ब्लॅक पेप्पर चिकन

Submitted by maitreyee on 10 March, 2022 - 08:54
blk pp chkn
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बोनलेस चिकन साधारण १ पाउंड, पांढरा किंवा पिवळा कांदा १ मोठा, सेलरीच्या २-३ काड्या, लसूण एक गड्डा, डार्क सोया सॉस, चिली व्हिनेगर, काळी मिरी क्रश करून १ लहान चमचा, १ अंडे, २ चमचे कॉर्न स्टार्च, रेड चिली सॉस किंवा ३-४ लाल मिरच्या

क्रमवार पाककृती: 

पांडा एक्सप्रेस किंवा तत्सम चायनीज फास्ट फूड मधे ब्लॅक पेपर चिकन हमखास मिळतं. आमच्या घरी आवडतं सगळ्यांना. पण बाहेर ते नेहमी फार तेलकट वाटते त्यामुळे घरी करून बघितले, १-२ वेळा केल्यावर ही रेसिपी परफेक्ट जमली आणि आता बाहेर न मागवता घरचीच सगळ्यांना आवडते.
आधी तयारी म्हणाजे चिकन धुवून मग ते निथळून घ्या, धुतलेले पाणी निघून गेले पाहिजे. मग चिकन चे अगदी लहान तुकडे करा, बाइट साइज पेक्षाही थोडे लहान. त्यात २-३ चमचे सोया सॉस, चमचाभर लसूण पेस्ट ( किंवा मिन्स्ड किंवा ग्रेटेड ) आणि अर्धा चमचा क्र्श केलेली मिरी पावडर घालून मिक्स करा आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्या. तोवर बाकीची तयारी करता येईल.
यात भाज्या फार वापरलेल्या नाहीत. फक्त कांदा आणि सेलरी. सेलरी आणि काळी मिरी यांच्या चवीचे कॉम्बिनेशन जे आहे तीच या डीश ची मुख्य चव आहे. त्यामुळे इतर भाज्या वापरल्यात किंवा सेलरी स्किप केलीत तर त्या पदार्थाला वेगळे नाव द्या Happy
रेसिपी अगदी सिंपल असली तरी यात सर्व इन्ग्रेडियन्ट्स च्या टेक्स्चर ला पण महत्त्व आहे. कांदा कापण्याची पद्धत विशिष्ट आहे. बर्‍याच चायनीज पदार्थात तसाच कापतात. यात कांद्याचे पापुद्रे वेगळे करायचे आणि प्रत्येक पापुद्र्याचे ३-४ मोठे तुकडे करायचे. हाताने केले तरी चालतील. हे वाचायला कॉम्प्लिकेटेड वाटलं तरी सोपे आहे. ( फोटो पहा) सेलरीचे पण मोठे मोठे तुकडे करा. फार बारीक केले तर ते विरघळून जातील आणि चव बिघडेल.
20220203_191116.jpg
उरलेला लसूण बारीक तुकडे करून घ्या. इथे पेस्ट चालणार नाही.
चिकन मधे १ अंडे फोडुन घाला, २ चमचे कॉर्न स्टार्च घाला आणि हातानेच नीट कालवून घ्या. एकीकडे वॉक मधे किंवा साध्या कढईमधे तेल तापायला ठेवा. रेस्टॉ. मधे चिकन चे तुकडे डीप फ्राय करतात. मला तेवढे ऑइली नको होते त्यामुळे मी थोडेच तेल सणसणीत तापवून त्यात हे शॅलो फ्राय केले. चिकन फर्म होऊन किंचित सोनेरी रंग येई पर्यन्त मोठ्या आचेवर शॅलो फ्राय करा. आणि बाजूला काढून ठेवा. एका वाटीत अर्धी वाटी पाण्यात दीड ते दोन चमचे कॉर्न स्टार्च कालवून तयार ठेवा.
आता वॉक पेपर टोवेल ने जरा स्वच्छ करून पुन्हा गरम करून त्यात थोडे तेल घाला. वॉक / कढई योकुच्या कढईसारखी सणसणीत तापली पाहिजे. मग त्यात आधी लसूण, लाल मिरच्या तुकडे करून, मग लगेच २ चमचे सोया सॉस घाला. जरासे परतून मस्त वास आला की मग कांदा घाला. थोडेसेच अगदी १०-१५ सेकंद परतायचेय, कांदा देशी पदार्थाना करतो तसा मऊ करायचा नहीये. त्यानंतर सेलरी घालून थोडे परता. मिरी क्रश करून घाला. आधी बाजूला ठेवलेले चिकन चे तुकडे घाला. व्यवस्थित हलवून मग २-३ चमचे चिली व्हिनेगर, कॉर्न स्टार्च ची मगाशी केलेली पेस्ट घालून गॅस ची आच जरा कमी करा. १-२ इनिटात कॉर्न स्टार्च मुळे सर्व मिळून येईल आणि तो एक फिनिशड लूक येईल. अगदी अंगाबरोबर, चकचकित सॉस तयार होतो. चव बघून गरज असेल तसे सोया सॉस, रेड चिली सॉस ( ऑप्शनल) घाला, लगेच गॅस बंद करा. सेलरी आणि कांदे जरासे क्रन्ची राहिले पाहिजेत. ब्लॅक पेपर चिकन तयार! जास्मिन राइस किंवा कोणत्याही प्लेन राइस सोबत सर्व करा.
blackpepperchicken.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांना व्यवस्थित पुरेल
अधिक टिपा: 

-चिकन ऐवजी पनीर, टोफू नक्कीच चालावे.
- बेसिक रेसिपी तीच ठेवून मी इतर व्हेरिएशन्स केली आहेत, म्हणजे सेलरी आणि मिरी न घालता हिरव्या मिर्च्या + रंगीत मिरच्या घालून चिली चिकन चांगले होते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त दिसतंय!
हे असंच व्हिएतनामी प्लेसला मिळतं इथे. रंग डार्क नसतो म्हणजे सोयसॉस नसतील घालत बहुतेक. बघतो करुन.

मस्त गं! आमचे पण हे फेव्ह! घरी कधी करता येईल विचार नाही केला.
साबा असल्याने सध्या चिकन बनत नाहीये घरी पण नंतर नक्की करून बघणार!

वा वा! भार्री! नक्कीच शक्य तितक्या लगेचच करून बघणार! Happy
योक्याच्या कढईचं टेम्परेचर हा आता यमीच्या गोरेपणासारखा मापदंड झाला आहे. Proud

यमीच्या गोरेपणासारखा मापदंड >> Lol
लंपन, एकदमच फ्युजन कल्पना आहे तुमची Happy या रेसिपीला साधा भात बेस्ट आहे. टोर्टिया रॅप मधे वापरायचे तर इतका उपद्व्याप पण जरुरी नाही, साधेच तव्यावर ग्रिल करून चिकन स्ट्रिप्स, कांदे आणि बेल पेपर्स, त्यात टॅको सीझनिंग घातले की झाले.

मस्त वाटतय !
मला पांडा आणि तत्सम ठिकाणची सगळी चिकनं आवडतात. ऑरेंज, स्पायसी कॅश्यू पण भारी असतं. हे करून बघू पण तो पर्यंत मॉलमधल्या फुकोत जाऊन चिकनं खाऊन येईन.

मस्त आहे, सगळ्या स्टेप्स फॉलो करुन करुन बघणार. नेहमी रिप्लेस्मेंट शोधत शोधत रेसेपी काहीच्या काहीच होउन जाते.

यात चिकन ला एगी/ आम्लेटी टेस्ट येते का? चिकन मध्ये कधी कधी तशी चव आवडतं नाही. मध्यंतरी इथल्या Kareem's मधून कोणतेतरी कबाब मागवले तर त्यात चिकन+ ऑम्लेट खाल्ल्यासारखे वाटलं.

रेसिपी सोप्पी आणि करता येण्यासारखी आहे.

नाही येत तशी चव. यात फक्त १ एग इतक्या १ पाउंड चिकन ला ऑम्लेटी चव येण्याला पुरेसे नाहीच आहे. ते फक्त जरा त्या तुकड्यांना थोडा फर्म नेस येण्यासाठी पुरे होते. बहुधा ते एग + बॅटर लावून डीप फ्राय केल्यावर ती तू म्हणतेस ती चव येत असावी. तरी तुला वाटले तर मला वाटते नुसतेच मॅरिनेट केलेले तुकडे एग न वापरता शॅलो फ्राय करून वापरून पहा. कच्चे चिकन मात्र नंतरच्या टॉस करण्याच्या स्टेप मधे चालणार नाही.