ओल्मर्ट यांनी आपल्या कार्यालयात झाडून सगळ्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आणि राजकारणी लोकांना बोलावून घेतलं होतं. अमेरिकेने ऐन वेळी कच खाल्ल्यामुळे त्यांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घ्यायचं ठरवलं होतं. बैठकीत त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेल्या प्रत्येक पुराव्याची सविस्तर माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली आणि इस्राएलने स्वसंरक्षणार्थ सीरियाच्या हद्दीत जाऊन हा प्रकल्प बेचिराख करावा अशी योजना मांडली. इराकमध्ये केलेल्या कृतीची ही पुनरावृत्ती ठरणार असली, तरी या वेळी वातावरण थोडं वेगळं होतं. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशांबरोबर एकतर्फी युद्धं करून मध्यपूर्वेतलं वातावरण तापवलं होतं....अशा वेळी इस्राएलने सीरियावर केलेला हल्ला चिथावणीखोर ठरून त्यातून आगीत तेल ओतलं जाण्याची शक्यता होती...पण इस्राएलकडे जगासमोर आणण्यासाठी भक्कम पुरावे होते. सीरियाने इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांबरोबर जगाला न सांगता अण्वस्त्र तयार करण्यासाठी केलेली हातमिळवणी कोणत्याही देशासाठी चिंतेची बाबच ठरली असती......अशा सगळ्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्राएलला काहीही धोका नसल्याची ओल्मर्ट यांची खात्री होती. विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतान्याहू यांनीही बिनशर्त पाठिंबा देऊन ओल्मर्ट यांचा मार्ग सुकर केला.
इराकच्या कामगिरीसाठी उपयोगात आणलेली F-१५ लढाऊ विमानं याही वेळी निवडली गेली. इस्राएलसाठी ही अत्याधुनिक विमानं अतिशय महत्वाची होती...या विमानांचा भरपूर सराव हवाईदलातल्या वैमानिकांना होता, शिवाय या विमानांमधून अनेक प्रकारची अस्त्रं सहज डागता यायची. या वेळी इस्राएलने कामगिरीसाठी निवड केली रामात डेव्हिड एअरबेसची. दिवस ठरला ५ सप्टेंबर २००५ आणि वेळ ठरली रात्रीची.
या कामगिरीमध्ये एकूण दोन तुकड्यांची निवड झाली. शालदाग कमांडोंची एक घटक तुकडी मोहिमेतली जमिनीवरची कामगिरी पार पडणार होती, आणि वर आकाशात F-१५ विमानांची ६९वी स्क्वाड्रन मुख्य लक्ष्याचा भेद करणार होती. शालदाग कमांडो तुकडी कामगिरीच्या दोन-तीन दिवस आधीच सीरियाच्या हद्दीत शिरली आणि मजल दरमजल करत दीर अल झुर अणुप्रकल्पापाशी आली. तिथे एक दिवस त्यांनी मुक्काम ठोकून आजूबाजूची व्यवस्थित टेहळणी करून घेतली. त्यानंतर त्यांनी अत्याधुनिक लेसर प्रणाली या अणुभट्टीच्या आजूबाजूच्या भागात तैनात केली. ही अतिशय आधुनिक प्रणाली आकाशातून येणाऱ्या विमानांसाठी महत्वाची होती - यातून निघणाऱ्या लेसर किरणांच्या आधाराने रात्रीच्या वेळी आकाशातल्या विमानांना अचूक लक्ष्यभेद करणं शक्य होणार होतं.
जेव्हा इस्रायली विमानांनी लक्ष्याच्या दिशेला झेप घेतली, तेव्हा इस्राएलच्याच ' सुतर ' वाणाच्या अत्याधुनिक संगणक प्रणालीच्या साहाय्याने त्यांनी सर्वप्रथम सीरियन रडार ' हॅक ' केले. त्यामुळे या रडारने सीरियाच्या आकाशामध्ये लढाऊ विमानं शिरलेली आहेत ही माहिती टिपलीच नाही...सीरियन सैन्यदल आणि संरक्षणदल इस्राएलच्या विमानांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होतं. एकूण दहा विमानांनी आकाशात झेप घेतली आणि पश्चिमेकडच्या भूमध्य समुद्रावरून त्यांनी तुर्किश - सीरियन सीमाभाग गाठला. त्यातल्या तीन विमानांनी लगेच परतीचा रास्ता धरला...उरलेल्या सात विमानांनी सीरियाच्या अवकाशात प्रवेश केला.त्यांनी सर्वप्रथम सीरियन रडार स्टेशन टिपून सीरियाचे कान - डोळे निकामी करून टाकले. काही मिनिटांच्या अवधीत इस्रायली विमानं सीरियाच्या अणुप्रकल्पाच्या जवळ पोचली. जमिनीवरच्या लेसर प्रणालीच्या साहाय्याने त्यांनी आपलं लक्ष्य अचूक हेरलं आणि विमानांमधले बॉम्ब्स क्षणार्धात अणुप्रकल्पावर जाऊन आदळले. अख्ख्या प्रकल्पाची राखरांगोळी झाल्यावर विमानांनी परतीचा मार्ग धरला आणि काही मिनिटांच्या अवधीत सगळी विमानं सुखरूप एअरबेसवर आली. तिथे जमिनीवरच्या शालदाग तुकडीने आपली उपकरणं गुंडाळून अणुप्रकल्पाच्या भागातून काढता पाय घेतला. काही तासांमध्ये ते सीमाभागात पोचले आणि सुखरूप इस्राएलमध्ये आले.
इस्राएलने अजून एक कामगिरी यशस्वी करून दाखवली होती. आता पाळी होती इस्राएलच्या राजकारण्यांची, कारण पुढचा टप्पा होता हे सगळं अतिशय मुत्सद्दीपणे हाताळायचा. सर्वप्रथम इस्राएलच्या बाजूने पंतप्रधान ओल्मर्ट यांनी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना - रिसेप एर्दोगन यांना दूरध्वनी लावला. हे एर्दोगन बशर अल असाद यांचे दोस्त. त्यांच्यामार्फत ओल्मर्ट यांनी असाद यांच्यापर्यंत एक महत्वाचा संदेश पाठवला - इस्राएल आसपासच्या भागात - विशेषतः शत्रूराष्ट्रांमध्ये - अण्वस्त्र प्रकल्प सुरु करण्याचे कोणतेही प्रयत्न इस्राएल हाणून पाडेल अशा अर्थाचा हा संदेश असाद यांच्या कानात धगधगत्या लाव्हारसाप्रमाणे शिरला आणि त्यांचं तोंड कडू झालं. आपल्या देशाच्या हद्दीत आदल्या रात्री नक्की काय झालं, हे त्यांना आता पूर्णपणे लक्षात आलं.
त्यांची कोंडी अशी झाली होती, की या हल्ल्याबद्दल उघडपणे काही बोलायचं तर प्रकल्पाबद्दल काहीतरी माहिती जगाला द्यावी लागली असती...यात आधीपासूनच त्यांच्यावर खार खाऊन असलेले देश अजून आक्रमक झाले असते. शिवाय इराणबरोबर हातमिळवणी केल्याचं समजल्यावर अरब जगताचाही रोष त्यांना सहन करावा लागला असता.इस्राएलने तर सोयीस्कर मौन पाळलेलं होतं…..अखेर १६ सप्टेंबर या दिवशी इस्रायली सैन्यदलाच्या हेरखात्याचे प्रमुख अमोस यादलीन यांनी इस्राएलच्या संसदेत या हल्ल्याचा अहवाल सादर केला आणि १७ सप्टेंबर या दिवशी ओल्मर्ट यांनी इस्राएल सीरियाबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार असल्याचं पिल्लू सोडलं.
सीरियाने सरतेशेवटी या सगळ्यावर प्रतिक्रिया म्हणून एक निवेदन जारी केलं. ' इस्राएलने आपल्या हवाई हद्दीत लढाऊ विमानं घुसवून आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला, ज्यावर प्रत्युत्तर म्हणून सीरियाने प्रतिहल्ला केल्यावर ही विमानं परत गेली....त्यांनी टाकलेले बॉम्ब वाळवंटात पडून फुटले ज्यामुळे जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही ' अशा प्रकारचं हे निवेदन ऐकून सगळे जण काय समजायचं ते समजले. सीरियाने आपल्या सुप्रसिद्ध आक्रस्ताळ्या स्वभावाला अनुसरून संयुक्त राष्ट्रसंघात इस्राएलविरुद्ध तक्रारही केली.
एप्रिल २००८ मध्ये अखेर अमेरिकेने आपलं मौन सोडलं. त्यांनी सीरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती जगापुढे आणून इस्राएलने नष्ट केलेली जागा या कामासाठी इराण - उत्तर कोरिया यांच्यासह सीरियाने जी अणुभट्टी उभारली होती, तिचीच जागा होती हेही स्पष्ट केलं. अमेरिकेत सेनेटर्ससमोर इस्राएलने शोधून काढलेल्या पुराव्यांचा सादरीकरण झाल्यावर त्यांना धक्का बसला. इस्राएलने सीरियाच्या या गुप्त प्रकल्पाच्या आतली छायाचित्रं आणि आराखडे कसे हस्तगत केले, हा प्रश्न जगभरातले अनेक लोक विचारू लागले. मोसाद आणि इस्रायली सैन्यदलाच्या हेरांनी बजावलेल्या या अतुलनीय कामगिरीने समस्त जगताला तोंडात बोट घालायला भाग पाडलं.
सीरियाने यावर अतिशय बालिश प्रतिक्रिया दिली. मुळात इतक्या महत्वाच्या प्रकल्पाच्या आजूबाजूला संरक्षणार्थ एकही क्षेपणास्त्र अथवा लढाऊ विमानं कसं नव्हतं, या सबबींच्या जोरावर त्यांनी हे दावे फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे उलट त्यांचंच पितळ उघडं पडलं, कारण जगापासून लपून छपून त्यांनी हा प्रकल्प उभारलेला होता या सत्यावर शिक्कामोर्तब झालं. क्षेपणास्त्र अथवा सैन्यदलाच्या तुकड्या जर त्या जागी तैनात केल्या गेल्या असत्या, तर जगाला या प्रकल्पाची कुणकुण लागली असती, त्यामुळे सीरियाने मुद्दाम तसं केलं नव्हतं....
इस्राएलचं काम इथेच संपलेलं नव्हतं. हे सगळं एकीकडे सुरु असताना इथे तेल अवीव येथे अजून एक योजना आखली जात होती. सीरियाच्या मनात कायमची धडकी भरवायची असेल, तर त्यांना अजून एक धक्का देणं महत्वाचं होतं....ऑपरेशन आउट ऑफ द बॉक्सचा हा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षाही अधिक रंजक असणार होता.
मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १९
Submitted by Theurbannomad on 15 February, 2021 - 10:24
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.
मस्तच.
तर त्यांना अजून एक धक्का देणं महत्वाचं होतं....ऑपरेशन आउट ऑफ द बॉक्सचा हा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षाही अधिक रंजक असणार होता.
पुढचं वाचायला नक्कीच आवडेल.