भूत फक्त रात्री का दिसते ?

Submitted by गारंबीचा शारूक on 13 February, 2022 - 00:57

जुन्या चाळीत असताना कधी कधी रात्रीचे भूताखेताचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही.
पण काही काही लोक खोटं बोलत नाहीत हे माहिती होतं. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहीती होतं. असे लोक पण जेव्हां भूताचे अनुभव सांगायचे तेव्हां त्यांना खोटं ठरवणं बरोबर वाटायचं नाही.

ज्याची त्याची श्रद्धा कपूर म्हणून मी ते ऐकायचो !
पिकनिक ला गेल्यावर मित्रांचे पण किस्से ऐकायला मजा यायची. त्यात किस्सा सांगणार्‍याची टांग खेचण्याचा कार्यक्रम व्हायचा. सगळेच इरफानमौला नसल्याने काही जण नाराज व्हायचे. मग एखादा नाराजी दूर करायसाठी दारूचा खंबा खोलू का विचारायचा. तेव्हां माझा एकट्याचा त्याला विरोध असायचा. मग सगळेच नाराज व्हायचे.

एकदा माझ्या एका मैत्रिणीने किस्सा सांगितला होता.

"ती लहान असताना गावी रहायची. गाव लहानच होतं. गावी लहान असताना रहायची पण मोठी झाल्यावर गाव सोडायला लागलं. आय मीन तिचे वडलांच्या बदल्या व्हायच्या. ते मोठेच होते. मोठे असताना नोकरीला लागले होते. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना माझी मैत्रीण झाली. म्हणजे त्यांना मुलगी झाली ती मोठी झाल्यावर माझी मैत्रीण झाली. हुश्श ! ती मुलगी लहान असताना (आणि तिचे वडील आणि आई पण मोठे असताना) त्यांची बदली एका लहानशा गावी झाली. तिथे एक वाडा त्यांना रहायसाठी मिळाला. तो दोन मजली होता. पुढच्या बाजूला गावातला रस्ता होता. मागच्या बाजूला कोकणात असते तशी वाडी होती. त्यात झाडं होती. विहीर होती.

एकदा तिची आई वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीत रात्रीची तारेवर वाळत असलेले कपडे काढून घ्यायला आली. तर तिने पाहीलं कि एक बाई भिंतीला टेकून उभी आहे. तिने पांढरं पातळ नेसलं होतं. आणि ती खूप उंच होती. इतकी कि तिचे पाय खाली जमिनीला होते आणि वरच्या बाल्कनीच्या इथे तिची छाती आली होती. खांदा आणि डोकं बाल्कनीतून वर मान करून बघावं लागत होतं. आईला आधी काही समजलंच नाही. माझी मैत्रीण तर लहानच होते. ती आईला म्हणाली " आई, बघ केव्हढी मोठी बाई "

तेव्हां आईच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे. तिचं लक्ष कपडे उतरवून घेण्यात असल्याने लक्ष दिलंच नव्हतं. माझी मैत्रीण (जी लहान होती) त्या बाईकडे बघत होती , आणि ती बाई पण हिच्याकडे बघत होती. आईने ते पाहिलं आणि तिला घाम सुटला. तिने कपडे दिले टाकून आणि मुलीला (मैत्रिणीला) हाताला धरून फराफरा ओढतच खाली आणलं. तेव्हां ती ( मैत्रीण जी लहान होती) महिनाभर तापाने आजारी होती.

तिने हा किस्सा सांगितल्यावर मी मस्त पैकी तिची खेचली. ती नाराज झाली. बरेच दिवस बोलली नाही.
मग एक दिवस तिच्या घरी गेलो तेव्हां तिच्या आईने ती माझ्यावर नाराज असल्याचे सांगितले. तिने मग माझी खात्रीच पटवली कि तिथे एक बाई तिनेही पाहिली आणि तिच्या आईनेही पाहिली. नंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबराल म्हणून आधी सांगितलं नव्हतं. तिथे एका बाईचं भूत सर्वांना दिसतं. ते काही करत नाही. पण आपल्याकडे बघत असतं.

मग त्यांनी ते घर आणि ते गावच सोडलं.

असे खूप किस्से ऐकले.
त्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे सर्वांना भूत रात्रीच दिसतं.
असे का ?

एकदा मुंबईतल्या एका डोंगरावर आम्ही सगळे रात्रीचे गेले होतो. त्यात भूत पकडणारे दोघे जण होते. ते मित्राच्या ओळखीचे होते.
तेव्हां तिथं हा विषय निघाला. मग रात्रीच भूत का दिसतं यावर चर्चा झाली.
ते दोघे पॅराझंपर होते. भूत या विषयात त्यांची पीएचडी केली होती. पॅराझंपिंग अ‍ॅक्टिव्हिटीज आणि एनर्जीज या विषयावर ते लेक्चर्स पण देतात.

त्यांनी सांगितलं की दोन कारणं आहेत.
पहिल्या टाईपमधे लोकांची मान्यता आहे की दिवसभर देवांचा वास पृथ्वीवर असतो. देवांच्या शक्ती सूर्याच्या उजेडासोबत सर्वत्र पोहोचतात. त्यामुळे अमंगळ शक्तींना बाहेर पडता येत नाही. दैवी शक्तींचा रात्री संकोच होतो. त्यामुळे भूतं रात्री बाहेर पडतात.
यावर बरंच डिस्कशन झालं. एकाचं असं म्हणणं होतं की भूतांना शरीर नसतं. त्यामुळे दुपारी उन्हानं त्यांचं अंग भाजतं. म्हणून ते रात्रीच्या थंड हवेत बाहेर पडतात. असे प्रत्येकाचे मत होते.

पण दुसरं कारण पण ऐकायचं होतं. ते म्हणाले हे वैज्ञानिक कारण आहे.

दिवसभरात आपले काँप्युटर, टीव्ही, रेडीओज, मोबाईल चालू असतात. याच्या वेव्हज वातावरणात सक्रीय असतात. तसेच गाड्या पळत असतात. त्यांच्या व्हायब्रेशन मुळे एलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हज / फोर्स तयार होत असतात. दिसवभरातल्या सजीवांच्या हालचालींमुळे वातावरणात उष्णता वाढत असते. त्यातून ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा दिवसा प्रसरण पावते. ती दिवसा खूपच शक्तीमान असते. ती पॉझिटिव एनर्जी असते. तिच्या आवाजात , प्रभावात निगेटिव्ह एनर्जी दबून जातात. निगेटिव्ह एनर्जी मुळात खूप अशक्त असतात. रात्र झाल्यावर हीट वेव्ह वरच्या दिशेने निघून जाते. खालचा स्तर थंड होऊ लागतो. रात्री वीजेचा वापर कमी होऊन जातो. मोबाईलचे संदेश येणं बंद होतं. उर्जेचा वापर रात्री खूपच क्मी होतो. त्या शांततेत नकारात्मक उर्जा आपले अस्तित्व प्रकट करू शकते. त्या उर्जेचा प्रभाव इतर ऊर्जा शांत झाल्यावर आपल्यावर जाणवतो. आणि आपल्याला ते समजत नसल्याने मेंदू आपल्याला इशारे देऊ लागतो. निगेटिव्ह उर्जेशी आपण किंवा मेंदू परिचित नसल्याने मेंदूतल्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रिअ‍ॅक्शन आपल्या जुन्या आठवणींप्रमाणे आपल्याला काही चित्रं दाखवू लागतात. हे भास असतात. त्यात आपल्याला मग एखादी बाई दिसते , कुणाला आकार दिसतात. कुणाला वेगवेगळे रंग तरंगताना दिसतात.

हे आम्हाला पटलं. तरी एक शंका नंतर आली. कि जर वेगवेगळे भास होत असतील तर एखाद्या जागी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वर्षी, एकमेकांना न ओळखणार्‍या लोकांना एकाच प्रकारचे भास का होत असतील ? ज्यांना त्या जागेची काहीच माहिती नाही त्यांनाही तेच भास का होतात ? जसे माझ्या मैत्रिणीला ( ती लहान असल्याने) आणि तिच्या आईला आधी कुणीही काहीही सांगितलेले नसताना पण तीच बाई कशी दिसली ? त्यांना वेगळा भास का झाला नाही ?

आता कुणाला यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. मी तर आधीच सांगितले की माझा भूतांवर विश्वास नाही. पण हे असे ऐकलेले कसे नाकारायचे ?

या गप्पा चालू असताना एकाने दारूची बाटली काढली. माझा राग अनावर झाला. मी ती बाटली हिसकावून घेतली आणि खाली आपटली. त्यातली दारू सगळीकडे सांडली.

इतक्यात तिथे कुणीतरी सिगारेट ओढत असल्याचा भास आम्हाला झाला. कुणी तरी असेल पण जे मघाशी दिसले नाही. आम्ही कोण आहे असे विचारून टॉर्च लावणार इतक्यात अंधारातून एक सिगारेट आली आणि जिथे दारू सांडली होती तिथेच पडली. क्षणात आग लागली. पाहता पाहता वणवा पेटला. आग भडकणार हे लक्षात येताच आम्ही तिथून धूम ठोकली.

सकाळी समजलं की डोंगरच जळाला.
ते काय होतं मग ?

आणि रात्रीच का भास झाला ?
कुणी यावर प्रकाश पाडू शकले तर मला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूत माणसांचे होते हा फार मोठा गैरसमज आहे.
जशी निगेटिव्ह एनर्जी ही पॉजीटीव्ह एनर्जी मारून बनत नाही तसेच भूत हे माणुस मरून बनत नाही.

जशी जीव सृष्टी अस्तित्वात आली तसेच भूत अस्तित्वात आले. भूतांना पिल्लं होतात.
पण त्यांना जाण असल्याने ते आपली भूतसंख्या मर्यादीत ठेवतात. त्यांची रहाणशैली ग्लोबल ग्लोबल वार्मिंगमध्ये अजिबात भर घालत नाही.

भूत शक्यतो महिलांचे होते.
1. मेल्यानंतर दागिने कोण पळवतंय म्हणून
2. जिवंतपणी बरीच खरेदी राहिली म्हणून
3. नवऱ्याने अमूक तमूक दिवशी दागिना घ्यायचा केलेला वादा पूर्ण केला नाही म्हणून
4. माझ्या मागे कोणत्या सटवीला दागिने केले या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून

त्यांना पिल्ले होतात म्हणजे त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करत असतील हे गृहीत धरून
मग आंतरजातीय, धर्मीय, खंडीय पण चालतात का
होणारे भूत कोणाचे आडनाव लावते? ममा भुताचे का पप्पाचे
त्यांचे ठरलेले एरिया असतात असं वाचलेलं, मग हुंड्यात ते जावयाला जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश देत असतील का?

चांगले इन्फोपार्क मधले स्थळ चालून आलेलं पण बाबांनी आंतरजातीय नको म्हणून या असल्या सदाशिव पेठी ला हो म्हणायला भाग पाडले
असे संवाद त्यांच्यात होत असतील का?

आपल्यात प्रेमात मरेपर्यंत साथ देण्याच्या आणाभाका असतात
ते काय म्हणत असतील?

तुम्ही माणसांचेच सगळे नियम त्यांना परत लावत आहात.
मांजरीलाही पिल होतात, कबुतरांना होतात.
ते सुद्धा खेडे गाव, शहर, जंगल, आणि शहरात नरिमन पॉइंट धारावी विविध ठिकाणी असतात.

आता त्यांच्यासाठी वर विचारलेले प्रश्न स्वतःला विचारून पहा बघु.

मांजर आणि कबुतर हे प्राणी आहेत
भूत हे प्रगत असायला पाहिजेत ना त्यांच्यापेक्षा
इव्हन माणसापेक्षा
अदृश्य होणे, वस्तूंच्या आरपार जाणे, हवा तो आकार घेणे हे अद्याप इतक्या वैज्ञानिक प्रगती नंतरही जमलेलं नाही
ते पिढ्यान्पिढ्या भूत करत आलेले आहेत

त्याना अगदीच सारख खाऊन सगळीकडे शिटून ठेवणाऱ्या प्राण्यांशी तुलना करू नका Happy

प्रगती करून पार पुढे गेले आहेत.
ग्लोबल वार्मिंगवर त्यांच्या रहाण्याचा कणभरही फरक नाही, म्हणजे विचार करा, जात, धर्म, आडनाव, विवाह पद्धत, पितृ/मातृसत्ताक पद्धत इत्यादि पासून किती पुढे निघुन गेलेत ते.

Pages