18 ची सकाळ स्वच्छ उन्हं घेउन उजाडली होती. आजचा आमचा प्रवास तसा कमी होता त्यामुळे रमत गमत करता येण्यासारखा होता.
परत एकदा एक छोटा ओढ्याचा पुल ओलांडुन टापरी पर्य़ंत येउन आम्ही नाको च्या रस्त्य़ाला लागलो. आता हळु हळु रस्ता थोडा कच्चा होउ लागला.झाडी विरळ होतीच परंतु नजारे मात्र क्षणाक्षणाला बदलणारे आणि विलोभनीय....खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणु उभा काढुन फ़णा...अशी एक कविता होती लहानपणी ती प्रत्यक्ष अनुभवत होतो.आता परत ढग दाटुन येउन थोड्याच वेळात पावसाला पण सुरुवात झालीच.साधारण सोमवार पर्यंत हवामान खराब आणि पावसाळी राहिल असा अंदाज हवामान विभागाकडुन वर्तवला गेला होताच.
आम्ही मात्र भरपुर फ़ोटो काढत नाको ला संध्याकाळ पर्य़ंत पोहोचलो.
आजचा आमचा स्टे होता ताशी होम स्टे मधे.
नाको मधल्या एका लेक च्या जवळच हा ताशी होम स्टे होता.आमचं नशीब असं की lockdown नंतर आम्हीच त्याचे पहिले ग्राहक होतो.
नाको हे गाव इथल्या मटाराच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.इथले मटार सर्वोच्च भावाने विकले जातात.
तिबेटी पद्धतीचा डायनिंग गच्ची वरुन दिसणारा नाको लेक संध्याकाळ अंधार पडेपर्यंत मग तिथेच बसुन समोर दिसणारं रो पुर्ग्यिल नावाचा बर्फ़ाच्छादित शिखर बघत राहिलो...
ताशी आणि त्यांची बायको हे जोडपं हा होम स्टे चालवतं.
lockdown मधे इथली स्थिती काय होती वगैरे गप्पा झाल्या,एकुणच स्वत:चं शेत असल्याने फ़ारसा त्रास झाला नसल्याचं जाणवलं.
उद्याचा दिवस खुप सगळ्या गोष्टी बघत जाणार होता त्यामुळे ताशी नी वाढलेलं गरम गरम साधंच पण रुचकर जेवण जेवुन लवकरच निद्राधीन झालो
नाको चा होम स्टे खरतर सोडवत नव्हता पण पुढे निघायला हवं होतं. ताशी ला आम्ही बरोबर आणलेला काही बेसिक मेडिसिन चा डब्बा दिला.नाको मधे एक मॉनेस्ट्री आहे सन 2007 मधे दलाई लामांनी इथे भेट दिली होती....ती सुरु असण्याची शक्यता कमी होती परंतु तरी तिथे भेट दिली.अपेक्षे प्रमाणे मॉनेस्ट्री बंद होती. तिथेच एका छोट्या दगडी इमारतीत जनजाती संग्रहालय दिसलय...ते बघण्यासारखं असावं परंतु दुर्दैवाने ते देखील बंद होतं. कोरोना मुळे ह्या सगळ्या शक्यता आधीच गृहीत धरल्या होत्या.
पुढचा पडाव होता ग्यु मॉनेस्ट्री.ही मॉनेस्ट्री मात्र सुरु असावी अशी मनात प्रार्थनाच करत होते. ही जागा खास आहे कारण इथे 600 वर्ष जुनी एका तपस्व्याची ममी जपुन ठेवण्यात आली आहे.
असं म्हणतात की इथुन जवळ असलेल्या एका स्तुपा मधे ही ममी होती.1975 साली झालेल्या भुकंपात ही परत एकदा जमिनीखाली गाडली गेली. सन 2004 साली ITBP चं काम सुरु असताना ती परत सापडली आणि सध्याच्या ठिकाणी ठेवण्यात आली.
ग्यु मॉनेस्ट्री बंदच होती त्यामुळे आजुबाजुच्या खिडकीतुन काही बघायला मिळतय का ते बघायचा प्रयत्न सुरु असताना कुठुन तरी गावातला एक माणुस येताना दिसला आणि त्याने बरोबर किल्ली आणली होती त्यामुळे आता आम्हाला ती ममी नीट आत जाउन बघता येणार होती.
ह्या ममी च वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणच्या ममी ज्या प्रकारे काही वनस्पती किंवा औषधांचे लेप लावुन जतन करण्यात आले तसे काहीही ह्या ममी ला केलं गेलं नाहीये. अंदाज असा केला जातो की हे लामा ध्यान करत असताना त्यांचा त्याच अवस्थेत मृत्यू झाला असावा आणि इथल्या बर्फ़ाळ हवामानामुळे त्यांचे शरीर deteriorate न होता नैसर्गिक ममी बनलं.
त्या माणसाशी बोलताना त्याने सांगितलं की त्याच्या दोन पिढ्या आधी लोकांनी ह्या उत्खननात भाग घेउन जेव्हा ममी बाहेर काढली तेव्हा ममी अतिशय जिवंत माणसासारखी दिसत होती.आज अजुनही ममी चे दात शाबुत असल्याचं आपण बघु शकतो. असं पण म्हटलं जातं की ह्या ममी ची नखं अजूनही वाढतायत.
अर्थात हात झाकलेले असल्याने बघता मात्र आलं नाही.
ग्यु मधे स्नो लेपर्ड चा मागोवा घेण्यासाठी सुद्धा पर्य़टक येतात परंतु ते थंडीच्या महिन्यांमधे!
ग्यु कडुन ताबो हा पुढचा थांबा होता.
ताबो मधे 1200 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आहे. अतिशय जुन्या पद्धतीचं मड हाउस पद्धतीचं बांधकाम निळ्याशार आकाशावर कॉन्ट्रास्ट उमटतं.
जुन्या मॉनेस्ट्री ची 75 च्या भुकंपात बरीच पडझड झाली होती,त्यानंतर नवीन मॉनेस्ट्री ची उभारणी दलाई लामांच्या हस्ते करण्यात आली.
लाकडी कोरीव काम केलेले खांब आणि पुतळे,तंखा पेंटींग्ज अजुनही नीट जपुन ठेवलेले बघायला मिळतात.
अन्य मॉनेस्ट्री सारखी ही भव्य दिव्य नाही उलट खुपच साधी आहे परंतु इथली शांतता खरोखरच अंतर्मुख करुन जाते....काही वेळ इथे शांत बसावं असं प्रत्येकालाच वाटलं.
ताबो मधेच जेवणाची वेळ झाली होती.इथे मैत्रेय रेस्टोरंट नामक छान रेस्तोरंट आहे तिथे मग जेवणावर ताव मारला.
ताबो सोडल्यावर रस्ता स्पिती नदीला समांतर जाउ लागतो. आपण स्पिती घाटीत प्रवेश केलाय!
आजुबाजुची हिरवी झाडी आता नाहीशी झालेली असते आणि खुरटी झुडुपं आता दिसत राहतात. सुंदर गुलाबी रंगाची फ़ुलं रस्ताभर दिसत राहतात.
ताबो पासुन निघाल्यापासुन साधारण तीस पस्तीस किलोमीटर वरच स्पिती आणि पिन नदीच्या संगमावर बांधलेला एक पुल दिसतो....इथुनच पिन व्हॅली आणि मुद गाव कडे जाणारा रस्ता दिसतो. बरेच ट्रेक रुट्स इथुन सुरु होतात.आमच्या प्लान मधे मात्र मुद नसल्यामुळे आम्ही काझा च्या रस्त्याकडे लागलो.
काझा जिल्ह्याचं गाव अनेक मॉनेस्ट्री आणि प्रेक्षणीय ठिकाणं इथून एका दिवसात बघून येण्यासारखी असल्याने काझा हा बेस ठेवून सर्वत्र फिरता येतं. ट्रॅव्हलर्स शेड नामक हॉटेल मध्ये आमचं बुकिंग झालं होतंच.
इथे पोहोचतानाच आम्हाला समजलं होतं की काझा च्या पुढचा रस्ता आणि चंद्रताल चा रस्ता बंद आहे त्यामुळे काझा मधला मुक्काम एक दिवस अजुन वाढवायचं ठरवलं.
#onewaytickettospiti
छान प्रवास वर्णन! अजून मोठे
छान प्रवास वर्णन! अजून मोठे भाग चालतील. मला शेवटचा फोटो सोडून बाकी कोणतेच फोटो दिसत नाहीयेत.