अरबस्तानचा इतिहास - भाग ०५

Submitted by Theurbannomad on 18 February, 2021 - 09:26

जोसेफ ते मोझेस - इजिप्तचे दिवस

जोसेफला कपटाने इजिप्तमध्ये घालवून दिल्याच्या घटनेच्या वीस वर्षांनी कानांच्या आणि आजूबाजूच्या अरबस्तानच्या प्रांतात ना भूतो ना भविष्यती असा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तब्बल सात वर्ष लांबला. अखेर शेजारच्या सधन, संपन्न आणि धनधान्याने भरलेल्या इजिप्तकडून मदत मिळवावी, या हेतूने त्याने बेंजामिनव्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या मुलांना त्या दिशेला पाठवलं. गेलेल्या दहा मुलांपैकी नऊ काही दिवसांनी परत आली, ती आपल्याबरोबर खेचरांच्या पाठीवरून धान्याच्या गोण्या घेऊन परतली. त्यांना इजिप्तमध्ये हेर समजून तिथल्या सैनिकांनी त्यांच्यातल्या सिमीओन नावाच्या भावाला कैद केलं आहे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जी माहिती चौकशीत पुरवली होती, ती खरी आहे हे पटवून देण्यासाठी बेंजामिनला इजिप्तला घेऊन यायची आज्ञा केली आहे अशी माहिती त्यांच्यातल्या थोरल्या रूबेनने जेकबला दिली. आपल्या कुटुंबाची इतकी सखोल माहिती इजिप्तच्या लोकांना दिल्याबद्दल जेकब त्यांच्यावर संतापला.
खरी वस्तुस्थिती काही वेगळीच होती. त्या धान्याबरोबर त्या भावंडांनी नेलेले पैसेसुद्धा तसेच परत आले होते. नजरचुकीने हा प्रकार झाला असावा अशी जेकबची समजूत झाली असली, तरी वास्तविक इजिप्तमध्ये जोसेफने आपापल्या भावंडांना ओळखून त्यांच्याकडून धान्याच्या मोबदल्यात घेतलेले पैसे त्यांना परत केले होते. काही दिवसांनी धान्य संपताच जेकबने पुन्हा आपल्या मुलांना इजिप्तहून धान्य विकत घ्यायला पाठवलं आणि मागच्या वेळच्या गैरसमजुतीमुळे या वेळी धान्याची दुप्पट किंमत द्यावी असंही बजावलं. आधीच्या खोट्या बतावणीला स्मरून भावंडांनी या वेळी बेंजामिनला घेऊन जायचा आग्रह धरला आणि अखेर जेकबने त्यांना परवानगी दिली.
या वेळी मात्र तब्बल २० अधिकच्या खेचरांच्या पाठींवर भरून धान्य घेऊन परतल्यावर मुलांनी अखेर जेकबला जोसेफ इजिप्तमध्ये जिवंत असल्याचं सत्य सांगितलं. इतकंच नाही, तर जोसेफ तिथला एक सन्मानित उमराव ( बायबलमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे इजिप्तचा गव्हर्नर ) झाला असून त्याची आपल्या सगळ्या कुटुंबाला कनान सोडून इजिप्तला निघून येण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी जेकबला सांगितलं. त्याचा आधी यावर विश्वास बसला नसला, तरी आपल्या ७० कुटुंबियांना घेऊन तो अखेर इजिप्तला निघालाच.
वाटेत बीरशेबाला आपल्या यहोवा देवतेला बळीचा नैवेद्य चढवून हा कुटुंबकबिला पुढे निघाला. इथे प्रत्यक्ष देवानेच जेकबला जरी त्याने आणि त्याच्या कुटुंबाने इस्रायलची पवित्र भूमी सोडलेली असली, तरी त्यामुळे तो नाराज नसल्याचं आश्वासित केलं आणि नव्या देशातही त्याच्या वंशजांची भरभराटच होईल असा दिलासा दिला. पुढे गोशेन येथे अखेर अनेक वर्षांनी जेकब आणि जोसेफची साश्रू नयनांनी गळाभेट झाली.
जोसेफ ज्या काफिल्याच्या प्रमुखाकडे विकला गेला होता, तो इजिप्तच्या फारोहचा एक सरदार होता. त्याने जोसेफला तुरुंगात टाकलं. जोसेफ कितीही झालं तरी प्रेषिताचा वंशज असल्यामुळे त्याला स्वप्नांचा अर्थ लावण्याची विद्या अवगत होती. फॅरोहला स्वप्नात सात कुपोषित गायी आणि सात धट्ट्याकट्ट्या गायी दिसल्या, ज्याचा अर्थ जोसेफने ' सात वर्ष भरभराट आणि सात वर्ष दुष्काळ ' असा असून फारोहने धान्याचा अतिरिक्त साथ करून ठेवावा असा सांगितला. हे भाकीत खरं ठरल्यामुळे फॅरोह जोसेफवर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला आपल्या राज्याचा वजीर म्हणून नियुक्त केलं.
वडिलांची गाठभेट झाल्यावर आता अर्थात जोसेफने आपल्या कुटुंबाची आपल्या राजाबरोबर भेट घडवून आणली. फॅरोहने सगळ्यांची आस्थेने चौकशी केली. त्या सगळ्या कुटुंबीयांनी आपल्याला इजिप्तच्या संपन्न राज्यामध्ये सामावून घेण्याची विनंती फॅरोहला केली. फॅरोहनेसुद्धा त्यांच्या विनंतीला मान दिला. त्याने जोसेफला आपल्या बरोबरीचा दर्जा दिलेला असल्यामुळे त्याने या सगळ्या कुटुंबियांना गोशेन प्रांतात स्थिरस्थावर करवून दिलं.

जेकबचं कुटुंब - ज्याला बायबलमध्ये ' हाऊस ऑफ इस्राएल ' असं संबोधलं गेलेलं आहे - या गोशेन प्रांतात चांगलंच भरभराटीला आलं. अगदी सात वर्षाच्या दुष्काळातही त्यांच्या घरच्या परिस्थितीत फरक पडला नाही, उलट त्यांची त्याही काळात भरभराटच झाली. आता हे कुटुंब सधन झालेलंच होतं, पण धनाबरोबर चालत आलेल्या मानसन्मानामुळे आता ते इजिप्तच्या उच्च वर्तुळातले उमराव झाले होते.
काही वर्षांनी जेकब आजारी पडून अंथरुणाला खिळला आणि त्याने मृत्यूनंतर आपलं दफन इजिप्तमध्ये नव्हे, तर कनानच्या आपल्या पवित्र भूमीत व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. जोसेफच्या मुलांपैकी - एफरिम आणि मनासे यांच्यापैकी धाकला एफरिम जास्त योग्यतेचा आहे हेही त्याने जोसेफला सांगितलं. इसाऊ आणि जोसेफची कहाणी ही अशा प्रकारे पुढच्या पिढीमध्येही नशिबाने घडवून आणली होती. अखेर जेकब म्हणजेच इस्राएलने आपला अंतिम श्वास घेतल्यानंतर जोसेफने त्याचं दफन आपल्या पूर्वजांच्याच बाजूला ' केव्ह ऑफ द पॅट्रीआर्च ' मध्येच केलं. कनानबरोबरच समस्त इजिप्तसुद्धा सत्तर दिवस दुखवटा पाळत होतं , यावरून जेकबला लोकांच्या आणि राजाच्या मनात किती मान होता हे दिसून येतं.
बॅबिलोनियन तालमूदप्रमाणे ( रब्बीनिक ज्यू ग्रंथ ) इसाऊ याने जेकबच्या दफनाला अडथळा आणल्यामुळे चिडून हुशीमने - जो जेकबच्या डॅन नावाच्या मुलाचा मुलगा म्हणजे त्याचा सक्खा नातू होता - इसाऊला ठार मारले असा उल्लेख आहे. तो प्रमाण मानला, तर जेकबच्या दफनभूमीच्या त्या गुहेमध्ये त्याच्या भावाचं शीरसुद्धा दफन झालं, असं मानायला जागा आहे कारण हुशीमने केलेल्या वारामुळे इसाऊचं डोकं धडावेगळं होऊन गुहेत घरंगळत गेलं असं त्या कथेत सांगितलेलं आहे.
जेकबच्या मृत्यूनंतर आता त्याच्या कुटुंबाची - हाऊस ऑफ इस्रायलची धुरा जोसेफच्या हातात एकवटली. त्याने आधीच आपल्या भावांना त्यांच्या कृत्याबद्दल मोठ्या मानाने क्षमा केली होती आणि आपापसातले मतभेद मिटवून सर्वांना एकत्र आणलं होतं. परंतु त्याच्या आयुष्यात पुढे अनेक महत्वाच्या घटना घडणार होत्या आणि त्याच्या वंशजांना आपल्या पवित्र भूमीसाठी बराच संघर्ष करावा लागणार होता.
मुळात कनानच्या लोकांमध्ये काही महत्वाचे गुण उपजतच होते - अविरत कष्ट उपसण्याची तयारी , हार नं मानता प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जायची चिकाटी आणि रक्तातच भिनलेली व्यापारी वृत्ती.शिवाय सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करत राहिल्यामुळे नव्या प्रांतांमध्ये गेल्यावर निवडलेल्या जागी एकत्र राहून ते आपली एक वस्ती तयार करत आणि वाढवत नेत.या वस्तीमध्ये आपल्या वंशाच्या लोकांमध्येच रोटीबेटीचे व्यवहार करून ते आपली संख्या वाढवायचं काम करत. आजही ज्यू लोकांमध्ये ही सवय आढळते , यावरून त्यांचा रूढीप्रिय स्वभावाची कल्पना येऊ शकते.
काही वर्षांमध्ये जोसेफच्या वंशजांनी आपली संख्या पद्धतशीरपणे वाढवत गेली. सोबत त्यांच्या व्यापाराची भरभराट होत होतीच. फॅरोह रामसेस याने आपल्या राज्यात आणलेली हि उपरी प्रजा त्याच्या नंतर गादीवर बसलेल्या फॅरोह सेटी याच्या डोळ्यात मात्र खुपायला लागली. या लोकांना इतका मान मिळत होता, की आता हे तंबूतले उंट मूळ मालकालाच वरचढ होतायत कि काय, अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली होती. नव्या
फॅरोहला आपल्या इजिप्तच्या प्रजेची काळजी या उपऱ्यांपेक्षा जास्त असणारच, त्यामुळे शेवटी त्याने एक पाशवी फर्मान काढलं. या कनानच्या लोकांच्या घरात जन्माला येणाऱ्या वंशजाला ठार मारायचं ते फर्मान. काही वर्षांपासून त्याने पद्धतशीरपणे या पाहुण्यांना गुलामगिरीच्या खाईत ढकललेलं होतंच, त्यावर आता हे फर्मान म्हणजे या कनानच्या लोकांचा पार निर्वंश करण्याचं कुटील कारस्थान असलं तरी शेवटी त्याच्या विरोधात तोंडातून ब्रही काढायची खोटी होती. आता मात्र कनानच्या लोकांच्या वंशविस्ताराला चांगलाच लगाम लागला. इजिप्तचे सैनिक डोळ्यात तेल घालून कनानच्या या पाहुण्यांच्या घरात कोण जन्माला येतो आहे हे बघत असल्यामुळे लपून छपून काही करणंसुद्धा अशक्य होतं आणि संख्येने कमी असल्यामुळे त्यांच्याबरोबर थेट युद्ध करणंसुद्धा शहाणपणाचं नव्हतं.
ईश्वराने योजून दिलेल्या काही घटना जशा कितीही प्रतिकूल परिस्थितीतही घडून येतातच, तशी काहीशी गोष्ट आहे मोझेसची. आपल्याकडे श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे कपटी कंस मामाच्या हातून निसटून जायला ईश्वराने मदत केली तशाच प्रकारे या मोझेसची कहाणी बायबलमध्ये वर्णन केलेली आहे.
जोसेफबरोबरच्या लोकांमध्ये असेलल्या एका कुटुंबाची ही कहाणी. जेकब आणि त्याची तिसरी बायको लेवी हिच्या वंशात पुढे जन्माला आलेल्या केहाथ या मुलाने केहाटाईट कबिल्याची सुरुवात केली.त्याच्या पोटी जन्माला आलेला अम्राम आणि त्याची बायको जोशेबेद यांच्या घरात मोझेस जन्माला आला. जोसेफबरोबर आलेल्या लोकांमध्ये हे केहाटाईट लोकसुद्धा आले होते. या मुलाचं इजिप्तच्या सैनिकांपासून कसं रक्षण करायचं, या विवंचनेत असलेल्या जोशेबेदने या मुलाला एका बंद टोपलीत ठेवलं आणि नाईल नदीच्या पात्राशेजारच्या झुडपांमध्ये आडोशाला लपवलं. कर्मधर्मसंयोगाने खुद्द फॅरोहच्या मुलीलाच हे मूल सापडलं आणि अशा प्रकारे मोझेस फॅरोहच्या राजमहालातच प्रवेश करता झाला.
राजवाड्यात फॅरोहच्या राजपुत्रांबरोबर आता हा मोझेससुद्धा मोठा व्हायला लागला. फॅरोहच्या मुलीने त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं. आपल्या श्रीकृष्णाच्या कथेशी साधर्म्य दर्शवणारी ही कथा. हा मोझेस राजमहालात वाढत असताना इथे त्याचे भाईबंद मात्र इजिप्तच्या सैनिकांच्या अत्याचारांमध्ये भरडले जातच होते. हे मोझेस नावसुद्धा त्याच्या नशिबाचंच प्रतीक, कारण या नावाचा अर्थ होतो ' नदीपात्रातून सापडलेला '. आपल्या 'यशोदेच्या' देखरेखीत अत्यंत लाडाकोडात मोठा होऊनही मोझेस हाताबाहेर गेला नाही. त्याला आपल्या वंशाबद्दल कशी कोणास ठाऊक, पण कणव होतीच. वयात आल्यावर एकदा आपल्या डोळ्यांसमोर एक इजिप्शिअन मालक आपल्या कनानवंशीय गुलामाला बेदम मारहाण करताना दिसल्यावर त्याच्या क्रोधाचा कडेलोट झाला आणि त्याने त्या मालकाचा जीव घेतला.
येऊनजाऊन तो नदीपात्रात सापडलेला. फॅरोहच्या क्रोधाला घाबरून त्याने थेट मीडिअन वाळवंट गाठलं. तेथे जेथ्रो नावाच्या स्थानिक धर्मगुरूंकडे त्याने मेंढपाळाची चाकरी पत्करली. एके दिवशी होरेब टेकड्यांच्या भागात आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन गेल्यावर त्याला तेथे एक विलक्षण दृश्य दिसले. एक झुडूप जळतंय, पण राख होतं नाहीये असं ते दृश्य म्हणजे ईश्वराने त्याला आपल्याकडे येण्याचा दिलेला संकेत होता. त्याच्या अंतरात्म्याला ईश्वरी संदेशाची जाणीव झाली, ज्यात त्याला दोन महत्वाचे आदेश मिळाले.
एक म्हणजे आत्तापर्यंत कनान आणि त्यांच्या वंशातल्या लोकांचे कबिले आपापल्या कबिल्याचे वेगळे देव पूजत होते, त्या सगळ्या देवतांचं एकत्रीकरण होऊन आता त्यांनी एकच देव पूजावा, हा कनान आणि त्यांच्या वंशातल्या लोकांना एकेश्वरवादाकडे पुन्हा एकदा वळवणारा 'एकत्रीकरणाच्या आदेश' आणि दोन म्हणजे स्वतःच्या नेतृत्वाखाली या लोकांचं पुन्हा एकदा पवित्र इस्राएलच्या भूमीत स्थलांतरण करण्याचा ' कनानच्या भूमीत परतण्याचा ' आदेश. या आदेशांनी त्याला यहोवाने ' हाऊस ऑफ इस्राएल ' चा पुढचा सर्वेसर्वा निवडल्याचंसुद्धा स्पष्ट झालं. मोझेस मुळात स्वभावाने लाजराबुजरा आणि मितभाषी असल्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी येणं म्हणजे त्याला 'धर्मसंकट' वाटलं. तशात आपण उपरे असल्याचा एक न्यूनगंड त्याला होताच. शेवटी त्याच्याच मोठ्या सक्ख्या भावावर - आरोनवर कनानच्या लोकांशी संवाद साधायची जबाबदारी यहोवाने नेमून दिली. हा आरोन इजिप्शिअन सैनिकांच्या तावडीतून कसा वाचला, हे बायबलमध्ये स्पष्ट केलेलं नसलं तरी हा कसाबसा जिवंत राहिला हे नक्की. शिवाय त्यांना एक बहीण सुद्धा होती, जिचं नाव मरियम होतं.
इजिप्तमध्ये जाऊन आपल्या कनानवासियांना अखेर मोझेसने एकत्र केलं. आपल्या अत्याचारी इजिप्शिअन मालकांच्या कचाट्यातून मुक्तता हवी असेल, तर एकत्र येऊन कनानच्या दिशेला प्रयाण करण्याचा यहोवा देवतेचा आदेश आरोनमार्फत त्याने प्रत्येकाला सांगितला. फॅरोहला हे समजताच त्याने आपल्या राज्याच्या अमीर-उमरावांकडे खितपत पडलेल्या या गुलामांना मुक्त करण्यास साफ नकार दिला. अखेर यहोवाने दिलेल्या वरदानाचा वापर करून मोझेसने एकूण नऊ प्लेग रोगाच्या साथी इजिप्त देशात घडवून आणल्या . हा रोग तेव्हा अतिशय दुर्धर म्हणून ओळखला जाई. या रोगाच्या साथीने इजिप्शिअन जरी पटापट मारत असले, तरी यहोवाचे कनानवासी मात्र या रोगात ठणठणीत राहिले.
शेवटी दहाव्या साथीच्या वेळी यहोवा प्रत्यक्ष या कार्यात उतरला. आपल्या मृत्यूच्या देवदूताला ( म्हणजेच हिब्रू लोकांचा यमराज ) त्याने इजिप्शिअन लोकांच्या मुलांचा जीव घ्यायच्या कामावर रुजू केलं.या यमराजाने हे काम इतकं मनावर घेतलं, की दंतकथेनुसार इजिप्शिअन लोक पार घायकुतीला आले. संकेतानुसार कनानवंशीय लोकांनी आपल्या घराच्या दरवाजाशी मेंढ्यांचं रक्त ठेवलं, की ते घर वगळून पुढे जायचं असा संदेश आपोआप या यमराजाला मिळत असे.
इजिप्शिअन लोकांचा पार निर्वंश होतो कि काय, अशी बिकट अवस्था झाल्यावर फॅरोहची तंतरली. त्याने अखेर कनानवंशीयच नव्हे, तर इतर वंशाच्या गुलामांनासुद्धा इजिप्तमधून मुक्त केलं. मोझेस आता त्या सगळ्या लोकांचा तारणहार आणि म्होरक्या झाला. हाऊस ऑफ इस्राएलच्या प्रमुखपदी अशा प्रकारे मोझेसची वर्णी लागली. त्याने जाताना जोसेफच्या अस्थी त्याच्याच अंतिम इच्छेनुसार कनानच्या भूमीत दफन करण्याच्या उद्देशाने आपल्याबरोबर घेतल्या. ज्यू लोकांचा आपल्या मातृभूमीबद्दलचा हा असा टोकाचा अभिमान आजही दिसून येतो.
अशा रीतीने जेकबच्या नावडत्या राणीच्या पुढच्या वंशजांनी कनानवंशीय लोकांना पुनरुज्जीवित करण्याचं मोठं कार्य आपल्या अंगावर घेतलं. आवडत्या राणीच्या वंशजाकडून कनानवंशीय लोक आपल्या मातृभूमीच्या बाहेर पडले आणि नावडत्या राणीच्या वंशजांमुळे ते आपल्या मातृभूमीकडे परत निघाले, हा एक काव्यात्मक न्याय. या स्थलांतराला बायबलमध्ये ' एक्सहोडस' असा शब्द आहे. मोझेसच्या आज्ञेला अनुसरून आणि आरोनच्या निर्देशानुसार हा 'गुलामांचा' तांडा आता आपल्या मूळ प्रदेशात परतायची तयारी करायला लागला. अरबस्तानाच्या इतिहासातल्या काही महत्वाच्या घटनांमधली ही एक ठळक घटना. कपाळावरचा गुलामगिरीचा शिक्का पुसून मानाने आपल्या मूळ भूमीमध्ये येऊन शून्यातून स्वर्ग उभा करण्याचा योग या कनानवंशीय लोकांच्या आयुष्यात आता पुन्हा एकदा येणार होता आणि आपल्या उपजत कामसू वृत्तीमुळे ते या नव्या आव्हानासाठी तयार झाले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल झोपायच्या आधी ४ आणि ५ भाग आलेले पाहिले. वाचून मगच झोपले. Exodus: Gods And Kings ह्या चित्रपटाची आठवण झाली. कोणाची का असेनात पण ती निष्पाप मुलं होती. त्यांचा जीव घेणारा देव आणि फक्त ज्यू कुटुंबियांना वाचवायला हे असं होणार हे माहित असूनही गप्प राहिलेला मोझेस दोघेही पटले नाहीत. 'the sins of the fathers are visited upon the children' असं म्हणतात ते खरं असावं.