बुश यांनी इस्राएलला सतत आपल्या कार्यालयाच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले. मोसाद आणि पंतप्रधान ओल्मर्ट यांनी सीरियाच्या अनेक लहानमोठ्या अधिकाऱ्यांकडून उपयुक्त माहिती काढून घ्यायचा सपाटा लावला. जमिनीवरचे हेर कमी, म्हणून की काय पण त्यांनी आकाशातले टेहळणी उपग्रहाची हेरगिरीच्या कामावर रुजू केले. रोजच्या रोज असंख्य छायाचित्रं, अणुप्रकल्पाच्या भागातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या हालचालींची माहिती आणि जोडीला महत्वाच्या अधिकाऱ्यांवर पळत ठेवून मिळणारी अधिकची माहिती मोसादच्या कार्यालयात जमा व्हायला लागली. इस्राएलने याच्या आधारे अमेरिकेलाही आपले टेहळणी उपग्रह सीरियाकडे वळवायला लावले. सीरियन प्रकल्प ज्या वेगाने आकार घेत होता, तो वेग बघून ओल्मर्ट अधिकाधिक अस्वस्थ व्हायला लागले.
अखेर त्यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे प्रयाण केलं आणि जॉर्ज बुश यांच्या कार्यालयात बुश यांची भेट घेतली. अमेरिकेने इस्राएलच्या मदतीने सीरियाच्या प्रकल्पावर हवाई हल्ले करावे यासाठी त्यांनी बिश यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केले. बुश यांचे सल्लागार होते रॉबर्ट गेट्स आणि कोंडोलिझा राईस. त्यांनी अशा कोणत्याही हवाई हल्ल्यांना साफ नकार दिला. या अणुभट्टीची अधिक माहिती काढून तिचा वापर नक्की अण्वस्त्रांसाठीच होणार आहे याचा निःसंदिग्ध पुरावा असल्याशिवाय अशी आगळीक अमेरिका करणार नाही हे त्यांचं मत बुश यांना मान्य करावं लागलं. इराकवरच्या हल्ल्याच्या वेळी सद्दामकडे नसलेल्या अस्त्रांचा बागुलबुवा उभे करणारे हेच ते सल्लागार इस्राएलला मात्र शहाणजोग सल्ला देत होते. ओल्मर्ट या सगळ्यामुळे चिडले असले, तरी त्यांना अगदीच उभा दावा मांडणं शक्य नव्हतं.
अखेर इस्राएलने आपल्या ओफेक - ७ नावाच्या अतिशय उच्च तंत्राने युक्त असलेल्या टेहळणी उपग्रहाला सीरियाच्या अणुप्रकल्पाचा दिशेने वळवलं. या उपग्रहाने अतिशय स्पष्ट आणि उच्च प्रतीची छायाचित्रं घेतली. मोसादच्या कार्यालयात या छायाचित्रांवर मोसादच्या अनुभवी तज्ज्ञांची नजर फिरली. अणुभट्टीच्या आराखडा त्यांनी नजरेखालून घालताच त्यांना जाणवलं, की हा आराखडा उत्तर कोरियाच्याच यॉंगब्योन अणुभट्टीसारखाच आहे...दोन्ही अणुभट्ट्यांची संरचना अगदी तंतोतंत जुळणारी आहे. हा पुरावा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ होता. अमेरिकेसाठी आता अजून पुरावे मागत बसणं अशक्य होतं...तरीही त्यांनी पुन्हा पुन्हा ' निस्संदिग्ध ' पुरावा मागण्याचा आपला हेका सुरूच ठेवला.
आता मात्र मोसाद इरेला पेटलं. त्यांनी आपल्या दोन खास प्रशिक्षित माणसांना बोलावून घेतलं. इस्राएलच्या सैन्यदलात काम करणारे हे दोघे महत्वाच्या जबाबदाऱ्या शत्रूच्या मुलखात जाऊन पार पाडण्यात पटाईत होते. सायरीत मत्कल नावाच्य एका खास कमांडो तुकडीचे हे दोघे सदस्य होते. त्यांनी योजनेनुसार एका हेलिकॉप्टरने सीरियाच्या हद्दीत प्रवेश केला. तिथून त्यांनी सीरियाच्या सैनिकांचा गणवेश घालून सीरियाच्या अंतर्भागात जायला सुरुवात केली. बेमालूमपणे सीरियाच्या वस्तीच्या भागातून आणि सैनिकी तळाच्या आजूबाजूने कोणालाही कसलीही शंका येऊ न देता ते दीर अल झुर भागात आले. प्रकल्पाच्या आजूबाजूच्या भागातली वाळू त्यांनी स्वतःच्या बरोबर आणलेल्या डब्यांमध्ये भरून घेतली. हा ऐवज घेऊन आल्या मार्गी हे दोघे सुखरूप इस्राएलला पोचले. मोसाद आणि लष्कराच्या प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले हे असे कमांडो इस्राएलच्या परदेशातल्या अनेक मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी बजावत असतात.
या वाळूचं पृथक्करण केल्यावर त्यात अतिशय उच्च प्रतीचा किरणोत्सर्ग इस्राएलच्या शास्त्रज्ञांना आढळून आला. या पुराव्यावर शंका घेतली तर शंका घेणारा मूर्ख ठरला असता....त्यामुळे आता बुश यांच्या सल्लागारांना आपलं जुनं तुणतुणं वाजवता येईनासं झालं. ओल्मर्ट यांनी आता बुश यांच्यासमोर निर्वाणीची भाषा करायला सुरुवात केली. स्टिव्ह हॅडली यांनी आपल्या शास्त्रज्ञांकडून पुन्हा एकदा त्या वाळूची चाचणी केली आणि चाचणीचा अहवाल बघितल्यावर प्रकरण चांगलंच हाताबाहेर गेल्याच त्यांच्या ध्यानात आलं. त्यांनी बुश आणि त्यांच्या सल्लागारांना सीरियाच्या या अणुप्रकल्पावर हल्ला करण्याच्या इस्राएलच्या मागणीला दुजोरा द्यायची विनंती केली. सगळे अमेरिकेचे धुरंधर बुश यांच्या कार्यालयात बसून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष कसा लावायचा यावर डोकेफोड करत होते. अखेर बुश यांनी निर्णय घेतला - कितीही गंभीर असलं तरी सीरियावर हल्ला करून आधीच इराक आणि अफगाणिस्तानच्या लष्करी कारवायांमध्ये ही नवी कारवाई जोडून घेऊन त्यांना जगाच्या नजरेत युद्धखोर व्हायचं नव्हतं.
ओल्मर्ट यांनी बुश यांचा हा निर्णय ऐकलं आणि शांतपणे आपला निर्णय त्यांना ऐकवला. इस्राएलच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला योग्य वाटेल ती कारवाई आपण करूव शकतो, त्यासाठी अमेरिकेच्या साहाय्याची आपल्याला गरज नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनीं बुश यांना पुढच्या काळात आपण काय करणार आहोत याची कल्पना दिली. याचं घटनेमुळे बुश यांनी आपल्या आत्मचरित्रात या प्रकरणाचा उल्लेख करताना ओल्मर्ट यांना ' धाडसी आणि हिम्मतवाला ' अशा शब्दात गौरवलेलं आहे. आता इस्राएलने सूत्रं आपल्या हाती घेतली होती. नेहेमीप्रमाणे तेल अवीव येथे पंतप्रधान कार्यालयात ओल्मर्ट यांच्याबरोबर मोसाद, लष्करप्रमुख आणि इतर महत्वाच्या व्यक्ती एकत्र जमल्या. विषय होता ऑपरेशन आउटसाइड द बॉक्स.
मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १८
Submitted by Theurbannomad on 15 February, 2021 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा