कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - ०१

Submitted by Theurbannomad on 3 June, 2021 - 11:25

इ.स. ३२४ साली रोमन सम्राट ' कॉन्स्टँटिअम द ग्रेट ' याने बायझेंटिअम या प्राचीन शहराला आपल्या विस्तीर्ण पसरलेल्या रोमन साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आणि युरोप - आशिया खंडांच्या अगदी मधोमध - जिथे हे दोन खंड एकत्र येतात अगदी त्याच जागी असलेलं हे शहर एकदम रोमन साम्राज्याचं केंद्र बनलं. कॉन्स्टंटाईन याने आपल्या नावावरूनच या शहराचं नाव बदलून केलं ' काँस्टंटिनोपल '. एक पाय युरोपमध्ये आणि एक आशियामध्ये ठेवून ऐसपैस पसरलेलं हे शहर पुढे तेराव्या शतकापर्यंत जगाच्या पाठीवरच्या महत्वाच्या व्यापारी शहरांमधील एक महत्वाचं केंद्र ठरलं.

या शहरात काय नाही? भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडच्या ' एजियन समुद्र ' म्हणून ओळखला जाणारा भाग काळ्या समुद्राला जोडला जातो ' सी ऑफ मार्मारा ' ने. या तीन समुद्रांना जोडतात दोन चिंचोळ्या सामुद्रधुनी. त्यातली एक आहे दार्दानेल्सची सामुद्रधुनी आणि दुसरी आहे बोस्फोरसची सामुद्रधुनी. कॉन्स्टॅन्टिनोपल याच बोस्फोरसच्या समुद्रधुनीच्या काठाला वसलेलं शहर. समुद्री मार्गाच्या दृष्टीने या शहराची जागा मोक्याची....कारण रशियाचा समुद्री व्यापार याच मार्गाने होणं शक्य होतं...रशियाच्या काळ्या समुद्राच्या बाजूच्या दक्षिण भागात तुलनेने थंडी कमी. उत्तर - पश्चिम भागातल्या बाल्टिक समुद्राच्या भागात प्रचंड थंडीमुळे समुद्री व्यापारासाठी बारमाही कार्यरत राहू शकणारी बंदरं नव्हतीच...त्यामुळे कॉन्स्टंटाईन या व्यापारावर नजर ठेवणाऱ्या दरवानासारखं होतं. या भूभागात हवा अतिशय आल्हाददायक. इथूनच आशिया खंडाचा खुष्कीचा व्यापारी मार्ग युरोपला जोडला जाई. व्यापारामुळे इथल्या लोकांची भरभराट झालेली होतीच....हे शहर अजूनही जगभरातल्या महत्वाच्या शहरांपैकी ओळखलं जातं, ते याच कारणाने.

प्लिनी द एल्डर या रोमन लेखकाने या शहराचा त्याला ज्ञात असणारा इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्याच्यानुसार, या जागेच प्राचीन नाव लेगॉस...पूर्वी इथे थ्रासीयन वंशाचे इंडो - युरोपियन भाषा बोलणारे लोक राहत होते. पुढे हे शहर काही अज्ञात कारणांनी ओस पडलं. त्यानंतर मेगारा भागातल्या ग्रीकांनी ६५७ B.C. मध्ये इथे पाऊल ठेवलं आणि या शहराला बायझेंटाईन असं ग्रीक नाव देऊन या शहराचं पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून या शहराला चांगले दिवस जे आले, ते आजतागायत. पुढे ग्रीकांनंतर रोमनांनी या शहरावर आपला अंमल बसवला आणि सम्राट कॉन्स्टन्टाईन याने या शहराला ' नोव्हा रोमा ' म्हणजे नवीन रोम असं संबोधन देऊन रोमन साम्राज्याची राजधानी तिथे हलवली. या शहराला तेव्हा ' दुसरं रोम ' म्हणून ओळखलं जाई. बायझेंटाईनचं ' कॉन्स्टॅन्टिनोपल ' झाल्यावर मात्र या शहराला जबरदस्त महत्व प्राप्त झालं. कॉन्स्टंटाईनच्या नंतरच्या सम्राटांनी या शहराला आपापल्या परीने अधिकाधिक वाढवलं, सुजलाम सुफलाम केलं.

या सम्राट कॉन्स्टंटाईनच्या मनात अजूनही बऱ्याच योजना होत्या. त्याला ख्रिस्ती धर्माचं आकर्षण होतं. ख्रिस्ती धर्म युरोप आणि जेरुसलेमच्या आसपासच्या भागात विखुरलेल्या अवस्थेत हळू हळू वाढत होता....या कॉन्स्टंटाईनला ख्रिस्ती धर्म आपल्या रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून स्वीकारायचा होता. त्याला या धर्माचं सुसूत्रीकरण करून एव्हाना या धर्माच्या अंतर्गत तयार झालेल्या विस्कळीत अवस्थेतल्या धार्मिक व्यवस्थांना एक दिशा द्यायची होती. इतिहासकारांना या कॉन्स्टंटाईनला नक्की कशामुळे ख्रिस्ती धर्माचं आकर्षण वाटत होतं, याचं ठोस कारण शोधता आलेलं नाही, पण ते होतं हे मात्र नक्की....कारण पुढे कॉन्स्टंटाईनने रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माला राजमान्यता दिली. रोमन पेगनिसम त्याने पूर्णपणे मोडीत काढलं.

या रोमन ख्रिस्ती धर्मामध्येही पुढे दोन शाखा तयार झाल्या. रोम येथे असलेलं जगभरातल्या ख्रिस्ती लोकांचं धार्मिक केंद्र पुढे रोमन कॅथॉलिक म्हणून मान्यता पावलं. या शाखेमध्ये पोप, क्लरजी नावाने ओळखलं जाणार त्याचं ' कारभारी मंडळ ' , आर्चबिशप ,बिशप , ' फादर ' म्हणून ओळखले जाणारे धर्मगुरू अशी धार्मिक व्यवस्थेची उतरंड होती. जगभरातल्या चर्चेसना या सगळ्या व्यवस्थेद्वारे रोमशी जोडलं गेलेलं होतं. धर्मगुरू आपल्या अनुयायांसह धर्मप्रसारासाठी दूरदूर जात आणि तिथे अधिकाधिक लोकांना आपल्या धर्मात आणून शेवटी तिथे ही व्यवस्था तयार करत.

यातून सर्वप्रथम वेगळं झालं ' ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च '. या व्यवस्थेला पोपचं धार्मिक वर्चस्व अमान्य होतं...त्याऐवजी त्यांनी कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मुख्य चर्चच्या आर्चबिशपला आपल्या सर्वोच्च स्थानी मानलं होतं. ख्रिस्ती धर्माच्या पहिल्या सात ' सर्वोच्च ' चर्च कौन्सिल्स - फर्स्ट कौन्सिल ऑफ निकाय, कॉन्स्टॅन्टिनोपल, ईफेसस, खाल्डियन, सेकंड कौन्सिल ऑफ कॉन्स्टॅन्टिनोपल, थर्ड कौन्सिल ऑफ कॉन्स्टॅन्टिनोपल आणि सेकंड कौन्सिल ऑफ निकाय - यांच्यासाठी धार्मिक उतरंडीत सगळ्यात वरच्या स्थानी होत्या. यांचे सर्वसाधारण धार्मिक विधी रोमन कॅथॉलिक पद्धतीनेच होत असले, तरी रोमन कॅथॉलिक चर्चची अधिकृत भाषा लॅटिन होती आणि इस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चची ग्रीक. रोमन कॅथॉलिक गुडघ्यावर बसून प्रार्थना करत, तर ऑर्थोडॉक्स उभ्याने. रोमन कॅथॉलिक यीस्ट घालून किण्वन प्रक्रिया न केलेला ब्रेड आपल्या धार्मिक विधींमध्ये वापरत, तर ऑर्थोडॉक्स लोकांना यीस्टने किण्वन केलेलाच ब्रेड लागे. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोक आपल्याला प्राचीन ख्रिस्ती व्यवस्थेचे पाईक मानतात, कारण पूर्वीच्या ख्रिस्ती धर्मात पोप आणि त्याच्या खालची ' पापल ' व्यवस्था अस्तित्वात नव्हती...पण रोमन कॅथॉलिक मात्र ऑर्थोडॉक्स आपल्यातूनच वेगळे झालेले असल्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा अर्वाचीन मानतात.....

अशा प्रकारे हळू हळू रोम हे रोमन कॅथॉलिक अर्थातच ' वेस्टर्न ' ख्रिस्ती केंद्र आणि कॉन्स्टंटाईन हे ' इस्टर्न ' ख्रिस्ती केंद्र म्हणून मान्यता पावून हळू हळू विस्तारात गेलं. वेस्टर्न चर्चने युरोप, पश्चिम आणि उत्तर आफ्रिका, स्कॅनडीनेव्हियन प्रदेश अशा भागात आपला विस्तार केला, तर इस्टर्न चर्च रशिया, मध्यपूर्व, लेव्हन्टचा भाग, आफ्रिकेचा पूर्व भाग, आशिया खंड अशा भागात पसरलं. यात रशियामध्ये ख्रिस्ती धर्मव्यवस्था वाढण्यामागे एक मजेशीर इतिहास आहे - इस्लाममद्ध्ये मद्य वर्ज्य असल्यामुळे आणि ख्रिस्ती धर्मात धार्मिक विधीतच ' वाईन ' प्राशन करण्याची परवानगी असल्यामुळे रशियाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असं म्हंटलं जातं.

अशा प्रकारे बायझेंटाईन शहराचं कॉन्स्टॅन्टिनोपल झाल्यावर आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची ख्रिस्ती धर्मव्यवस्था ज्या ख्रिस्ती ऑर्थोडॉक्स पद्धतीने चालते, त्या ऑर्थोडॉक्स पद्धतीचं केंद्र या शहरात एकवटल्यावर येथे धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक भरभराट प्रचंड प्रमाणात झाली. हे शहर पुढे कॉन्स्टंटाईनच्या पुढच्या सम्राटांनी अभेद्य बनवलं...पण अशा या प्रबळ शहरावर अवघ्या विशीतल्या आणि मिसरूडही न फुटलेल्या सम्राट मेहमत याने आक्रमण केलं आणि कॉन्स्टॅन्टिनोपल ' इस्तंबूल ' झालं....ही लेखनमालिका त्याच विषयावर असणार आहे. पुढच्या भागात या कॉन्स्टॅन्टिनोपलवर अजून थोडी महत्वाची माहिती येणार आहे, तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मालिका! इस्तंबूल भेट देण्याच्या शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या शहराविषयी वाचायला आवडेल. पुभाप्र.