पहिले अध्यात्मिक पुस्तक

Submitted by सामो on 18 February, 2022 - 03:23

झाली असतील एक २५-२७ वर्षं. ही गोष्ट आहे माझ्या अध्यात्मिक साहित्य वाचनाच्या श्रीगणेशाची.

रोज भाजी आणायला जाताना, ऑफिसात जाताना त्या फाटक्या अंगाच्या भय्याकडे लक्षही जायचे नाही किंबहुना गेले तरी तो खिजगणतीतही नसायचा. मात्र एका रणरणत्या दुपारी, झाडाखाली सावलीत पथारी पसरुन तिच्यावरती बसलेल्या त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या इवल्या इवल्या पुस्तिकांकडे लक्ष गेले आणि मी थबकले. रंगीबेरंगी त्या पुस्तिका होत्या अध्यात्मिक पुस्तिका -गीता प्रेसच्या. हनुमान चालीसा, दुर्गाचालिसा, गणेश स्तोत्रे वगैरे. त्यांचे रंगच इतके चटखीले होते, आय हॅड टु स्टॉप इन माय ट्रॅक्स. हाकच मारली त्या पुस्तिकांनी. सगळी उत्तर प्रदेशिय साहित्याची बरं का. हिंदी भरणाच जास्त.
भैय्या डोळ्यात आशा आणुन बघत होता- ही बाई घेते का काही आज. आज तरी सुटतील का त्याला २ पैसे. २ पैसे म्हणजे अक्षरक्षः अडीच ते पाच रुपयांपर्यंतच्या त्या पुस्तिका. तेव्हा तर मी हनुमान चालिसाही वाचलेली नव्हती. दोझ वेअर द बेबी स्टेप्स. अध्यात्मिक पुस्तके व साहीत्य वाचण्याच्या १०००० पावलांच्या प्रवासातील पहीले पाऊल. ती हनुमान चालिसाही लाल रंगाच्या अक्षरांत बरं का. हातभर साईझच्या प्रत्येक पानावरती ४ श्लोक, मोठ्या व ठळक छापात आणि लगतच्या पानावरती हनुमान-राम-सीतेचे प्रसंगानुरुप, चटखीले चित्र.
पण मला त्या भैय्याच्या डोळ्यातली आशा अजुनही आठवते. मी २ पुस्तिका घेतल्यानंतरची कृतज्ञताही - गेले असतील का २ घास पोटी त्याच्या, पाठवता आले असतील का २ पैसे गावाकडे? कोण असेल त्याच्यावरती अवलंबुन - वृद्ध आई-वडिल, बायको-पोरं. असे कितीसे लोक घेत असतील त्याच्या पुस्तिका की इतक्या उन्हात प्रामाणिकपणे व सचोटीने तो विक्री करत असेल? काय भविष्य होतं त्याला? पुस्तक हातात देताना माझी निवड उत्तम आहे अशा संदर्भात काहीतरी पुटपुटला होता. पण तेव्हा ना या काही गोष्टी ध्यानीमनी आल्या, ना विचार केला गेला. एक मात्र नक्की झालं, ती हनुमान चालिसा पावली मला. परदेशी येताना ती २० पानांची, हातभर/वीतभर लहानशी पोथी मी घेउन आले. नंतर एका मैत्रिणीच्या बरोबर ती नजरेत भरली व तिने हक्काने मागुन घेतली. नंतर कित्येक अध्यात्मिक पुस्तके धो धो आली, भेट मिळाली, विकत घेतली. वाचन झाले. पण त्या भैय्याच्या डोळ्यातील कृतज्ञतेच्या रॅपरमध्ये बांधून आलेले ते पुस्तक तेवढे एकच. परत तो दिसलाही नाही मला.
काही लोक मनात घर करुन जातात.
आजही खूपदा मनातून त्या उत्तर/मध्य प्रदेशिय विक्रेत्याकरता आशीर्वाद, आशीर्वचनेच निघतात.
-------------------
अगदी मामुली प्रसंग आहे पण माझ्या मर्मबंधातला. बंडल वाटल्यास अ‍ॅडमिन यांनी उडवला तरी चालेल. पण व्यक्त करण्याकरता मला योग्य वाटला म्हणुन हा लेखनप्रपंच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages