बटाटा (पोह्यांचे) पराठे आणि रायता.

Submitted by अमितव on 11 May, 2021 - 13:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ बटाटे - उकडुन सालं काढून.
पाऊण कप पोहे.
अर्धा कप कणीक
३ -४ लसणीच्या पाकळ्या
तेल
पाणी
मीठ
अर्धा चमचा चिली फ्लेक्स/ १ हिरवी मिरची बारीक चिरुन
कोथिंबीर

रायत्यासाठी
१ मध्यम कांदा
१ गाजर किसुन
अर्धा चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
कढिपत्ता
कोथिंबीर
पुदिन्याची पानं

क्रमवार पाककृती: 

परवा युक्ती सुचवा बाफवर वावेने ह्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला. त्याने बटाट्याचे पराठे केले ते खूपच मऊ -लुसलशीत झाले. नेहेमीच्या बटाट्याच्या पराठ्यांपेक्षा जरा निराळे आणि करायला एकदम सोपे वाटले. त्याच बरोबर केलेला रायता पण वेगळ्या चवीचा होता. व्हिडिओ वेळेवर सापडत नाही म्हणून पाकृ लिहुन ठेवतोय.

१. तीन मोठे बटाटे उकडुन सालं काढून ठेवा.
२. साधारण पाऊण कप पोहे मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या. पोहे जाड/ पातळ कुठलेही चालतील, बारीक पीठच करायचं आहे. हे पीठ मोजुन घ्या, कारण या पिठाच्या प्रमाणात पाणी घालायचं आहे.
३. कढईत दोन - तीन टी स्पून तेल गरम करायला ठेवा. तेल जरा तापलं की त्यात किसलेला लसूण घाला. लसुण किंचित जास्तच छान लागतो, कारण त्याचाच फ्लेवर आहे मुख्य.
४. लसूण किंचित गुलाबी झाला की पोह्याच्या पिठाच्या दुप्पट पाणी घाला, एक चमचा मीठ घाला.
५. त्यात अर्धा चमचा लाल चिली फ्लेक्स असतील तर ते नसतील तर बारिक चिरुन हिरवी मिरची घाला. मुलं पण खातील म्हणून मी काहीच तिखट घातले न्हवते. बरोबरचा रायता जरा आम्हाला झणझणीत केलेला.
६. पाण्याला चांगली उकळी फुटली की गॅस बारीक करुन पोह्याचं पीठ हळूहळू घालत ते ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
७. पोहे पाणी शोषुन घेतील. हलवताना साधारण गोळा बनला की गॅस बंद करा आणि ते गार होऊ द्या.
हे 'पोहे' असेच खायला पण मस्त वाटले. Happy
८. हा लगदा साधारण हाताने कालवता येतील इतपत गार झाला की मळून घ्या.
९. उकडलेला बटाटा आधी मॅशरने कुस्करा आणि त्यात हे पोहे घालुन एकजीव मिश्रण करा.
१०. यात मावेल तेवढी कणिक, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोडं तेल लावुन पोळ्यांना करतो तशी कणिक भिजवा. नेहेमी बटाट्याच्या पराठ्याला बटाट्याच्या सारणाइतकाच (जरा जास्तच) कणकेचा गोळा लागतो. इथे कणिक फक्त बाईंडिंगला वापरलेली आहे, त्यामुळे अगदी एखाद मोठा डाव बरीच होते. मला साधारण पाऊण कप लागली असेल. #लेसग्लूटनपराठे Happy
११. आता गोळे करुन पराठे लाटा, आणि दोन्ही कडून तेल सोडून भाजा. मऊ लुसलुशीत पराठे तयार.

रायत्या साठी.
१. अगदी चमचा भर तेल गरम करुन त्यात जिरं (आवडत असेल तर मोहोरी) तडतडुन घ्या. तेल अगदी कमी घाला, फक्त जिरं फुलण्याइतकंच.
२. त्यात मनसोक्त मिरचीचे तुकडे, कढिपत्ता घाला आणि परता.
३. एक मध्यम कांदा बारिक चिरुन घाला. थोडा परतला की एक मोठं गाजर किसुन घाला.
४. कांदा आणि गाजर फार शिजवायचं नाहीये. क्रंच राहिला पाहिजे.
५. एखाद मिनिटाने गॅस बंद करा आणि हे जिन्नस बाऊल मध्ये काढून घ्या.
६. वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घाला.
६. यात रायत्याची कन्सिस्टंसी येईल इतकं दही घाला. व्हिडिओमधल्या काकूंच्या टीप नुसार मीठ एकदम आयत्यावेळी घाला, नाही तर रायता आंबट होतो. आमच्या घरच्यांच्या मतानुसार पाणी सुटतं. थोडक्यात मीठ सर्व करताना घाला.

रायत्या बरोबर किंवा नेहेमीच्या केचप, सॉल्टेड बटर बरोबर छान लागले पराठे.

वाढणी/प्रमाण: 
याप्रमाणात लहान आकाराचे १२-१३ पराठे झाले. अगदी पातळ आणि हाताळायला सोपे, न चिकटणारे पराठे होतात. पण इतके पुरले नाही आम्हाला, कारण (ग्लूटन नसल्याने) पोट भरल्या सारखं वाटतंच न्हवतं. :)
अधिक टिपा: 

१. बटाटे मायकोवेव्ह मध्ये उकडले की पाणी काढून गार होऊ द्या, म्हणजे बटाट्यात पाण्याचा अंश फार रहाणार नाही.
२. दही आमचं थोडं कमी झालं रायत्यात. आणखी थोडं चाललं असतं.
३. पराठ्यात पोहे आहेत हे अजिबात जाणवत नाही, नुसते बटाट्याचे पराठेच वाटतात. काकूंच्या सांगण्यानुसार कच्चे पोहे मिळून येत नाहीत. ते शिजले की मऊ होतात आणि पराठेही मऊ होतात.

आजचा नवा शब्द: कद्दुकस करणे = किसणे. व्हिडिओ मधल्या काकू कद्दुकस इतकं भारी म्हणतात की फार मजा आली ऐकताना.

माहितीचा स्रोत: 
https://www.youtube.com/watch?v=kXeGiJ673Z8
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! तू करूनही पाहिलेस. मला अजून मुहूर्त मिळाला नाहीये Happy रायत्यासाठी अडून राहिलं आहे. म्हणजे घरात सगळ्यांना थोडी थोडी सर्दी होती त्यात अजून दह्याचं निमित्त कशाला? पण आता करतेच दोन तीन दिवसांत.
छानच दिसतायत. त्या काकूंचं बोलणं आवडलं मलापण. गुजराती आहेत बहुतेक. बाकी पण रेसिपी छान आहेत त्यांच्या.

अरे तू केलेस पण ! छानच. त्या काकू मस्तच बोलतात. आवडल्या मला.
पोह्याचे पराठे करणार आहेच पण ते दह्याचं रायत मला फार आवडल आहे . करून पाहणार आहेच.

छान.. ह्या काकूंनी दिलेली गट्टेची सब्जी पण चांगली होते. कधी फेल जात नाहीत ह्यांच्य रेसिप्या. त्या काकू राजस्थानी आहेत, पप्पा मम्मी रेसिपि वाल्या. त्यांच्या बहुतेक रेसिपि मारवाडी मध्ये असतात आणि सगळ्यात दही असतेच असते Happy

छान आहे. बघताच भूक लागली.
पोहे म्हणजे flattened rice ना? थेट तांदळाचीच पिठी कणकेत मिसळली तर सिमिलर चव येईल की कसे?
मागे मधुराच्या रेसिपीने तांदळाची भाकरी केली त्याचे पीठ आहे त्याची आठवण झाली.

पोहे पाण्यात शिजल्याने येणारा मऊपणा कणकेत तांदुळाचं कोरडं पीठ मिसळुन कदाचित येणार नाही. तांदुळाची उकड करुन बघु शकता.
दोन्ही करा आणि सांगा काय चांगलं लागलं ते Happy

कधी कधी मी पोह्याचे डांगर आणते, पीठच ते पण तिखट मीठ घातलेलं. तोंडीलावणे म्हणून होतं. ते आणलं की करून बघेन.

हो. गुजराथी असाव्या आणि एकदम मुंबईचं 'शुद्ध' हिंदी ते ही नॉन स्टॉप बोलतात
<<
आय थिंक त्या काकू मारवाडी आहेत, त्यांचे एक मारवाडी भाषेतही कुकिंग चॅनल आहे .
रेसिपी छान आहे पण लेंदी वाटली !

दोन्ही मस्तच. व्हिडीओमध्ये लुसलुशीत गोळा बघून असं वाटलं की कार्बला तोडच नाही. Wink रायता तर ताबडतोब करून बघणार. संमोहन झाल्यागत मीही कद्दुकस कद्दुकस पुनःपुन्हा म्हणत आहे.
आमच्या घरच्यांच्या मतानुसार पाणी सुटतं.>>>आमचेही हेच मत आहे .

काकूंचा व्हिडिओही पाहिला. मस्त दिसतायत पराठे. फक्त मला त्या पराठ्यांच्या मिश्रणात चिली फ्लेक्स घालणं फार पटलेलं नाही तेव्हा मी लाल तिखटच घालेन आणि रायत्यात कांदा, गाजर कॉंबो कसं लागेल ह्याचा अंदाज येत नाहीये. पण करुन तर बघावेच लागतील.

रायता इज द की! अशक्य भारी लागतो. आज डोशाबरोबर परत हा रायता चटणी ऐवजी केलेला. फारच मस्त लागला. आता नारळाची चटणी बादच झाली.
कुठल्याही पराठ्या बरोबर मस्त लागेल हा. किंवा पोळीबरोबर ही.

मस्त रेसिपी. रायतं फारच आवडलं. रंगही मस्त येतोय.

कद्दुकस हा शब्द आमच्या युपीतही वापरतात. काहीही खिसलं तरी 'कद्दु' कसच - कद्दु कस करना. गाजर कद्दुकस कर के. मूली कद्दुकस कर के. टमाटर कद्दुकस कर के आणि अर्थात कद्दु कद्दुकस कर के. शिवाय, मला वाटतं खिसणीलाही कद्दुकस म्हणतात.

काकूंचं दिसणं, आवाज आणि बोलण्याची पद्धत यावरून इला अरुणची आठवण येते. ती देखिल राजस्थानी आहे.

मी या काकूंचा दुसरा पराठा बटाटा रवा घालून केला होता. चांगला झाला होता. त्या रेसिपिला 9M व्ह्यु होते.

अरे वा अमितव, करुनपण पाहिला पराठा? फोटू भारीय. सहीच आहे ही रेसिपी.
हो ते कद्दूकस ऐकून मीही अगदी म्हटलंच की रेसिपीव्यतिरिक्त हे पण नवीन शिकायला मिळालं.
या काकूंच्या बाकी रेसिपी बघायला हव्या.

Pages