सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही.
पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे. किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये मृत्यु जितका कन्फर्म आहे, तितकं कन्फर्म बाकी काहीही नाही. पैसा, प्रतिष्ठा, सुख, समाधान, शांती ह्या गोष्टी मिळतील किंवा मिळणार नाहीत. त्याबद्दल निश्चित काहीही सांगता येत नाही. पण मृत्यु हा निश्चित आहे. इथे कोणाचंही तिकिट वेटिंग किंवा आरएसी नाहीय तर अगदी कन्फर्म आहे. आज बुद्धपूर्णिमा आहे. तथागत बुद्ध आपल्या भिक्षुंना मृत्युवर ध्यान करण्यासाठी स्मशानात पाठवायचे. दोन दोन महिने ते भिक्षुंना स्मशानात पाठवायचे व म्हणायचे की, बघा मृत्युला. जो देह जळत आहे, ज्वाळा ज्या शरीराला जाळत आहेत, तो नष्ट होणारा देह नीट बघा. आणि डोळसपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक दिवस तुमचाही देह असाच नष्ट होणार आहे.
जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यु होतो, तेव्हा एका अर्थाने आपलाही मृत्यु होतो. कारण आपण तो व्यक्ती आपला एक भाग असतो किंवा आपण त्या व्यक्तीचा एक भाग झालेलो असतो. त्यामुळेच एक रिक्तता येते. एक पोकळी निर्माण होते. जर डोळसपणे आपण मृत्युला बघू शकलो तर त्यामध्ये आपल्याला आपलाही मृत्यु दिसतो. पण समाजाने आपल्याला नेहमीच मृत्यु बघण्यापासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे आपण इतक्या उघड्या डोळ्यांनी मृत्यु बघू शकत नाही. पण जर आपण थोडी हिंमत करून आपला मृत्यु बघू शकलो तर आपल्याला घडणा-या प्रत्येक मृत्युमध्ये आपला स्वत:चा मृत्यु दिसायला लागतो. आपल्याला ते सत्य लक्षात येतं मग की, होय, इथे प्रत्येकाचा मृत्यु निश्चित आहे. आणि जेव्हा आपण दुस-या व्यक्तीचा मृत्यु हा एका अर्थाने स्वत:चाच मृत्यु आहे, त्याचीच पूर्वसूचना आहे असं म्हणून जेव्हा बघतो, तेव्हा हळु हळु त्या मृत्युचा दंश कमी होत जातो. आपल्याला आतून जाणीव होत जाते की, जे कन्फर्म आहे, जे होणारच आहे, ते नाकारून काहीच उपयोग नाही. आणि जेव्हा आपण मृत्युला स्वीकारतो तेव्हा जीवनाचे दुसरे अर्थ आपल्याला उलगडत जातात. मग जेव्हा आपण एखादा गलितगात्र माणूस बघतो किंवा एखादा अतिशय विकलांग स्थितीतला रुग्ण बघतो तेव्हा आपल्याला आतून जाणीव होते की, एक दिवस माझीही ही अवस्था होणार आहे. आज जे त्या व्यक्तीचं सत्य आहे, तेच माझं उद्याचं सत्य आहे.
मृत्युची आठवण जर आपण सतत ठेवली तर जीवनाचा अर्थ बदलत जातो. जीवनात दु:ख आहे, दु:खाचं कारण आहे, दु:ख मुक्तीचा उपाय आहे व दु:ख नसलेली अवस्था आहे असं सांगणा-या बुद्धांच्या ध्यानाच्या मार्गाकडे आपल्याला जाता येतं. थोडसं वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचं तर त्यामुळे अशी जाणीव होते-
मै पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
ही जाणीव जर आपल्याला खोलवर झाली तर हळु हळु बुद्धांनी सांगितलेल्या निर्वाणाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्युच्या पलीकडे असलेलं निर्वाणाचं सत्य गवसतं तेव्हा तो माणूस असं म्हणू शकतो-
मै हर एक पल का शायर हूँ
हर एक पल मेरी कहानी है
हर एक पल मेरी हस्ती है
हर एक पल मेरी जवानी है
सत्याच्या ह्या मार्गावर जाण्यासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
(हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी व ध्यानाबद्दलचे माझे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करावे: www.niranjan-vichar.blogspot.com niranjanwelankar@gmail.com 09422108376)
शीर्षकातील दंश शब्दामुळे जरा
शीर्षकातील दंश शब्दामुळे जरा झटका बसतो. जमीनीवर यायला मदत होते.
फार छान लिहिलं आहे.
फार छान लिहिलं आहे.
आधी बाबा, मग मित्रपरिवारातले काही आणि मग 3-4 तरुण कलीग्ज, अक्षरशः सिरीज चालु आहे. त्यामुळे लेखन फारच अपील झालं.
चांगले मांडले आहे.
चांगले लिहिले आहे.
धन्यवाद! @ मीरा.. जी, ओहह....
धन्यवाद! @ मीरा.. जी, ओहह......
लेखन आवडले. कळतयं पण वळत नाही
लेखन आवडले. कळतयं पण वळत नाही अशी परिस्थिती होते कधीमधी.
मीरा , बिग हग्ज ..!!