दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सहावा - नेवाडा ते टेक्सास

Submitted by अनया on 4 May, 2021 - 12:46

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग पाचवा : वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा

०५ ऑक्टॉबर २०१९ लास व्हेगस, नेवाडा ते फिनिक्स, ऍरिझोना
Nevada ariCOLLAGE.jpg

आहा! आजचा दिवस एकदम स्पेशल होता.

आज फिनिक्समध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी मुक्कामाला जायचं होतं. एकेकाळी आम्ही दोघी पाच मिनिटात एकमेकींच्या घरी पोचायचो. जरा जास्त वेळा पोचायचो. वह्यांची देवाणघेवाण, एखादं आजिबात येत नसलेलं आणि फार-फार महत्वाचं गणित विचारायला, कधी एकत्र अभ्यासाच्या नावाने, कधी नुसत्याच खुसूखुसू गप्पा मारायला, कधी त्यांच्या अंगणातल्या बकुळीची फुलं वेचायला. खरं सांगायचं तर काही कारण नसायचं आणि काही कारण लागायचंही नाही. अश्विनी आणि मी बालवर्गापासून एका वर्गात होतो ते थेट बारावीपर्यंत. नंतर मात्र आमची फाटाफूट झाली. ती फिजिओथेरपी शिकायला लागली आणि मी आर्किटेक्चर. ही कायम आपल्याबरोबर असणार हे मी इतकं गृहीत धरलं होतं की ती बरोबर नाहीये हे पचायला बराच वेळ लागला.त्यामुळेच की काय पण आम्ही आमच्या-आमच्या कॉलेजात फार रमलो नाही. कॉलेजव्यतिरिक्त करायच्या गोष्टी म्हणजे फॅशन स्ट्रीटची चक्कर, एखादा सिनेमा, अन्य काही खरेदी नेहमी बरोबर करायचो.

हळूच ही वर्षे संपली. मग लग्न करून ती एका गावात गेली आणि मी दुसऱ्या गावात गेले. मग काहीकाळ ती पृथ्वीच्या एका टोकाला आणि मी दुसऱ्या टोकाला, असे दिवस आले. आमच्या दोघींच्याही घरात बाळपावलं आली. संसाराचा सराव झाला. सगळं बदललं. पण मैत्री कायम राहिली. प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या पण ओढ, जिव्हाळा तसाच होता. आयुष्याचा प्रवाह पुढे जातोच. आमचाही गेला. नव्या ठिकाणी घरं मांडली, आवरली आणि पुन्हा दुसऱ्या जागी मांडली. हे सगळं करताना एखाद्या क्षणी वाटायचं, मला हे जे वाटतंय किंवा होतंय ते कोणाला नाही कळलं तरी तिला कळलं असतं. पण कधीतरी होणाऱ्या तुटपुंज्या भेटी, पत्रं, इमेल, फोनवरची संभाषणं ह्यात ते सांगायचं मनातच राहायचं. ह्यालाच मोठं होणं म्हणतात.

आमची ही मैत्री काही गोडमिट्ट वगैरे नव्हती. लहानपणी तर पुष्कळ भांडणं व्हायची. कोणी कोणाच्या घरी बोलवायला जायचं? हा मुख्य विषय. नंतर तह करून मधला एक स्पॉट नक्की केला होता. तिथे भेटून पुढे एकत्र जायचं आणि येताना तिथे निरोप घ्यायचा, अशी तहाची कलमं होती. निरोप घेताना उभं राहून अर्धा-अर्धा तास गप्पा मारायचो पण ‘मला लांब पडतं’ असं म्हणून घरी जायचं नाही म्हणजे नाही. जिद्द म्हणजे जिद्द!! नंतर भांडणं अशी नाही झाली. तिला काय बोलावं आणि काय बोलू नये, ही समजूत खूप चांगली आहे. माझा त्याबाबतीत जरा आनंदच आहे. त्यामुळे नको इतकं बोलणे, नको ते बोलणे आणि नको तेव्हा बोलणे ही माझी खासियत आहे. ते पोटात घालून त्याचा डाग मैत्रीला न लागू देणे, ही तिची खासियत आहे.पण आपण चुका आपल्या हक्काच्या जागीच करतो ना? वय वर्षे तीनपासून मी हा हक्क तिच्यावर गाजवते आहे. तिच्या मैत्रीने मला फार समृद्ध केलं आहे.

आता आमच्या लग्नांना पंचवीस वर्षे होऊन गेली. पण आम्ही चिकटपणे आमची मैत्री सांभाळून ठेवली आहे. मध्यंतरी काही वर्षे संपर्क थोडा कमी झाला होता. मी कैलास-मानसला जाऊन आल्यावर त्याचं वर्णन लिहिलं. त्या निमित्ताने काहीशा दुरावलेल्या मैत्रिणी, नातेवाईक पुन्हा जोडले गेले. त्या लिखाणाने मला दिलेली ही अपूर्व अशी भेट आहे. त्यानंतर आम्ही मैत्रिणी + मुलं मिळून हिमालयातल्या एका सुंदर ट्रेकलाही गेलो होतो. आमच्या मैत्रीची ही वेल पुढच्या पिढीपर्यंत पोचली, ह्याचा फार आनंद होतो.

काही वर्षांमागे महेशच्या कामाच्या निमित्ताने आम्ही अमेरिकेत घर मांडलं. तिला अमेरिकेत येऊन बरीच वर्षे झाली होती. आम्ही अमेरिकेच्या दोन टोकांना होतो. एका गावात आलो असतो तर हत्तीवरून साखरच वाटली असती बहुतेक! दोघींच्या गावांमध्ये अंतर खूप होतं तरी एकदा तिच्याकडे एकटी गेले. एकदा सहकुटुंब सहपरिवार गेले. एकदा व्हर्जिनिया ते ऍरिझोना अशी रोडट्रीप केली आणि आता मोठ्या रोडट्रीपमधला विश्रांतीचा दिवस तिच्या घरी होता! थोडक्यात काय इकडून तिकडून कुठूनही कुठेही गेलो की आमच्या रस्त्यात फिनिक्स येतंच!

तसंच ह्या ट्रीपमध्ये रस्ता थोडास्सा वळवून आम्ही फिनिक्सच्या दिशेने निघालो होतो. आज प्रवासाचा दुसरा टप्पा संपणार होता. आजचं अंतरही कमी होतं. तीनशे मैलांच्या आसपास. रस्त्यात हूव्हर डॅमला भेट देणार होतो. उद्या आम्हाला आणि गाडीला एक दिवसाची विश्रांती मिळणार होती. त्यात आराम करणे, रसद पुन्हा भरून घेणे आणि मुख्य म्हणजे गप्पा मारणे असा छानसा कार्यक्रम होता.

काल लास व्हेगासच्या रस्त्यांवर भरपूर पायपीट झाली होती. रात्रभर छान विश्रांती झाली तरीही पाय ठणकत होते. अशा कुरकुरणाऱ्या पायांसकट गाडीत बसून निघालो. व्हेगासपासून हूव्हर डॅम अगदीच जवळ आहे. नेवाडा आणि ऍरिझोना राज्याच्या सीमेवरील कोलोरॅडो नदीवरचं हे धरण आहे. दरवर्षी जवळपास दहा लाख पर्यटक ह्या जागेला भेट देतात. ह्या वर्षीचा हा आकडा गाठण्यासाठी आम्ही हातभार लावला होता. बाकी धरण-रस्ते-पूल हे विषय आर्किटेक्ट मंडळींच्या कक्षेत येत नसल्यामुळे त्याबद्दल मी काही बोलायचं काम नाही.
IMG_20191005_105143094_TOP.jpgDSC_1019.JPGIMG_20191005_104848502_TOP.jpg

धरणाकडे जाताना सुरक्षेसाठी गाडीची अगदी कडक तपासणी झाली. नंतर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर धरणाचं विहंगम दृश्य बघता येतं. पायऱ्या चढताना मधेमधे थांबून विश्रांती घेता येईल अशा जागा केल्या आहेत. तिथे धरणाची, त्याच्या बांधकामाची माहिती दिली आहे. जी माहिती खाली उतरेपर्यंतही लक्षात राहात नाही, ती माहिती अक्षरओळख आहे म्हणून मी उगीच वाचते. इथेही वाचली. वर भणाण वारा होता. त्या बाल्कनीसारख्या जागेच्या एका बाजूला नदीचा अडवलेला प्रवाह दिसत होता तर दुसऱ्या बाजूच्या हायवेवरून गाड्या ‘वेगे वेगे’ धावत होत्या. आसपास दिसणारे डोंगर लालसर दगडांचे होते. महाराष्ट्रासारखाच हा भागही ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ होता. पूर्ण प्रवासात जिथेजिथे राज्यांच्या सीमारेषा आल्या, तिथल्या ‘xxx राज्यात स्वागत आहे’ अशा बोर्डचे फोटो काढत होते. चालत्या गाडीतून असे फोटो काढायचे म्हणजे शिकार केल्यासारखं सावध राहावं लागायचं. इथे मात्र निवांतपणे फोटो काढता आले.
IMG_20191005_105137886.jpgDSC_1020 (1).JPG

कोलोरॅडो नदीचं वरून दर्शन घेतल्यावर गाडीत बसून त्या भागातून अजून थोडी चक्कर मारली आणि फिनिक्सच्या दिशेने निघालो. घरून निघाल्यापासून रोजच्या रात्रीच्या जेवणाची सगळी भिस्त इन्स्टंट पॉटवर असल्यामुळे रोज आमटी/ पिठलं / रस्सा + भात किंवा उपमा असं जेवत होतो. त्यामुळे अश्विनीबरोबर झालेल्या (असंख्य) फोनकॉलमध्ये आम्ही आलो की भात आणि रवा हे पदार्थ नसतील, असं काहीही जेवायला कर, अशी सूचना आधीच दिलेली होती. त्यामुळे घरच्या सुग्रास अन्नाचा वास मला दोनशे मैल अंतरावरूनच येऊ लागला होता.

०७ ऑक्टॉबर २०१९ फिनिक्स, ऍरिझोना ते अल पासो, टेक्सास

COLLAGE 2.jpg

अश्विनी-अजित ह्यांचा निरोप घेऊन निघालो. तिथे होतो तोवर खूप गप्पा झाल्या. अजित, अश्विनी, तिच्या सासूबाई आणि मी सगळे कल्याणचे. तेव्हाचं कल्याण लहान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे कॉमन ओळखी भरपूर. महेशला कंटाळा येईल म्हणून कल्याणच्या गप्पा नाही मारायच्या असं ठरवलं तरी कुठूनतरी विषय निघून तिथेच येत होतो. भरपूर गप्पा, विनोद, हसाहशी, खाणे आणि ड्रायव्हिंगला सुट्टी ह्या सगळ्यामुळे प्रवासाचा शीण गेला होता. आता ताजेतवाने होऊन पुढच्या प्रवासाला निघालो होतो.

व्हर्जिनिया ते वॉशिंग्टन स्टेट ते ऍरिझोना असे दोन टप्पे संपले होते आणि आता प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात ह्युस्टनकडे निघालो होतो. ह्या रस्त्याचा बराचसा भाग मेक्सिकोच्या सीमेजवळून जात होता. ऍरिझोनानंतरचं पहिलं राज्य ‘न्यू मेक्सिको’ होतं. त्यामुळे सीमेच्या एका बाजूला न्यू मेक्सिको (मेक्सिको खुर्द) आणि पलीकडे नुसतं मेक्सिको (मेक्सिको बुद्रुक) आहे, असं वाटत होतं. जिथे जाणार होतो, ते ‘अल पासो’ तर अगदी सीमेवरच आहे. ह्या भागात बेकायदा स्थलांतर करून अमेरिकेत येण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाची इथे बरीच वर्दळ असते, असं कळलं होतं. मेक्सिकन आणि भारतीय लोकांची चेहरेपट्टी काहीशी सारखी असते, केसांचा रंगही सारखा असतो. त्यामुळे काहीवेळा भारतीय लोकांना थांबवून त्यांची कागदपत्रे बघितली जातात, असं ऐकलं होतं. पण आमच्याबाबतीत तसं काही झालं नाही.

2-1.jpg2-2.jpg

बाहेर अजूनही लालसर दगडांच्या पर्वतांचं राज्य होतं. वेगवेगळ्या आकाराच्या दगडांनी तयार झालेले आकृतीबंध बघायला मिळत होते. अल पासो हे गाव मेक्सिको देश, न्यू मेक्सिको राज्य आणि टेक्सास राज्य ह्या तिन्हीच्या सीमारेषांच्या जवळ आहे. मुक्कामावर पोचायच्या थोडंसंच आधी टेक्सास राज्यात प्रवेश केला. हे आमच्या प्रवासातलं एकविसावं राज्य होतं. काही राज्यामध्ये एकही मुक्काम केला नाही, तिथे काही बघायलाही थांबलो नाही. तिथला अगदी थोडासा भाग पार केला. अशा वेळी आम्ही ‘ह्या राज्यात आपण शास्त्रापुरतं जायचं आहे’ असं म्हणायचो. टेक्सास राज्यातून तीन दिवस प्रवास करायचा होता. हे राज्य भौगोलिक दृष्ट्या मोठं राज्य आहे. आम्ही जो रस्ता निवडला होता, तो टेक्सासच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणार होता. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर अगदी ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ म्हणता येईल असा रस्ता होता!

2-3.jpg

अल पासोला पोचल्यावर हॉटेलमध्ये जाण्याआधी वॉलमार्टमध्ये जाऊन दूध-भाजी खरेदी करायची होती. तिथे गेलो तर आवारात शस्त्रधारी पोलिसांची बरीच वर्दळ दिसली. आधी वाटलं की मेक्सिकोच्या सीमेवरचं शहर असल्यामुळे इथे वाढीव बंदोबस्त असेल. पण मग टी.व्ही. बघताना कळलं की काही महिन्यांपूर्वी ह्याच वॉलमार्टमध्ये एकाने अंदाधुंद गोळीबार केला होता. काहीही चूक नसताना वीस लोकं त्या गोळीबारात गेली. म्हणून इथे पोलीस पहारा होता.

अमेरिकेत दारू किंवा सिगारेट विकत घ्यायची तर वयाची अट आहे. तुम्ही अगदी जख्ख म्हातारे असलात तरी ओळखपत्र दाखवल्याशिवाय ह्या गोष्टी विकता येत नाहीत. जर एखादा दुकानदार ओळखपत्र न तपासता ह्या वस्तूंची विक्री करताना पकडला गेला तर अत्यंत गंभीर परिणाम होतात. हे कायदे योग्यच आहेत. पण त्याच देशात तुम्ही एके-47 सारखी प्राणघातक शस्त्र आपल्या घरात ठेवू शकता. तुमच्या घराच्या बागेत वाघ-सिंह पाळू शकता. तुमच्या शेजाऱ्याने असे प्राणी पाळले असतील, तर तुमच्यासाठी विमा कंपन्यांनी वेगळी पॉलिसीही तयार केलेली आहे.

गंमत आहे की नाही!!

०८ ऑक्टॉबर २०१९ एल पासो, टेक्सास ते जंक्शन टेक्सास

IMG_20191007_155747283_TOP.jpg

गेली तीन-चार वर्षे अमेरिकेत राहात होतो. त्याआधी अमेरिकेत कधी आलेही नव्हते. पुस्तकातून किंवा सिनेमातून जेवढी ओळख होती तेवढीच. सिनेमापेक्षा पुस्तकातूनच जास्त. वाचनातून अमेरिकेतील समाजजीवनाचे वेगवेगळे थर माहिती झाले. त्यातलंच एक पुस्तक म्हणजे जॉन ग्रिशॅम ह्या लेखकाचं ‘The painted house.’ हे पुस्तक मला फार आवडतं. अमेरिकेतल्या खेड्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या सात-आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य आणि साधारण एक वर्षात होणाऱ्या घडामोडी असं ढोबळ कथानक आहे. इथली शेतं बघताना मला त्या पुस्तकाची खूप वेळा आठवण आली. खरं तर ते कथानक टेक्सास राज्यात घडत नाही. जेव्हा यांत्रिक शेतीचं प्रमाण कमी होतं तेव्हाच्या जुन्या काळातली ती गोष्ट आहे. तेव्हा असं सगळं असलं तरी ती मैलोनमैल पसरलेली शेतं , त्यातलं एखादं घर बघताना ‘ल्यूकचं घर’ असंच दिसत असेल, असं वाटायचं खरं. लान्स आर्मस्ट्रॉंग ह्या सायकलपटूच्या ‘It’s not about the bike’ ह्या पुस्तकातून टेक्सास राज्याची ओळख झाली होती. तिथले रस्ते, निसर्ग हे वर्णन वाचून फार प्रभावित झाले होते. पुढे त्या सायकलपटूने आपली कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजक औषधांचं सेवन केल्याचं उघडकीला आलं. हे कळल्यावर माझा मुलगा इतका चिडला की ते पुस्तक त्याने चक्क केरात टाकून दिलं!! टेक्सासच्या रस्त्यांवरून जाताना हे असं कायकाय आठवत होतं.

सुरवातीच्या टप्प्यांमध्ये आपण घराकडे पाठ करून प्रवास करतोय, घरापासून लांब जातोय, असं वाटत होतं. आता मात्र घराच्या दिशेने जातोय, असं वाटत होतं. साधारण आठवड्याभरात घरी पोचलो असतो. प्रवासाचा कंटाळा आला नव्हता. पण घराची ओढ तीव्र होत होती. घरी जायला किती दिवस आहेत, घरी गेल्यावर काय करायचं, कुठली कामं लगेच करायला हवी आहेत? लवकरच मायदेशी कायमचं परतायचा बेत होता. त्यादृष्टीने काय तयारी करायची आहे, हे विषय सारखे चर्चेला येत होते.

आजच्या प्रवासात काही बघायला थांबायचं नव्हतं. एका गावाहून निघायचं चारशे मैल ड्राइविंग करायचं आणि पुढच्या गावाला पोचायचं, इतकाच अजेंडा होता. नेवाडा राज्यात शिरल्यापासून वाळवंट बघत होतो. लाल-किरमिजी रंगांचे डोंगर, वाळूसारखी पिवळसर माती, हिरवा रंग जरा दुर्मिळच झाला होता. आता पुन्हा एकदा मैदानी प्रदेशाकडे निघालो होतो. विस्तीर्ण अशी शेतं दिसत होती.

आता अगदीच सरावाचे झालेले ‘सकाळची आन्हिके-ब्रेकफास्ट - सामान गाडीत भरणे - नेव्हिगेशन काकूंना पत्ता सांगणे - गाणी ऐकणे - जेवायला थांबणे - कॉफीसाठी थांबणे - हॉटेल गाठणे - चेकइन करणे - खोली अस्ताव्यस्त करणे - स्वैपाक - जेवण - टीव्ही - उद्याचं हवामान- झोप’ हे रुटीन अजून एकदा गिरवलं आणि आजचे कार्यक्रम संपले. उद्या भेटू ह्याच जागी, ह्याच वेळी असं जाहीर केलं आणि निवांत झोपलो.

०९ ऑक्टॉबर २०१९ जंक्शन टेक्सास ते व्हिडोर टेक्सास

IMG_20191007_155747283_TOP.jpg

माझा मामा डहाणूला राहात असे. तिथे गेल्यावर भरपूर गुजराती कानावर पडायचं. मामा तर अस्खलीत बोलायचाही. मुंबईत तसंही ट्रेनमध्ये-दुकानात गुजराती कानावर पडत राहतं. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यावर बांधकाम-प्लॅस्टर-टाईल्सचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर गुजराती होते. इतक्या सगळ्या अभ्यासावर मला तोडकं-मोडकं गुजराती बोलता येतं आणि बऱ्यापैकी कळतंही. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी पटेल मंडळी मोटेल्स / हॉटेल्स चालवतात किंवा त्याचं व्यवस्थापन बघतात. तसा अंदाज आला, की मी माझी चार ठरलेली गुजराती वाक्य सुरवातीला म्हणून टाकत असे आणि शेवटी ‘आव जो’ म्हणून निरोप घेत असे! तेवढीच जरा गंमत.

आज जिथे राहात होतो, तेही ‘जितुभाईंना मोटेल’ होतं. प्रथेप्रमाणे मी माझी चार वाक्य टाकली. त्यांनीही थोडं जास्त हसून स्वागत केलं होतं. मात्र तो आनंद काही मिनिटंच टिकला. हॉटेलमध्ये नूतनीकरणाचं काम चालू होतं. सगळीकडे धूळ, सिमेंटचं राज्य होतं. आम्ही बुकिंग करताना ब्रेकफास्टची सोय आहे, असं बघूनच हॉटेल ठरवायचो. पण इथे आल्याआल्या जितुभाईंनी ‘ब्रेकफास्ट नाहीये. फक्त फळं आणि बिस्किटं मिळतील’ असं सांगितलं. संध्याकाळ होत आली होती. दमलोही होतो. त्यामुळे बुकिंग रद्द करून दुसरं हॉटेल शोधण्याइतकी शक्तीही नव्हती आणि वेळही. त्यामुळे नाराज होऊन खोली गाठली. आतलं चित्र बघून अजूनच नाराज झालो. आतला सगळा सीन जरा जुनाट होता. पडदे, बेड कव्हर्स बिचारी. टेबल-खुर्चीवर चरे आले होते. अमेरिकेत आल्यापासून पुष्कळ फिरलो. पण असा अनुभव आला नव्हता. तो इथे आला, त्याचं थोडं वैषम्य वाटलं.

सकाळी आयता ब्रेकफास्ट मिळणार नव्हता. त्यामुळे उपमा केला. तो खाऊन, भांडी धुवून, सामान भरून निघेपर्यंत जरा उशीरच झाला. इथे प्रत्येक हॉटेल रूममध्ये नियम असल्यासारखी बायबलची प्रत असतेच असते. आज कुठे काही विसरलो नाही ना, ते बघताना एका ड्रॉवरमध्ये बायबलच्या सोबतीने इंगजीतील भगवद्गीता होती, ते बघून अंमळ मजा वाटली.

3-1.jpg

आजही चारशे मैल म्हणजे साधारण सहा-सात तासांचं ड्रायव्हिंग होतं. फिनिक्सच्या रस्त्यावर हूव्हर डॅम बघितला, त्यानंतर काही बघायला असं थांबलो नव्हतो. आज सॅन अंटानियो ह्या गावातला एक ऐतिहासिक प्लाझा बघायचा होता. ह्यूस्टनला जेवायच्या वेळेपर्यंत पोचलो असतो. तिथून दीड-दोन तासावर मुक्कामाचं गाव होतं. तीन दिवस टेक्सास राज्यात फिरत होतो, आता आज ह्या राज्यातला शेवटचा मुक्काम होता.

4-1.JPG4-2.jpg

सॅन अंटानियो इथे अलामो प्लाझा बघायला जायचं असं आधीच ठरलेलं होतं. ‘इतकं काही खास नाही. It’s overrated’ असं अश्विनीच्या कन्येने आधीच बजावून सुद्धा आम्ही ठरल्याप्रमाणे आलो होतो. इथे मिशन, चर्च, थोडा नागरी युद्धाचा इतिहास असं कायकाय होतं. टेक्सास आणि मेक्सिकोच्या युद्धात ह्या जागेला महत्त्व होतं. आपल्याकडे अशा लढायांचा इतिहास, एखाद्या वास्तूचं स्थानमाहात्म्य आपल्याला माहिती असतं. अमेरिकेत फिरताना अशा जागी हा प्रश्न नेहमीच येत होता. एकतर त्यांचा इतिहास माहिती नाही. तिथल्या यादवी युद्धातले वीर, महत्त्वाच्या लढाया माहिती नाहीत. त्यामुळे भावना उचंबळून येण्याचा संभव नव्हता. तिथे गेलो, फिरलो, माहिती देणारी एक फिल्म दाखवत होते ती बघितली.

4-5.jpg

बाहेर येऊन कॉफी शॉपमध्ये शिरलो. इथली कॉफी मात्र छान होती. छान तरतरीत होऊन पुन्हा गाडीत बसलो. सॅन अंटानियोमध्ये जरा जास्तीच शुकशुकाट वाटला. बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती. असं का असेल, हा चर्चा विषय आम्ही ह्युस्टन येईपर्यंत पुरवला.
आजचा उरलेला प्रवास लांबचलांब क्षितिजापर्यंत पसरलेले रस्ते, शिस्तीत पण वेगात धावणाऱ्या गाड्या आणि आत्ता दिसत आहेत तोवर दृष्टीआड होणारी चिमुकली गावं बघताना संपला सुद्धा.

ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग सातवा (अंतीम) : टेक्सास ते व्हर्जिनिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिले आहे. Happy
काहीशा दुरावलेल्या मैत्रिणी, नातेवाईक पुन्हा जोडले गेले.>>>अगदी असंच झालं मलाही.
अश्विनीची लेक म्हणते तसे "इतकं काही खास नाही. It’s overrated’ तेच मलाही वाटते. रिव्हर वॉकला गेला नाहीत का, ते एक(ठीक ठीक) मुख्य आकर्षण आहे.
खुर्द बुद्रुक Happy
येऊ दे अजून.

रेणू, अस्मिता वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार.
आता पुढचा भाग शेवटचा. घर जवळ आलं!! समारोप लिहायला नेहमीच जड जातो. तेच काम चालू आहे आत्ता.