंतर मायनरच्या आयुष्याने विचित्र कलाटणी घेतली. त्या थंडीच्या पहाटे त्यांनी मिस्टर जॉर्ज मेरेट नावाच्या कामगाराला गोळ्या घालून ठार मारले होते. त्यावेळी बिचारा जॉर्ज मेरेट कारखान्यात कामासाठी चालला होता. गोळीबाराचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला आणि पोलिस घटनास्थळी धावून आले. त्यांना मेरेट गोळीनं मानेला झालेल्या जखमेमुळे रस्त्यावर मृतावस्थेत सापडला. घटनास्थळी असलेल्या कॉन्स्टेबल टारंट नावाच्या अधिकाऱ्याने मायनरना पकडले, मायनर बंदुक घेऊन रस्त्याच्या शेवटी उभा होता आणि त्याने लगेचच गोळीबाराची कबुली दिली.
त्याने असा दावा केला की ही चूक होती. हा शॉट त्यांच्या खोलीत घुसलेल्या दुसऱ्या माणसासाठी होता. ही घटना मायनरच्या गंभीरपणे बिघडलेल्या मानसिक स्थितीचे द्योतक होती.
मायनर हे एक अमेरिकन सर्जन होते. ते एक वर्षापूर्वी इंग्लंडला आले होते. मानसिक आजाराने ग्रस्त झालेले मायनर शांततेचे ठिकाण शोधत होते. सैन्यासाठी सर्जन म्हणून घालवलेल्या वेळेचा परिणाम त्यांच्या डोक्यावर झाला असावा असे अनेकांनी गृहीत धरले होते.
१८३४ साली सिलोनमध्ये मिशनरी पालकांच्या पोटी जन्मलेला मायनर किशोरवयातच घरी परतला. वैद्यकीय मदतीची नितांत गरज असलेल्या केंद्रीय सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि वयाच्या एकोणतीसव्या वर्षी येल विश्व विद्यालयाचची पदवी घेतली.
सैन्यात भर्ती झाल्यावर चार दिवसांनीच गेटिसबर्गची लढाई उफाळून आली. लढाईत जखमी झालेल्या सैनिकांची सेवा सुश्रुषा करण्याची मायनरची तीव्र इच्छा असूनही त्याला अशी संधि मिळायला आणखी सहा महिने लागले. युद्धाच्या अत्याचारांच्या प्रत्यक्ष दर्शनाने मायनरच्या संवेदनशील मनावर खोल परिणाम झाला.
ते जसे एक सुशिक्षित सर्जन होते तसेच एक संवेदनशील 'माणूस'ही होते. त्यांना फ्लूट वाजवणे आणि वॉटर कलरमध्ये चित्रे रंगवण्याचा छद होता. त्यांचे वैद्यकीयप्रशिक्षण असूनही तो युद्धातील काही अत्यंत क्रूर प्रसंगांना सामोरे जाण्यास असमर्थ होता. लढाईच्या शेवटी शेवटी मायनर खूप वेगळा माणूस बनला होता. न्यूयॉर्कला परतल्यावर ते व्यसनांधीन झाले. दिवसेंदिवस त्यांचा विक्षिप्तपणा वाढत चालला. शेवटी त्यांना मोनोमॅनियाचे निदान केले गेले. मोनोमॅनिया हा एक वेडेपणाचा प्रकार आहे. कुठल्यातरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हे ह्या वेडेपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. परिणामस्वरूप चौतीस वर्षांचा असताना त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. ऑक्टोबर १८७१मध्ये तिथून सुटल्यावर ते तडक लंडनला जाण्यासाठी एकेरी तिकीट घेऊन जहाजावर चढले. युरोपमध्ये एक वर्ष चित्रकला, विश्रांती आणि वाचन केल्याने त्याचे मन शांत होईल आणि ते पूर्ववत होतील अशी त्यांची अपेक्षा होती.
त्यांच्यावरील खुनाच्या खटल्यात मायनर वेडेपणाच्या कारणास्तव दोषी आढळला नाही. परंतु त्यांना वेड्यांच्या इस्पितळात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ एप्रिल १८७२ रोजी ब्रॉडमूर येथे ते 'रुग्ण क्र ७४२' म्हणून दाखल झाले. त्यांना आश्चर्यकारकपणे चांगली वागणूक देण्यात आली. ते माजी लष्करी अधिकारी आहेत हे जाणून त्यांना दोन जोडलेले सेल देण्यात आले. त्यांच्या ह्या खोल्यांना दिवसा कुलूप लावलेले नसे. खिडक्यांतून त्यांना हिरवी कुरणे, आजूबाजूच्या टेकड्या आणि ब्रॉडमूर मनोरंजन क्षेत्राचे दृष्य पहावयाला मिळत होते.
अमेरिकन व्हाईस कौन्सिलच्या विनंतीनुसार त्यांना कपडे, कला साहित्य आणि त्यांचा पुस्तकसंग्रह यासह त्यांच्या अनेक वैयक्तिक वस्तू पाठवण्यात आल्या. माजी अधिकारी म्हणून त्यांना लष्करी पेन्शन मिळाली होती, मायनरने हे पैसे त्यांचा एका कोठडीत लायब्ररी, चित्रफलक आणि आरामखुर्ची ह्यांसाठी वापरले. उरलेल्या पैशांचा वापर सहकारी कैद्यांना त्याच्या सामानाची साफसफाई आणि व्यवस्था करण्यासाठी, पुस्तक विक्रेत्यांकडून आणखी पुस्तके मागवण्यासाठी आणि त्यांच्या हातून चुकीने मृत्युमुखी पडलेल्या मेरेटच्या विधवेला नियमितपणे पैसे पाठवण्यासाठी केला. जेम्स मरे जेव्हा डॉ. डब्ल्यू सी मायनर ह्यांना भेटण्यासाठी ब्रॉडमूरला गेले तेव्हा त्यांच्या डोक्यात मायनरबद्दल काही कल्पना होत्या. एक सुसज्ज लायब्ररी, संगीताची मैफिल,हिरवळीवर फेरफटका इत्यादी. पण सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते असे म्हणतात हेच खरे! मायनरची लायब्ररी ही एक कोठडी होती, मैदाने ही असायलमची मालमत्ता होती. दररोज रात्री हल्लेखोर छतावरून आत घुसून आपल्याला ठार मारतील ह्या विचाराने मायनर अधिकाधिक भ्रमित होत होते. मरेला मायनरकडून पाठवलेल्या कागदाच्या पहिल्या स्लिप्स १८८५ च्या वसंत ऋतूमध्ये मिळाल्या.. उन्हाळ्यात पेपर स्लिप्सने भरलेली मोठी पॅकेट फक्त “ ब्रॉडमूर ” म्हणून लिहिलेल्या पत्त्यावरून पाठवलेली पोहोचली. मरे, पत्त्याच्या खऱ्या स्वरूपाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होता. मायनरने पाठवलेल्या कागदपत्रांच्या सतत वर्षावाने मरे उत्साहित झाला. हळूहळू त्यांची मैत्री झाली. पण त्यांची भेट होईपर्यंत सतरा वर्षे निघून गेली होती आणि तोवर हजारो पेपर स्लिप्स आणि पत्रव्यवहार दोघांमध्ये झाला होता.
मायनरबद्दलचे सत्य कळल्यावर, मरेच्या मनाची थोडी देखील चलबिचल झाली नाही. उलट त्यांनी ताबडतोब कोठडीमध्ये नेण्याचा आग्रह धरला. त्यांच्या पहिल्या भेटीचा लेखाजोखा अस्पष्ट आहे पण त्या भेटीचा परिणाम असा झाला की त्यांची मैत्री त्यांच्या आयुष्यभर टिकली. ते दोघे वर्षानुवर्षे डझनभर वेळा भेटले. ते त्यांच्या इंग्लिश भाषेच्या प्रेमावर चर्चा करत आणि एकमेकांना मासिकातील लेख वाचून दाखवत. मरे मायनरच्या बदलत असलेल्या मूड आणि भ्रमांबद्दल संवेदनशील होते. ते मैदानावर फेरफटका मारायचे. खराब हवामानात ते त्यांच्या कोठडीत बसून चहाचा आनंद घेत.
पण सर्व दिवस सारखेच नसतात. त्या असायलमच्या संचालकाच्या निवृत्तीनंतर नवीन आलेल्या अधिकाऱ्याने मायनरच्या सर्व सुखसोयी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. मरेने मायनरला चांगली वागणूक दिली जात नसल्याची तक्रार केली. त्यांनी मायनरच्या डॉक्टरांना लिहिले की त्यांनी मायनरसाठी हस्तक्षेप करावा. मायनरला त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत परत पाठवावे यासाठी मरेंनी प्रयत्न चालू ठेवले बऱ्याच वर्षांनंतर अखेर मायनरला त्याच्या भावाच्या देखरेखीखाली घरी परतण्याची परवानगी मिळाली. ही चांगली बातमी ऐकल्यावर मरेने ब्रॉडमूर गार्डन्समध्ये बसलेल्या मायनरचे औपचारिक पोर्ट्रेट घेण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकाराची नेमणूक केली. १६एप्रिल १९१० रोजी सकाळी मरे आणि त्याची पत्नी, मायनर आणि त्याच्या भावाला लंडनमधील बंदरात भेटले. तिथेच दोन मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतला.
अमेरिकेत परतल्यावर, मायनर वॉशिंग्टन डीसीमधील वेड्यांसाठीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मायनर यापुढे डिक्शनरीच्या कामात योगदान देत नव्हते, मरेने मात्र २६ जुलै १९१५ रोजी त्याचा मृत्यू होईपर्यंत शब्दकोशावर काम सुरू ठेवले. मायनरला वेगळ्या ठिकाणी म्हणजे हार्टफोर्ड कनेक्टिकट येथील असायलममध्ये हलवण्यात आले. २६ मार्च १९२० पर्यंत ते तिथेच राहत होते. त्यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी झोपेत निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वी, मायनरने मरेच्या पत्नीला ब्रॉडमूर येथील आपली सर्व पुस्तके अर्पण केली. एक दिवस बोडलेयन लायब्ररीतील संग्रहाचा एक भाग बनतील अशी त्यांना आशा होती. आज ती पुस्तके "डॉ. मायनर द्वारा लेडी मरे" देणगी म्हणून नोंदणीकृत आहेत. इंग्लिश ऑक्सफर्ड डिक्शनरी अखेरीस १९२७च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झाली.
अवांतर
जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा
दीनानाथ मंगेशकर, ज, रणदुंदुभि
छान. आवडला.
छान. आवडला.
कुमार१
कुमार१
आपला आभारी आहे. धागा वर काढल्या बद्दल.
एका अंदाजानुसार डॉ मायनर ह्यांनी OEDला जवळ जवळ १२००० शब्दांचे योगदान दिले.तेव्हा पुढच्या वेळी शब्द बघण्यासाठी OED उघडलं तेव्हा डॉ मायनर ह्यांची आठवण ठेवा.
रोचक माहिती. दु:खदही.
रोचक माहिती. दु:खदही.
भाषा अनेक ठिकाणी इंग्रजी धाटणीची वाटते आहे.
भरत
भरत
खर आहे. मूळ(अनेक) सोअर्स इंग्रजीत आहेत. मराठीत काही रुपांतरीत करणे किती कर्म कठीण आहे याची जाणीव झाली. एक हॉलीवूड सिनेमा, एक चरित्र आणि बरेचसे आंतर जालीय संदर्भ. पण कथेने एव्हढी मिहिनी घातली कि राहवेना. समजून घ्यावे ही विनंती.
सुरेख माहिती.
सुरेख माहिती.