मला माबोकर होऊन २१ वर्षे आणि ११ महिने झाले आहेत त्यामुळे 'आमच्यावेळी...' वगैरे सूर आळवत या उपक्रमात हजेरी लावायला मी जामच एलिजिबल आहे.
२१ वर्ष ११ महिने म्हणजे ९८ चे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने (योग्य साल आहे!). तेव्हाचं रजिस्ट्रेशन. ऑलमोस्ट गद्धे पंचविशीत, सदाशिव पेठेतून उड्डाण करून अॅयथेन्स गावी जॉज्या प्रांती शिकायला पोचून महिना दीड महिना झाला होता. मराठी बोलायला/ ऐकायला मिळत नव्हती. स्कूलमधे कॉम्प, इंटरनेट नुकतेच ओळखीचे झाले होते. इंटरनेटवर शोधता येतं याचा पत्ता लागला होता. त्यावेळी काहीतरी शोध घेताना मायबोलीवर पोचले होते. अचानक अनेक लोक रोमनातून का होईना पण मराठीत गप्पा मारताना दिसले. म्हणजे वाचायला मिळाले.
जे चालू होते त्या गप्पांच्यात उडी घेतली. खूप मस्त वाटलं होतं. आळेकरांच्या प्रभावामुळे मुद्दामून मराठीतले प्रचलित नसलेले शब्द वापरायची, किंवा ज्याला अतिमराठी म्हणू तसे बोलायची सवय होती. मग ते माझे मराठी वाचून कुणीतरी मला गटणे म्हणाले. माझी ट्यूब नेहमीप्रमाणे तेव्हा पेटली नाही आणि मी काहीतरी रिअॅक्ट झाले. पण मग टाइमपास करायची वेळ संपली आणि मी ब्राउजर बंद करून निघून गेले. तेव्हा बहुतेक रजिस्ट्रेशन जरूरी नव्हते. ब्राउजरवर साइट बुकमार्क करता येत होती की नाही लक्षात नाही पण मला हे असे बुकमार्क करणे वगैरे काही माहिती नव्हते. काय शोधताना माबोवर पोचले होते तेही लक्षात नव्हते त्यामुळे दुसर्या दिवशी साइट काही सापडली नाही. मग अर्थातच पुढे काय झाले कधी कळले नाही. ही पहिली भेट
त्यानंतर काही दिवसांनी असंच इतर काहीतरी शोधताना परत साइट सापडली. रजिस्ट्रेशन सुरू झाले होते. अर्थात बिना रजिस्ट्रेशनचेही उंडारता येत होतेच. मी तेव्हा दिसेल तिथे, जाहिरात येईल तिथे रजिस्ट्रेशन करायचे म्हणजे याहू चॅट, पुणेसिटी चॅट वगैरे कुठेही. तर इथेही करून टाकले आणि मी माबोच्या गळाला लागले. तेव्हा अश्या साइटसवर आपल्या नावाने करायचे नाही रजिस्ट्रेशन असे पक्के होते डोक्यात. त्यामुळे मी वेगळे नाव घेतले. त्या नावाचा इतिहास एकदाचा सांगून टाकलाच पाहिजे.
माबोवर रजिस्टर करायच्या जस्ट आधी मी याहूवर स्वतःच्या नसलेल्या नावाने इमेल उघडला होता. नुसते नीरजा मिळत नव्हते मला ती १२३४५ वगैरे वाली गाडी जोडायची नव्हती. मग काहीतरी युनिक आणि सोपे नाव हवे म्हणून मी खूप विचार केला. आमच्या विभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंडने मला नुकतेच एका संस्कृत प्रहसनाचे इंग्रजी भाषांतर वाचायला दिले होते. ते प्रॉडक्शन करायचे आमच्या विभागात घाटत होते. (मी थिएटर स्कूलला होते.) त्या प्रहसनाचे नाव होते 'भगवदज्जुकेयम'. त्यात दोन पात्रे होती भगवद म्हणजे बौद्ध भिख्खू आणि अज्जुका नावाची नटी/ गणिका. ते झाले असते तर मी अज्जुकेचा रोल करणार होते. काय सुचलं मला आणि मी अज्जुका या नावाने याहू इमेल उघडला. मग तेच नाव इथेही घेतले. पुढे अज्जुका हे नुसते त्यातल्या गणिकेचे नाव नसून अज्जुका या शब्दाचा अर्थ गणिका असाही होतो हा उलगडा झाला. तोवर हे नाव इथे प्रचलित झाले होते. आणि नाव बदलता येण्याची सोय नव्हती. नशिबाने खूप लोकांना हा एवढा विषय खोल माहिती नसतो त्यामुळे मी सुटले. पण असाम्याला आणि बहुतेक जयाला मीच बावळटासारखे हे सांगितले होते. मग काय माकडाच्या हातात कोलित. मुद्दामून गटगला, बाफवर मधेच विषय बदलून अज्जुकाचा अर्थ काय असे हे लोक जोरात विचारायचे. मी गपा रे वगैरे काहीतरी म्हणलं की झालं. "चिल्डी चिल्डी!" सुरू! मग ते पसरलं. ज्यांना काही माहिती नाही ते ही मजा म्हणून असं विचारू लागले. असं विचारलं की नीरजा प्रचंड चिडते आणि समोरच्याचे 'खून पी जाती है' वगैरे अश्या आख्यायिका निर्माण झाल्या. अखेर २००७ च्या (हो ना? ) नव्या माबोमधे नाव बदलायची सोय मिळाली आणि माझी त्या नावापासून सुटका व्हायला सुरूवात झाली.
नमनालाच पाल्हाळ खूप झाले. तर परदेशात शिकताना मराठी बोलण्याची गरज यातून माबो रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली. ९९ च्या डिसेंबरमधे मी सुट्टीसाठी भारतात आले होते तेव्हा मी, Storvi आणि milya अश्या तब्बल तीन माबोकरांचे अखिल मायबोली अधिवेशन अर्थात AMBA झाले होते. हे बहुतेक माबोवरचे पहिले आंबा. नंतर मग बर्याच आंबा आणि गटगंना हजेरी लावली. पहिल्या वहिल्या सिंहगड रोडच्या वविला हजेरी लावली होती. नंतरही काही वविंना गेले होते. वविला जाण्याचे नसतानाही टिशर्ट घ्यायला शिवाजी पार्कच्या गटगला खूप वेळा गेले.
माझ्या लिखाणाची सुरूवात इथे झाली असं म्हणणार नाही कारण माबोपूर्व काळात फिरोदियाला वगैरे लिखाण केलेले आहे. लिहायला आवडायचे आणि अक्षर वाइट असल्यामुळे लिखाणाचा कंटाळा यायचा असा काहीतरी प्रकार होता. त्यामुळे मी जास्त कविताच लिहायचे माबोपूर्वी. पण माबोवर लिहायचे म्हणजे वाइट अक्षराचा मुद्दाच नाही. आणि मग मी धडाक्यात लिहू लागले.
जुन्या माबोमधे जया आणि असामी लिहित असलेल्या कादंबरीत जयाने घुसू दिले नाही लिहायला म्हणून एक नाटकही लिहून काढले होते. शिवाजी फॉण्टपण नव्हता तेव्हा. ते सगळे रोमनमधेच लिहायचो आम्ही आणि तसेच वाचायचे सगळे. आता ते नाटक माझ्याकडेही नाही आणि माबोवरूनही गडप झालेय. अगदी पहिल्या का दुसर्या माबो दिवाळी अंकांमधे दागिन्यांबद्दल सालंकृत नावाचा लेख लिहिला होता. मग गॉन विथ द विंडच्या स्कार्लेट बद्दल लिहिले होते. आणि मग अखेर २००६ मधे कथालेखनाला सुरूवात केली पहिली कथा लिहायला सुरू केले आणि तीचा शेवट मिळेना. दुसरी कथा लिहिली ती ठिकच होती. मग 'मला पण लिहिता येतं!' अश्या खुन्नसवर तिसरी कथा लिहिली. त्यावर्षी साप्ताहिक सकाळच्या स्पर्धेत दिली आणि चक्क तिला बक्षीस मिळालं. मग पुढे अजून २-३ कथांना विविध ठिकाणी छोटीमोठी बक्षिसे मिळत राह्यली. एका कथेच्या बाफवर माझ्या बहुतेक सगळ्या कथांच्या लिंका आहेत. नाहीतर माझ्या लेखनात मिळतीलच.
खूप पाल्हाळ झालेय त्यामुळे आता लिहायचेत ते मुद्दे थोडक्यात लिहिते.
माबोवरचा माझा प्रवास हा माझे शिक्षण, मग भारतात परतणे, लग्न, करीअरची सुरूवात वगैरे माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींबरोबर समांतर चालू होता. ते सगळे वेळोवेळी माबोकरांबरोबर शेअर करणे हा माझ्या आनंदाचा भाग होता. पहिल्याच सिनेमाच्या मेकिंग पासून ते मिळालेल्या यशापर्यंत माबोकरांनी ऐकले आहे. अनिलभाई, एसव्हिएस यांनी तर लागेल तिथे मदत केली आहे. एसव्हिएसच नाही तर तो आणि प्रिया दोघांनी मला माझ्या सिनेमासंदर्भातल्या अमेरिका दौर्यादरम्यान आपल्या घरात काही काळ सहनही केले आहे.
आता संयोजकांचे प्रश्न (अनिवार्य नाहीयेत माहितीये पण तरी... )
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
जग जसं बदलतं तशीच मायबोली बदलत गेली. टेक्निकल प्रगती आणि त्यामुळे मानसिकतेतही काहीसा फरक नक्की आहे. पण मुळात माणसे गाभ्यात तीच तशीच असतात सगळीकडे. जगभरात पोलरायझेशन होते आहे प्रचंड प्रमाणात त्याचे प्रतिबिंब इथेही दिसत असावे. मी रेग्युलर यायचे इथे तोवर ते लक्षात यायला लागले होते. पुढचे माहीत नाही. म्हणून असावे.
इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
मला अजूनही ट्री व्ह्यू हा सगळ्यात आवडलेला आहे. त्यानंतर अत्यंत सोपे देवनागरी लिखाण. जेव्हा संयुक्ता होते तेव्हा संयुक्ता.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
आजही माहितच नसेल.
गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लिखाणाला बळ. देवनागरी टायपिंग आणि लोकांचे प्रतिसाद दोन्हीमुळे. विविध चर्चा आणि वादांमधून आपली मते/ मुद्दे मांडताना करायची मांडणी, आपलेच विचार घासून पुसून पक्के होत जाणे किंवा तुटून गळून पडणे. काही प्रमाणात रेट्रोस्पेक्शन. खूप मित्रमंडळी दिली. बाहेरच्या जगात न जाता जगाचे अनुभव दिले. परदेशात असताना एकटे पडू दिले नाही.
तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
हे विचारता आणि मग उत्तर दिलं की लोक म्हणणार मी मी करते. तर आता मी मी करतेच. सगळ्यात पहिलं म्हणजे मी माबोला इतर सर्व सदस्यांप्रमाणेच भरपूर वेळ दिला. काही सदस्य आणले. माबोच्या अफाट पसार्यात माझ्या लिखाणाचे थोडे कपटे सोडले. दिवाळी अंक, गणेशोत्सव वगैरेंसाठी लिखाण केले. कोणे एके काळी गणेशोत्सव संयोजन समितीमधे काम बघितले. संयुक्ता होते तेव्हा काही काळ संयुक्ता व्यवस्थापनात काम बघितले. तसेच संयुक्तातर्फे महिला दिनानिमित्त 'लिंगनिरपेक्षता' या विशेषांकाचे संपादन केले.
तुमचं कुठलं लेखन गाजलं,
मी माझे आडनाव न बदलल्यामुळे आलेल्या अनुभवांवर लिहिलेला लेख गाजला आणि वाजला सुद्धा. तरी नशीब पहिल्यांदा तो माबोवर टाकला होता त्यावेळेचा वाद मी तो धागाच उडवून टाकल्याने आता उपलब्ध नाही. स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे या विषयावरचा २०१० की २०११ च्या दिवाळी अंकातला लेख प्रचंड गाजला. दुर्दैवाने आजही तो लेख तितकाच रेलेव्हंट आहे. माझी लेमन राइसची रेसिपी आणि फ्लॉवरची सा-खि भाजी रेसिपी आणि हेतेढकल खाकरा भेळ रेसिपी लोकांना भरपूर आवडली. आणि माझ्या कथा. मी आणि नवा पाऊस, एका हरण्याची गोष्ट, देहाची तिजोरी या कथा मुख्यत्वेकरून लोकांना आवडल्या/चर्चिल्या गेल्या. मी आणि नवा पाऊस जुन्या माबोवर लिहिली होती. तेव्हा ती लिहिली जात असतानाचे प्रतिसाद आता सापडणार नाहीत.
मी श्वास चित्रपटाच्या मेकिंग संदर्भाने एक सिरीज लिहायला सुरू केले होते. ते अर्ध्यावर सोडले. सिरीजचे नाव होते 'माझा श्वास'. जुन्या माबोवरच्या रंगीबेरंगीत( बहुतेक) होते ते लेख. त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला होता. काल मला वाटले की जुने हितगुज नष्ट झालेय पण त्याचे अर्काइव्ह्ज आहेत अजून. तर ही माझा श्वास सिरीज
कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
माझ्या लिखाणापेक्षा माझ्या विविध वादातल्या भूमिका आणि माझी झालेली भांडणं यामुळेच जी काय गांजागांज झाली असेल माझ्याकडून ती असेल. अर्थात मी १० गांजलं तर त्यावरून माबोकरांनी मला १०० गांजलेलं आहे त्यामुळे मिच्छामि दुक्कडम मोडमधे मी जाणार नाही. गेले तर माझा आयडी हॅक झालाय का अशी शंका नाही का येणार लोकांना.
तर माबोवर भरपूर गप्पा मारल्या, दंगा केला, चर्चा केल्या, वाद घातले. भांडणेही झाली. पण काही तुरळक लोक वगळता ते मजेने घेतले जायचे. पण नंतर ती मजा निघून गेली. गद्धेपंचविशीत, तिशीत खाल्लेली माती म्हणजेच मी हे गृहित धरूनच लोक बोलत मग शब्दाला शब्द वाढत जाई. मला भाषेवरून लेक्चर देणार्या प्रत्येकाने त्या लेक्चरमधेच इतकी जहरी भाषा वापरलेली आहे की मला त्या लेक्चर्सचा एकीकडे राग आणि एकीकडे हसायला यायला लागायचे. असो असो
जुन्या माबोवरच्या इतक्या आठवणी आणि किस्से आता सुचत होत्या की काय काय लिहू असे झाले होते. पण थांबायला हवे त्यामुळे आता शेवट. नक्की..
माबो विशेष वरच्या लिखाणाचा प्रताधिकार यासंदर्भाने प्रसिद्ध झालेल्या नियमावली, त्यातल्या वाक्यातून ध्वनित होणारा अर्थ वगैरे चर्चेदरम्यान आलेल्या विधानांमुळे मला इथे नवीन काही लिहिण्याबाबत डिस्कम्फर्ट नक्की निर्माण झाला.
तीन चार वर्षे सुखाने चाललेल्या आणि एक सुरक्षित वातावरण असलेल्या संयुक्ताचे अचानक सगळे सुरक्षित कवच काढून घेतले जायचे वारे वाहू लागले आणि माबोवरच्या विश्वासाला तडा गेला.
एकेका शब्दाचा मुद्दामून वाकडा अर्थ काढणे आणि मग त्यावरून वाटेल त्या लेव्हलला जाऊन मला बोलणे हे फार व्हायला लागले. पूर्ण दोष मी त्यांना देत नाही तसाच पूर्ण दोष माझ्याकडे घेणार नाही. मी एक विरूद्ध अनेक अश्या प्रकारे हे घडत बुलिंगच्या पातळीपर्यंत जायला लागले. २०१५ मधे उघडपणे काही व्यक्ती एका वाहत्या बाफवर "आपण सगळ्यांनी मिळून हिला सोशल मिडियावरून हाकलून देऊ." वगैरे चर्चा करताना दिसल्या.
मायबोलीवर माझे घर आता उरले नाही याची स्पष्ट जाणीव झाली. वाइट वाटले पण थोडे अंतर ठेवणे हेच बरे आहे हे पक्के कळून चुकले. कधीमधी चक्कर मारायला. इतर ठिकाणी प्रसिद्ध केलेले लिखाण इथे परत टाकायला, नुसतेच वाचायला उगवते मी अजूनही. पण ते तेवढेच.
मला सोशल मिडियावरून हाकलून द्यायची स्वप्ने बघितली गेली असली तरी सोशल मिडिया हाताशी धरून २०१५ मधे मी माझा तारकामांचा नी या नावाने ब्रॅण्ड सुरू केला. माझ्या इतर सर्व कामांबरोबर तो ब्रॅण्ड सुखेनैव चालू आहे, मुंगीच्या गतीने वाढतो आहे.
- नी
शेवटचा पॅरा
शेवटचे पॅरा
असो, आपला स्त्रियांची स्वच्छतागृहे लेख आजही लक्षात आहे .. आणि आपला फेमस रोखठोकपणाही
खूप मस्त लिहीलंयस नी. फायनली
खूप मस्त लिहीलंयस नी. फायनली मला त्या अज्जुकाचा अर्थ कळला आज
शेवटचे पॅरे वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं आणि तुझा इथला वावर अचानकच कमी का झाला याचा उलगडा झाला. मला इतके दिवस वाटत होतं तू तुझ्या तारकामात सुपर बिझी झाली आहेस म्हणून इकडे येत नाहीस.
असो. माझ्यानिमित्ताने का होईना, तू लिहीलंस हे छान झालं.
लेख आवडलेला आहे.
लेख आवडलेला आहे. पुढील कविता आवडत्या आहेत -
झण्ण - https://aisiakshare.com/node/7708
उजेड - https://aisiakshare.com/node/7109
तुकडे - https://aisiakshare.com/node/6540
आवडले लेखन. तुझे बरेच लेखन
आवडले लेखन. तुझे बरेच लेखन वाचलेयं. वैदेही व कापडाचोपडाच्या गोष्टी तर अजूनही आठवते. अज्जुका आयडीची गंमत
तुझा इथला वावर अचानकच कमी का झाला याचा उलगडा झाला.>>>+१
तुझा व्यवसाय व लेखन नेहमीच रोचक वाटते. तुला शुभेच्छा.
उडवू का ते उल्लेख?
उडवू का ते उल्लेख?
नको उडवूस. तू तुझी बाजू
नको उडवूस. तू तुझी बाजू मांडली आहेस. त्यात गैर काय आहे?
थँक्स सामो. पेनफुल होते ते.
थँक्स सामो. पेनफुल होते ते. पण कधी कधी सतत सगळ्यात असण्यापेक्षा स्वतःतच उतरत जाणे बरे असते. ते खूप केले मी. आणि आता वसईला राहायला गेल्यावर तर अजूनच. प्रत्यक्षातल्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी संपर्क तितका सोपा राह्यला नाही त्यामुळे अजूनच केले.
वा, छानच. उशीरा का होईना
वा, छानच. उशीरा का होईना लिहिलेस ते छान केलेस. तुझे कपड्यांच्या, दागिन्यांच्या इतिहासासंदर्भातले सगळेच लेखन फार आवडलेले आहे हे सांगायला नकोच पुन्हा. स्वच्छतेच्या बैलाला... , शिवाय चित्रपट / कॉस्च्यूम डिझाइन क्शेत्रात काम करताना आलेले अनुभव.. वैदेहीची कथा मला खूप आवडली होती.
ती एक ३१ डिसेंबर ची कथा होती एक. ती काढली आहेस का? कशावरून तरी मागे आठवली आणि शोधली तर सापडलीच नाही.
बाकी कोणीतरी यूजर्स नी वाहत्या बाफ वर तुला इथून घालवायच्या गप्पा केल्या तर त्याला काय इतकं महत्त्व द्यायचं ?असं कोणी युजर दुसर्या यूजर ला सोशल मिडियावरून उडवू वगैरे शकत असते तर काय हवं होतं
खूप छान गोड आणि कडवट आठवणी.
खूप छान गोड आणि कडवट आठवणी. स्वओळ्ख करून दिल्याबद्दल धन्यवाद. नवीन ब्रॅण्ड साठी भरपूर शुभेच्छा.
ती एक ३१ डिसेंबर ची कथा होती
ती एक ३१ डिसेंबर ची कथा होती एक. ती काढली आहेस का? <<
हो काढली आहे. तो पहिला ड्राफ्ट होता. मग त्यावर परत एकदोनदा हात फिरवला. ते फायनल व्हर्जन २०१६ च्या ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेय. तिथे सापडेल बघ. कथेचे नाव खेळ.
>> असं कोणी युजर दुसर्या यूजर ला सोशल मिडियावरून उडवू वगैरे शकत असते तर काय हवं होतं << नाहीच करू शकत पण त्या व्यक्तीने जंग जंग पछाडले यासाठी. अर्थात ते माबोवर नव्हते त्यामुळे इथे चर्चा नको त्याची. पण शक्य तितका त्रास द्यायचा झुंडीने प्रयत्न केला गेला. असो जौदे..
मस्त लेख विशेषतः पहिली भेट
मस्त लेख विशेषतः पहिली भेट ... लिहीलास ते चांगले केले.
भारीच नी! तुझे लेख मस्त
भारीच नी! तुझे लेख मस्त असतात. फायनली अज्जुकाचा अर्थ कळला >> मला पण. आमच्याकडे काल जुनी मायबोली उघडली होती त्यात बरेचदा हे नाव वाचलं. तसं ते चर्चेत मधून मधून असतंच आता नक्की कळलं
छान लिहिलंय ! 'माझा श्वास' ही
छान लिहिलंय ! 'माझा श्वास' ही सिरीज खूप आवडली होती.
>>>पूर्ण दोष मी त्यांना देत नाही तसाच पूर्ण दोष माझ्याकडे घेणार नाही.>>> हा खासच नीधप attitude !
>>>इतर ठिकाणी प्रसिद्ध केलेले लिखाण इथे परत टाकायला... >>> नक्की टाक ... तुझे अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला आवडते.
मस्त! वैदेहीची गोष्ट आवडली
मस्त! वैदेहीची गोष्ट आवडली होती. ती एक लक्षात आहे. स्वच्छतेच्या बैलाला वाला सोशली रिलेव्हंट लेख अजूनही रिलेव्हंट आहे हे सिरीयसली वाईट आहे.
एकदा पार्ल्यातील गटग (ते कोणत्यातरी मॉल मधे झाले होते, बहुतांश मुंबईकर होते) व पुण्यातील २-३ गटग - एक ज्यात सरांनी तुला "तुम्हाला मुक्ता बर्वेबरोबर काम करायला मिळते" हा स्फोटक प्रश्न विचारला होता ते, एकात खाण्याच्या टेबलावरून पर्मनंट सुवासिक पाणी का काय ते मारत होते ते - ते सगळे लक्षात आहे.
चांगलं मनोगत नी.
चांगलं मनोगत नी.
(आयडी चा अर्थ माहीत नव्हता आणि शोधायचेही प्रयत्न केले नाहीत.माझ्या डोक्यात त्या आयडी बद्दल 'माहेरचं घरचं नाव बिव काही असेल' किंवा 'कोणीतरी 2-3 भावंडं नावं मिळून असं नाव बनलं असेल' इतकेच गेस होते )
तुझी हरण्याची गोष्ट, ती वैदेहीची गोष्ट या आजही शोधून वाचत असते.
बाकी अलंकार,कापडचोपड यातला व्यासंग तर जगजाहीर आहेच.
आवडलं.
आवडलं.
वैदेहीची गोष्ट, कापडाचोपडाच्या गोष्टी हे आवडलेलं लिखाण आहेच. पण मला पुण्याच्या मराठीवरच्या लेखातला 'तन्मय-चिन्मय मराठी' हा शब्दप्रयोग खूप आवडला होता. मी तो घरीपण फेमस केलाय. मराठीच असं नाही, तन्मय-चिन्मय काहीही.
एकदा पार्ल्यातील गटग (ते
एकदा पार्ल्यातील गटग (ते कोणत्यातरी मॉल मधे झाले होते, बहुतांश मुंबईकर होते) << शोनू गटग. तू डोंबिवलीहून वर्सोव्याला आला होतास.
पुण्यातील २-३ गटग << एक तुझ्या घरातच झाले होते. ते लक्षात आहे.
>> एक ज्यात सरांनी तुला "तुम्हाला मुक्ता बर्वेबरोबर काम करायला मिळते" हा स्फोटक प्रश्न विचारला होता ते, एकात खाण्याच्या टेबलावरून पर्मनंट सुवासिक पाणी का काय ते मारत होते ते - <<
हे अजिबात लक्षात नाहीये रे.
>> 'तन्मय-चिन्मय मराठी' << मी तो फेबुवर वाचलाय बरे!
ऑर्कुटवर पण होतात तुम्ही.
ऑर्कुटवर पण होतात तुम्ही. फक्त नी इतकंच नाव असेल बहुतेक. कोणत्या तरी मासिकात लेख छापून आल्याचा लेख हे लक्षात आहे अजून. त्यावर ट्रोल्स पण आले होते.
मस्त नी, तुझ्या लेखाची ही वाट
मस्त नी, तुझ्या लेखाची ही वाट बघत होते. पण आग्रह करून लिहायला सांगण्या इतकी आपली ओळख नाही. आणि खरंच सांगायचं तर मला जरा तुझी भिती वाटायची. मी स्वतः २००९ ला सदस्य झालेय पण त्याआधी बरीच वर्षे रोमात राहून वाचलय. मला मनातून खू ssssप इच्छा होती कि आपली ओळख व्हावी, मैत्री व्हावी. पण मी भयंकर भिडस्त, आणि तू प्रचंड स्पष्टवक्ती. मी लांबूनच तुझे सगळे लेख वाचलेत. जेव्हा तुझी आई गेली त्यावेळेस तू लिहीलेलं पण आठवतय. ( हे मला अत्ता अंधूक आठवतय)
कडुगोड आठ्वणी आहेत. तुझ्या
कडुगोड आठ्वणी आहेत. तुझ्या लेखाची वाट पहात होते. जुन्या माबोकरांनी कोणी लिहाव असे वाटत होते.
मला तुझा हेतेढकल शब्दप्रयोग आवडला होता. कापडचोपडच्या गोष्टी, संयुक्तामधले तुझे सल्ले नियमित वाचायचे.
चांगला आढावा. मी बरेचदा
चांगला आढावा. मी बरेचदा कथांच्या नावात घोळ घालते कारण मला त्यातल्या थीम लक्षात असतात पण कथेच नाव आणि कॅरेक्टर्सची नाव बरेचदा पुसटली जातात त्यामुळे नावानिशी नाही सांगू शकत पण मला तुझी विद्यापिठाच्या आवारात बस स्टॉपवर घडणारी कथा आवडली होती. पार्टी आणि इतर बायांत मिसफिट असलेली नायिका असलेलीही एक कथा होती (बहुतेक ड्राफ्ट होता का?) आवडली होती. तू फेसबुकवर write in times of corona नावाने पेज सुरु करुन त्यात काही एक लिहायला सुरु केले होतेस (पळून गेलेल्या बाईबद्दलची गोष्ट) (जे मला वाटत अजून पुर्ण नाही झालेय) ते हि खुप इंटरेस्टींग होते. तुझे कपडेपटावरचे लेख अभ्यासपूर्ण असतात.
पूर्ण दोष मी त्यांना देत नाही तसाच पूर्ण दोष माझ्याकडे घेणार नाही. >>
बरेचदा प्रत्यक्ष आयुष्यात संपूर्ण काळे किंवा पांढरे असे काही नसते. प्रत्येकातच कमीअधिक ग्रे शेड्स असतात किंवा प्रत्येकजण आपापल्या जागी काही प्रमाणात का होईना बरोबर असतो.
यावरून काही दिवसांपुर्वी नेटफ्लिक्सवर 'मॉडर्न लव्ह सिझन २' मधे बघितलेली एक गोष्ट आठवली. त्या गोष्टीतल्या दोन व्यक्ती काही काळाने एकमेकांच्या समोर येतात (दुरुनच सामोऱ्या येतात खरतर) तेव्हा काही काळापूर्वी एकत्र घालवलेल्या एका रात्रीच्या आणि त्यानंतरच्या सकाळच्या आठवणी दाखवल्या आहेत. घटना एकच पण दोघांच्या त्याच्याशी जोडलेल्या आठवणी आणि भावना, अगदी त्या त्या प्रसंगातले स्वतःचे आणि दुसऱ्याचे शब्द वेगळे असतात. (खरतर हे इंटरप्रिटेशन म्हणता येईल) मला फार आवडला होता तो कंसेप्ट. (हे अवांतर आहे इथे पण या वरच्या वाक्यावरुन जे त्याक्षणी जे आठवत गेलं ते लिहून टाकलं)
ती मिसफिट नायिका वाली म्हणजे
ती मिसफिट नायिका वाली म्हणजे न्यू इयर ची ना, संयुक्ता ज्योती हेमंत निनाद वाली?त्याचं नाव काही काळ वर्किंग टायटल होतं.खरं दिलेलं नाव आठवत नाही पण कथा चांगली आठवते.
खरं दिलेलं नाव आठवत नाही पण
खरं दिलेलं नाव आठवत नाही पण कथा चांगली आठवते.>> बरोबर.
>> प्रत्येकजण आपापल्या जागी
>> प्रत्येकजण आपापल्या जागी काही प्रमाणात का होईना बरोबर असतो. << आपल्या जागीच? एकुणात नाहीच?
अपेक्षित होतंच.
प्रत्येक बाजू थोडी बरोबर असते हे म्हणतो तेव्हा हे ही खरे आहे की प्रत्येक बाजूचे काही प्रमाणात का होईना चुकलेले असतेच. मी ते मान्य केले समोरची बाजू हे मान्य कधीच करणार नाही याची खात्री आहे. असोच.
आपल्याला माझे प्रतिसाद आवडत
आपल्याला माझे प्रतिसाद आवडत नाहीत हे माहीत आहे तरीही इथे लिहिण्याचे धाडस केले आहे त्या बद्दल क्षमस्व.
मी नवीन मायबोलीकर असताना एकदा मुंबई एअर पोर्ट वरून पुण्याला जायचे होते व त्यावर मी पुपु वर लिहिले होते. तर नीधप जी ह्यांनी लिफ्ट ऑफर केली होती. डोमेस्टिक वरून मी व लेक त्यांना जॉइन झालो व पुण्यात उतरलो. त्या बद्दल फॉर्मली अॅक्नॉलेज व धन्यवाद . तुम्ही मला गार्लिक पीलर अशी एक छोटीशी भेट पण दिली होती.
तुम्ही इतके छान तारांचे काम करता हे मला माहीत नव्हते तितकेसे त्यामुळे मी लाइफ स्टा इल मधला घेतलेला काचेच्या मण्यांचा नेकलेस
थँक यू गिफ्ट म्हणून दिला होता. मला नंतर ओशाळल्या सारखे झालेले.
नुसत्या मायबोलीच्या ओळखीवर कोण इतके करते. तर पुनश्च धन्यवाद. व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
प्रत्येक बाजू थोडी बरोबर असते
प्रत्येक बाजू थोडी बरोबर असते हे म्हणतो तेव्हा हे ही खरे आहे की प्रत्येक बाजूचे काही प्रमाणात का होईना चुकलेले असतेच. >> अर्थात. समोरच्याची /आपली प्रत्येक बाजू थोडी बरोबर असते अस मी म्हणतेय तेव्हा थोडी चुकलेली बाजूही असणारच समोरच्याची / आपली. संपूर्ण काळे संपूर्ण पांढरे नसतेच काही.
अपेक्षित होतंच.>> हे कळले नाही पण ते सोडून देते.
आपापल्या जागी काही प्रमाणात
आपापल्या जागी काही प्रमाणात का होईना बरोबर असतो. << आपल्या जागीच? एकुणात नाहीच? Lol>> हो आपापल्या जागीच कारण हे जे असते ते आपले आपले असते बरेचदा. रिसिव्हिंग एंडलाही आपापल फिल्टर असत जे त्या त्या व्यक्तीच्या आधीच्या अनुभवातून गृहीतकातून किंवा आणखीही n number of घटकांमुळे असू शकतं. म्हणून तर ते नेटफ्लिक्स मॉडर्न लव्ह कथेच्या थीमबद्द्ल आठवल. हे थोडे बरोबर असण किंवा थोडे चुकलेल असण प्रत्येकाच्याच बाबतीत होत असतं.
आपल्याला माझे प्रतिसाद आवडत
आपल्याला माझे प्रतिसाद आवडत नाहीत << असं तर मी कधी म्हणाले नाहीये. असा गैरसमज करून घेऊ नका. काही विषयांवर (कुत्रा मुख्यतः) आपली मते जुळत नाहीत यापलिकडे काही नाहीये.
बाकी माझ्यासाठी नुसत्या माबोच्या ओळखीवर अनिलभाई, एसव्हीएस-प्रिया, अंबर कर्वे, ललिता-प्रीती, रैना आणि अश्याच अजून काही लोकांनी बरंच काही केलंय. ते बघता मी तुम्हाला प्रवासात गाडीत बरोबर घेणे ही छोटीशी गोष्ट आहे. तेव्हाच्या काळात मी दागिने वगैरे बनवायला सुरू केले नव्हते आणि असते तरी त्या माळांबद्दल त्यामुळे ओशाळले वाटून घेण्याची गरज नाही. त्यामागची भावना महत्वाची.
ती मिसफिट नायिका वाली म्हणजे
ती मिसफिट नायिका वाली म्हणजे न्यू इयर ची ना, संयुक्ता ज्योती हेमंत निनाद वाली? <<
संहिता, ज्योती, हेमंत, निनाद...
त्या कथेचा पहिला द्रफ्ट इथे पूर्ण केला होता. इथे असेतो त्या कथेला नाव दिले नव्हते. नंतर दोनतीन वेळा त्या कथेवर हात फिरवून मग ती ऐसीच्या 2016 च्या दिवाळी अंकाला दिली. तेव्हा त्या कथेचे नामकरण केले खेळ. तिथे आहे ती कथा.
<<<पण शक्य तितका त्रास
<<<पण शक्य तितका त्रास द्यायचा झुंडीने प्रयत्न केला गेला.>>....
तुझ्या एकटीसाठी "त्यांना" झुंड बनवून यावे लागले यावरून तुझ्या ताकदीची कल्पना येते. .. अशीच खंबीर रहा कायम..
Pages