कहाणी कोविड पश्चात अमेरिकेस प्रयाणाची

Submitted by रेव्यु on 9 March, 2022 - 14:10

कहाणी कोविड पश्चात अमेरिकेस प्रयाणाची
सरतेशेवटी बायडन बाबाने भारतीयांसाठी, किंबहुना अनेक देशांतील नागरिकांसाठी त्यांच्या अमेरिकेतील आप्तस्वकीयांना भेटण्याचा मार्ग खुला केला. ८ नोव्हेंबर २१ रोजी निर्बंध बर्‍याच अंशी कमी झाले.
मी तातडीने तिकिटे पहायला सुरुवात केली. माझ्यासाठी एक स्टॉपओव्हर असला तरीही सतत ९ + ११ तास विमानात बसायचे जीवावर येते. माझी एक दूरची मावसबहिण बासल-स्विट्झर्लंड मध्ये असते म्ह्णून मुंबई-झुरिक (तिथे ८-१० दिवसे वास्तव्य) आणि मग झुरिक ते सॅन फ्रान्सिस्को(मुलीकडे) असा बेत ठरवला. एव्हाना स्विट्झर्लंडने जवळ जवळ सर्व कोविड निर्बंध उचलले होते. आधी विचार होता फेब्रुवारीत जाण्याचा पण तिथे थंडी खूप असेल म्हणून २ मार्चला झुरिकला प्रयाण आणि मग ९ मार्चला पुढे अमेरिकेस जायचे ठरले. स्विस एअरवर तिकिटे पाहण्यास सुरुवात केली . रु ८८,००० चे तिकिट निर्णय होईपर्यंत ९८,००० पर्यंत पोहोचले होते. फायदा एवढाच होता की ते ’रिबुकिंग अलाउड’ प्रकारात मोडत होते.. शेवटी झाला अधिक खर्च .. हरकत नाही म्हणून २७ नोव्हेंबरला बुकिंग केले आणि दुसर्‍याच दिवशी स्विट्झर्लंडने तिथे पोहोचल्यावर दर ३ दिवसात आरटीपीसीआर अनिवार्य केले. झालं.... प्रथम ग्रासे मक्षिकापात: अशी स्थिती झाली... विनाकारण तो धोका आणि खर्च नको म्हणून लगेच कनेक्टिंग फ्लाइट २ तारखेस केली अन स्वस्थ बसलो.... साधारण डिसेंबरच्या मध्यात स्विटझर्लंडने आपले निर्बंध ह्टवून आमचा मामा केला.... पुन्हा बुक करायचा प्रयत्न केला तर माणशी १२,००० जास्त भरावे लागणार होते... आम्ही स्वस्थ बसलो.
काही दिवसांनी मला एअर्लाइनचा फोन आला की तुमचे विमान -२ तारखेचे रद्द झाले आहे.... तुम्ही ३ ला त्याच पैशात जाल का. तुम्हाला सात दिवसांची मुदत आहे.
मी लगेच होकार दिला.
पण पुढची गंमत आता सुरू होत आहे
मी तरीही वेबसाइटवर परतीच्या प्रवासात काही करता येईल का पहात होतो पण मला अमेरिकेतून स्विस व्हिसा घेणे अशक्य होते, बी१ व बी२ व्यतिरिक्त सर्व व्हिसा धारकांसाठी हे शक्य होते .
अन अचानक २० ऑगस्टच्या माझ्या परतीच्या तिकिटा ऐवजी २२ ऑगस्ट टाकले तर ती वेबसाइट प्रत्येकी ८,००० चा रिफंड दाखवत होती.... मी लगेच २२ बुक केले आणि ७२ तासाच्या आत माझे अन हिचे मिळून १६,००० परत मिळाले. थोडक्यात , माझे तिकिट आता ९८,००० - ८,०००= ९०,००० ला पडले होते
अभी भी पिक्चर बाकी है दोस्त!
२७ जानेवारीला पुन्हा फोन आला आणि मला सांगितले की २ मार्चची पहाटे २-३० ची फ्लाइट ३ मार्चला आता ५-५० ला निघेल कारण स्विस एअरने शेड्यूल बदलले आहे, मी हा बदल स्वीकार करू शकतो किंवा पूर्ण रिफंड मिळेल.
मी पुन्हा वेबवर १ किंवा २ तारखेच्या मुंबई- सॅन फ्रान्सिस्को फ्लाइट शोधू लागलो आणि अचानक मला १ तारखेला मुंबई-फ्रॅंकफुर्ट- मुंबई तिकिट ८४,००० ला दिसले. मी ते लगेच बुक केले आणि एअरलाइनच्या वेबसाइटवर रिफंड टाकला.
थोडक्यात आता मला ९०,००० प्रत्येकी मिळायला हवे होते... पण काही दिवसांनी मला ८७,००० च रिफंड केले. म्हणजे ३,००० प्रत्येकी कमी... त्यांचे रिफंड खाते कोणत्याही इ मेलला धड उत्तर देत नव्हते. शेवटी “ इ मेल ऑफ एम डी ऑफ स्विस एअर “ गूगल केल्यावर dieter.vranckx@swiss.com हा पत्ता मला मिळाला.
त्यांना लिहिल्याबरोबर त्यांच्या सेक्रेटरीण बाईचे ३ दिवसात उत्तर मिळाले. त्यांनी मला प्रत्येकी ३,००० ऐवजी ६,००० चा रिफंड पाठवला होता. देवाजीने करुणा केली, शेते पिकूनी पिवळी झाली....
अस्मादिक व सौ १ तारखेस पहाटे मुंबईहून निघून फ्रॅन्कफर्ट मार्गे अंकल सॅमच्या देशात पोहोचलो.
तत्पूर्वी २४ तासाच्या आतील आरटीपीसीआर इ. सोहोळे पार पाडले. एक दिवस आधी निगेटिव्ह रिपोर्ट आला, ही चाचणी खरीखुरी होती आणि त्या नंतर आम्ही घरीच राहिलो आणि आमच्या लॅबने पुढच्या दिवशीची तारीख टाकून तो इश्यु केला. मला त्याच दिवशी ती चाचणी करवून २४ तासात रिपोर्ट मिळणे अशक्य होते कारण मी नागपूरला होतो.
वाटेत फ्रॅन्कफर्टला आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत तेथील कारकूनाने पाहिली आणि श्री नमोंचा फोटो माझ्या चेहर्‍याशी जुळत नाही असे वक्तव्य केले... त्याव्र मी भाष्य करत नाही कारण त्यावर साहेबांचा फोटो अस्थानी आहे पण अनेक लोक मला केरळ उच्च न्यायालयाचा हवाला देतील.
अमेरिकेतील आगमन सुरळित पार पडले. सर्व कागदपत्रे ऑन लाइन अपलोड केल्याने कोणतीही हार्ड कॉपी आवास अधिकार्‍याने मागितली नाही.
सामान घेताना मात्र टिच्चून १६ डॉलरमध्ये २ ट्रॉल्या घेतल्या.. वेबसाइटवर त्या नि:शुल्क आहेत असे सांगितले होते.
अमेरिकेत इन्फ्लेशन सुरूझाले होते... पेट्रोल ५ डॉलर पर गॅलन झाले होते
असो..... ही आमची अमेरिका आगमनाची कहाणी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या लॅबने पुढच्या दिवशीची तारीख टाकून तो इश्यु केला. >> मेरा भारत महान.

अमेरिकेतील आगमन सुरळित पार पडले, हे छान.

स्वागत अमेरिकेत!

कोणत्या विमानतळावर? आता सगळीकडेच पैसे भरून घ्याव्या लागतात असे दिसते. पूर्वी सॅन फ्रान्सिस्कोला परदेशातून येताना फुकट असत, पण डिपार्चरला $५ ला मिळत.

एसएफओला त्या परत केल्या की क्वार्टर परत मिळत असे. थोडा वेळ थांबला असतात तर ते ही वसुल झाले असते पैसे! Wink
>> आमच्या लॅबने पुढच्या दिवशीची तारीख टाकून तो इश्यु केला.>>केवळ ह्याच कारणाने फक्त दिल्ली एअरपोर्टवरचे रिपोर्ट आमचा देश घेत होता.

अमित - हा लॉजिस्टिकल प्रॉब्लेम आहे. लोक टेस्ट करायला तयार आहेत. आता अमेरिकेने "१ दिवस आधी" ची सोय केल्याने रात्री उशीरा ज्यांच्या फ्लाइट्स असतात त्यांना सोपे केले आहे. माझी दिल्लीहून फ्लाइट ११:४५ ला होती रात्री. त्यामुळे आदल्या दिवशी पुण्यात सकाळी केलेली टेस्ट चालली. पण हे जर १२:१५ ला असती तर पुण्यात धावपळ झाली असती. मग लोक रात्री ८ ला करतात आणि वेळ मध्यरात्री १२ ची मिळते - तारीख दुसर्‍या दिवशीची Happy आणि टेस्ट नक्की किती आधी करायची याबद्दल देशोदेशीच्या नियमातील तफावत बघता यात exact science असे काही नाही. त्यामुळे असला जुगाड ठीक आहे.

विमानतळावर सहजपणे टेस्ट उपलब्ध असेल, त्याचा रिझल्ट वेळेत मिळत असेल, आणि तो रिझल्ट चालत असेल तर बहुतेक पब्लिक तयार आहे करायला.

मला काळजी वेगळ्याच जुगाडाची होती. मी ज्या लॅब मधे टेस्ट केली तेथे एकदम स्टार्टअप कल्चर होते. जी मुलगी आधी तेथे फरश्यांवर पाणी ओतून ते लोटून स्वच्छ करत होती तिनेच माझी टेस्ट केली. तिने तेथे काहीही काम करावे, मला ते जज करायची गरज नाही. पण तिने नक्की हात कितपत स्वच्छ केले मला शंका आहे. मी ज्या खुर्चीवर बसलो ती प्रत्येक व्यक्तीच्या टेस्टनंतर सॅनिटाइज करतात का माहीत नाही. भारतात काही काळ हे खूप पाळत होते असे ऐकले पण एकदा ढिले पडले की काही सांगता येत नाही Happy आणि ढिले पडले आहे हे सर्वत्र दिसत होते. "जन्ता" ते विमानतळावरच्या सो हाय क्लास पब्लिकपर्यंत.

बाय द वे, नाकाखाली मास्क हे भारतातले इन्व्हेन्शन आता अमेरिकेतही दिसू लागले आहे Happy व्हायरसप्रमाणे उपायांचेही व्हेरियण्ट्स Happy

हा लॉजिस्टिकल आहे, पण मुंबईत निगेटिव्ह सर्टिफिकेट कसं मिळवलं याच्या सु. आणि च. कथा पब्लिक नावागावा सकट सोमी वर सांगत होतं पूर्वी. कोव्हिड पीक मध्ये असताना इकडे हॉटेल क्वारंटाईन होतं तर हॉटेलचं बुकिंग दाखवुन बाहेर पडताक्षणी ते कँन्सल करणारं आणि वर कसं उल्लू बनवलं अशा टिपिकल देसी जुगाडू पोस्टी वाचल्या की काय बोलणार?
पायाला ब्रेसलेट लावल्याशिवाय ऐकणारच नाही आपलं पब्लिक असला प्रकार आहे! आणि त्याचं ही काही वाटणार नाही.
>>एकदम स्टार्टअप कल्चर होते >> Biggrin

थोडे थांबला असता तीच पांढरा कोट घालून लॅब मध्ये सॅम्पल चे अनालीसिस करताना दिसली असती आणि नंतर रिपोर्ट टाईप करताना... Happy जसपाल भट्टी ची SOS ऐरलाईन्स एपिसोड आठवला...

https://youtu.be/rOuwWJ0_Iyc

पायाला ब्रेसलेट लावल्याशिवाय ऐकणारच नाही आपलं पब्लिक असला प्रकार आहे! आणि त्याचं ही काही वाटणार नाही.>> वा! त्याचाही जुगाड करतीलच की.

वाटेत फ्रॅन्कफर्टला आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत तेथील कारकूनाने पाहिली आणि श्री नमोंचा फोटो माझ्या चेहर्‍याशी जुळत नाही असे वक्तव्य केले << हाहा

भारी अनुभव. या सगळ्यात कुठे मोठा भूर्दंड बसला नाही हे नशिबच म्हणायचे.

स्टार्टअप कल्चर शब्द प्रयोग आवडला. Happy

वाटेत फ्रॅन्कफर्टला आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत तेथील कारकूनाने पाहिली आणि श्री नमोंचा फोटो माझ्या चेहर्‍याशी जुळत नाही असे वक्तव्य केले
Lol

ती नाईन्टीज के झमेले नावाची एक पोस्ट फिरते ना, ज्यात रीळ उलगडलेली कॅसेट, विंडोजमधली फाईल कॉपी करतानाची 'टाईम रिमेनिंग 2 डेज' अशी खिडकी वगैरे वगैरे फोटो असतात, तशी काही वर्षांनी 'कोविड के झमेले' अशी पोस्ट फिरेल.. ज्यात हे आरटीपीसीआरचे जुगाड, सॅनिटायझरचा अतिरेकी वापर, थिएटरमधल्या ५०% भरलेल्या सीट्स वगैरे वगैरे फोटो असतील.

मला काळजी वेगळ्याच जुगाडाची होती. मी ज्या लॅब मधे टेस्ट केली तेथे एकदम स्टार्टअप कल्चर होते. जी मुलगी आधी तेथे फरश्यांवर पाणी ओतून ते लोटून स्वच्छ करत होती तिनेच माझी टेस्ट केली. >> स्वॅब कलेक्ट करायला घरी बोलावलं असतं लॅबमधल्या माणसाला, तर ही सगळी द्रुश्य बघायला लागली नसती आणि मनात उगाच शंका-कुशंका निर्माण झाल्या नसत्या. Happy

स्प्रिंग मध्ये आणि समार मध्ये नेहमीच वाढतात भाव... बाकी ते गॅस चे भाव वाढण्याचे कारण वेगळे आहे... इन्फ्लेशन नाहीय...

स्वागत अमेरिकेत!>+१
८ नोव्हेंबर २२ रोजी निर्बंध बर्‍याच अंशी कमी झाले.>>> २२चे २१ कराल का?

आरटीपीसीआर ला उगाच पैसे वाया घालवले तुम्ही, आम्हाला कधीही सांगा हव्या त्या तारखेच्या पीडीएफ देतो असे उत्साहाने भरलेले मेसेज पाठवले आहेत लोकांनी. Lol

मस्त लहान लेख. >> म्हणजे लेख लहान आहे म्हणून मस्त आहे असे असेल का सी ? Wink

स्टार्टअप कल्चर >> Happy

देवाजीने करुणा केली, शेते पिकूनी पिवळी झाली.... > हे एकदमच आवडले !

रेव्यु, तुमचे अमेरिकेतील वास्तव्य सुखाचे होवो.

हा लॉजिस्टिकल आहे, पण मुंबईत निगेटिव्ह सर्टिफिकेट कसं मिळवलं याच्या सु. आणि च. कथा पब्लिक नावागावा सकट सोमी वर सांगत होतं पूर्वी. कोव्हिड पीक मध्ये असताना इकडे हॉटेल क्वारंटाईन होतं तर हॉटेलचं बुकिंग दाखवुन बाहेर पडताक्षणी ते कँन्सल करणारं आणि वर कसं उल्लू बनवलं अशा टिपिकल देसी जुगाडू पोस्टी वाचल्या की काय बोलणार?
पायाला ब्रेसलेट लावल्याशिवाय ऐकणारच नाही आपलं पब्लिक असला प्रकार आहे! आणि त्याचं ही काही वाटणार नाही.>>

>>>>>
बाकीचे जुगाड चांगला/जॉब/पैसे/पदवी वगैरे मिळण्यासाठी समजू शकत होते. पण हे तर सरळ सरळ दुसरे मेले तरी चालतील्/त्यांना कोव्हिड झाला तरी चालेल पण मला माझ्या ठिकाणी पोहोचलेच पाहिजे अशी मेंटॅलिटी का असेल बरं. Sad

थोडे थांबला असता तीच पांढरा कोट घालून लॅब मध्ये सॅम्पल चे अनालीसिस करताना दिसली असती आणि नंतर रिपोर्ट टाईप करताना. >>> Happy Happy तिच्याकडे ते स्किल असेल तर खुशाल सगळे स्वतःच करावे, सगळे सॅनिटाइज करून Happy

रेव्यूजी - मग आता अमेरिकेत आल्यावर कोविडचे नियम पाळण्यात काही फरक दिसला का? न्यू यॉर्क शहरात तर काही रेस्टॉ मधे व्हॅक्सिनेशन कार्ड मागत होते म्हणे - दोन आठवड्यापूर्वीही. पण बे एरियात आता खूप शिथिल झाले आहे. रेस्टॉ मधे लोक मास्कशिवाय येतात. मला व्हॅक्सिनेशनबद्दल कोणी काही विचारले नाही. ह्यूस्टनवगैरेला त्याहून मोकळेढाकळे आहे.

फा , सॅनफ्रॅन्सिस्कोला डीसेंबर मध्ये गेले होते तेव्हा मागत होते vaccination card बर्‍याच restaurants मध्ये. सायन्स Museum मध्ये वगैरे पण.
आमच्या टेक्सासात मात्र Covid नाहीच आहे अस पहिलया दिवसापासुन वागतात त्यामुळ वॅक्सीनेशन कार्ड मागितल तर लोक गन काढतील बरीच.

आमच्या टेक्सासात मात्र Covid नाहीच आहे अस पहिलया दिवसापासुन वागतात त्यामुळ वॅक्सीनेशन कार्ड मागितल तर लोक गन काढतील बरीच. >>> हो मी ह्यूस्टनला नोव्हेंबर मधे होतो. तेथे मास्क्स बर्‍यापैकी होते पण एकूण फारसे वातावरण नव्हते Happy चेन हॉटेल्स मधे फोर्स करत होते मास्क्स.

मी राहतो त्या भागात मास्कची स्थिती नरोवा कुंजरोवा आहे..... एका थाय रेस्टॉरटमध्ये जेवण फोनवर ऑर्ड र केले... सिट इन होते.... थ्रो अवे भांड्यात... प्लॅस्टिकच्या..... जेव ण दिले.
व्हॅक्सि नेशन सर्टिपिकेट कुठे ही विचारले नाही... नमोच्या बागुलबुवाला घाबरतात...... Happy
विमानात लेग स्पेस बेक्कार होती.... जेवण चांगले होते...