
कैलास मानसरोवर यात्रा (मे २०१२)
कैलास मानस यात्रेबद्दल बद्दल धार्मिक ओढ किंवा श्रद्धा म्हणावी असे काही नव्हते. तिथे खूप छान निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार होते असेही काही नव्हते. तरी पण ही यात्रा करायची जबरदस्त इच्छा उरी होती. दोन मित्र या यात्रेला जाणार असल्याचे कळले आणि डोक्यात विचारचक्रे सुरु झाली. घरून बाकी कोणीच येणार नसल्याने फक्त माझ्या खर्चाचा अंदाज घेऊन जायचे पक्के केले. नेपाळच्या श्रेष्ठ ट्रेक्सकडे आम्ही तिघांनी पैसे, कागदपत्रे दिली आणि 30 एप्रिलची वाट पहात बसलो. मधल्या दिवसात रोज किमान 5 किमी चालण्याचा सराव ठेवला. अधूनमधून गड किल्ल्यांवर भटकंती चालूच होती. थंडीच्या कपड्यांची तयारी केली. श्रेष्ठ ट्रेक्स च्या ऑफिसमध्ये जाऊन तिकिटे आणि इतर कागद घेऊन आलो. बरीच वाट पाहायला लावणारा निघायचा दिवस उजाडला.
30 एप्रिलला आमचे त्रिकुट मुंबईहून निघाले. दिल्लीला विमान बदलून काठमांडूला पोहोचले. एक दिवस स्थानिक स्थळे पाहून 2मे ला सकाळी नाश्ता झाल्यावर हॉटेल सोडले अणि प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात झाली. एका छोट्या बस मध्ये आमचा 14 जणांचा ग्रुप पहिल्यांदाच एकत्र भेटला. अमेरिकास्थित दानवले जोडपे सोडले तर बाकी सगळे एकेकटे. कलकत्त्याच्या अरुणवची बायको ऐन वेळी आजारी पडल्याने तो एकटाच आला होता. "कोणी कोणासाठी थांबायचे नाही" असे त्यांचे आधीच ठरलेले होते !! एक गुजराती संन्यासी मुलगी, तिची आई आणि संन्यासी गुरू असे गुजरातहुन आलेले होते. चार लंडनस्थित श्रीलंकन, एक गुजराती अमेरिकन आणि आम्ही तिघे असा आमचा आंतर्देशीक, आंतरभाषिक ग्रुप जमला.
दुपारी नेपाळ तिबेट सीमेवर पोहोचलो. कोशी नदीच्या रूपात असलेली ही नैसर्गिक सीमा इथल्या कोदारी गावाच्या नावावरून 'कोदारी बॉर्डर' नावाने प्रचलित आहे. नदी पलीकडे तिबेट, अलीकडे नेपाळ आणि मधे त्या दोन देशांना - दोन संस्कृत्यांना जोडणारा चित्रवत भासणारा सुंदर पूल. परवानगी प्रक्रिया होईपर्यंत आम्ही नदीवरच्या पुलावर फिरत होतो. खाली नदीचा दूरवर दिसणारा फेसळता प्रवाह आणि दोन बाजूंना आकाशाला भिडणाऱ्या पर्वत भिंतींचा देखावा उत्साह वाढवत होत्या. परवानगी मिळताच थोड्या अंतरापर्यंत छोट्या गाड्यांंमधून गेलो जिथे चार लँड क्रूझर्स आमची वाट पहात होत्या. बाड बिस्तरा घेऊन त्या गाड्यांमध्ये बसलो आणि थोड्याच वेळात झंगमू या गावात थांबलो. सीमेजवळचे घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावर वसलेले हे छोटे गाव छान होते. पण आम्हाला 'न्यालम' च्या आधीच इथे का थांबवलय हे कळत नव्हते. लवकरच पुढचा रस्ता दरड कोसळल्याने अनिश्चित काळासाठी बंद असल्याची धक्कादायक बातमी आली आणि आजचा मुक्काम याच गावांत नक्की झाला. सकाळी गावात चौकशी केली पण चिनी पोलीस काही खबर लागू देत नव्हते. करता करता तीन रात्री याच गावात काळजीत गेल्या. त्याच त्याच रस्त्यांवर फिरून खूप कंटाळाही आला होता. शेवटी चवथ्या रात्री आमच्या गाईडने सगळ्यांना बोलावून इशारा वजा माहिती दिली, "उद्या सकाळी रस्ता चालू झाला नाही तर आपल्याला कैलास परिक्रमा करता येणार नाही. पण जर उद्या रस्ता चालू झालाच तर तो आपल्याकरता शेवटचा चान्स असेल ...अर्थात तुमची सर्वांची तयारी असेल तरच. कारण उद्या आपल्याला जर निघता आले तर गाड्या तडक 4500 मी उंचीवरच्या सागा गावात मुक्कामी पोहोचतील. मध्ये बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळणार नाही.. थोडा त्रास होईल. कोणाकोणाची तयारी आहे?" शेवटी गाईडने प्रश्न टाकला.
हा त्रास काय स्वरूपाचा असतो याचा अजिबातच अनुभव नसल्याने म्हणा किंवा होईल तो त्रास सहन करण्याची तयारी म्हणा पण सगळ्यांचेच हात लगेच वर झाले..संभाव्य धोक्यांची कल्पना सगळ्यांना देण्यात आली. "उद्या सकाळी रस्ता चालू होवो" अशी प्रार्थना करीत सगळे झोपले. प्रार्थना फळास आली. रस्ता चालू झाला. गाड्या "सुटल्या". वाटेत फक्त जेवणाचा थांबा झाला. ज्या गावात आम्ही acclimatization साठी मुक्काम करणार होतो त्या न्यालम गावातला सरावाचा डोंगर गाईडने वाटेत फक्त दाखवला आणि गाड्या पुढे पिटाळल्या. रात्री 7 च्या सुमारास सागा या गावात पोहोचलो.
गाडीतून उतरलो आणि दोनच मिनिटात श्वास लवकर लवकर घेतला जातोय याची जाणीव झाली. काही तासात आम्ही २२०० मीटर अधिक उंचीवर पोहोचलो होतो. आपोआपच चालण्याचा, बाकी हालचालींचा वेग मंदावला होता. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर जाताना जिन्यात चार वेळा थांबून दम घेत घेत खोलीत पोहोचलो. कमालीच्या थंडीत घाम फुटत होता. इतक्यात जेवणाचे बोलावणे आले. इच्छा असेल तसे खा आणि लगेच डायमोक्स ची गोळी घ्या म्हणजे बरे वाटेल असे गाईड म्हणाला. जेमतेम दोन पुऱ्या भाजीबरोबर खाल्ल्या आणि गोळी घेऊन झोपलो पण सारखा खोल श्वास घ्यावा लागत असल्याने अजिबात झोप लागू शकली नाही.
दुसऱ्या दिवशीची सकाळ "आज मानसरोवर दर्शन होणार" या आनंदात झाली. श्वासाचा त्रासही खूप कमी जाणवत होता. पण कमी ऑक्सिजनने एकूण हालचालींचा वेग अर्ध्यावर आणला होता. काही जण ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले. पण गाईडने 'ऑक्सिजन अजिबात लावायचा नाही' अशी तंबी दिली, कारण एकदा सवय लागली की त्याच्याशिवाय चालत नाही आणि कायम सिलेंडर लावायला लागतो. त्यापेक्षा आपोआप शरीर सरावू देणे हाच उत्तम मार्ग. नाश्ता झाल्यावर गाड्या निघाल्या. तिबेट मधले रस्ते उत्तम असल्याने दिवसाला 7-8 तासात 700km अंतर सहज पार होत होते.
उत्तम रस्ते
दुपारी मानसरोवरच्या किनारी पोहोचलो. सरोवरपासून 200-300 मीटर अंतरावर यात्रेकरूंना राहण्यासाठी पत्र्याच्या खोल्या केलेल्या होत्या. एका खोलीत 16 पलंग होते. सॅक टाकून बाहेर पडलो. सूर्य पश्चिमेला झुकल्याने मानसरोवर असंख्य आरशांच्या कवडश्यांच्या रुपात दिसत होते. बाजूला सगळे बर्फाच्छादित डोंगर होते पण पाण्याच्या चमचमाटात ते फिके पडले होते. खूप विस्तीर्ण पसरलेल्या मानसरोवरचे हे चमचमणारे रूप खूप लोभस होते. पाणी स्वच्छ होते पण आधी ऐकल्या प्रमाणे पाण्याखालचा तळ किंवा त्यात रंगीत मासे असे मात्र आम्हाला काही दिसले नाही. एक जोडीदार पाण्यात डुबकी मारायला गेला. कडाक्याची थंडी होतीच तरी धीर करून मीही त्या गार पाण्यात गेलो. डुबकी मारायचीच असे मनाशी पक्के ठरवले होते पण शरीराच्या कुडकूडण्याने मनाच्या निग्रहावर मात केली. माझ्या मित्राप्रमाणे त्या थंड पाण्यात मी काही डुबकी मारू शकलो नाही. कंबरभर पाण्यात कसेबसे उभे रहात भराभर हातानेच अंगावर पाणी घेतले आणि बाहेर येऊन पटकन कपडे चढवले. इतक्यात कोणीतरी ओरडले "कैलास देखो" आणि आमच्या माना उजवीकडे वळल्या. ढग बाजूला होत कैलास पर्वत मोकळा होत होता.
पहिलेच प्रत्यक्ष कैलास दर्शन
तसा दूरवर दिसत असला तरी पहिलेच प्रत्यक्ष कैलास दर्शन अंगावर काटा आणायला पुरेसं होतं. अनिश्चिततेच्या सावटातून बाहेर निघून आज हे परमोच्च शिवस्थान आपल्या दृष्टीपथात आले आहे ही जाणीव होत नकळत हात जोडले गेले आणि मान झुकली.
कैलास मानस दर्शन घेत थोडा वेळ तिथेच रेंगाळलो आणि संध्याकाळी थंडीचा जोर सहन होईनासा झाल्यावर आमच्या पेटीघरात परतलो. उद्या ब्राह्म मुहूर्तावर देव देवता मानसरोवरात अंघोळीसाठी येतात ते पाहण्यासाठी उठायचे होते त्यामुळे लवकर जेवून झोपलो. आज तसा श्वासाचा त्रास होत नव्हता आणि कालचे पूर्ण जागरण असल्याने लगेच झोप लागली. पण ती इतकी गाढ लागली की दीड वाजता देवतांचा चमत्कार पाहायला जाणाऱ्यांनी दार ठो ठो वाजवूनही मला अजिबात जाग आली नाही आणि माझा हा चमत्कार पाहायचा राहिला. जे त्यावेळी गेले त्यांना सरोवरात दूरवर प्रकाशरूपी देवतांचा अद्भुत विहार पाहायला मिळाला. इकडे मला थोड्या वेळाने 3 वाजता जाग आली. एकटाच उठून सरोवरापाशी गेलो. पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्र प्रकाशात मानसरोवर वेगळेच चमकत होते. हट्टाने Full moon ची बॅच घेतल्याचे सार्थक झाले. आजचा शीतल चमचमाट कालच्या तेजस्वी लखलखाटाशी सौन्दर्यस्पर्धा करत होती. आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर सरोवराच्या पलीकडचे बर्फीले डोंगर चंद्रप्रकाशात खास उठून दिसत होते.. पहाटेच्या त्या शांत वातावरणात कमालीची प्रसन्नता होती. जवळपास कोणीच नसल्याने त्या शांततेत माझाच श्वास मला स्पष्ट ऐकू येत होता. अर्धा पाऊण तास हे सौंदर्य डोळ्यात मनसोक्त साठवत तिथेच फिरलो. पण देवतांचा चमत्कार पाहायचा राहिला ही चुटपुट लागून राहिली. कदाचित त्यासाठी परत येणे होण्यासाठी ही योजना असावी अशी मनाची समजूत करून घेत पेटीत परतलो.
मानसरोवर दर्शनाच्या आठवणी बरोबर घेऊन कैलासाच्या पायथ्याशी जायला मोठ्या उत्साहात ग्रुप निघाला. मानसरोवराची परिक्रमा गाडीतूनच करून कैलासाकडे जायचे होते. थोड्याच अंतरावर एका ठिकाणी गाड्या थांबल्या. उजव्या बाजूला मानस तर डाव्या बाजूला राक्षस ताल दिसत होता. याचे पाणी खारे आहे असे कळले आणि त्याला कोणीही स्पर्श देखील करू नये असं सांगितलं गेलं. रावणाने तपश्चर्येच्या काळात केलेली ही लघुशंका आहे असे गाईड ने हसत हसत सांगितल्यावर मात्र कोणालाही त्याच्या जवळ जायची इच्छा झाली नाही. पुढे एका ठिकाणी थांबून मानसरोवरचे तीर्थ बाटल्यात भरून घेतले. कालच्या अंघोळीच्या ठिकाणी सगळे पाण्यात उतरत असल्याने "ये तो आप लोगोंका तीर्थ है।" असे म्हणत गाईडने आम्हाला तिथले तीर्थ घेऊ दिले नव्हते. मानस परिक्रमा गाडीत बसून पूर्ण केली आणि कैलासाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. आमच्या गाड्या उत्तम, रस्ते खूपच आखीव रेखीव आणि रहदारी अगदीच तुरळक असल्यामुळे या प्रवासाचा शीण अजिबात येत नव्हता. जेवणासाठी गाड्या थांबल्या पण जवळपास एकही झाड नसल्याने वनभोजनाऐवजी ऊन भोजनाचा आस्वाद घेतला.
उजाड प्रदेशामुळे उन्हातच जेवणाचा थांबा.
संध्याकाळी दारचेन या गावात पोहोचलो. बैठ्या चाळीसारखी आमच्या मुक्कामाच्या खोल्यांची रचना होती. मागच्या बाजूच्या डोंगरांच्या मागे कैलासचा थोडासा भाग दिसत होता. केव्हा एकदा त्याचे पूर्ण दर्शन घेतोय असे झाले होते. गावात थोडे फिरून आलो. इथल्या लोकांना आमची भाषा कळत नव्हती. इंडिया म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हते. कशाबशा खाणाखुणा करून घरी फोन करून घेतला. आता पुढचे दोन तीन दिवस संपर्क होऊ शकणार नव्हता. आज त्रास काही होत नव्हता पण उद्या जवळून कैलास दर्शन मिळणार...अनेक ऐकलेल्या गोष्टींप्रमाणे आपल्याला कोणी दिसेल का? या कल्पनेनेच झोप लागत नव्हती. कशीबशी रात्र सरली आणि सकाळी गाड्या निघाल्या.
आधी यमद्वार या ठिकाणी जायचे होते. यमद्वारातून पलीकडे गेल्यावर कैलास परिसर म्हणजे "त्याचा एरिया" चालू होतो असा समज आहे. थोड्याच वेळात आम्ही यमद्वारापाशी पोहोचलो. परिसर पताका लावून सजवलेला होता.
यमद्वार
यमद्वार एखाद्या छोट्याश्या देवळा प्रमाणे असल्याने त्यात वाकूनच शिरून बाहेर पडावे लागले. पलीकडे बाहेर पडताच समोरच अद्भुत कैलासपर्वताचे विराट, भारदस्त रूप पाहायला मिळाले. वातावरणात वेगळीच शांतता जाणवत होती. कैलासाच्या वरच्या भागात ढगांची धावपळ तिथल्या रुद्र रूपाची थोडीशी कल्पना देत होती.
कैलासपर्वताचे विराट रूप
देवधर्मा ऐवजी निसर्गशक्तीला मानणारा मी आवाक होऊन पहात होतो. मानसिक परिणाम होता की काय माहीत नाही पण तिथल्या वातावरणाने मला शिव पार्वती याच - माझ्या समोरच्या शिखरावर रहात असावेत असे मानण्यास भाग पाडले आणि डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागले..नक्की कशाने ते कळत नव्हते पण आनंद, समाधान, श्रद्धा, उत्सुकता, थोडीशी काळजी, काहीशी भीती अशा अनेक समजणाऱ्या आणि न समजणाऱ्या भावनांचा हा एकत्रित परिणाम वाटत होता. गाईडच्या हाकेने भानावर आलो यमद्वाराला प्रदक्षिणा घातल्या आणि बाकीचे येईपर्यंत कैलास न्याहाळत राहिलो. इथे गाडीचा प्रवास संपला. आता इथून पुढे देरापुक -डोलमा ला पास- झुथुल्पूक आणि परत दारचेन हा सगळा चालत प्रवास. इथे काही पोर्टर घेतात तर काही याक. आमच्यातले फक्त सहाच जण पुढे निघाले. बाकीच्यांना काही ना काही त्रास वाटल्याने त्यांनी येथूनच कैलास दर्शन पूर्ण करुन परत फिरण्याचा निर्णय घेतला. माझ्या दोन मित्रांनीही इथूनच माघार घेतली. आमच्या गाईडने बरेच समाजावूनही कोणीही तयार झाले नाहीत. संध्याकाळी गप्पा मारताना गाईड मला म्हणाला की ते सगळे देरापुक पर्यंत नक्कीच येऊ शकले असते. त्यांना त्यांच्याच शरीराची क्षमता अजून समजलेली नाहीये. पण ते मनाने हारले आणि थांबले!!
लवकर दम लागणे हा प्रकार सोडला तर देरा पुक पर्यंत आरामात पोहोचलो. मध्ये डब्यात घेतलेले जेवण जेवलो. ही वाट अजिबात कठीण नाही. कायम उजव्या बाजूला कैलासपर्वताचा मोठा आधार आणि डाव्या बाजूला बऱ्याच अंतरापर्यंत गोठलेल्या नदीची साथ. मजेची बाब म्हणजे इथे थंडीही कडक आणि उनही तितकेच तापदायक. त्यामुळे चालयला लागलो की घाम यायचा म्हणून स्वेटर काढायला लागायचा. पण थांबलो की लगेच थंडी वाजायला लागायची की मग स्वेटर घालायचा असा खेळ चालू होता. वाट सरळ असल्याने 'keep moving with steady pace that suits you..' हा गाईडचा सल्ला ऐकत प्रत्येक जण आपापल्या गतीने चालत होता. संथपणे चालतानाही दम लागत असल्याने गप्पा मारायचा प्रश्नच नव्हता.
सुरुवातीला कैलास पर्वताच्या पश्चिम बाजूने चालत जात पुढे थोडेसे वळण घेऊन कैलासाच्या उत्तर बाजूला असलेल्या देरापुक गावात पोहोचलो. आज पश्चिम बाजू आणि उत्तर बाजू पाहायला मिळाली. कैलासपरिक्रमेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कैलास दर्शन होत नाही.
दिरापुक हे 20-25 घरांचे छोटेसे तिबेटी गाव. गावात वीज नाही त्यामुळे अंधार पडल्यावर सोलर दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात सर्व व्यवहार चालू. उद्याची चौकशी करण्यासाठी काही घरात जाऊन आलो. राकट आणि उग्र चेहऱ्याची माणसे. त्यांचा आवाजही खूप खालच्या पट्टीत त्यामुळे गंभीर वाटणारा. त्यांच्या कडे गाणी लागलेली पण एकदम खर्जातल्या आवाजातली.. या सगळ्यामुळे एकूण वातावरण गूढ किंवा काहीसे भीतीदायक वाटत होते.
इथे बऱ्याचश्या जणांचा घोडे, याक यांचाच व्यवसाय. आम्ही पोहोचलो आणि डोलमा पास भागात बर्फ घट्ट झाल्याने घसरून दोघेजण कैलासवासी (बाजूलाच स्थलांतरीत) झाल्याचे कळले. पुढची वाट चिनी पोलिसांनी बंद केली असल्याचे सांगण्यात आले आणि आम्हाला आमचा पुढचा अडथळा दिसला.. आमचा गाईड आम्हाला न्यायला तयार होता पण सर्वस्वी आमच्या जबाबदारीवर. शिवाय दुर्दैवाने कुठे अडकलो तर कोणाचीही मदत मिळणार नाही असेही सांगितले. बर्फ कडक झाल्याने घोडे, याक द्यायला कोणी तयार होईना. शेवटी गाईडने तसेही पुढचे दोनही दिवस कैलास दिसणार नसल्याने आणि त्याऐवजी परत फिरलात तर अजून एक दिवस कैलासाच्या जवळून जाता येणार असल्याचे सांगत आम्हाला परत फिरण्याचाच सल्ला दिला. चिनी प्रदेशात संभाव्य धोका पत्करायला कोणी धजावले नाही. शेवटी सर्वांनी एकमताने दैवापुढे शरणागती पत्करली आणि इथूनच परतीचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या दिवशी वेळ असल्याने कैलासाच्या उत्तर बाजूच्या जेवढे जवळ जाता येईल तेवढे गेलो. काही जण चरणस्पर्श म्हणतात ते घडले. काहींनी पूजा केली. कैलासावरून बर्फ वितळून येणारे प्रत्यक्ष कैलास-तीर्थ बाटलीत भरून घेतले आणि परत फिरलो. दोन दिवस कैलासाच्या सान्निध्यात राहून रात्री दारचेन मध्ये परतलो. काहीजण जे यमद्वार पासून परतलेले होते त्यांनाही आम्ही सगळे सुखरूप आल्याने हायसे वाटले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागलो.
तिबेट मुळातच खूप उंचीवर असल्याने हा भाग तसा उजाडच. खूप लांबवर पसरलेला रुक्ष भूप्रदेश आणि त्यामागे दूर अंतरावर उघडे बोडके किंवा बर्फाच्छादित डोंगर हेच दृश्य इथल्या बहुतांश प्रवासात दिसते. काश्मीर, हिमाचल सारखी हिरवाईवर उठून दिसणारी बर्फाची चंदेरी नक्षी आणि त्यावर सूर्यकिरणांनी चढवलेले सोन्याचा मुकुट अशी निसर्गसौंदर्याची उधळण इथे कोठेच दिसत नाही. म्हणून ज्यांना या यात्रेबद्दल फारशी ओढ नाही त्यांच्यासाठी ही यात्रा म्हणजे केवळ एक सरोवर आणि एक पर्वत पाहण्यासाठी केलेला खटाटोप असेही म्हणता येईल. पण कैलास मानस भेटीची आस बाळगणाऱ्यांसाठी मात्र एवढे नक्की सांगता येईल की या यात्रेत मिळणारा अनुभव हा निव्वळ अद्भूत आहे. कोणत्याही प्रकारच्या वर्णनात बांधता येण्याच्या फार फार पलीकडचा आहे आणि या विलक्षण अनुभवाची प्रचीती ही प्रत्यक्षच घेण्यासारखी आहे.
पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात मनसोक्त घेतलेले मानसरोवर दर्शन आणि कैलासपर्वताचा दोन दिवसांचा अखंड सहवास नक्कीच मन तृप्त करणारा ठरला. ब्राह्ममुहूर्तावर देवतांचे दर्शन हुकल्याची आणि कैलास परिक्रमा अपूर्ण राहिल्याची हुरहूर मला इथे पुनः एकदा घेऊन जावो हीच शिवचरणी प्रार्थना..
नेपाळहून यात्रा करणे खूप सोपे
नेपाळहून यात्रा करणे खूप सोपे आहे ऐकले होते, पण तुमचे लिखाण वाचून ते तसेच आहे असे लक्षात आले. ज्यांना फारसे शारीरिक कष्ट नको असतील त्यांच्या करता योग्य मार्ग आहे. किती दिवस लागले पूर्ण प्रवासाकरता? साधारण खर्च किती आला?
छान लिहीलेत. यात्रा पूर्ण
छान लिहीलेत. यात्रा पूर्ण व्हायला हवी होती. शेवटी देवाची मर्जी.
इथे केदार जोशी ने लिहीलेली त्यांची ( केदार व पराग ) कैलास- मानस यात्रा आहे.
https://www.maayboli.com/node/50778
खूप छान वर्णन केले आहे.. .
खूप छान वर्णन केले आहे.. . लेख वाचताना तुमचा प्रवास अगदी डोळ्यांसमोर उभा राहत होता..!! लेखातले फोटोही अप्रतिम..!!
खूप मस्त प्रांजलपणे वर्णन
खूप मस्त प्रांजलपणे वर्णन लिहीले आहे.
कैलासवासी वाली कोटी आवडली.
या यात्रेत मिळणारा अनुभव हा
या यात्रेत मिळणारा अनुभव हा निव्वळ अद्भूत आहे. कोणत्याही प्रकारच्या वर्णनात बांधता येण्याच्या फार फार पलीकडचा आहे आणि या विलक्षण अनुभवाची प्रचीती ही प्रत्यक्षच घेण्यासारखी आहे. >>>>
सत्यवचन
देवधर्मा ऐवजी निसर्गशक्तीला
देवधर्मा ऐवजी निसर्गशक्तीला मानणाऱ्या, श्रद्धाळू नसणाऱ्या तुमची अशी अवस्था झाली मग भोळ्या भक्तांचे प्राणच जातील की हो तिकडे. उगाच नाही कैलासवासी होणे हा वाक्प्रचार रूढ झाला आपल्याकडे.
बाकी प्रवासवर्णन आवडले.
व्यत्यय, प्रतिसाद आवडला!
व्यत्यय, प्रतिसाद आवडला!
छान वर्णन आहे प्रवासाचे! तो कैलासाचा फोटो अप्रतिम आहे!
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
वर्णन वाचताना त्या भागात जाऊन आल्यासारखं वाटलं. हर्पेनलाही वाटलं असेल, अशी खात्री आहे.
वर्णन वाचताना त्या भागात जाऊन
वर्णन वाचताना त्या भागात जाऊन आल्यासारखं वाटलं >>>>
पराग!!
पराग!!
छान लिहिले आहे. फोटोही
छान लिहिले आहे. फोटोही अप्रतिम. मी पराग, केदार आणि अनया यांच्या लेखांचे पारायण केलेतं. जेव्हा जेव्हा ह्या यात्रेबद्दल वाचण्यात येते , मला कधी जायला मिळणार इथे असं वाटतं. ही यात्रा करण्याची उत्कट इच्छा आहे कधी पूर्ण होईल काय माहिती !! कैलास परिक्रमा करण्याची तुमची मनोकामना पूर्ण होवो या सदिच्छा.
>>Submitted by नरेन. on 17
>>Submitted by नरेन. on 17 February, 2021 - 01:22<< +१
कैलास+मानसरोवर यात्रेत, डेस्टिनेशन इज मोर ग्रॅटिफाइंग अँड इंपाँर्टंट दॅन द जर्नी इटसेल्फ, या मताचा मी असल्याने नरेन. यांच्या सारखंच मलाहि कुतुहुल आहे. कदाचित मी अजुनहि संतपदाला (टाकिचे घाव घेतल्या शिवाय... याअर्थी) पोचलो (आणि पुढे कधीच पोचणार नाहि, याची हमखास खात्री) (अ)नसल्याने हा स्मार्टकट. १०-१५ दिवस गधामजुरी करण्यापेक्षा २-३ दिवसांत हा पटेल स्पॉट नेपाळ/चीन मधुन कवर करता येत असेल तर आयॅम सोल्ड...
डिटेल्स कळवा, प्लीज...
ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
वर्णन वाचताना त्या भागात जाऊन आल्यासारखं वाटलं. हर्पेनलाही वाटलं असेल, अशी खात्री आहे. >>>
ॐ नमः शिवाय अनया.
हो. त्याशिवाय मी परत एकदा माझे फोटो पण बघून घेतले.
१०-१५ दिवस गधामजुरी
१०-१५ दिवस गधामजुरी करण्यापेक्षा २-३ दिवसांत हा पटेल स्पॉट नेपाळ/चीन मधुन कवर करता येत असेल तर आयॅम सोल्ड... >> टोटली हेली कॉप्टर मध्ये एक सीट रिकामी असेल तर आय विल पे अँड जॉइन.
तुम्ही छान लिहीले आहे. व तुम्हाला यात्रेच्या शुभेच्छा. ते रात्रीचे देवता दिसतात ते खरेतर ऑ रोरा टाइप काहीतरी असेल का?
पायाला फोड आले, थकून गेल्यावर गरम मॅगी फार सुखवून गेली असे काही लिहीले नाही. काब्रे.
वड्याचे तेल वांग्यावर निघाले.
वड्याचे तेल वांग्यावर निघाले.
>>ही यात्रा करण्याची उत्कट
>>ही यात्रा करण्याची उत्कट इच्छा आहे कधी पूर्ण होईल काय माहिती
माझंही तेच आहे. अर्थात मलाही धार्मिक कारणाने नाही तर एक अनुभव म्हणून ही यात्रा करावीशी वाटते. अधिक माहिती मिळाल्यास उत्तम कारण हा मार्ग तुलनेने करता येईल असा वाटतोय. फक्त ते आंघोळ/ प्रातर्विधी उरकण्याची सोय कशी असते हा मुद्दा महत्त्वाचा. त्यात गैरसोय सोसून यात्रा करावी एव्हढी माझी सध्यातरी तयारी नाही
ज्यांना फारसे शारीरिक कष्ट
ज्यांना फारसे शारीरिक कष्ट नको असतील त्यांच्या करता योग्य मार्ग आहे. किती दिवस लागले पूर्ण प्रवासाकरता? साधारण खर्च किती आला?>>
नरेन, तसे नाही. फारसे शारीरिक कष्ट नको असतील तर हेलिकॉप्टर चा पर्याय आहे. आम्हाला एकूण 14 दिवस लागले. तेव्हा ₹६५०००/- (काठमांडू-यात्रा-काठमांडू) लागले.
कैलासवासी वाली कोटी आवडली.>>
कैलासवासी वाली कोटी आवडली.>>
धन्यवाद Mi_anu,
त्यात आधी smiley पण टाकला होता.पण त्याच्यामुळे लेख पोस्ट होत नव्हता. वे. मा. ने हुशारीने ते ओळखून smiley काढून टाकायला सांगितला आणि लेख इथे दिसला.
१०-१५ दिवस गधामजुरी
१०-१५ दिवस गधामजुरी करण्यापेक्षा २-३ दिवसांत हा पटेल स्पॉट नेपाळ/चीन मधुन कवर करता येत असेल तर आयॅम सोल्ड...>>
राज,
हा 'स्पॉट' "कवर" करायला 2-3 दिवसांची तरी गधामजुरी कशाला? तू-नळी वरच पहा की...
सुरेख ओघवते वर्णन केले आहे.
सुरेख ओघवते वर्णन केले आहे. फोटोही अप्रतिम, अजून चालले असते.