20/06/2021
काझा हे स्पिती मधलं एक मोठं गाव...गावातले 95% स्थानिक सरकारी नोकरदार आणि शेतकरी.
काझा बेस बनवुन तुम्हाला अनेक ठिकाणं बघता येतात.
आज थोडे निवांत तयार झालो आणि आमच्या आजच्या भटकंती साठी निघालो.
काझा पासुन 46 किलोमीटर वर असलेलं हिक्कीम हा आमचा पहिला थांबा होता.
हिक्कीम इथे जगातलं सर्वात उंचीवरचं पोस्ट ऑफिस आहे.वाटेवर खुपदा फ़ोटो साठी थांबत थांबत हिक्कीम ला पोहोचलो.सर्वोच्च पोस्ट ऑफिस मधुन आपल्या आप्त मित्र मंडळांना इथुन पोस्टकार्ड्स पाठवता येतात,अर्थात ती कधी मिळतील त्याचा काही अंदाज मात्र देता येत नाही.एका ब्लॉगर ने लिहिल्याप्रमाणे त्याचं कार्ड एक वर्षानंतर मिळालं!
इथल्या पोस्ट मास्टर बरोबर थोड्या गप्पा झाल्या त्यांना देखील एक मेडिसिन बॉक्स दिला.
आणि पुढच्या ठिकाणासाठी निघालो.
लांग्जा ह्या गावात बनलेला मोठा बुद्धाचा पुतळा लांग्जा च्या वाटेवर असताना दुरुनच दिसु लागतो.एका डोंगराच्या अगदी कडेवर असलेला हा अवाढव्य पुतळा थोडंसं चालत जाउन जवळुन बघता येतो.
सुमारे 50 दशलक्ष वर्षांपुर्वी दोन महाखंड (लॉरेशिया आणि गोंडवाना) च्या टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरीमुळे हिमालय रेंज आणि तिबेटी पठार उदयास आले, त्यामुळे टेथिस समुद्र नाहीसा झाला. लेह मध्ये आणि अन्य काही ठिकाणी सुद्धा काही खाऱ्या पाण्याचे तलाव अजुन बघायला मिळतात.टेथिस समुद्राखाली राहणारे सागरी प्राण्यांचे जीवाश्म आज लांग्झा व आसपासच्या खेड्यात आढळतात.
गावात चौकशी केल्यास स्थानिकांकडे असे जीवाश्म बघायला मिळु शकतात.
ह्या गावाच्या आणि बुद्धाच्या पुतळ्याच्या पार्श्वभुमीवर एक अणुकुचिदार टोक असल्यासारखे एक शिखर उठुन दिसते.त्या शिखराचं नाव आहे चाउ चाउ कांग निल्डा (सी.सी.के. एन) ह्याचा शब्दश: अर्थ आहे आकाशातला निळा चंद्र....ह्या संपुर्ण परिसरात फ़िरताना हे शिखर प्रामुख्याने दिसत राहतं.
देमुल ह्या गावी जाण्यासाठी गाडी सुरु केली आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यावर लक्षात आलं की गाडी मधे काहीतरी प्रॉब्लेम आहे.गाडी हीट अप होते आहे. आजुबाजुला एकदमच निर्जन प्रदेश त्यामुळे थोडावेळ गाडी बंद करुन थांबायचं ठरवलं,कदाचित गाडी थंड झाल्यावर इंडिकेटर बंद होईल असं वाटुन.
बराच वेळ तिथे थांबुन सुद्धा काही फ़रक नव्हता त्यामुळे पुढे न जाता परत मागे वळायचं ठरवलं आणि जवळच्या गावात काही मदत मिळते आहे का बघुया म्हणुन हळुहळु खाली निघालो.
कोमिक हे जगातलं सर्वात उंच मोटरेबल गाव आल्यावर तिथे चौकशी केली.तिथे असलेला एक हिमाचली ड्रायवर मदतीला आला खरा...परंतु प्रॉब्लेम तसाच होता त्यामुळे काझा कडे परत फ़िरायचं असं ठरवुन निघालो.
हा सगळा भाग किब्बर अभयारण्यामधे समाविष्ट आहे.इथे थंडीत स्नो लेपर्ड बघण्यासाठी खास सहली आयोजित केल्या जातात.
इथल्या वन्यजीवनाची झलक बघायला मिळेल की नाही ह्या बद्दल साशंक होते....परंतु काझा ला परत येताना अचानकच दरीत आयबेक्स चा कळप दिसलाय. आमचीच गाडी असल्यामुळे की कोण जाणे पण न घाबरता त्यांचा वावर चालु होता.
काझा ला गाडी सरळ मेकैनिक कडे वळवली.सुदैवाने काही मोठा प्रॉब्लेम नव्हता,त्यामुळे उद्याची आमची भटकंती देखील निर्धोक होणार होती.
क्रमश:
21/06/2021
कालच ट्रैव्हलशेड च्या अरुण ने आम्हाला चंद्रताल आणि मनाली कडे जाणारा कुंजुम पास वाला रस्ता पुन्हा सुरु झाल्याची बातमी सांगितली होती...त्यामुळे आता आम्हाला सर्किट करता येणार ही गोष्ट नक्की झाली.
आज काझा च्या जवळच्या अजुन काही जागा बघण्यासाठी निघालो....
इथल्या मुख्य मॉनेस्ट्रीज मधे की मॉनेस्ट्री चा समावेश होतो.ही मॉनेस्ट्री जवळ जवळ 1500 -1600 वर्ष जुनी असल्याचं मानलं जातं. इथे बुद्धाच्या मंदिरा व्यतिरिक्त बौद्ध सन्याश्यांसाठी शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था देखील आहे. एका वेळी इथे अडीचशे मॉन्क्स राहतात.
की मॉनेस्ट्री च्या मुख्य पायर्या चढुन वर गेलो आणि तिथे एका monk ने आम्हाला मॉनेस्ट्री दाखवायला सुरुवात केली.सर्वप्रथम एका छोट्या किचन मधे घेउन जाउन त्यांनी आम्हाला हर्बल टी दिला, इथे ऑक्सीजन कमी त्यामुळे बर्याच जणाना त्रास होतो....ह्या हर्बल टी ने थोडा आराम मिळतो असं सांगुन त्यांनी आम्हाला मॉनेस्ट्री दाखवायला सुरुवात केली. ह्या मॉनेस्ट्री मधे हजारो वर्ष जुनी पुस्तकं जी संस्कृत,पाली आणि तिबेटी भाषेत लिहिली गेली आहेत भुर्जपत्रावर लिहिलेली ही पुस्तकं,अध्यापन कक्ष बघायला मिळालं.एका छोट्याश्या अंधार्या खोलीत मेडिटेशन रुम होती. डोळे मिटुन तिथे शांत किती वेळ बसलो होतो कोणास ठावुक परंतु तो अनुभव अतिशय ह्रुद्य होता खरा...त्या जागेतच असं काहीतरी होतं ज्याने मन अगदी शांत झालं होतं.
मुख्य मंदिरात पुजा सुरु होती तिथे थोडावेळ घालवुन बाहेर आलो....छोटे संन्यासी तिथे क्रिकेट खेळत होते थोडावेळ आम्ही देखील खेळलो!
की मधे फ़ोटोग्राफ़ी करायला परवानगी नव्हती.
आता आम्ही निघालो आशिया मधील सर्वात उंच पुल चिचम ब्रिज वर जायला.
हा पुल किब्बर आणि चिचम ह्या दोन गावांना जोडणारा तसा नवीनच म्हणावा लागेल.ह्या पुलामुळे लोसर मार्गे चंद्रताल कडे जाणारा एक मार्ग कमी अंतरात पार करता येतो.
आजकाल पर्य़टकांमधे हा पुल फ़ोटोग्राफ़ी,विडिओ साठी खुपच लाडका होतोय....आजचा इंटरनैशनल योग दिवस आम्ही इथे साजरा केला.
चिचम वर बराच वेळ घालवुन आम्ही ह्या डोंगराच्या दुर्गम भागातल्या छोट्या छोट्या गावांना भेट देणार होतो. गेटे गाव आणि ताशिगॉन्ग.
ह्या गावांमधे काही विशेष नाही पण तिथे जाणारा रस्ता आणि तिथुन दिसणारी सुंदर दृश्य ह्यासाठीच केवळ तिथे जायचं. आज आमच्या बरोबर आमच्याच होटेल मधे राहणारे काही पर्य़टक होते...त्यांना मात्र ताशिगॉन्ग, गेटे बद्दल काहीच कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही पुढे आणि ती मंडळी मागे असे आम्ही निघालो.
अतिशय निर्जन अशा प्रदेशात खरतर रस्ता चुकण्याची शक्यता दाट असते.काहीच वेळापुर्वी मोटरसायकल वरुन आलेले काही स्थानिक मात्र पुढे जाउन आमच्या साठी थांबुन राहीले होते...रस्ता न सापडुन गोंधळ होवु नये ह्यासाठी...आम्ही न सांगताही त्यांचं हे अगत्य ही खरं म्हणजे अतिथी देवो भव चं ब्रीदवाक्य म्हटलं पाहिजे.
गेटे गावात फ़क्त 7-8 घरं आहेत.तिथुन थोडंसच पुढे गेल्यावर ताशिगॉन्ग मॉनेस्ट्री आणि गाव लागतं. इथे एका घरात जेवणाची सोय होते तिथेच बनणारा मटार वापरुन बनवलेला पुलाव पर्यटकांसाठी बनवण्यात येतो असं समजलं होतं,भुक लागली होतीच पण गावात बाहेर कोणीच दिसेना मग एका घराचं दार वाजवल्यावर एक आजीबाई आल्या बाहेर...जेवायला मिळेल का? असं विचारल्यावर "अभी पंचायत ने अलौ नही किया ना! इस लिये नही दे सकते....लेकीन आप गुस्सा मत होना वापस आना!" असं सांगितलं....
या छोट्या छोट्या गावातली एकी बघुन खरंच आश्चर्य वाटलं....
अर्थात जरी पुलाव मिळाला नाही तरी एक छानसा फ़ोटो मात्र मिळाला.
थोडावेळ ह्या ठिकाणी घालवुन परत फ़िरलो.
काझा ला परतल्यावर इथल्या काझा मार्केट मधे थोडावेळ भटकलो...आणि रुम वर येउन परत आंघोळ वगैरे तयार झालो....आज सोनम डोल्मा भेटणार होती..
लहान खुर्या चणीची आणि तपकिरी सुंदर डोळ्यांची सोनम जेव्हा आली तेव्हा कल्पना नव्हती की ह्या छोट्या मूर्ती मध्ये किती धमक आहे.
गोष्ट आहे आत्ता आत्ताचीच, सोनम डोलमा ह्या 31 वर्षाच्या युवतीची...
सोनम डोलमा, काझा ची सरपंच.. कदाचित सर्वात लहान.पण त्याआधी corona काळात काजा मधल्या महिला मंडळाने तिच्यावर प्रधान किंवा अध्यक्ष होण्याची जवाबदारी टाकली. भारतभर corona पसरत होता,आणि आपल्या छोट्या प्रांतात kaza मध्ये corona पसरू नये म्हणून काहीतरी करायचं असं ह्या बायकांनी ठरवलं. त्यांचं नेतृत्व करून सोनम ने सर्वानुमते असं ठरवलं की kaaza मध्ये कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही. बायका फक्त एवढाच निर्णय घेऊन थांबल्या नाहीत तर सकाळी 6 ते 8 अशा बायकांच्या duty लावल्या गेल्या.kaza च्या हद्दिपाशी सर्वांना अडवण्यात आलं.पर्यटकांना परत पाठवल गेलं. स्पिती सर्वांसाठी बंद केलं गेलं.
त्याच दरम्यान हिमाचल चे कृषी मंत्री राम लाल मारकंडा त्यांच्या काही कामासाठी kaza मध्ये येणार होते. परंतु बायकांनी मंत्री महोदयांना सुद्धा थांबवलं.
सोनम ही गोष्ट सांगताना म्हणत होती,मी माझ्या लोकांना वाचवण्यासाठी हे करत होते.जर आमच्या गावातल्या बाहेर गेलेल्या लोकांच्या दोन दोन वर्षांच्या मुलांना quarantine केलं गेलं,आम्ही केलं तर मंत्रीजी तर खूपच मोठे आहेत न! त्यांना एवढं तर समजायला हवं की नियम सर्वांसाठी सारखे असतात!
त्यानंतर ही खबर पसरली आणि माध्यमांनी उचलून धरली.मागोमाग हिमाचल मधल्या सर्व महिला मंडळांनी त्यांना support केला आणि सांगितलं की हम स्पिती के महिलाओं के साथ है! उन्होंने कुछ गलत नही किया.
मी काही फार शिकलेली मुलगी नाही.दोन मुलांची आई आहे आणि शेतकरी आहे पण मला एवढं कळतं की आपल्या गावाला ह्या भयंकर आजारापासून वाचवायला हवं आणि त्यासाठी समोर मंत्री असो की अजुन कोणी! सोनम म्हणाली.ह्या कामासाठी आम्हाला कुठलंही appreciation मिळालं नाही पण त्याची मला पर्वा नाही!
ह्या विरोधासाठी सोनम ना आणि तिच्या महिला मंडळातल्या बायकांना त्रास सहन करायला लागला आणि अजूनही आहे. त्यांच्यावर पोलीस केसेस लावण्यात आल्या."पण मी काही चूक केली नाही!" हे म्हणताना आणि ठोस पणे स्वतः च म्हणणं मांडताना तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता तो अचंबित करणारा. स्वतः तेवढंच प्रामाणिक असल्याशिवाय हे होत नाही.
सोनम त्यानंतर पंचायत इलेक्शन लढली आणि जिंकून आली. गावात शेतकऱ्यांसाठी,बायकांसाठी तिला अजून खूप काम करायचं आहे. तिच्या बोलण्यातून हे पटतं की ती नक्कीच काहीतरी छान काम करणार आहे.
ही खरी नारी शक्ती! हो ना?
सोनम शी भरपुर वेळ गप्पा झाल्या.आजचा आमचा काझा मधला शेवटचा दिवस...उद्या पहाटे 5 वाजता निघायचं ठरवलं होतं कारण उद्या बराच मोठा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे लवकरच निद्राधीन झालो!
क्रमश:
हां. बरोबर झालाय हा भाग. दहा
हां. बरोबर झालाय हा भाग. दहा फोटो आणि लेखन.
इतक्या कमी वस्तीत आणि थंड वातावरणातही कोरोना पसरतोय म्हणजे कमालच झाली. मटार भात शिजवून बाहेर दूर कोपऱ्यावर आणून द्या म्हटलं असतं.
एकूण कठीणच आहे।
छान, वाचतोय. फोटो मस्तच.
छान, वाचतोय. फोटो मस्तच. सोनमबाई ग्रेट !
छान मालिका चालू आहे. भाग
छान मालिका चालू आहे. भाग एक ते पुढील ह्यांची लिंक लेखाच्या आधी देता येते. वाचकांना सोपे जाईल. ते कसे करायचे अॅडमिन ना विचारून घ्या. फोटो पण उत्तम आहेत. तुम्ही मेडिकल बॉक्स तिथे देता हे फार छान आहे. सोनम बाई खरेच ग्रेट .
छान मालिका चालू आहे.
छान मालिका चालू आहे.
फोटो पण उत्तम आहेत.
तुम्ही मेडिकल बॉक्स तिथे देता हे फार छान आहे.
सोनम बाई खरेच ग्रेट . >>> +१
कृपया पुढचे भाग "प्रवासाचे
कृपया पुढचे भाग "प्रवासाचे अनुभव - भारतात" या ग्रूपमधे प्रकाशीत करा. (गुलमोहर कथा कादंबरी किंवा ललित लेखन मधे नको) तिथे हा धागा हलवला आहे