प्रभावी भाषणासाठी...

Submitted by कुमार१ on 21 December, 2021 - 23:46

आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला. माझ्यावर झालेले शालेय शिक्षकांचे संस्कारही यासाठी उपयोगी पडले. तसेच वक्तृत्वकलेसंबंधी काही पुस्तके वाचली. या अभ्यासातून माझ्यावर काही चांगल्या वक्त्यांच्या कृतींचा प्रभाव पडला. पुढे त्यात स्वानुभवाने काही भर घालता आली. या संदर्भातील काही रंजक व रोचक माहिती, अनुभव आणि किस्से आपल्या सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी हा लेख लिहितोय. माझ्याप्रमाणेच इथल्या वाचकांमध्येही काही हौशी वक्ते असू शकतील. त्यांनीदेखील आपापले असे अनुभव प्रतिसादांमध्ये जरूर लिहावेत.

१.
सुरुवात करतो नामवंत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या संदर्भातील एका प्रसंगाने. हा किस्सा रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे.
एकदा शिक्षणदिनाच्या निमित्ताने आकाशवाणीने पुलंना अवघ्या ४ मिनिटांचे भाषण देण्यासाठी बोलावले होते. पिंगे तेव्हा तिथले अधिकारी होते. त्यांचा अंदाज होता की, पुलं भाषणाच्या फार तर तासभर आधी येतील आणि उत्स्फूर्तपणे ते छोटेसे भाषण ठोकून देतील ! परंतु तसे अजिबात घडले नाही. पुलं पिंगे यांना दोन दिवस आधी भेटायला गेले. त्यांनी त्यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली. आधी या विषयावर कोण कोण व काय बोलून गेले आहे, त्याची सुद्धा चौकशी केली. मग भाषणाच्या तयारीसाठी २४ तास मागून घेतले. घरी गेल्यावर पुलंनी त्यावर पुरेसा अभ्यास करून अडीच पानी मजकूर तयार केला. दुसऱ्या दिवशी ते आकाशवाणीत गेले. तिथे त्यांनी आधी भाषणाची तालीम केली आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी तयार होऊन बसले. हे छोटेखानी भाषण त्यांनी बरोबर ३ मिनिटे ५९ सेकंदात बसवले होते.

एका लहानशा भाषणासाठी पुलंसारखा मुरब्बी साहित्यिक किती मेहनत घेतो हे वाचून मी थक्क झालो. श्रोत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे भाषण देण्यासाठी ते किती परिश्रम करीत हे यातून शिकता आले.

२.

दुसरा किस्सा आहे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान आणि साहित्यिक विन्स्टन चर्चिल यांचा. ते पट्टीचे वक्ते होते पण त्यांनी कधीही उत्स्फूर्त भाषण केले नाही. ते भाषणाची पूर्वतयारी अगदी कसून करीत. आधी उत्तम मसुदा तयार करीत. तो झाला की स्वतःच्या बायकोला तो खणखणीत आवाजात पण संथपणे वाचून दाखवत. अगदी पाच मिनिटांचे औपचारिक भाषण असले तरी त्याच्या ६-७ तालमी ते घरी करीत. अंघोळीच्या वेळेस ते आपले भाषण स्वतःलाच मोठमोठ्याने म्हणून दाखवत. प्रत्यक्ष भाषणाचे वेळी मात्र ते भाषण वाचून दाखवत. त्यांचे कुठलेही भाषण १५ मिनिटांच्या आत संपणारे असे हेही एक विशेष. बोलण्याची मंदगती आणि थांबत थांबत बोलण्याची पद्धत ही त्यांची खास वैशिष्ट्ये. अशी दांडगी मेहनत केल्यानेच त्यांना वक्तृत्वात उत्तुंग यश मिळाले. त्यांच्या कित्येक भाषणांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्यांची तडाखेबंद विक्री झाली.

एकेकाळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या या मुत्सद्द्याची भाषण-पूर्वतयारी पाहून आपण स्तिमित होतो. लेखन असो वा भाषण, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच त्यांच्याबद्दलच्या या माहितीतून मला शिकता आले.
वरील दोन नामवंत उदाहरणे दिल्यावर एक मुद्दा स्पष्ट करतो. आपण जरी या मंडळींसारखे व्यावसायिक वक्ते नसलो, तरीही त्यांचा तयारी व मेहनतीचा गुण आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. एखाद्या मर्यादित परिचित समूहात देखील जर आपण तयारीनिशी व परिपक्वतेने बोललो, तर त्याचेही वेगळेच समाधान मिळते. आपल्या छोट्याशा पण चांगल्या बोलण्याला मिळालेली श्रोत्यांची दाद आनंददायी व उत्साहवर्धक असते.
...
३.
आता वळतो एका मार्गदर्शक इंग्लिश पुस्तकाकडे. त्याचे नाव आहे Write better, Speak better. लेखकद्वयाची नावे आता आठवत नाहीत. ते रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन आहे. एव्हाना ते दुर्मिळ झालेले असावे. एका शब्दात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे बावनकशी सोने आहे ! मी ते वयाच्या तिशीच्या आतच वाचले. पुस्तकाच्या शीर्षकात दोन कलांचा उल्लेख आहे. या कलांमध्ये मला आजपर्यंत जी काही थोडीफार गती मिळाली त्याबद्दल मी या पुस्तकाचा कायम ऋणी आहे. उत्तम लिहिणे व बोलणे यासंबंधी पुस्तकात मिश्कील शैलीत अमूल्य मार्गदर्शन आहे. (त्यापैकी लेखनकलेसंबंधी मी या संस्थळावर अन्यत्र प्रतिसादांमधून पूर्वी काही लिहिले आहे). पुस्तकातील बरेचसे आता विसरलो आहे, पण जे एक-दोन मुद्दे तेव्हापासून मी आत्मसात केले ते चांगलेच लक्षात आहेत.

पहिला मुद्दा आहे वक्त्याच्या आत्मविश्वासासंबंधी. लेखकाने एक काल्पनिक परिस्थिती वर्णिली आहे. त्यामध्ये एखाद्या सामान्य हौशी वक्त्यासाठी काही सूचना केली आहे. समजा, एखाद्या सार्वजनिक मंचावर भाषणांचा कार्यक्रम आहे. त्यांमध्ये एक जण सामान्य माणूस आहे आणि बाकीची सर्व तालेवार मंडळी आहेत-अगदी वक्तृत्व शिरोमणी वगैरे. त्यांच्यापैकी एखादा अगदी राष्ट्रप्रमुख सुद्धा असू शकेल ! अन्य मंडळी देखील उच्चपदस्थ मान्यवर आहेत. वरील सर्वांनाच क्रमाने बोलायचे आहे. आता इथे गोची होते ती त्यातल्या सामान्य माणसाची. समारंभ सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर या सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रचंड दडपण येते. त्याच्यात क्षणभर कमालीचा न्यूनगंड येऊ शकतो. इथे या पुस्तकाचे लेखक त्याला बळ देतात. कसे, ते त्यांच्याच शब्दात लिहितो :

अशा वेळेस वरील वक्त्यांच्या समूहातील सामान्य माणसाने अजिबात बिचकू नये. मनात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. जगातील प्रत्येक माणसात कुठला ना कुठला गुण हा जबरदस्त असतो. हा जो गुण आहे तो बाजूच्या अन्य वक्त्यामध्ये बिलकुल नाही असे समजा. त्यांचे गुण त्यांच्यापाशी, पण ‘मी’ हा मीच आहे ही भावना पक्की करा. मग तुमची पाळी येईल तेव्हा निर्भिडपणे जे काय बोलायचं आहे ते मनापासून बोला. तुमचे भाषण सुद्धा लोक उचलून धरतील”

अशी भावना जर प्रत्येक होतकरू वक्त्याने मनात ठेवली तर त्याचा आत्मविश्वास नक्की उंचावेल. पुस्तकातील या सूचनेचा मला काही प्रसंगात चांगला उपयोग झाला आहे. वक्तृत्वासाठी लागणाऱ्या निर्भिडपणाची त्यामुळे सुरेख जोपासना करता आली.

आपले भाषण फुलवण्यासाठी आपण बरेचदा म्हणी, वाक्प्रचार आणि थोरामोठ्यांची अवतरणे इत्यादींचा वापर करतो. त्या संदर्भात पुस्तकात काही चांगल्या सूचना आहेत. शंभर वर्षे जुन्या म्हणी, घासून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार, सुमार कोट्या, इत्यादी गोष्टी भाषणात कटाक्षाने टाळा, नव्हे गाळा, असे लेखकांचे आग्रही प्रतिपादन आहे. या स्वरूपाच्या गोष्टी आपण भाषणात अंतर्भूत केल्याने त्यावर श्रोत्यांकडून रटाळपणाचा शिक्का बसण्याचा धोका असतो. अन्य लोकांची अवतरणे अगदी गरज असली तरच आणि ते सुद्धा संपूर्ण भाषणात एखादेच वापरावे हेही चांगले.
ज्या सभांमध्ये वक्त्याला ‘माइक’ (microphone)चा वापर करून बोलायचे असते त्यासंदर्भात काही मौलिक सूचना या पुस्तकात आहेत. आता त्याबद्दल पाहू :

अ) माइक वापरून बोलताना एक घोडचूक अनेक जण करतात. आपले बोलणे सुरू करण्यापूर्वी समोरच्या माइकमध्ये जोराची फुंकर मारून आवाज उमटतो का, ते पाहतात. हे अत्यंत अयोग्य आहे. अनेक वक्त्यांनी अशाप्रकारे माइकमध्ये वारंवार फुंकर मारल्याने आपल्या तोंडातील बाष्प त्यात जाऊन साठते व लवकरच त्याच्यातील विद्युत यंत्रणा खराब होते. म्हणून ही सवय कटाक्षाने मोडली पाहिजे. त्याऐवजी माइक हातात घेतल्यावर श्रोत्यांकडे दूरवर पहात, “हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना ?” असे स्पष्टपणे विचारावे हे उत्तम. (माइक हातात घेणाऱ्या प्रत्येकाने अशी फुंकर मारून ठेवणे हे पुढच्या वक्त्याच्या अनारोग्याला निमंत्रण देत असते. सध्याच्या महासाथीच्या काळात तर हा मुद्दा अधोरेखित व्हावा).

आ) काही सभांमध्ये एखाद्या वक्त्याला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो. अशा भाषणांमध्ये बहुतेकांकडून एक चूक सतत होत राहते. वक्त्याच्या समोर माइक असतो. पण वक्ता परिचय करून देताना सलग श्रोत्यांकडे न बघता मध्येमध्ये काटकोनात मान वळवून पाहुण्यांकडे बघत राहतो. यामुळे होते असे की, त्याचे निम्मेअधिक बोलणे माइकच्या कक्षेत येत नाही आणि श्रोत्यांना ऐकूच जात नाही. इथे वक्त्याने एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे. पाहुण्यांचे नाव, हुद्दा आणि परिचय हे सर्व सुस्पष्टपणे सांगताना तोंड पूर्णपणे माइकसमोर आणि नजर श्रोत्यांकडेच ठेवली पाहिजे. आपले सर्व बोलणे संपल्यावरच पाहुण्यांकडे मान वळवून त्यांना अभिवादन करावे.

भाषणाची पूर्वतयारी, त्याचा गाभा, प्रत्यक्ष संवादफेकीचे कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबी यासंबंधी कितीतरी चांगली माहिती या पुस्तकातून मला समजली. अशा या सुंदर पुस्तकाबद्दल लेखक आणि प्रकाशक यांना मनोमन वंदन !
...
४.
आता अजून एका पुस्तकाबद्दल. ‘सभेत कसे बोलावे’ हे माधव गडकरी यांचे छोटेखानी पुस्तक आहे. त्यातून काही मूलभूत गोष्टी शिकता आल्या. चांगल्या वक्तृत्वासाठी चौफेर वाचन व मननाची गरज लेखकाने अधोरेखित केली आहे. श्रोत्यांना आपला एखादा विचार पटवण्याची काही माध्यमे असतात. त्यापैकी विनोद हे सर्वात मोठे व उपयुक्त माध्यम असल्याची टिपणी त्यात आहे. महत्वाचे म्हणजे भाषणाची सुरुवात हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे लेखक सांगतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “जो वक्ता पहिल्या पाच मिनिटात सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो”. या विवेचनातून मी भाषणाची सुरुवात नेहमी आकर्षक व प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले. वेळोवेळी त्याची पसंती श्रोत्यांकडून मिळाली.

आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा झालो’ या पुस्तकातील ‘मी वक्ता कसा झालो’ या लेखाबद्दल मी ऐकून आहे. परंतु अद्याप ते वाचलेले नाही.

आपल्या भाषणातील शब्दांचे सुस्पष्ट उच्चार हा या कलेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी बोलण्याच्या बाबतीत काही जोडाक्षरे आणि पुढे विसर्ग असलेल्या काही अक्षरांचे उच्चार कष्टपूर्वक व्यवस्थित करावे लागतात. स्वतःचे उच्चारण सुधारण्यासाठी एक रोचक सूचना मी एका साप्ताहिकातील लेखात वाचली होती. ती आता लिहितो. त्या लेखकाने असे म्हटले होते की, पुढील वाक्य सर्व वक्त्यांनी रियाज केल्यासारखे रोज अनेक वेळा स्वतःशी मोठ्याने म्हणावे :

“पश्चिमेकडून जो माझा मित्र आला तो माझा जीवश्च कंठश्च मित्र होता”.

वरील वाक्य वारंवार म्हटल्याने आपल्या स्वरयंत्राच्या विविध भागांना नियमित व्यायाम होत राहतो. त्यातून आपले उच्चार सुस्पष्ट राहतात. पूर्वी मी हे वाक्य स्नानगृहात असताना नियमित रोज १० वेळा म्हणायचो. अलीकडे मात्र अंगात आळस भरला आहे. नव्या लेखनाचा विषय सुचणे असो किंवा भाषणाची मोठ्याने तयारी करणे असो, त्यासाठी स्नानगृह हे खरोखरच उत्तम ठिकाण आहे असा(चर्चिलप्रमाणेच) माझाही अनुभव ! तिथे आपल्याला मिळणारा खाजगी अवकाश आणि निवांत मनस्थिती या गोष्टी दोन्ही कलांच्या विकासाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत.
....
५.
एखाद्या समूहातील संभाषण हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनापासूनच होते. शालेय शिक्षकांचे संस्कार त्या दृष्टीने अर्थात महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात आमच्या एका शिक्षकांची आठवण सांगतो. शिकवण्याच्या ओघात त्यांनी एकदा एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. बऱ्याचदा समूहात वावरताना समाजातील एखादा कटू, अप्रिय किंवा गडबडघोटाळ्याचा विषय निघतो. अशा वेळेस, जर त्याच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा आपण उल्लेख करणार असू तर त्या संदर्भात तारतम्य बाळगले पाहिजे असे त्यांचे मत होते. अशा वादग्रस्त घोटाळ्यासंदर्भात बोलताना कुठल्याही व्यक्तीचे थेट नाव घेऊ नका अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. थेट नाव घेण्यापेक्षा त्या व्यक्तीचे अप्रत्यक्ष वर्णन करावे. ते जर हुबेहूब जमले तर तिचे नाव न घेताही श्रोत्यांना जे काही समजायचे ते बरोबर समजते !

नंतर मोठे झाल्यावर या शिक्षकांचा हा सल्ला अधिक उमजला. कोणावरही जर आपण पुराव्याविना काही जाहीर आरोप करत असू तर ते अत्यंत बिनबुडाचे ठरतात. उलट, जर का आपण नाव घेऊन कोणाबद्दल असे काही वावगे बोललो तर बदनामी केल्याचे किटाळ आपल्यावर येऊ शकते. त्यादृष्टीने आमच्या गुरुजींची ही शिकवण मौलिक होती. आज समाजात जेव्हा काही वाचाळवीर येता जाता काही व्यक्तींची नावे घेऊन खुशाल वाटेल ते बरळताना दिसतात तेव्हा आमच्या या शिक्षकांची वारंवार आठवण होत राहते.
...
६.
वयाची चाळिशी उलटल्यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी मिळून एक ‘वाट्टेल ते’ या स्वरूपाचा भाषणकट्टा चालवला होता. त्याच्या संयोजनाची जबाबदारी मी आपण होऊन स्वीकारली होती. त्यासंबंधी एक स्वतंत्र लेख, ‘कथा एका कट्ट्याची’ यापूर्वीच इथे (https://www.maayboli.com/node/63779) लिहिला आहे. त्या उपक्रमातूनही भाषणासंबंधी बरेच काही शिकता आले. त्यात आम्हा मित्रांपैकी क्रमाने प्रत्येक जण काही दिवसांच्या अंतराने सर्वांसमोर बोलत असे. या उपक्रमातून आपल्या अन्य सहकारी मित्रांच्या बोलण्याची लकब, देहबोली, संवादक्षमता, आवाजातील चढ-उतार आणि विनोदनिर्मिती अशा गुणांचे निरीक्षण मला जवळून करता आले. त्यातून स्वतःच्या वक्‍तृत्वविकासाला चांगली चालना मिळाली.

उत्स्फूर्त ( किंवा आयत्या वेळी विषय समजल्यानंतर) बोलणे ही देखील एक वेगळी कला आहे. त्यासाठी संबंधित भाषणाची 'तयारी' हा भाग उद्भवत नाही. परंतु, एकंदरीत आपल्या आयुष्यातील वाचन, चिंतन, मनन आणि बहुश्रुतता या शिदोरीवर ते करता येते. जशी या गोष्टींची बैठक असेल त्यानुसार ते वठते.

७.
प्रत्यक्ष गुरु, पुस्तकरूपी ज्ञान आणि अन्य वक्त्यांचे निरीक्षण या सर्व प्रकारांनी आपण आपली वक्तृत्वकला घडवत जातो. वयानुसार जसे आपण या कलेत मुरत जातो तशी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. वरील सर्वांपेक्षाही आपला सर्वोत्तम गुरु असतो तो म्हणजे स्वानुभव ! भाषणादरम्यान आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्याला नंतर जाणवतात. अन्य वक्त्यांकडून वारंवार घडणाऱ्या चुकांचेही निरीक्षण होत राहते. विविध सभांमध्ये काही मूलभूत शिष्टाचार पाळले जातात किंवा नाही, हेही नजरेत भरते. अशा निरनिराळ्या चुका आपल्या पुढच्या भाषणात होणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊ लागतो. समाजात काही सभांमध्ये वक्त्यांची ठराविक रटाळ छापील वाक्ये, बोलण्याच्या पद्धती आणि वेळखाऊपणा हे वर्षानुवर्ष चालू असलेले दिसते व ते खटकते. अशा काहींचा आता आढावा घेतो.

समजा, एखाद्या सभेत सात-आठ जण ओळीने बोलणार आहेत. सुरुवातीच्या दोन-तीन वक्त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे ते म्हणजे, आपल्याला नेमून दिलेली वेळ आपण पाळावीच. जर आपण त्या वेळेचे उल्लंघन करत राहिलो तर आपण तळाच्या क्रमांकाच्या वक्त्यांवर अन्याय करीत असतो. पण वास्तवात बहुतेकदा हे वरचे श्रोते वेळमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे बिचाऱ्या तळातील वक्त्यांची बोलण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा श्रोते कंटाळलेले असतात ! श्रोत्यांच्या कंटाळलेपणाचे भान तळाच्या वक्त्यांनी (नाइलाजास्तव) बाळगणे गरजेचे आहे. पण इथेही तसे होत नाही. जेव्हा असा तळाच्या क्रमांकावरील वक्ता बोलायला उठतो तेव्हा उगाचच वेळ खाणारी काही रटाळ वाक्ये कशी बोलली जातात त्याची ही जंत्री :

“माझ्या आधीच्या दिग्गज वक्त्यांनी सगळे काही बोलून ठेवल्याने खरंतर मला आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही..”

• “श्रोतेहो, तुम्ही सगळे आता कंटाळले असाल व चहापानासाठी/ घरी जायला उत्सुक असाल. तेव्हा मी काय तुमचा फार वेळ घेत नाही”... (असे म्हणून पुढे भाषणाचे रटाळ लांबण लावणे ! ).

• भाषण सुरू करताना व्यासपीठावरील सर्वांची नावे त्यांच्या हुद्दा व बिरुदांसकट सर्व वक्त्यांनी पुन्हा पुन्हा घेत बसणे, हे तर श्रोत्यांसाठी महाकंटाळवाणे.
....आणि शेवटी...

• आभार प्रदर्शन करणाऱ्याच्या तोंडचे ठराविक नकोसे वाक्य,
“तुम्ही जरी आता खूप कंटाळला असलात तरी आभार प्रदर्शनाचे ‘गोड काम’ माझ्याकडे आलेले आहे आणि मी ते अगदी थोडक्यात(?) करणार आहे ......”

असे अजून काही नमुने विस्तारभयास्तव टाळतो.
माझ्या मते वर नमुना म्हणून दिलेली घासून गुळगुळीत झालेली व वेळखाऊ वाक्ये तळाच्या वक्त्यांनी टाळावीत. आपल्याला जो काही निसटता वेळ मिळाला आहे त्यात स्वतःच्या मोजक्याच महत्वाच्या मुद्यांना हात घालावा आणि भाषण नेटके ठेवावे. श्रोत्यांचा उत्साह टिकून असेपर्यंतच वक्त्यांच्या भाषणाला अर्थ राहतो. त्या मर्यादेनंतर तो श्रोत्यांवर झालेला नकोसा भडीमार असतो !

असा हा माझा हौशी वक्तृत्वकलेचा आतापर्यंतचा अभ्यास व प्रवास. त्यातील काही रोचक अनुभव तुमच्यासमोर मांडले. प्रतिसादांमधून आपणही आपले अनुभव जरूर लिहा. लेख आणि प्रतिसाद यांच्याद्वारे झालेल्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आपल्या सर्वांचाच मनोविकास घडावा ही सदिच्छा !
....................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद
....
आचार्य अत्रे यांचे एक धमाल व दुर्मिळ भाषण इथे ऐकता येईल:

https://youtu.be/x5fi3182p4Y

धन्यवाद .
...
कला ही प्रयत्नसाध्य असते या मुद्द्याला अनुसरून माझाच ‘अपयशातून यश’ या प्रकारचा अनुभव लिहितो.

शाळेपासून ते थेट पदवी मिळेपर्यंत मी वक्तृत्व किंवा अन्य कुठल्याही स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नव्हता. पुढे पदव्युत्तर शिक्षण चालू झाले. एकदा एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेसाठी कॉलेजने चार जणांचा चमू निवडला होता. परंतु आयत्या वेळेस त्यातील एक जण गळाला. जो वक्तृत्व सचिव होता त्याला काही करून ती जागा फुकट घालवायची नव्हती. मग त्याने मला गळ घातली की तू स्पर्धेत भाग घे. क्षणभर मी गांगरलो. पण तोच म्हणाला, बिंदास बोल.
स्पर्धेसाठी निघालो. प्रवासात माझ्या लक्षात आले की बाकीचे तिघे हे या कलेत मुरलेले आहेत आणि आपणच नवखे आहोत. आमच्या सचिवाने एक तोडगा काढला. तो म्हणाला, “आयत्या वेळचा विषय हा जो स्पर्धेतला भाग आहे त्यासाठी तुझे नाव देतो”. म्हटलं, बर बघू काय होतय.
आता स्पर्धेच्या दिवशी त्यांनी पंधरा मिनिटे आधी आम्हाला विषय सांगितला. विचार केला पण फार काही मनासारखे सुचेना. तेवढ्यात एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. स्वतःला म्हटलं, आपण बोलण्याची सुरुवात विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी सारखी करूया म्हणजे ती आकर्षक होईल. पुढे मग जमेल तसे बोलायचे चार-पाच मिनिटं.

स्पर्धा सुरू झाली. माझा क्रमांक आला. मोठ्या आवेशात मी मंचावर गेलो आणि विक्रम-वेताळ पद्धतीने बोलायला सुरुवात केली. पहिली दोन मिनिटे मी बोलू शकलो आणि श्रोतेसुद्धा स्तिमित झाल्याचे मला जाणवले. पण पुढे मला काही मुद्दाच सुचेना आणि सुन्न झालो. मग,“ माफ करा” असे म्हणून मंच सोडून निघून आलो.

आता हे माझे अपयशच. पण यातून मला एक धडा मिळाला की, भाषणाची सुरुवात आकर्षक करणे हा भाग आपल्याला चांगला जमतोय. मग त्यानंतर मी वरील लेखात लिहिल्याप्रमाणे बराच अभ्यास आणि थोडेफार परिश्रम घेऊन ही कला विकसित करीत राहिलो.,
पुढे काही वर्षानंतर मला त्यात बर्‍यापैकी गती आली. सध्या म्हणाल तर अशी परिस्थिती आहे. कौटुंबिक मेळावा मित्रांचे संमेलन किंवा एखाद्या (आरोग्य, पर्यावरण किंवा अन्य) विशेष दिनानिमित्त मला आमंत्रित वक्ता म्हणून बोलावले जाते आणि तेव्हा श्रोत्यांना आवडेल असे मुद्देसूद आणि रंजक भाषण मी करू शकतो.

छान अनुभव...
>>>मुद्देसूद आणि रंजक भाषण मी करू शकतो.>>>
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता....
असाध्य ते साध्य करीता सायास...

आजच्या छापील सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ' नेहरु विरुद्ध मुखर्जी : अविस्मरणीय शाब्दिक द्वंद्व" हा चांगला लेख आहे.
भारताची पहिली घटना दुरुस्ती १९५१ मध्ये झाली. तेव्हा संसदेमध्ये अनेकांची आक्रमक भाषणे झाली. ती चर्चा हा संसदेच्या इतिहासातील हे एक उत्कृष्ट वाद-विवाद मानला जातो.

चर्चेदरम्यान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले घणाघाती भाषण गाजले.
सोळा दिवस चाललेल्या चर्चेसंदर्भात दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत ती अशी :

1. Nehru : The debates that defined India

2. Sixteen stormy days

आभार !
...............
अ‍ॅड. बाबुराव कानडे यांनी आचार्य अत्रे यांच्याविषयी व्याख्यानांची मालिका केली आहे..
त्यातला पहिला भाग सह्याद्री वाहिनीवर रविवार, दिनांक ९ जानेवारी २०२२ ला सकाळी ११.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे.
इच्छुकांनी जरुर बघा.

आज सहज युट्युबवर चक्कर टाकली असता खूप पूर्वी दूरदर्शन वर झालेला जसपाल भट्टींचा फ्लॉप शोचा एक भाग पहिला.
या भागाचे नाव समारंभाचे प्रमुख पाहुणे असे आहे.
त्यात प्रमुख पाहुण्यांनी पैसे देऊन भाषण लिहून आणण्यापासून अनेक प्रसंगांची धमाल टिंगल आहे.
https://www.youtube.com/watch?v=wdDusqwOnVg

ज्यांनी पूर्वी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा

प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला.
त्यांच्या प्रभावी वृत्तनिवेदनाने आपण जणू त्यांच्या प्रेमातच पडायचो !
आवाजाच्या क्षेत्रात ते अमिन सयानी यांना गुरुस्थानी मानायचे.
आदरांजली !

काही आवाज 'आयडियल' म्हणून आपल्या डोक्यात बसलेले असतात. लता मंगेशकरांचा गाण्यात, अमिन सयानी यांचा रेडिओ जॉकी म्हणून आणि प्रदीप भिडे यांचा वृत्तनिवेदक म्हणून. बाकी कोणाचेही आवाज आपण ऐकले तर त्या त्या क्षेत्रातल्या आयडीयल आवाजाशी आपण नकळत तुलना करत राहतो. ह्या लोकांनी 'मेरी आवाजही पहचान है' म्हणणे हा सुद्धा एक विनयच झाला. त्यांचा आवाज हा केवळ त्यांची ओळख म्हणून मर्यादित नाही; उलट त्यांनी त्या त्या क्षेत्रात आवाज कसा असला म्हणजे सर्वोत्तम म्हणता येईल याचे मापदंडच उभे केले.

रसिक वाचक,ठाणे प्रस्तुत ग-गप्पांचा.
पुष्प तिसरे :चंद्रशेखर टिळक

https://m.youtube.com/watch?v=AJ1lwzq4ALY

त्यांची भाषणशैली आवडली.
टिळक आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीचा प्रसंग ऐकण्यासारखा आहे.

डॉक्टर साहेबांचा नेहेमी प्रमाणे अजून एक चांगला लेख!

Toastmasters क्लबचा कोणाला अनुभव आहे का?
एका क्लबमध्ये आमंत्रणावरून पाहुणा म्हणून (guest) दोन ते तीन मिटिंग्ज केल्या होत्या परंतु तेथील वातावरण फारच औपचारिक वाटले आणि मिनिटां मिनिटांचा हिशेब बघून आश्चर्य वाटले होते. सभा संचालक टेबलावर हातोडा आपटून आपटून सभा चालवत होते. मात्र प्रत्येक वक्त्याला कितीवेळा um, uh, er, ah केले, किती fillers (like, ok, right, you know, I mean etc.) वापरले, काय चुकले, कुठे सुधारणा पाहिजे, गरज नसताना एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केली (pleonasm) असे उपयुक्त अभिप्राय देत होते.

तेव्हा पाच मिनिटांसाठी उत्स्फुर्तपणे (impromptu) बोलण्याची संधी मिळाली होती. सुदैवाने माहितीतला विषय मिळाल्याने पाच मिनिटे भाषण ठोकले होते. पुढे वूहानच्या चिनी विषाणूच्या जागतिक साथीमुळे सर्व जगातील व्यवहार ठप्प झाल्याने क्लब बंद पडला. काही काळानंतर फार्मा कंपन्यांनी भरपूर पैसा कमावल्यावर साथ आटोक्यात आल्याने क्लब चालू झाला परंतु परत काही गेलो नाही अर्थात जबरी फी हे एक कारण होतेच.

आणखी एकदा एका कार्यशाळेत साधारणतः तीन ते चार मिनिटांचे छोटे भाषण करण्याची संधी मिळाली होती तेव्हा व्यासपीठावर जाऊन मी म्हणालो
सामान्यतः भाषण विसरल्यामुळे, शब्द न आठवल्याने आणि अनेक लोकांच्या नजरा आपल्यावर खिळल्यामुळे वक्त्यांची त्रेधातिरपीट उडते तेव्हा आज मी एक प्रयोग करणार आहे मी आता दोन मिनिटे इथे काहीही न बोलता फक्त उभा राहणार आहे. ते podium (मराठी शब्द? मंच?) नसलेले मोकळे व्यासपीठ होते. मग वर्गातील प्रत्येकाकडे आळीपाळीने बघत, सर्व वर्गावर नजर फिरवीत, काहीही न बोलता शांतपणे उभा राहिलो. हा प्रकार सगळ्यांना अनपेक्षित असावा. प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरू झाली, त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेना. आश्चर्य चकित नजरेने माझ्याकडे बघत होते. दोन मिनिटांनी माझे निःशब्द भाषण शांतपणे "बघितल्याबद्दल" सर्वांचे आभार मानले परंतु व्यासपीठावरून खाली उतरल्यावर शिक्षकांनी नापसंती व्यक्त केली. संधी मिळाली होती तर दोन शब्द बोलायला पाहिजे होते असे सुनावले. मला मात्र एक वेगळा प्रयोग केल्याचे समाधान लाभले.

* निःशब्द भाषण >>> छान !
काही नाटकांमध्ये शांततेच्या काही जागा मुद्दाम सोडलेल्या असतात. त्या वेळात अभिनेते देहबोलीतूनच काहीतरी दाखवतात. याला निर्भाषिते असं म्हणतात ( भाषिते आणि निर्भाषिते ).
..
* podium = मंच योग्यच.
( काही वर्षांपूर्वी एका कवी संमेलनाला गेलो होतो. त्याच्या अध्यक्षीय भाषणात ते महोदय म्हणाले, की हल्लीची कविता मनस्विनी होण्याऐवजी मंचकीय होत चाललेली आहे.

मला हा बोलण्याचा प्रसंग फार क्वचितच आला. पण आपल्यावर भाषण द्यायची वेळ कधीही अचानक येऊ शकते यांनी सहमत. तयारी ठेवली पाहिजे.
१) सर्वप्रथम किती वेळ दिला आहे हे लक्षात घेणे.
२) विषय काय आहे.
३) "तुमच्यातले काही जण जाणकार आणि अनुभवी असतील" परंतू मी या विषयाकडे कसा वळलो हे थोडक्यात सांगणे. यातून श्रोत्यांना सहभागी करता येते.
४) माईक हातात घेतल्यावर श्रोत्यांच्या वयाचा, उत्सुकतेचा, पुरुष/स्त्रिया यांचा प्रथम अंदाज घेणे. तसेच ते खरोखरच ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का हे जाणणे. त्यांचे लवकर निसटायचे किंवा पुढील अल्पोपहार घेण्याकडे चुळबूळ आहे का हे पाहाणे. अन्यथा आपली वृथा बडबड ठरेल.
५) अगोदरचे किंवा नंतरचे वक्ते कोण आहेत आणि आपल्याला वेळ मारून न्यायला उभे केले आहे का याचा विचार करणे.
६) खरोखरच आपलेच भाषण आणि आपला विषय मुख्य असेल तर श्रोत्यांना प्रथम प्रश्न विचारायला देणे ही महत्वाचे मानेन. कारण वेळ संपल्यावर आणखी अर्धा तास कुणी देणार नाही आणि भाषणांची गाडी सुरवातीपासूनच योग्य रुळावर ठेवता येईल. श्रोत्यांच्या सहभाग प्रथमपासूनच धरल्याने {प्रश्न विचारणारे तरी} कान देऊन ऐकतील अशी आशा ठेवता येईल.

सर्वांना धन्यवाद !

* श्रोत्यांना प्रथम प्रश्न विचारायला देणेही महत्वाचे मानेन >>>
चांगला मुद्दा. आवडला.

Pages