अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०३ )

Submitted by Theurbannomad on 17 August, 2021 - 08:59

एकोणिसाव्या शतकापर्यंत मध्यपूर्व, मध्य आशिया, भारत आणि चीन या भागांमध्ये प्रचंड उलथापालथ झालेली होती. एक तर युरोपच्या साम्राज्यवादी सत्ता हळू हळू जगभर पाताळयंत्री पध्दतीने व्यापाराच्या आडून आपलं साम्राज्य विस्तारत होत्या. आपापसात लढण्यात मश्गूल असलेले राजे - सुलतान - शेहेंशाह वगैरे एव्हाना लढून लढून मेटाकुटीला आले होते. मराठे, तुर्की, अफगाण, उझबेक, मुघल वगैरे शाह्या पूर्वीसारख्या एकसंध आणि प्रबळ उरल्या नव्हत्या. अफगाणिस्तानात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यातल्या त्यात प्रबळ होते बरकाझाई कबील्याचे लोक, ज्यांचा प्रमुख होता फतेखान. त्याने आपल्याच २१ भावांना अफगाणिस्तानचे वेगवेगळे प्रांत सांभाळायला दिले होते.

या काळात भारताच्या पंजाब भागात शीख प्रबळ झालेले होते. पलीकडे इराणमध्ये पर्शियन सम्राट अफगाणिस्तानचा घास घ्यायला टपलेला होता. फते खान होता तोवर त्याने कशीबशी गादी सांभाळली, पण तो गेल्यावर त्याच्या सगळ्या भावांनी आपापल्या प्रांतांची वेगळी चूल मांडली. हा काळ अफगाणिस्तानच्या इतिहासातला सर्वाधिक अस्थिर काळ. बरकाझाई भावांमधल्या दोस्त मोहम्मद खानने स्वतःला अफगाणिस्तानचा अमीर म्हणून घोषित केलं...पण इतर भाऊ त्याच्या विरोधात गेले. ही संधी साधून शीख राजा रणजित सिंह याने पंजाब आणि काश्मीर अफगाणमुक्त केलं. १८२३ साली खैबर पखतूनवा प्रांतसुद्धा शीख सैन्याने जिंकला. पुढे १८३७ साली शीख जमृद किल्ल्यापर्यंत जाऊन थडकले. हरी सिंह नालवा या पराक्रमी सेनापतीच्या नेतृत्वाखाली त्यांनी किल्ला जिंकला खरा पण हरी सिंह यात शहीद झाला. तिथे भारतात मुघल, राजपूत आणि मराठे बऱ्याच अंशी विखुरले गेले होते. अशा वातावरणाचा फायदा घेतला ब्रिटिशांनी....त्यांची कुटील कारस्थानं - द ग्रेट गेम - आता आकाराला येऊ लागली.

१८३८ साली ब्रिटिशांनी आपल्या सैन्याची पाठवणी अफगाणिस्तानात केली आणि दोस्त मोहम्मद खान त्यांच्या हाती आला. त्याला भारतात पाठवून देऊन त्याच्या जागी ब्रिटिशांनी आणला शाह शुजा. पण लवकरच या सगळ्याचा परिणाम असा झाला, की अफगाण त्वेषाने पेटून उठली आणि त्यांनी ब्रिटिश सैन्याला १८४२ च्या काबूलच्या लढाईत पराभूत केलं. ब्रिटिशांनी मुकाट्याने दोस्त मोहम्मद याला पुन्हा गादी दिली खरी, पण १८७८ साली ते जय्यत तयारी करून पुन्हा अफगाणिस्तानात अवतरले.

या वेळी या धुमश्चक्रीत एक नवा भिडू आला होता - रशिया. अफगाणिस्तानात तेव्हा दोस्त मोहम्मद खान याचा मुलगा शेर अली खान गादीवर होता. ब्रिटिशांनी आपल्याकडच्या आधुनिक शस्त्रसामुग्री आणि सुसूत्र सैन्यदलाच्या साहाय्याने त्याला अल्पावधीत नामोहरम केलं. शेर अली पळून गेला आणि मोहम्मद याकूब खान याने अफगाणी आघाडी हाती घेतली. हा वास्तविक हेरात प्रांताचा प्रशासक, पण बापाविरोधात कटकारस्थाने करण्याच्या गुणांमुळे तुरुंगात खितपत पडलेला. ब्रिटिशांनी त्याला थेट गादीवर बसवून त्याच्याशी ' गंडमक समेट ' घडवून आणला.

करारपत्रावर मोहोर उमटवली जाणार, तोच अयुब खान नावाचा अफगाण लढवय्या पुढे आला. हा मोहम्मद याकूब खानाचा भाऊ. त्याने ब्रिटिशांच्या सैन्यावर चढाई केली आणि दुसरं ब्रिटिश - अफगाण युद्ध सुरू झालं. ब्रिटिशांनी याचीही अल्पावधीत खांडोळी केली आणि दोस्त मोहम्मद खानाच्या पणतूला - अब्दुर रहमान खान याला पुन्हा अमीरपद दिलं. उद्देश हा, की हा अब्दुर आपला अंकित राहील आणि अफगाण लोकांना त्यांच्या प्रिय नेत्याच्या वंशातला अमीर गादीवर बसलेला दिसला की तेही शांत होतील.

हे सगळं ब्रिटिश करू शकले कारण रशिया त्यांच्या आड आला नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे दोन्ही सांड एकमेकांकडे संशयाने बघायचे. ब्रिटिशांना रशियाचा हस्तक्षेप भारत आणि पूर्वेकडच्या प्रांतांमध्ये नको होतं आणि रशियाला ब्रिटिश मध्य आशिया आणि इराणच्या भागात नको होते. या अविश्र्वासातून जन्माला आला ' द ग्रेट गेम '. १८३० साल उजाडताच लॉर्ड एलेंबरो यांनी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटलिक याला सिल्क रूटला पर्याय म्हणून बुखारा शहरातून मध्य आशिया मार्गे युरोपला जोडणारा व्यापारी मार्ग तयार करण्याची युक्ती सुचवली. अफगाणिस्तान या मार्गाच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, कारण पूर्वेकडे चीन, खाली दक्षिण - पूर्वेला भारत आणि पश्चिमेला इराण ( पर्शिया ) ही भौगोलिक परिस्थिती या नव्या खुश्कीच्या मार्गासाठी पोषक होती. अरबस्तानात ब्रिटिश एव्हाना स्थिरावले होते आणि लेवंट देशांच्या भागातही त्यांनी आपला झेंडा रोवला होता. अशा प्रकारे अचानक ब्रिटिशांना अफगाणिस्तान महत्त्वाचा झाला होता.

हे घडवून आणण्यासाठी ब्रिटिशांनी रशियाला चुचकारण्याचा मार्ग स्विकारला. अफगाणिस्तानची सीमारेषा तेव्हा स्पष्ट नव्हती, आणि उत्तरेला तर ती रशियाच्याच प्रांतांना लागून होती. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान या देशांची वेगळी चूल तेव्हा मांडली जात नव्हती. रशियाला अंधारात ठेवण्यासाठी इराक, तुर्कस्तान आणि इतर लेवंट भागातल्या देशांमध्ये ब्रिटिशांनी रशियानांना काही प्रमाणात मोकळीक दिली. ब्रिटिश इतके धूर्त, की त्या भागात त्यांनी फ्रेंचांना सुद्धा गोड बोलून या सगळ्या गोंधळात सामील करून घेतलं होतं. उद्देश हा, की तिथे पायात पाय अडकले की मध्य आशियात कोणाचं लक्ष जाणार नाही.

सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्यावर १८७८ साली ब्रिटिशांनी सैन्यदल अफगाणिस्तानात आणलं. एव्हाना भारतातल्या उठावाची सांगता होऊन ब्रिटिशांनी भारताच्या भूमीवर आपला अंमल घट्ट केला होताच....पुढचा टप्पा होता अफगाणिस्तान. अली मस्जिद आणि पीवार कोटाल या दोन जागी झालेल्या लढायांमध्ये अफगाण पराभूत झाले. शेर अली मदतीची याचना करत रशियाकडे गेला, पण तिथे झारने त्याची स्पष्ट शब्दात बोळवण केली. आधी ब्रिटिशांच्या तहाच्या अटी काय आहेत ते बघ आणि त्या घेऊन ये, अशा शब्दात रशियाने त्याला उत्तर दिल्यावर तो हात हलवत मझार - ई - शरीफ येथे परतला आणि १८७९ साली वारला.

त्यानंतर ' गंडमक समेट ' झाला, काही दिवसांतच काबुलचा उठाव झाला, दुसरं युद्ध झालं आणि ब्रिटिशांनी १ सप्टेंबर १८८० रोजी कंदहार ताब्यात घेऊन अयुब खानाचा निर्णायक पराभव केला. अब्दुर रहमान खान याला ब्रिटिशांनी गादीवर बसवून त्याच्या आडून अफगाणिस्तान आपल्या हाताखाली आणला. रशिया आणि भारत यांच्या मध्ये ब्रिटिशांना हवा असलेला ' बफर स्टेट ' अशा प्रकारे आकाराला आला आणि बुखारा मार्गे त्यांचा व्यापार बिनबोभाट सुरू झाला.' द ग्रेट गेम ' चा हा निर्णायक क्षण. रशियाला कसलीही चाहूल लागू न देता ब्रिटिशांनी आपला कार्यभाग साधलेला होता.

अब्दुर रहमान खान ब्रिटिशांना वाटला त्यापेक्षा बराच उजवा निघाला. त्याने ब्रिटिश आणि स्थानिक अफगाण यांच्यात इतका चांगला सलोखा निर्माण केला की १८८१ साली ब्रिटिशांनी काही नाममात्र अधिकारी आणि लहानसा फौजफाटा ठेवून बाकी सैन्य अफगाण भूमीतून बाहेर नेलं. ' iron khan ' म्हणून प्रसिद्ध झालेला हा अब्दुर रहमान खान आधुनिक अफगाणिस्तान प्रस्थापित करणारा शासक म्हणून इतिहासात नोंदला गेला.

१८९३ साली मोर्टीमर ड्युरांड हा ब्रिटिश अधिकारी अफगाण भूमीत आला तो एक विशिष्ट अजेंडा घेऊन. अब्दुर रहमानबरोबर अधिकारांची स्पष्ट वाटणी आणि सीमारेषा निश्चिती करून अफगाणिस्तान मार्गे होणाऱ्या व्यापाराला कायमस्वरूपी सुरक्षित करणं ही दोन कामं त्याला ब्रिटिश सरकारने दिलेली होती. त्याने वाटाघाटी करून जन्माला घातलेला करार म्हणजेच ' ड्युरांड अग्रिमेंट ' .

याच करतात पुढच्या असंख्य राजकीय गुंतागुंतीची बीजं सापडतात...पण त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रिटिश इतके धूर्त, की त्या भागात त्यांनी फ्रेंचांना सुद्धा गोड बोलून या सगळ्या गोंधळात सामील करून घेतलं होतं. उद्देश हा, की तिथे पायात पाय अडकले की मध्य आशियात कोणाचं लक्ष जाणार नाही.>>>> काय रिटे लोक होते. जाईल तिथे तोडफोड करायचे.

डोंगराऴ भाग, त्यातले अवघड मार्ग, खोल खोल सुरक्षीत गुहा. यामुळे तालीबान्यांचे कुणीच काही करु शकले नसतील.

डोंगराऴ भाग, त्यातले अवघड मार्ग, खोल खोल सुरक्षीत गुहा. ...........

हे तर छोट्या गटांना संरक्षण देतेच. पण पैसा मिळण्याचा स्रोतसुद्धा हस्तगत केला. अफूचा व्यापार, खाणीतील मौल्यवान जिन्नस यांचेहि उत्पन्न ढापले. ते वापरून अफगाण आर्मित लाचखोरी आणि ऐषारामी सुरू केली. अमेरिकध शस्त्रेही ढापली. अफगाण आर्मीतली लाचखोरीमुळे ती खिळखिळी झालीच. दहशतीमुळे सामान्य जनता विरोध करत नाही. मग संपलेच. काबूल इतके सहज पडण्याचे कारण तेच.

वाचतोय.......

काबुल मध्ये काही दिवसापुर्वी किती तरी मुली शाळेत जात होत्या. त्यामधी काही मुली काबुल मधिल एका शाळेत जाताना ह्या विडियो मध्ये (४.०८ मिनिटापासुन) २० सेकंदात दिसतील. मला नाही वाटत की ह्या पुढे काही दिवस ( वर्ष ?) मुली शाळेत जाउ शकतिल.

https://youtu.be/6ZVC2NFyQX4?t=248

विडियो जरी काल अपलोड केला असेल तरी तो काही दिवसा पुर्वीचा आहे

ते ब्रिटीश आणि अफगाण सैन्यात १८३९ ते १८४२ मध्ये झालेले पहिलेच युद्ध. सुरवातीला यात ब्रिटीश सैन्याने काबुलवर नियंत्रण मिळवले खरे पण नंतर अफगाण सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात त्यांचा निभाव लागला नाही. माघार घेऊन परत येत असताना ब्रिटीशांच्या बाजूने लढणाऱ्या ब्रिटीश व भारतीय सैन्याची अफगाण सैन्याने अक्षरशः कत्तल केली. साडेचार हजार सैनिक आणि बारा हजार नागरिक अशा एकूण सोळा ते साडेसोळा हजार जणांची कत्तल झाली. ब्रिटीश सैन्यातला एकच डॉक्टर यातून वाचला. जे काय घडले ते सांगू शकणारा १६००० च्या ब्रिटीश तुकडीतील हा एकमेव साक्षीदार. १३ जानेवारी १८४२ रोजी ब्रिटीशांच्या पोस्टवर हा एकमेव डॉक्टर जिवंत परतला.

लेखामध्ये याचा उल्लेख आला आहे.

>> अफगाण त्वेषाने पेटून उठली आणि त्यांनी ब्रिटिश सैन्याला १८४२ च्या काबूलच्या लढाईत पराभूत केलं

हेच ते युद्ध. दोस्त मोहम्मद खान याच्या मुलाच्या नेतृत्वाखाली अफगाण लढले होते.

खरंच अफगाणिस्तान एक शोकांतिका झाला आहे . कोण ? कोणाचे ? आणि का जीवन संपवतय ?
हा विनाश अफगाणी जनतेला कोठे घेऊन जाणार आहे ? एअरपोर्ट वर त्यांच्याच धर्मातील बहुसंख्य लोक शरण आलेले असताना बॉम्बस्फोट करवून लहान मुलं बायकांचा गळा का घोटला जातोय?
हि विकृत मानसिकता इतकी वाढीस का लागली ?
https://twitter.com/baires_news/status/1430943192816488454?s=19

छान चाललीये लेखमालीका.
बर्याच दिवसांनी माबोवर आलो आणि काहीतरी छान अभ्यासपूर्ण वाचायला मिळालं.
दुसर्या भागाच्या धाग्यावरील गदारोळावर दुर्लक्ष करुन पुढील भाग लवकर टाकावा.

अफगाणइस्तान आज जे काही चला आहे ते ठीकच आहे असे एक भारतीय म्हणून वाटते त्यांच्यासाठी, याच अफगाणी आक्रमकनी भारतात पूर्वी असेच अत्याचार केले होते, त्यामुळे आपण का आपल्या शत्रू बद्दल का वाईट वाटून घाव्ये

अफगाणिस्तान नंतर सुदान चा नंबर लागला वाटतं !
जगातील 50 मुस्लिम देशांपैकी फक्त 8 देशात लोकशाही नांदत होती , त्यातील सुदान मध्ये लष्कराने लोकनियुक्त सरकार पडून पंतप्रधान ला अटक करून देश ताब्यात घेतला !

Pages