काही वर्षांपूर्वी, आईने जपून ठेवलेली, माझी जुनी वही सापडली होती. त्या संग्रहातील काही ओव्या खाली देत आहे. कवी माहीत नाही. या ओव्या पूर्वी सिध्दीच्या धाग्यावरती एका प्रतिक्रियेमध्ये दिलेल्या आहेत पण आज, इथे वेगळ्या धाग्यात देते आहे.
-------------------------------------------------------------------------
ओव्यांची आठवण येण्याचे कारण पुढील साईट सापडली - https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A...
यामध्ये 'लोकसंस्कृतीतील स्त्रीरूपे - डॉ कृष्णा इंगोले' नावाचे पुस्तक सापडले. जबरदस्त प्रस्तावना आहे. सुंदर पुस्तक जरुर वाचा. या ओव्यांतून दिसून येणारं, भावविश्व इतकं अलवार, हळूवार आहे. मन लोण्यासारखं होउन जातं. कसं काय या निरक्षर बायांनी असे साहीत्य रचले असेल!!
-------------------------------------------------------------------------------------------
(१) राजबन्सी गं पाखरु| चोचीमंदी दुखावलं
मोत्या नी पवळ्याचा| चारा खानं इसरलं|
(२) उन्हाळ्याचं ऊन्| झाडाला नाही पान|
जंगल पाखराचं| उदास झालं मन|
(३) हासून खेळून्| नार चालली वनाला|
अंतरीचं दु:ख| काय कळे गवाराला|
(४) देहाला भिरुडं| सांगून काय सार|
जगाला दिसतं| झाड गं हिरवं गार|
(५) सुख माझं दु:ख| दोघं मांडले दुकानी|
सुखाला मिळे धनी| दु:खाला नाही कोणी|
.
(६) थोराच्या आम्ही लेकी| आम्ही फार शिरजोर|
सर्पाचे केले दोर| वाघ नेले पाण्यावर|
(७) बोलशील बोल| बोलू देते एक दोन|
तिसर्या बोलाला| उतरीन भारी पण|
.
(८) माळ्याच्या मळ्यामंदी| हुबी माळीण एकली|
जाईच्या फुलांची गं| हिनं काचोळी गुंफीली|
(९) माळ्याच्या मळ्यामंदी| हाये माळीण मइना|
जाईच्या कळ्यामंदी | हिनं गुंफला आईना|
.
(१०) जोडीला मायबहीण| जात साळूची वायली|
एका ताटात जेवायाची| हौस मनात र्हायली|
(११) तुझा माझा भाऊपणा| जसा डोंगराचा झरा|
वरी जमू द्या कचरा| अंतरात लोभ खरा|
.
(१२) रांधोन घालते घरादाराला, पाहुण्याला,
निवद मनोमन माज्या ईठ्ठल देवाला|
.
(१३)माझ्या गं अंगणात| सांडीला दूधभात|
जेवीला रंगनाथ| तान्हा बाळ|
(१४) माझ्या गं अंगणात| सांडीली दूधपोळी|
जेविली चाफेकळी| लेकीबाई|
.
(१५) पिकलेलं लिंबू| लिंबू झाडाला तोलेना|
गर्व झालेली बोलेना| वैनीबाय|
(१६) शेजी गं पुसते| तुला भाऊ कोणकोण|
चंद्रसूर्य दोघेजण| भाईराज|
.
(१७) अरण्या रानात| कोण रडतय आइका|
सीतेला धीर देती| बोरी बाभळी बायका|
(१८) रामाच्या महालात| जळे सोन्याची समई|
लाकूड पेटवून| सीता बाळाचं तोंड पाही|
.
(१९) मिरगाच्या महीन्यात्| काय आभाळ उठीयेलं|
कुना गं कुणब्याचं| बाळ पेराया नटयेलं|
.
(२०) बापानं दिल्या लेकी| नाही पाहीलं वतन|
कसाबाच्या घरी| गाई बांधल्या रतन|
(२१) बाप म्हणे लेकी | तू गं नशीबाची हीन|
डोंगर धुंडल्यानं| पळसाला पानं तीन|
(२२) बाप म्हणे लेकी| मर मर वं पापीणी|
तुज्या संसाराची| माज्या जीवाला घोकणी|
.
(२३) भरताला नारी| नको बोलू अजंदुजं|
अपुल्या जल्माचं| त्यान उचललं वझं|
(२४) फाटला पालव| घे गं नीरीला झाकून|
आब कंथाचा राखून|
.
(२५) दुबळ्या भ्रताराची| नको करुस हेळणा|
वर्साला हालवीतो| कोडकौतुकं पाळणा|
(२६) वळणाचा पाऊस | कुठं पडतो कुठं न्हाई|
भरताराचं सुख| दैवालागून हाये बाई|
(२७) लेकीचा जल्म कसा| जसा बाभळीचा पाला|
वार्या वावटळानं गेला| धनी कुनाचा कोन झाला|
(२८) भरताराचं झालं| सरगामधी सोनं|
मागं राहील बाईल| तुळशीचं वाळवण|
(२९) दुबळा भरतार असू दे दुबळा बाई
सम्रत (समर्थ्)मायबाप, तिथं काडीची सत्ता नाही|
.
(३०) धाकला माजा दीर| गोरा छल्लाटा नाकयेला|
किती धाक मी लावू त्येला|
(३१) थोरलं माजं घर| त्येला चौकट मोराची|
करनी थोरल्या दीराची|
(३२) नणंद पाहुनी|कोन पुसे शेजारीन|
माझ्या चुड्याची कैवारीन|
.
(३३) पीर्तीचा कंथ बोले| राणी गं खाली बैस|
जातीस माह्येरा| मला कठीण जाती दिस|
.
(३४) माहा दुबळपण| उद्या निघून जाईल|
बालकाला माह्या| मोल हीर्याला येईल|
(३५) झाले बारा वर्षं| लेक झाला कामिनीचा|
पाऊस पडतो रंग| पाहून जमिनीचा|
.
(३६) लेका गं परीस| लेक कशानं ती उणी|
राजस बाई माझी| हीरा नव्हे ती हिरकणी|
(३७) सगळ्या झाल्या लेकी| शेजी म्हणते झाल्या झाल्या |
माऊली झुरे मनी| दाही दिशा चिमण्या गेल्या
.
(३८) डोंगरी वणवा| आग लागली तणाला|
जळती कीडा-मुंगी| शान्या उमज मनाला|
(३९) आपल्या मनाजोगं| मन गेले मी पहाया|
सोन्याच्या नादानं| खरं रेशीम गेलं वाया|
(४०) संसाराचा वेढा| वेढा बाई वंगाळ|
पान्यतली नाव| खुशीखुशीनं सांभाळ|
.
(४१) कडू विंद्रावण्| मला वाटे खावं खावं|
त्याचे हे असे ग| मला वेडीला काय ठावं|
(४२) गरतीची लेक| का गं कावरी बावरी|
तीळ घेतील झाडुनी| झाड पडेल वावरी|
(४३) हासू नको नारी| हशाचा भ्रम मोठा|
आपुला अस्तुरीचा| नारी गं जल्म खोटा|
.
(४४) अहेवाचं लेनं हात भरुन काकनं|
हळदीवरी कुंकू कपाळावरी दिस छान|
(४५) धनसंपदेचं नको देवास घालू कोडं|
हळदकुंकाचं राज असावं तेवढ|
.
(४६) तान्ह्या गं राजापायी जीव होतो थोडाथोड|
लाडका बाळ माझा , माझ्या काळजाचा घडा|
(४७) शेजी लेती लेनं पाच पुतळ्या कवामवा|
कपाळीचं नित दागीना माझ नवा|
(४८) एका करंड्याचं कुंकू रोज लेत्यात सासूसुना|
सये गं शेजीबाई असं भाग्य नाही कुना|
.
(४९) सुर्व्या उगवला उगवाला झाडावेरी|
किरन टाकीतो तोच माझ्या चुड्यावरी|
.
(५०) अहेव मरणाची मला हाये वो आवड|
म्होरं पतीपुत्र मगे कुंकवाची कावड|
(५१) अहेव मरणाची सयांनो मोठी मौज|
म्होरं चाले कंथ, माग गोतांची चाले फौज|
(५२) अहेव मरण येई असल नशीबात|
ध्याईला जागा तुळशीवनात|
-----------------------------------------------------------------------------------
वर उल्लेख केलेल्या, 'लोकसंस्कृतीतील स्त्रीरूपे' या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओव्या -
(१) रुक्मिणी धुणं धुती| विठ्ठल खडकावर बसं|
दोघांच्या पिरतीचं| चंद्रभागेला आलं हसं||
.
(२) राम या म्हणू राम| राम न्हाई सीतेच्या तोलाचा
हिरकणी माझी सीतामाय| राम हलक्या दिलाचा||
.
(३) लेकीच्या आईला| म्हणु नका हलकी|
लेकाच्या आईला| कुणी दिलीया पालखी||
.
(४) देशीच्या देशमुखा| का रे उभा तुझा घोडा|
कंथ माझा जंगलात| वाघीणीच्या मोजी दाढा||
.
(५) साळू निघाली सासर्याला| मी गं बघती खालीवर|
पोटची साळू दिली| सत्ता चालना तिच्यावर||
.
(६) घरचं होतं दूध| पराया घरचं आलं ताक|
किती सांगू सासूबाई| लेकीसारख्या सूना राख||
.
(७) पिकलं सीताफळ| हिरवी त्याची काया|
रागीष्ट भरताराची| पोटात त्याची माया||
.
(८) सोन्याचा पिंपळ| नाही कुणाच्या गावाला|
आळंदीचं वतन दिलं| ज्ञानोबा रायाला||
.
(९) जात्या तू ईश्वरा| कुण्या डोंगराचा तू ऋषी|
बया मालिणीसारखं| हुरदं उकललं तुझ्यापाशी||
कसं काय या निरक्षर बायांनी
कसं काय या निरक्षर बायांनी असे साहीत्य रचले असेल!!>>+1
अरे!! काय ठेवा आहे!!
अरे!! काय ठेवा आहे!!
जबरदस्त!!
धन्यवाद पाभे.https://ccrss
धन्यवाद पाभे.
https://ccrss.org/database/songs.php?location_id=211#top
https://ruralindiaonline.org/en/articles/gsp-masterpage/
- हे पण पहा.
येस,
येस,
अवांतर: विजेचा तुटवडा, अंगमेहनतची कमतरता, शुद्ध-सकस खाण्याचा आग्रह इत्यादीसाठी घरगुती दगडी जाते घरोघरी येवू घातले तर?
जात्याचा आकार, त्यातून येणारे आऊटपूट, कुटूंबसदस्यांची संख्या, त्यांना लागणारे आठवड्याचे पीठ इत्यादीवर काही संशोधन झाले आहे काय?
(व्यायामाची सायकल व त्याला जोडलेले जाते यांना क्षमस्व.)
अग काय सुंदर आहेत एकेक! मन
अग काय सुंदर आहेत एकेक! मन हेलावलं हे वाचून.. त्या काळातील स्रीजीवनाचे प्रतिबिंबच! काय समर्पित जीवन असेल!
एकेक ओवीचा अर्थ लिही तुझ्या सुंदर शब्दात!
https://www.maayboli.com/node/25270 हे बघ, मी लिहिलंय तस!
आर्या किती सुंदर धागा आहे
आर्या किती सुंदर धागा आहे तुझा. वाचते. त्यात तू अर्थ लिहून चार चांद लावलेत.
---------------
त्या पुस्तकाचा दुवा दिलाय त्यात इतकं सुंदर विवेचन आहे की मी काय वीट लावू ताजमहालास असे वाटले गं.
@आर्या, आपण बोलत आहात तसे
@आर्या, आपण बोलत आहात तसे तत्कालीन स्त्रीजीवनाचे प्रतिबिंब आहेच. समर्पित जीवन, मर्यादीत जाणीवा व मर्यादीत गरजेपोटी आलेले असावे.
दु:खात सुख मानणे, आहे त्यात समाधानी असणे हे तर आहेच पण आपले दु:ख कोठेतरी बाहेर पडावे या गरजेपोटी अशा ओव्या ओठांवर असाव्यात.
मला वाटते की, असल्या ओव्यातून स्त्री मनाचा अभ्यास अनेकांनी केला असेल, पण त्या ओव्या त्यांना का स्पूरल्या, त्यात नव्याने भर कशी पडत गेली, त्या ओवीकरीणच्या मनाची अवस्था कोणती होती याचा सांगोपांग अभ्यास व्हायला हवा. (एखाद्या पीएचडीच्या थिसीस साठी नको, त्यात केवळ पदवी प्राप्त करणे हा हेतू असतो, पण एक सामाजीक अभ्यास म्हणून आवश्यक आहे. )
मागे आकाशवाणीवर अमरावती की परभणी - आठवत नाही, पण तेथल्या जात्यावरच्या ओव्यांचा कार्यक्रम प्रसारीत झाल्याचे आठवते.
<<पण त्या ओव्या त्यांना का
<<पण त्या ओव्या त्यांना का स्पूरल्या, त्यात नव्याने भर कशी पडत गेली, त्या ओवीकरीणच्या मनाची अवस्था कोणती होती याचा सांगोपांग अभ्यास व्हायला हवा.< <<बरोबर आहे , स्त्रीमनाचे वेगवेगळे पैलू, अन तिची काय घुसमट असायची ते कळेल यातून! अभ्यास व्हायला हवा.
सामो, खूप छान अनमोल ओव्या.
सामो, खूप छान अनमोल ओव्या. मी_आर्या यांच्या अर्थासहीत ओव्या सुंदर. या ओव्यांचा एखादा कार्यक्रम व्हायला पाहिजे.
पीर्तीचा कंथ बोले| राणी गं
पीर्तीचा कंथ बोले| राणी गं खाली बैस|
जातीस माह्येरा| मला कठीण जाती दिस|
देशीच्या देशमुखा| का रे उभा तुझा घोडा|
कंथ माझा जंगलात| वाघीणीच्या मोजी दाढा||
>> कंथ म्हणजे नवरा असा अर्थ आहे तर. लेखासाठी आभार.
सामो, खूप छान अनमोल ओव्या. मी
सामो, खूप छान अनमोल ओव्या. मी_आर्या यांच्या अर्थासहीत ओव्या सुंदर. या ओव्यांचा एखादा कार्यक्रम व्हायला पाहिजे.>>> +१ अवीट गोडवा असतो ओव्यांमधे !!!
'रानजाई' या दुरदर्शन वरील कार्यक्रमात डॉ. सरोजिनी बाबर व शांता शेळके या दोघी ओव्यांवर चर्चा करायच्या. त्यातही सुरेख ओव्या ऐकायला मिळाल्या आहेत.
हा कार्यक्रम यूट्यूबवर उपलब्ध आहे.
थँक्स अस्मिता. बघते.
थँक्स अस्मिता. बघते.
सामो, खूप छान ओव्या.
सामो, खूप छान ओव्या.
वाचल्यावर भोंडल्याची गाणी पण आठवली.
सामो खूप आशयघन ओव्या आहेत.
सामो खूप आशयघन ओव्या आहेत.
निवडक १० त...
खूप धन्यवाद...
सामो, सगळ्या ओव्या खूपच सुंदर
सामो, सगळ्या ओव्या खूपच सुंदर आहेत. तुम्ही छान मांडल्या आहेत..
आर्या, नितांतसुंदर अर्थ सांगितलाय.. छान काहीतरी वाचल्याचं समाधान मिळालं.. धन्यवाद, इथे लिंक दिलीत.
खरंय अस्मिता, मी लहानपणी 'रानजाई' न चुकता बघायचे, श्रावणातल्या वेगवेगळ्या सणांप्रमाणे ओव्या आणि गाणी.. छानच