कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - ०३

Submitted by Theurbannomad on 7 June, 2021 - 12:25

भाग ०१- https://www.maayboli.com/node/79178
भाग ०२ - https://www.maayboli.com/node/79203

१४३२ साली ३० मार्च रोजी तेव्हाच्या ऑटोमन साम्राज्याच्या राजधानीत - एदिरने येथे सुलतान मुराद दुसरा याच्या हुमा हुतां नावाच्या गुलाम स्त्रीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. ही हुमा हुतां सुलतान मुराद याची चौथी ' बायको '. तिच्या जन्माबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी तिच्या वर्णनावरून आणि तेव्हाच्या तुर्की ' वकाफ़िये ' म्हणजे बखरींमध्ये केल्या गेलेल्या नोंदींवरून असा अंदाज बांधता येतो, की ती मूळची स्लाव्ह वंशाची सर्बियन ख्रिस्ती स्त्री असावी...मुरादने तिला राणीचा दर्जा दिला असला तरी शेवटी ती गुलाम असल्यामुळे बाकीच्या तीन राण्यांसाठी कमी दर्जाची स्त्री होती. मुरादच्या बाकीच्या राण्यांमधली येनी हुतां तुर्किश वंशाची. दुसरी बायको सुलतान हुतां इस्फेंडीयारी वंशाच्या तुर्किश राजघराण्यातली. तिसरी मारा ब्राँकोव्हिक थेट सर्बियन सम्राट जॉर्ज ब्राँकोव्हिक याची मुलगी....त्या मानाने हुमा अगदीच सर्वसाधारण असली, तरी तिच्यात बाकीच्या तिन्ही राण्यांपेक्षा वेगळा असा एक गुण होता - ती अतिशय थंड डोक्याने तोलून मापून काम साधण्यात पटाईत होती.

तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा मेहमत पुढे ऑटोमन साम्राज्याच्या विजयपताका थेट बायझेंटाईन साम्राज्याचा मेरुमणी समजल्या जाणार्या कॉन्स्टॅन्टिनोपल शहरावर फडकावणार होता. हा मेहमत लहान असतानाच त्याला मुरादने अमस्या शहरात पाठवलं. हे शहर आत्ताच्या तुर्कस्तानच्या ईशान्येला आहे. उद्देश हा, की त्याला अगदी कोवळ्या वयातच राज्यकारभाराचे धडे मिळावेत. त्यासाठी त्याच्या बरोबरीला मुरादने आपले दोन खास ' लाला ' म्हणजे सल्लागार नेमून दिलेले होते. त्याव्यतिरिक्त मुरादच्याच दरबारातले अनेक तज्ज्ञ लोक अधून मधून कोवळ्या मेहमतला वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान देण्यासाठी अमस्या शहरात जायचे. त्यांच्यातल्या मुस्लिम धर्मगुरूंनी मेहमतला मुस्लिम धर्माचं सखोल ज्ञान दिल्यामुळे मेहमतला अगदी कमी वयातच या धर्माबद्दल पराकोटीचं आकर्षण निर्माण झालं होतं. मुल्ला गुरानी नावाच्या धर्मगुरूने मुस्लिम धर्मातल्या वैज्ञानिक गोष्टींबद्दल विशेष आकर्षण त्याच्या मनात निर्माण केलं होतं. दुसरा अक्षमसद्दीन नावाचा धर्मगुरू त्याच्या मनात निरंकुश आणि सर्वव्यापी सत्तेचं आकर्षण निर्माण करत होता. हा अक्षमसद्दीन शम्सीया - बेरामिया सूफी पंथाचा प्रणेता. त्याला मानवी शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि औषधशास्त्रातही चांगली गती होती. त्याने मोहम्मद पैगंबर यांच्या एका लढवय्या साथीदाराची - अबू अयूब अल अन्सारी याची कबर शोधून काढली होती. हा तोच अबू अयुब, ज्याने मोहम्मद पैगंबरांच्या काळात कॉन्स्टॅन्टिनोपलवर चढाई करून ते शहर जिंकण्याचा असफल प्रयत्न केलेला होता.

मेहमत आणि अक्षमसद्दीन यांच्या जोडगोळीने एकीकडे तुर्किश ऑटोमन साम्राज्याचा झेंडा कॉन्स्टॅन्टिनोपल शहरावर फडकवायचं स्वप्न बघितलेलं...आणि दुसरीकडे त्याच दिशेला मुरादचीही पावलं पडत होती. ऑटोमनांनी १३९१ सालापासून पाच - सहा दशकात चार वेळा तसा प्रयत्न करून बघितलेला होता. कॉन्स्टॅन्टिनोपलच्या आसपास ऑटोमनांनी आपला जम बसवला असला तरी प्रत्यक्ष कॉन्स्टॅन्टिनोपल अजूनही अभेद्यच होतं. ऑटोमन सम्राटांनी आणि सैन्याने भरपूर प्रयत्न करूनही त्यांची तिथे काही डाळ शिजली नव्हती.

सम्राट मुरादने हंगेरीच्या सम्राटाशी हातमिळवणी करून शांतततेचा करार केला आणि युरोपच्या भागात ऑटोमन साम्राज्याचा स्थानिक युरोपीय साम्राज्यांशी होतं असलेला संघर्ष थांबला....पण का कुणास ठाऊक, अचानक मुरादने विरक्ती पत्करून आपल्या राजगादीचा त्याग केला आणि अवघ्या बारा वर्षांच्या मेहमतला आपल्या साम्राज्याचा कारभार देऊन तो बाजूला झाला. हे बघून हंगेरीच्या जॉन हुन्यादी नावाच्या सरदाराला शांततेचा करार झुगारून पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्याशी ' धर्मयुद्ध ' सुरु करण्याची हुक्की आली आणि त्याने हंगेरीच्या सम्राटाला आपल्या बाजूने वळवलं. मेहमतने आपल्या बापाला पुन्हा एकदा सत्ता सांभाळायची विनंती केली आणि मुरादने आपल्या पोराचं मन राखून त्याच्या विनंतीला मान दिला. अखेर १२ वर्षाचा हा कोवळा पोरगा आणि सम्राट मुराद ऑटोमन सैन्याला घेऊन हंगेरियन सैन्यावर चालून गेले आणि १० नोव्हेंबर १४४४ या दिवशी बल्गेरियाच्या वरना शहरात दोन्ही सैन्यं भिडली.

एकीकडे हंगेरी आणि पोलंड या दोन देशांचं वॅलेशियन सैन्य, ज्यात खुद्द पोपने आपल्या बाजूने आजूबाजूच्या ख्रिस्ती प्रांतांतून अधिकचं सैन्यबळ पाठवलेलं होतं...त्यात होते चेक, बोस्नियन, क्रोएशियन, लिथुआनियन, रुथेनियन आणि बोहेमियन सैनिक. त्यांच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती तिसऱ्या व्लाडिस्लाव याने, जो पोलंड - हंगेरीचा सम्राट होता. त्याच्या जोडीला होता वॅलेशियन प्रांताचा प्रमुख दुसरा मर्सिया आणि या दोघांच्या सेनापतीपदी होता अर्थातच जॉन हुन्यादी. यांच्या जोडीला अल्विस लोरेंडन नावाचा व्हेनेशियन आरमारप्रमुख युरोपच्या बाजूने दार्दानेल्सच्या समुद्रधुनीची कोंडी करायला युद्धात उतरलेला होता. जमीन आणि पाणी अशा दोहोंकडून त्यांना ऑटोमन साम्राज्याला तडाखे द्यायचे होते. या सगळ्यात ऑटोमन साम्राज्याने साम्राज्यविस्तार करताना युरोपमध्ये पिटाळून लावलेले आर्मेनियन ख्रिस्ती लोकही युद्धभूमीवर उतरले होते.

या सगळ्यांसमोर होता ऑटोमन सुलतान मुराद आणि अवघ्या बारा वर्षाचा कोवळा पोरगेलासा मेहमत. त्यांच्या बरोबर होती ऑटोमन सेना...मेहमतने युद्धाच्या आघाडीचं नेतृत्व स्वीकारताच त्याच्यातल्या बुद्धीकौशल्याची चुणूक त्याच्या सरदारांना दिसायला लागली. ऑटोमन सैन्य ६०००० च्या आसपास होतं....मुराद आणि मेहमतने आपल्या या प्रचंड सैन्याच्या लाटा ख्रिस्ती सैन्यावर आदळवायची रणनीती आखली आणि वरना शहराच्या पश्चिमेकडून अचानक ९ नोव्हेंबर १४४४ या दिवशी जबरदस्त चढाई केली. त्यांचा वेग इतका प्रचंड होता की ख्रिस्ती सैन्य तीव्र उतार असलेलं फ्रांगा पठार,वरना जलाशय आणि काळा समुद्र यांच्या मधोमध अडकून पडलं. प्रतिहल्ला करण्यासाठी जॉन हुन्यादी याच्या नेतृत्वाखाली २०००० जणांचं ख्रिस्ती सैन्य पुढे आलं. त्यांनी साडेतीन किलोमीटरची सैनिकांची अर्धवर्तुळाकार तटबंदी उभी करून ऑटोमन सैन्याला घेरण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली.

ऑटोमन सैन्यात जॅनिसेरी नावाचे लढवय्ये होते. हे जॅनिसेरी ऑटोमन सम्राट पहिला मुराद याच्या काळात सुलतानाच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी नेमले गेलेले जबरदस्त लढवय्ये. मूळचे गुलाम. त्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे पुढे त्यांची वर्णी लागली ऑटोमन सैन्यात. मेहमतचे विश्वासू असलेले हे जॅनिसेरी आता ख्रिस्ती सैन्याची फळी मोडायला पुढे आले. त्यांच्या बरोबर होते रुमेलियन सैनिक, जे जॅनिसेरी सैनिकांइतकेच शूर होते. त्यांनी आपल्या तोफखान्याच्या साहाय्याने ख्रिस्ती सैन्यावर हल्लाबोल केला. दुसरीकडे मेहमतने ऑटोमन सैन्याची दुसरी फळी थेट हंगेरियन आणि बल्गेरियन सैन्याच्या दिशेला पाठवली. तिथे सम्राट व्लाडिस्लाव आपल्या सैन्यासह आघाडी सांभाळत होता. त्याने आपल्या सैन्यासह शर्थीची लढाई करून ऑटोमन फळी मोडून काढली आणि आपले ५०० सैनिक घेऊन थेट सुलतानाच्या तळाच्या दिशेने चाल केली. त्याच्या दुर्दैवाने मुरादच्या तंबूपासून काही फुटांवर त्याचा घोडा ऑटोमनांनी लावलेल्या सापळ्यात अडकला आणि कोसळला. कोडजा हजार नावाच्या तुर्किश सैनिकाने व्लाडिस्लावला कंठस्थान घातलं आणि ख्रिस्ती सैन्याची पळापळ सुरु झाली.

चवताळलेल्या तुर्किश ऑटोमन सैन्याने आता ख्रिस्ती सैन्याला असा प्रचंड तडाखा दिला की आधीच अवसान गळलेलं ख्रिस्ती सैन्य वाट फुटेल तिथे पळायला लागलं. ऑटोमनांनी युरोपीय सैन्याला पार मध्य आणि पूर्व युरोपपर्यंत पिटाळून लावलं आणि युरोपमध्ये आपले मुस्लिम झेंडे फडकावले. पुढे १४४८ साली कोसोवो येथे ऑटोमनांनी हंगेरियन सैन्यावर निर्णायक घाव घालून बाल्कन प्रांतात शिरकाव केला आणि जॉन हुन्यादीलाच कैद केलं. युरोपच्या दक्षिण, मध्य आणि पूर्व भागात ऑटोमनांना रोखणारं आता कोणीच उरलं नव्हतं.

मुरादने वरनाच्या युद्धानंतर मेहमतला सुलतान पदावर राहण्याची विनंती केली. मेहमतने नावापुरतं सुलतानपद स्वीकारून प्रत्यक्षात मात्र मनीसा प्रांताचा प्रशासक म्हणून काम करायला सुरुवात केली. १४५१ साली मुराद वारल्यावर मात्र मेहमतने ऑटोमन साम्राज्याची धुरा स्वीकारली आणि त्याच्या हाती सगळी सत्ता एकवटली. एव्हाना पुलाखालून पुष्कळसं पाणी वाहून गेलं होतं. मेहमत एकोणीस वर्षाचा झालेला होता आणि वरनाच्या लढाईनंतर १४५१ पर्यंतच्या सात वर्षात त्याला अस्तनीतले साप कोण आहेत आणि आपल्या बाजूचे कोण आहेत हे नीट समजलेलं होतं. राज्यकारभारात कोण नको तितकी ढवळाढवळ करतं, कोणाचे इरादे स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे आहेत , कोणाला साम्राज्याची लालसा आहे हे त्याने अतिशय व्यवस्थित ताडलेलं होतं. त्याला त्याच्या आईने राज्यकारभार करण्यासाठी एक कानमंत्र दिलेला होता - डोकं थंड ठेवून विचार करून आपल्या चाली खेळायच्या....मेहमत तसाच राज्यकारभार करत होता. त्याने आपलं स्वप्न पूर्णत्वाला नेण्याची तयारी आता सुरु केली - कॉन्स्टॅन्टिनोपल ऑटोमन साम्राज्यात सामील करण्याच्या निर्णायक युद्धाची तयारी...पण त्यावर पुढच्या भागात. तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users