टाईम बाँल म्हणजे बंदरावरील एखाद्या उंच इमारतीवर उभारलेल्या पोल वरुन एक धातूचा किंवा लाकडाचा रंगीत मोठा गोळा दिवसाच्या एका ठराविक वेळेला वरुन खाली सोडला जातो. बंदरातील असणाऱ्या बोटी व किनार्याजवळ आलेल्या बोटी यांना क्रोनोमिटर वरील वेळ जुळवून घेण्यासाठी ही सोय केलेली असते. त्यामुळे त्यांना त्या बंदराचे रेखांश समजतात. सध्या ही पद्धत इलेक्ट्रॉनिक टाईम सिग्नल मुळे काल बाह्य झालेली आहे.
पहिला टाईम बाँल पोर्ट स्मिथ इंग्लंड येथे 1829 मधे उभारला होता. मुंबईत देखील ही यंत्रणा अस्तित्वात होती. आजही तुम्ही मुंबईत पी. डिमेलो रोडने जात असाल तर पोर्ट ट्रस्टच्या आवारातील घड्याळ असणार्या टाँवरवरचा हा मोठा रंगीत गोळा बंद पडलेल्या स्थितीत बघू शकता. जगभर सगळ्या बंदरात हा गोळा दुपारी एक वाजता वरुन खाली सोडण्यात येत असे. एक ला पाच मिनीटे असताना तो खालून मध्यावर आणतात, बरोबर एक वाजता तो वर नेतात व वरुन खाली सोडतात.
1840 मधे ही टाईम बाँल यंत्रणा मुंबईत प्रथम बसवण्यात आली होती. एक अचूक साईडरियल क्लाँक (नक्षत्र वेळ) दर्शविणारे घड्याळ व दोन अचूक वेळ दर्शविणार्या घड्याळांच्या सहाय्याने ही यंत्रणा चालत असे. पुढे आँब्झरवेटरी मधे टाईम बाँल ऐवजी झेंडा दर्शविणारी पद्धत सुरू झाली होती.
ही यंत्रणा " बाँम्बे कँसल " मधील उंच घड्याळ असलेल्या मनोर्यावर उभारण्यात आली होती. त्यासाठी कुलाबा आँब्झरवेटरी व बाँम्बे कँसल येथे एकच अचूक वेळ दर्शविण्यासाठी विजेच्या सहाय्याने ही दोन्ही घड्याळे जोडली होती. पुढे "प्रिन्सेस डाँक" सध्याच्या पी. डीमेलो रोडवरील आवरातील घड्याळ टाँवरवर 1891 मधे दुसरी टाईम बाँल यंत्रणा उभारण्यात आली होती.
'द गॅझेट आँफ बाँम्बे सिटी (1910)' च्या माहितीनुसार पोर्ट ट्रस्टच्या घड्याळ टाँवरवर सकाळी स्थानिक वेळेनुसार 8.30 वाजता हा बाँल वर उचलून खाली सोडला जात असे. तर बॉम्बे कँसल मधे दुपारी दोन वाजता हा बाँल वर उचलून खाली सोडला जात असे. ही यंत्रणा आठवड्याचे सुट्टीचे दिवस सोडून सर्व दिवस चालू असे.
'मुंबई चा व्रुत्तांत '(1889), या पुस्तकातील माहितीनुसार हा टाईम बाँल बॉम्बे कँसल येथे दुपारी एक वाजता वरुन खाली सोडण्यात येत असे. हा गोळा वरुन खाली पडला म्हणजे त्या वेळच्या सेक्रेटरीएट समोर समुद्र किनारी ठेवलेल्या तोफेला बत्ती देत असत. या तोफेच्या आवाजाने मुंबईतील लोक आपली घड्याळे लावत असत. रात्री नऊ वाजता देखील अशीच एक तोफ उडवली जात असे.
पोर्ट ट्रस्टच्या आवारातील ही टाईम बाँलची यंत्रणा गोदीला लागलेल्या भीषण आगीत आणि बाँम्ब स्फोटामुळे 14 एप्रिल 1944 रोजी कायमची बंद पडली.
© प्रसाद शेज्वलकर
बॉम्बे कॅसल व प्रिन्सेस डॉक येथील टाईम बॉल वर्तुळ करून दाखवण्यात आलेला आहे.
नवीन माहिती मिळाली.
नवीन माहिती मिळाली.
नवीन माहिती मिळाली +१
नवीन माहिती मिळाली +१