आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो. जोपर्यंत पैश्याची आवक सुरु असते तोपर्यंत आपल्याला तो खर्च करण्यात काही वाटत नाही. पण अचानक एखादी आपत्ती येते आणि आपली आर्थिक गणिते कोलमडून पडतात. या अशा आपत्तीचा सामना कसा करायचा याचा जर आपण आधीच विचार करून ठेवला तर अशा आपत्तींना तोंड देणे सोपे जाते. आपण कदाचित संपूर्ण नुकसान टाळू शकत नाही पण ते निदान सहन करण्याच्या मर्यादेत (रिस्क अपेटाइट मध्ये) ठेवू शकतो.
आपण आज कोणकोणत्या आर्थिक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात आणि त्याचा कसा सामना करता येईल त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत.
धोका १: अचानक नोकरी जाणे :
गेल्या दीड वर्षात करोना मुळे आपल्यापैकी अनेक जणांना हा दुर्दैवी अनुभव आला असेल. सुखासुखी चाललेली नोकरी अचानक जाणे म्हणजे आपली सर्व आर्थिक नियोजने (केली असतील तर) कोलमडून पडणे हे साधे सरळ गणित आहे. या आपत्तीचा सामना खालील प्रकारे करता येऊ शकतो:
उपाय :
१. कॉन्टेंगेंसी पैसे नेहमी तयार ठेवणे : या उपायात तुमच्या मासिक खर्चाच्या सहा पट रक्कम तुम्ही साठवून ठेवणे अपेक्षित आहे. म्हणजे जरी नोकरी गेली तरी आपण या पैशाचा वापर करून निदान पुढचे सहा महिने तरी काढू शकतो. इथे मासिक खर्च म्हणताना त्या खर्चात तुमचे घराचे हफ्ते हफ्ते , भाडे , तुमच्या मुलांच्या फिया असे सगळे खर्च गृहीत धरणे अपेक्षित आहे. मासिक खर्चाची ढोबळ यादी मी खाली देत आहे. प्रत्येकाने आपापले असे खर्च मांडून एकदा अभ्यासावेत म्हणजे तुम्हास किती पैसे कॉन्टेंगेंसी साठी ठेवावे लागतील याचा अंदाज येईल. हे कॉन्टेंगेंसी चे पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवावेत जेणे करून एका क्लिक वर एक कामकाजाच्या दिवसात तुम्हास ते मिळू शकतील. शक्यतो ही रक्कम पती आणि पत्नी यांनी आपापल्या खात्यात अर्धी अर्धी करून ठेवावी.
- Loans EMI
- Insurance Premiums
- Society maintenance
- Petrol
- Hotel
- Veg
- Grocery
- School Fees
- Rickshaw / Van wale kaka fees
- Kids Tuition Fees
- kids other classes
- Mobile recharge
- Internet
- Land Line
- Tata Sky
- Milk
- Hobby And lifestyle
- Medical
- Doctor
- Cloths and Hosiery
- Vehicle Servicing
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
२. हल्ली नोकरी सुरक्षा विमा पण मिळतो. यात जर तुमची नोकरी गेली तर ती विमा कंपनी तुम्हास पुढील ३ किंवा ६ महिने निश्चित रक्कम देते. आपण या विम्याचा अभ्यास करून कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून मगच अशा विम्यात पैसे घालावेत असे मी सुचवतो.
३. आपल्या नोकरीच्या ठिकाणी कायम डोळ्यात तेल घालून जागे असणे आवश्यक आहे. आपल्या कंपनीत आपण रिडंडंट होत नाहीये ना याची काळजी कायम घ्यावी. आपल्या नोकरीस काही धोका नाही ना हे कायम लक्ष देऊन असावे. आपली स्किल सेट कायम अपडेट ठेवावी. वेळ पडली तर दुसरी नोकरी मिळवण्यासाठी आपण कायम पात्र राहू (कॉम्पिटन्ट) हे पाहावे.
धोका २ : अचानक उद्भवणारे हॉस्पिटलायझेशन:
उपाय: अचानक होणारे हॉस्पिटलायझेशन तुमची सर्व बचत उध्वस्त करु शकते. यासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेणे अतिशय उपयुक्त ठरते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना.
कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना फॉर्म भरायला लागतो त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती प्रामाणिकपणे भरा. पॉलिसी घेताना ती नीट अभ्यास करून घ्या. एवढेच काय तर पॉलिसी घेतल्यानंतर सुद्धा तीन दिवसाचा अवधी तुम्हाला रिव्ह्यू साठी दिला जातो. पॉलिसीचा प्रीमियम किती आहे त्या प्रीमियम मध्ये कव्हर किती मिळणार आहे याचे कॉस्ट बेनेफिट अनालिसिस करणे फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळा घरात ज्येष्ठ नागरिक असतात. अशा लोकांच्या पॉलिसी घेणे फार महाग पडते. कधीकधी प्रीमियमची रक्कम इतकी जाते की त्यातून मिळणारे कव्हर आणि आजारांना मिळणारे विमा संरक्षण हे अपुरे असते आणि कॉस्ट बेनेफिट अनालिसिस वरती टिकत नाही. अशा वेळी अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हॉस्पिटलायझेशन साठी एक स्वतंत्र रक्कम जमा करून ठेवणे आवश्यक ठरते.
अनेकदा हल्ली कॉर्पोरेट कंपन्या पेरेंटल इन्शुरन्स देतात. अशा कंपनी अशा प्रकारच्या इन्शुरन्स मध्ये बहुतांश वेळा अधिक असलेले आजार सुद्धा कव्हर केले जातात. तेव्हा ज्यांना ज्यांना हा पेरेंटल इन्शुरन्स उपलब्ध आहे त्या सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. कंपनीच्या मार्फत मिळणारा आरोग्य विमा अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरावा आणि स्वतः साठी स्वतंत्र मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी असा सल्ला मी देऊ इच्छितो.
आपण घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसी ची माहिती घरातल्या सर्वांना देणे आवश्यक आहे. बरेचदा असे होते की अशा पॉलिसी ची माहिती फक्त घरातल्या कमावत्या पुरुषालाच माहिती असते आणि प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा तो कमावता पुरुषच आजारी पडतो कधी कोमात असतो त्यामुळे अशा पॉलिसीची माहिती जर घरातल्या मंडळींना नसेल तर त्या मंडळींची फारच ससेहोलपट होते. आणि हे फक्त मेडिक्लेम पॉलिसी बाबत मी सांगत नाहीये तर घरातल्या कर्त्या पुरुषाने आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कोणत्या कोणत्या मेडिक्लेम पॉलिसी आपण घेतलेल्या आहेत, आपल्यावर किती कर्ज आहे? ते कोणाकोणाचे आहे. या आणि अशा सर्व बाबींची माहिती घरातल्या इतर मंडळींना देणे आवश्यक वाटते. अनेक घरातील कर्त्या पुरुषाचा असा समज असतो की बायकांना काय कळते, त्यांनाही माहिती देण्याची गरज काय? हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा असून घातक आहे. घरातल्या सर्व आर्थिक बाबींची माहिती आपल्या जोडीदाराला असणे मला तरी खूप आवश्यक वाटते.
जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयाची गरज पडली आणि मेडिक्लेम पॉलिसी वापरावी लागली तर त्या वेळी कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, पॉलिसी नंबर त्याचे ओळखपत्र या सर्व गोष्टींची माहिती एका कागदावर लिहून तो सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावा. किमान तीन महिन्यात नाही एकदा तरी त्याचा रिव्ह्यू घ्यावा. मेडिक्लेम पॉलिसी विकणाऱ्या एजंटने सुद्धा आपल्या क्लायंटची निदान सहा महिन्यातून एकदा बोलावे आणि त्यांना त्यांच्या पोलिसी बद्दल काही शंका अडचणी आहेत का याची विचारणा करावी.
धोका 3 : आपण आपली पुंजी ठेवलेली बँक किंवा पतपेढी दिवाळखोरीत निघणे आणि आपली सर्व रक्कम तिथे अडकून पडणे.
उपाय: गेल्या काही वर्षात डी एस के किंवा किंवा रुपी सारख्या बँकेत अनेकांनी ठेवलेल्या ठेवी त्या बँका दिवाळखोरीत निघाल्या मुळे अडकल्या गेल्या. आता परत मिळतील का नाही याची कुणी खात्री देऊ शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या बँकेत किंवा स्कीम मध्ये अधिक व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतवतो त्या वेळी अधिक व्याज मिळण्याच्या शक्यता बरोबर गुंतवलेली रक्कम बुडू सुद्धा शकते ही शक्यता आपण कधी गृहीतच धरत नाही. यावर उपाय म्हणजे शक्यतो आपली सर्व पुंजी कधी एकाच ठिकाणी गुंतवून ठेवू नये. आपल्या रिस्क अपेटाइट नुसार वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गुंतवावी. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही अधिक व्याज मिळवण्याच्या हव्यासापोटी अशा धोकादायक ठिकाणी गुंतवण्या पेक्षा सुरक्षित अशा राष्ट्रीयीकृत बँका ती रक्कम गुंतवावी. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण गुंतवलेल्या रकमेला किती विमा कवच आहे याचीही माहिती करून घ्यावी. भिशी, मल्टी लेयर मार्केटिंग अशा पासून दूर राहिलेले बरे असे माझे मत आहे.
धोका 4: तुमचे राहते घर नैसर्गिक आपत्तीत नष्ट होणे.
उपाय: तुमचे राहते घर जर सर्व सरकारी नियम पाळून बांधले गेले असेल तर अशा नैसर्गिक आपत्तीपासून तुमच्या घराला संरक्षण मिळण्याची सोय अनेक विमा कंपन्यांनी केलेली आहे. असा विमा उपलब्ध असेल तर तो जरूर घ्यायचा विचार करावा. आपण ज्या घरात राहतो त्या घराचे अथवा बिल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळोवेळी करून घ्यावे आणि आवश्यक ते सर्व दुरुस्त्या करून घ्याव्यात.
धोका 5: तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाणे.
उपाय: तुमची मौल्यवान वस्तू जसे सोने-नाणे दागिने पैसे घरात सुरक्षित वाटत नसतील तर त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची सोय असते. पण पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की बँकेच्या लवकर मदत अशा ऐवजाची चोरी झाली तर बँकेला आपल्याला ते परत देणे , त्याची नुकसान भरपाई देणे हे बंधनकारक नाहीये. फक्त घरापेक्षा बँकेत अधिक थोडी जास्त सुरक्षितता असते म्हणून आपण तिथे आपली मौल्यवान वस्तू ठेवू शकतो. यावर दुसरा उपाय म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करून बाळगण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ फंड यासारख्या दुसरा पर्यायाचा आपण विचार करू शकतो. याशिवाय घरात अगदी जरुरीपुरती कॅश ठेवून बाकीचे पैसे लिक्विड फंडात ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.
तुमच्या वाहनांचा विमा काढून ठेवणे हे अनेकदा उपयुक्त ठरते. किंबहुना कायद्याने ते बंधनकारक आहे. जर तुमच्या वाहनाची चोरी वगैरे झाली किंवा अपघात नुकसान झाले तर त्या नुकसानाला काही भाग निदान इन्शुरन्स मधून वसूल होऊ शकतो.
धोका 6: घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू होणे.
उपाय: घरातील कर्त्या पुरुषाने आपला टर्म इन्शुरन्स काढून घेणे हा एक यावरचा उपाय आहे. तो टर्म इन्शुरन्स किती घ्यावा कुठल्या कंपनीचा घ्यावा कुठल्या प्रकारचा घ्यावा याची आपल्या सल्लागाराची विचारविनिमय करून निर्णय घ्यावा. मी वर सांगितल्याप्रमाणे घेतलेल्या सर्व इन्शुरन्स ची माहिती घरातील इतर मंडळींना अवश्य अवश्य द्यावी. दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर कोणाला संपर्क करायचा आहे काय प्रोसेस आहे याची सर्व माहिती आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना द्यावी. अन्यथा घेतलेल्या इन्शुरन्स चा काहीही उपयोग होत नाही. अशा प्रकारचे टर्म इन्शुरन्स घेताना सर्व माहिती प्रामाणिकपणे द्यावी. इन्शुरन्स घेतल्यावर तीस दिवसाचा तुम्हाला रिव्यू टाईम मिळतो. त्या वेळात घेतलेल्या पॉलिसीचा नीट अभ्यास करून घ्यावा. काही गोष्टी पटल्या नाहीत तर ही पॉलिसी या काळात परत करता येते.
धोका 7: घरातील कर्ता पुरुष अपघातात अपघातात निकामी होणे आणि त्या पुढे पैसे कमावण्यास असमर्थ ठरणे.
उपाय: यासाठी ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध आहेत. त्या घेतल्या तर अशा आपत्ती पासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते.
वरील सर्व मुद्दे वाचल्यावर एखाद्याला अशी शंका येईल की मी कुठला तरी विमा एजंट किंवा विक्रेता आहे. पण असे काही नाही. पण वरील दिलेले मुद्दे हे माझ्या अनुभवातून किंवा माझ्या मित्रमंडळी नातेवाईक यांना आलेल्या अनुभवातून मला समजलेले आहेत ते मी इथे मांडले आहेत. ते प्रत्येकाने अमलात आणावेत असा माझा बिलकुल आग्रह नाही.
आपत्ती येऊ नये म्हणून आपण काही करू शकत नाही. पण समजा आपत्ती आली तर आपले कमीत कमी नुकसान व्हावे त्या कळकळी पोटी वरील गोष्टी सांगितल्या आहेत. शेवटी ज्याने त्याने आपापले सद्सद्विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यावा.
कौस्तुभ पोंक्षे
छान माहिती.
छान माहिती.
काही भर घालाविशी वाटते:
मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या भविष्यासाठी पीपीफ अकाउंट काढावे आणि त्यात जमेल तसे पैसे जमा करावेत. म्हणजे १५ वर्षात चांगली रक्कम जमा होऊ शकते. तसेच उत्पन्नानुसार एखाद्या म्युच्युअल फंडात दरमहा एसआयपी सुरु करावी. बरेचदा वीमा एजंट लहान मुलांचीही पॉलीसी काढायला भाग पाडतात, त्या पासुन दुर रहावे.
वा बरीच उपयुक्त आर्थिक
वा बरीच उपयुक्त आर्थिक नियोजनाची माहिती
अतिशय उपयुक्त माहिती.
अतिशय उपयुक्त माहिती.
यातला धोका क्रमांक६, माझे बाबा गेले तेव्हा प्रत्यक्ष अनुभवला. 30 वर्षांपूर्वी एखादी पॉलिसी सोडलयास इतर काही तरतूद मध्यमवर्गीय परिवारात क्वचितच असायची. माझं आणि भावाचं शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळेपर्यंत ७-८ महिने गेले. आईच्या आधीपासून असलेल्या व्यवहारज्ञानामुळे आणि आमच्यावर असलेल्या मध्यमवर्गीय संस्कारामुळे हा आणि नंतरचा काही काळ कुणावर अवलंबून न राहता आम्ही रेटला. घराचे कर्ज बाबा जाण्याआधी 3महीने फिटले होते ही जमेची बाजू. पण या प्रसंगामुळे आपत्कालीन तरतूद करण्याची गरज मनावर कायमची बिंबली आहे आणि पुढच्या पिढीलाही याची जाणीव करून दिली आहे.
उपयुक्त धागा
उपयुक्त धागा