शशक पूर्ण करा - रघुकुलतिलकनाम दासाअंतरी - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 September, 2021 - 14:10

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. उजेडाची एक मंद तिरीप आत येते, तिनेसुद्धा माझे तीनही डोळे दिपतात. पुजारी अभिषेकपात्रात आणखी पाणी ओतून गेला. पुन्हा दार बंद! कशाला दिवसरात्र अभिषेक लागतो? शेवाळ धरेल मला अशाने! देवपणावर पुटं चढली आहेतच! कुठे त्या वाहत्या गंगेचा ध्रोंकार ऐकत हिमालयात रानावनात स्वच्छंद हिंडणारा मी आणि कुठे हा दुधातुपाने चिकट झालेला दगड! कधीतरी युगानुयुगांत एखादा या दगडात आणि दगडाबाहेरही देव पाहणारा भक्त भेटेल या आशेने बांधला गेलो आहे, नव्हे चिणला गेलो आहे इथे. मला शिळेतून मुक्त करणारा राम कधी येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्त आहे
कोरोनामुळे तर हे दगडातले देव असेच बंद दरवाज्यात अडकले आहेत

Apratim

खूपच वेगळ्या वाटेवरची गोष्ट! ध्रोंकार शब्द तर कित्ती दिवसांनी वाचला...किंबहुना...पहिल्यांदा कुठे वाचला असेल (बहुतेक गो नी दांच्या भ्रमण गाथा मध्ये? ) त्यानंतर आजच!

सुंदर!
ध्रोंकार बहुतेक रारंगढांगमध्ये आहे का?

मस्त!

हटके कल्पनाविचार, अनवट पण सहजसुयोग्य शब्दयोजना, समर्पक शीर्षक. सगळेच उत्तम.
खूपच आवडली ही शशक

तुमच्या कथेत विचारांची गुंतागुंत नाही... जी बहुतेकदा कथा समजायला कठीण करते...कथा जे काय सांगायचे ते स्पष्ट आणि शशकच्या बंधनात राहून सांगते. विषयही सामान्यतः वेगळा आहे.