डॅन गिब्सन यांनी मक्केच्या वर्णनात आलेल्या ' हरित भूमीचा ' आणि ' झाडांनी भरलेल्या शेताचा ' उल्लेख बघितल्यावर मुद्दाम मक्केच्या आसपासच्या भूमीचे मातीचे नमुने आपल्या काही सहाय्यकांना तपासायला दिले. त्याचे निष्कर्ष असे आले, की अतिशय प्राचीन काळापासून या भागात शेतीयोग्य जमीन उपलब्ध नव्हती. मातीत कोणत्याही प्रकारचे परागकण, पोषणद्रव्य किंवा झाडांचे प्राचीन अवशेष त्यांना मिळाले नाहीत. मक्केला अतिशय प्राचीन काळापासून जास्तीत जास्त १० सेंटीमीटर प्रतिवर्ष इतकाच पाऊस पडल्याचे उल्लेख आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते असा दावा करतात, की कुराणातील ' mother of all cities ' हे वर्णन ज्या शहराचं आहे, तिथे जितकी लोकसंख्या गृहीत धरायला हवी, त्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न आणि पाणी आत्ताच्या मक्केत असणं अशक्य आहे.
डॅन गिब्सन यांनी प्राचीन काळचे अरबस्तानचे नकाशे काढून तपासल्यावर त्यांना काही आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. अरब लोक फार पूर्वीपासून तांडे घेऊन वाळवंटातून प्रवास करायचे. पुढे ते पट्टीचे दर्यावर्दी म्हणूनही ओळखले जाऊ लागले. नकाशे रेखायचं अतिशय प्रगत तंत्र त्यांनी आत्मसात केलं होतं. असं असूनही, त्यांच्या एकाही प्राचीन नकाशात मक्का शहराचं स्थान अधोरेखित झालेलं दिसत नाही. इतकाच नव्हे, तर त्या नकाशांमध्ये मक्का शहरही दिसत नाही. इस्लामपूर्व काळातल्या नकाशांमध्येही मक्का कुठेच दिसून येत नाही. हा विरोधाभास नक्कीच विचार करण्यासारखा आहे, कारण इतक्या महत्वाच्या शहराचा उल्लेख न करता तेव्हाचे नकाशे बनवले जाणं अशक्यप्राय गोष्ट आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपसूक येणार प्रश्न म्हणजे मक्का या जागेची वैधता. जर मक्का हे शहर अस्तित्वातच नव्हतं, तर कुराण कपोलकल्पित कहाण्यांनी भरलेलं लिखाण आहे असं मानायचं का? या प्रश्नाला डॅन गिब्सन थेट भिडतात ते वेगळ्या अंगाने. त्यांच्या मते, पुरातन लेख, धर्मग्रंथ आणि तत्सम साहित्य थेट चुकीचं ठरवण्यापेक्षा त्याचा डोळसपणे अभ्यास करण्याची आज गरज आहे. त्यांनी याच पद्धतीने वर उल्लेखलेल्या अनुत्तरित प्रश्नांना हात घेतला, आणि त्यातून निघालेले निष्कर्ष त्यांना वेगळ्याच दिशेला घेऊन गेले.
कोणत्याही ऐतिहासिक जागांचा अभ्यास करताना कालसापेक्षता महत्वाची ठरते. इस्लाम या भागात जन्माला आलेल्या तीन धर्मांपैकी सगळ्यात अलीकडचा. साहजिकच, या धर्माआधी स्थापन झालेले इतर दोन धर्म, त्या धर्मांचे लिखित स्वरूपातले दस्ताऐवज, धर्मग्रंथ आणि इतर प्राचीन हस्तलिखितं याचा अभ्यास करून बऱ्याच गोष्टींचा उलगडा करणं शक्य होऊ शकतं. डॅन गिब्सन आणि त्यांच्या सहाय्यकांनी आपला मोर्चा इस्लामपूर्व काळाकडे वळवला आणि त्यांना तेव्हाच्या इतिहासात काही विस्मयकारक गोष्टी आढळल्या.
इस्लाममध्ये ' हज ' आणि ' उमरा ' अशा दोन प्रकारच्या तीर्थयात्रांचा उल्लेख आलेला आहे. हज म्हणजे मोठी यात्रा, जी सर्वाधिक महत्वाच्या जागी होते आणि उमरा त्याखालोखालच्या महत्वाच्या जागी होऊ शकते. या प्रथा इस्लाम स्थापन होण्यापूर्वीपासून प्रचलित होत्या. प्रेषित मुहम्मदांचे आजोबाही अशा तीर्थयात्रांना जायचे. या तीर्थयात्रा ज्या जागी होतं, तिथे अनेक वेगवेगळ्या देवतांच्या अनेक मूर्त्या होत्या असा उल्ल्लेख प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळतो. लोक या जागी ' प्रायश्चित्त ' घेण्यासाठी जात आणि आपण अजाणतेपणी केलेल्या पापांबद्दल त्या देवतांची क्षमा मागत. या देवतांची नावं इस्लामपूर्व काळापासून प्रचलित होती. मिस्रि लोकांची शक्तिदेवता, सिरियनांचा हुबल देव हे आणि असे अनेक देव तेव्हा पूजले जात. अरब व्यापारी आपले तांडे घेऊन ज्या ज्या भागातून फिरत, तिथल्या स्थानिक देवतांचा ते आदर करत आणि त्यांची पूजा करत. तेव्हाच्या अरबांकडे स्वतःची अशी देवता नव्हती. ते प्राणी, पक्षी इतकंच काय पण भूमितीय आकाराच्या शिलाखंडांनाही देवतास्वरूप मानून पूजत. या देवतांच्या जागी हिंसा करण्याला मनाई होती. तिथल्या झाडांवरही कुऱ्हाड चालवणं निषिद्ध मानलं जाई.
डॅन गिब्सन यांनी इस्लामपूर्व काळातल्या एका मंदिराला - ' टेम्पल ऑफ दुशारा ' ला भेट देऊन त्या वास्तूचं संशोधन केलं. आजच्या सीरिया देशाच्या दक्षिणेला असलेल्या या मंदिरात ' दुशारा ' देवता प्रस्थापित केलेली होती. इटली देशातही या दुशारा देवाचं मंदिर सापडलेलं आहे. या आणि अशा अनेक उदाहरणांवरून दिसतं, की इस्लामपूर्व काळातल्या अरब लोकांकडून तेव्हापर्यंत प्रस्थापित झालेल्या ग्रीक - रोमन अथवा इजिप्शियन देवी - देवतांचीच पूजा होतं असे. हे सगळं होण्यामागे तेव्हाच्या अरब जगताचे युरोपीय भागाशी असलेले घनिष्ट संबंध कारणीभूत होते. या अभ्यासानंतर डॅन गोबसन यांनी इस्लामपूर्व काळातल्या अरबस्तानमधल्या महत्वाच्या मंदिरांचा अथवा ' होली श्राइन्स ' चा कालसुसंगत अभ्यास करायला सुरुवात केली.
कुराणात उल्लेख केलेली इस्लामपूर्व काळातली ' मस्जिद - अल - हराम ' म्हणजेच ' एकत्र येण्याची वर्जित जागा ' नक्की कोणती असावी, यावर डॅन गिब्सन यांनी लक्ष केंद्रित केलं. इस्लाम स्थापन झाल्यावर इस्लामी पद्धतीने बांधली जाणारी वास्तू - मस्जिद तयार होऊ लागली, पण इस्लामपूर्व काळात मस्जिद या शब्दाचा अर्थ ' एकत्र येण्याची जागा ' इतकाच मर्यादित होता. त्या अनुषंगाने कुराणात उल्लेख केलेल्या ' मस्जिद - अल - हराम ' चं वर्णन जेव्हा गिब्सन यांनी अभ्यासलं, तेव्हा त्यांना काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला. हे स्थान इस्लामच्या स्थापनेपूर्वीपासून धार्मिक तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध होतं आणि या जागी हजारो यात्रेकरू आणि भाविक दरवर्षी येत असत, या उल्लेखावरून त्यांनी त्या आकाराच्या प्राचीन जागा शोधायला सुरुवात केली.
त्यांना आत्ताच्या जॉर्डन देशामध्ये असलेल्या ' बेक्का ' खोऱ्यात काही प्राचीन खाणाखुणा सापडल्या. या भागात त्यांना सापडली एक अशी प्राचीन जागा, जी हजारो वर्षांपासून इथल्या स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे - पेट्रा . लाल रंगाच्या दगडांमधून कोरून काढलेली लेण्यांसारखी मंदिरं, आजूबाजूच्या डोंगरांच्या उभ्या भिंतींवर तयार केलेले भूमितीय आकार, ऑलिव्ह आणि बाकी फळफळावळ उगवणारी सुपीक जमीन, बऱ्यापैकी पाऊस, वर्षाचे सात - आठ महिने सुसह्य हवामान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागात असणारी कुराणमध्ये वर्णन केलेली भूरचना या सगळ्यामुळे गिब्सन यांना पेट्राच्या भागाने आकर्षित केलं. हे शहर जुन्या व्यापारी मार्गावरचं अतिशय महत्वाचं शहर. इराक, जॉर्डन, पॅलेस्टिन, जेरुसलेम, सीरिया आणि इजिप्त या महत्वाच्या देशांपासून अगदी हाकेच्या अंतरावरचं हे शहर कुराणामध्येही अनेक वेळा नमूद केलं गेलेलं शहर आहे.
इथे त्यांना एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. या शहराकडच्या सगळ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंना असलेले डोंगर आणि टेकड्या अनेक चिन्हांनी आणि जुन्या काळच्या भाषेत तेव्हाच्या वाटसरूंना कोरून ठेवलेल्या आकृत्यांनी/मजकुरांनी भरलेल्या. या सगळ्याचा कालसुसंगत अभ्यास करणं अवघड, त्यामुळे नक्की यातल्या कोणत्या गोष्टी प्रमाण मानायचा हे त्यांना कळेनासं झालं. अखेर त्यांच्या या समस्येचं उत्तर मिळालं त्यांच्याच एका कुवेती मित्राकडून - अदेल शेमारी यांच्याकडून. पण त्यावर पुढच्या भागात, तोवर अलविदा !
वॉव नवीन माहिती मिळाली. छान
वॉव नवीन माहिती मिळाली. छान आहे हा भाग.
छान!
छान!
मिस्रि लोकांची शक्तिदेवता, >>>> शक्य असेल तिथे मूळ नाव लिहाल का? जसे हुबल या देवाचे लिहिले आहे. कंसात कशाची देवता ते पण लिहा.