अरबस्तानच्या वाळवंटात घडलेल्या घटनांचा हा गोषवारा जितका रंजक आहे, तितकाच वैविध्यपूर्ण. या भागातली संस्कृती इतर जगापेक्षा निराळी. जगातल्या तीन प्रमुख धर्मांचा उगम झालेली ही भूमी गेल्या हजारो वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरांतून गेली असल्यामुळे येथे इतिहासाला कलाटणी देणाऱ्या असंख्य घटना घडून गेल्या आहेत. या भूमीतून जसे ओसामा बिन लादेन निपजले, तसेच राजे फैसलही. इथल्या अरबांमध्ये एका बाजूला कट्टर इस्लामी विचारांना कवटाळून राहिलेले मूलतत्त्ववादी आहेत, तसेच दुसरीकडे जगाला ' गज़ल ' या काव्यप्रकाराची देणगी देणारे कलेचे भोक्तेही आहेत. रखरखीत वाळवंटाच्या कुशीत तग धरून राहिलेले अरब जितके रांगडे, तितकेच दिलखुलास. वेळप्रसंगी सत्तेसाठी आपल्या भावंडांचाही जीव घेणारे अरब एखाद्यावर जीव लावला तर तो प्राणापणाने जपतातही. या भूमीत मेसोपोटेमिया, पर्शिया, इजिप्त या अतिशय प्रगत आणि वाहाबी विचारांच्या मूलतत्त्ववादी अशा दोन टोकांच्या संस्कृती जन्माला आल्या.अरबस्तानच्या वातावरणासारखीच इथल्या माणसांच्या स्वभावाची दोन टोकं. इथे एकीकडे आलिशान गाड्यांमधून फिरणारे राजघराण्यातले अरब दुसरीकडे वाळवंटात तंबू ठोकून गप्पाटप्पा मारतानाही दिसू शकतात. महागड्या सुटाबुटांमध्ये जग फिरणारे अरब रमझानसारख्या पवित्र काळात आपल्या पारंपरिक वेशभूषेत दिवसभर अन्नपाण्याविनाही राहतात. घोडे, उंट अशा प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे अरब दुसरीकडे हिंसक होऊन आपल्या विरोधी गटातल्या माणसांना निर्दयीपणे मारूही शकतात. एकंदरीतच विलक्षण विरोधाभासाने भरलेलं आणि भारलेलं हे अरब जग म्हणावं तर विलक्षणही आहे आणि म्हणावं तर एकसुरी.
अरेबियन नाईट्स, इसापनीती आणि कुराण यापलीकडेही अरब जगतात खूप काही आहे. अठराव्या शतकातला आणि लिओनार्डो द विन्चीनंतरचा सर्वगुणसंपन्न मनुष्य म्हणून ज्याला जग ओळखत, तो सर रिचर्ड बर्टन या अरबस्तानच्या प्रेमात का पडला, हे समजण्यासाठी या जगताच्या अंतरंगात डोकावून पाहावं लागतं. भारतीय उपखंडात , युरोपमध्ये आणि चीन-जपानसारख्या देशांमध्ये असलेली निसर्गाची विविधता या अरबस्तानला फारशी मिळाली नाही. युरोपमध्ये घडून आलेल्या रेनेसाँससारख्या स्थित्यंतरातून हा भाग कधी गेलाच नाही. अमेरिका, भारत अथवा इंग्लंडसारखी या भागात लोकशाही मूळ धरू शकली नाही. रशियाच्या बाजूलाच असूनही इथे साम्यवादानेही बस्तान बसवलं नाही. इथे वर्षानुवर्षं कायम राहिलेली एकमेव गोष्ट म्हणजे ' संघर्ष '. त्याच्या जोडीला विश्वासघात आणि कारस्थानांचीही देणगी या भागाला ईश्वराने भरभरून दिलेली आहे. अगदी इव्ह आणि ऍडमपासून या भागाच्या इतिहासात हे पदोनपदी दिसून येतं आणि तरीही इथला इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. युरोपियन महासत्तांना या अरबस्तानने नुसतं थोपवलंच नाही, तर अनेकदा युरोपमध्ये शिरकावही करून दाखवला आहे. इथले लोक जसे पट्ट्टीचे दर्यावर्दी आहेत , तसेच केवळ आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या साहाय्याने योग्य दिशेला मार्गक्रमण करणारे कुशल वाटाडेही आहेत. रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, अंकगणित अशा अनेक शास्त्रात हे अरब निपुण मानले जातात. इजिप्त, पर्शिया आणि मेसोपोटेमियाच्या संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी या संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे अनेक दाखले दिले आहेत.
अरबस्तानच्या प्रदेशात भटकंती करताना, इथल्या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताना आणि त्यांच्या तोंडूनच त्याचा इतिहास - भूगोल समजून घेताना मला त्यांच्यातला प्रखर राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान प्रकर्षाने जाणवला. पेट्रोडॉलरच्या जोरावर इथल्या लोकांनी मागच्या शंभर वर्षात प्रचंड उत्कर्ष करून घेतलेला असला, तरी अजूनही इथे शाबूत असलेल्या राजेशाही समाजव्यवस्थेचा मागोवा घेताना मला शाळेत शिकलेल्या समाजशास्त्राच्या विषयाचा नव्याने परिचय झाला. दुबईसारख्या खऱ्या अर्थाने ' वैश्विक ' शहरात राहायला मिळाल्यामुळे काही तुरळक नियमांचा अपवाद सोडल्यास राहणीमानाचं स्वातंत्र्य मी भरभरून उपभोगलं असलं, तरी कामानिमित्त इतर अरब देशांमध्ये गेल्यावर तिथले निर्बंधही अनुभवले आहेत. रमझानच्या महिन्यात लहान वयाच्या मुलांपासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत सगळे जण निर्जळी उपवास धरताना बघितले आहेत आणि रोजा सोडताना माझ्या धर्माचा, जातीचा अथवा नागरिकतेचा विचार न करता मला आपल्याबरोबर भोजनात अगत्याने सामील करून घेणारे अरबी सुहृदही मी अनुभवले आहेत. मायभूमीशी जोडलेली नाळ घट्ट ठेवूनही मला माझ्या या कर्मभूमीशी एक जिव्हाळ्याचं नातं जपता आलाय, ते अशा सगळ्या मित्रमंडळींमुळेच.
साठा उत्तरांची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करताना माझ्याकडून काही राहून गेलं असेल, तर त्याबद्दल वाचक मला मनापासून क्षमा करतील, अशी मला आशा आहे. या जगाचा इतिहास, भूगोल, समाजकारण, अर्थकारण, धर्मजीवन आणि राजकारण मला जस समजल आणि उमजल, ते तुम्हा दर्दी वाचकांसमोर आणताना मला अतिशय आनंद होतं आहे.
विख्यात अरबी लेखक सादल्लाह वानूस यांच्या शब्दांनी या लेखनप्रपंचाचा शेवट करणं इथे संयुक्तिक ठरेल. ते म्हणतात, “We are doomed by hope, and come what may, today cannot be the end of history.”
समाप्त
अरबस्तानचा इतिहास - समारोप
Submitted by Theurbannomad on 22 February, 2021 - 16:47
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या लेखमालेवर आलेल्या
या लेखमालेवर आलेल्या प्रतिक्रिया बघून पुढचा विषय सुरू केला आहे...तुर्कस्तानचा इतिहास. लवकरच लिहायला घेणार आहे, आशा आहे सगळ्यांना तोही आवडेल.
छान. पुलेशु.
छान.
पुलेशु.
Pages