मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १५

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:10

२८ सप्टेंबर या दिवशीचा संडे मिरर वानूनूने वाचायला घेतला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या फोटोसकट त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या वास्तव्याची माहिती, तिथले फोटो, त्याने केलेल्या दाव्यांवर उभी केलेली प्रश्नचिन्ह, त्याच्यावर उघडपणे केलेला ' बोगस माहिती 'चा आरोप अशा अनेक मजकुरांनी भरलेलं वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ त्याने बघितलं आणि त्याच्या मेंदूला मुंग्या आल्या. संडे टाइम्सच्या लोकांबद्दल त्याच्या डोक्यात चांगलीच तिडीक गेली. आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी काहीही केलं नाही अशी भावना होऊन त्याने संडे टाइम्सच्या एकूण एक लोकांना शिव्यांची लाखोली वाहिली. आता त्याला माहित होतं, की इस्राएलच्या बाजूने त्याला संपवायचे प्रयत्न सुरु होणार....तशात त्याला संडे टाइम्सच्या लोकांनी त्याने दिलेल्या छायाचित्रांची सत्य-पडताळणी अमेरिकेत सुरु असल्याची बातमी दिली. याचा अर्थ स्पष्ट होता - संडे टाइम्सला लेख छापायला अजून एक-दीड आठवडा लागणार होता....या टप्प्यावर वानूनूचा धीर सुटला. इथे मोसादने वानूनूला पकडण्यासाठी केलेली पूर्वतयारी कमी आली. मोसादच्या कार्यशैलीची ही खासियत - प्रत्येक पाऊल चोख उचलायचं आणि वेळ साधायची.
वानूनू संडे मिररच्या बातमीमुळे खवळला. त्याने संडे टाइम्सला पुरवलेल्या माहितीला कसे पाय फुटले हे त्याला कळत नव्हतंच, पण आपल्या चेहेऱ्यानिशी एका वेगळ्याच वर्तमानपत्राने इतकी महत्वाची बातमी छापली आणि तीही बोगस म्हणून, याच त्याला जास्त दुःख झालं. त्याच्या मनात नाही म्हंटल तरी आपल्या मायदेशाच्या हेरांची भीती होतीच...ब्रिटनमध्ये ज्यू हेरांचा सुळसुळाट होता हे त्याच्यासारख्या व्यक्तीला व्यवस्थित माहित होतं.त्याला लवकरात लवकर इंग्लंडमधून बाहेर पडायचं होतं. अखेर त्याने सिंडी आणि आपण स्वतः उत्तर इंग्लंडच्या भागात काही दिवस राहायला जात आहोत अशी संडे टाइम्सच्या लोकांना थाप मारली आणि प्रत्यक्षात त्याने सिंडीसह लंडन हीथ्रो विमानतळ गाठलं. त्याच्याकडे होती ब्रिटिश एयरवेसची इटलीची तिकिटं.
मोसादने या सगळ्याचं नियोजन इतकं व्यवस्थित केलं होतं, की त्या दोघांना विमानतळावर सोडणाऱ्या टॅक्सीचा चालकसुद्धा मोसादचा ' एजंट ' होता. सिंडीने आपल्या कपड्यांमध्ये शक्तिशाली ट्रान्समीटर होता...त्यातून त्या दोघांमधला बोलला गेलेला एक एक शब्द मोसादच्या कार्यालयात ऐकला जात होता. हे दोघेजण विमानात बसले आणि साधारण तीन तासांच्या प्रवासानंतर रोम येथे फ्युमिचिनो विमानतळावर उतरले. इथेही त्यांना घ्यायला आले सिंडीचेच काही नातेवाईक - जे अर्थातच मोसादचे हेर होते. त्यांनी दोघांना रोमच्या एका साध्या कामगार वस्तीतल्या एका छोट्याशा घरापाशी सोडलं. एका जिन्याने दोघे वर गेले आणि एका घरासमोर उभे राहिले. हे घर होतं सिंडीच्या ' बहिणीचं '. दार उघडून तिने त्या दोघांना आत घेतलं आणि दार लावलं.
अचानक अंधारातून दोघांनी मागच्या बाजूने वानूनूवर झडप घातली आणि त्याला खाली पाडून त्याच्या तोंडावर हात दाबला. कोणीतरी त्याच्या शरीरात सुई टोचल्याचं त्याला जाणवलं आणि काही क्षणात तो गाढ झोपी गेला. मोसादच्या त्या हस्तकांनी त्याला लगेच फ्युमिचिनो बंदरावर आणलं आणि तिथे नांगर टाकून वाट बघत असलेल्या ' नोगा ' जहाजातलय एका बंदिस्त खोलीमध्ये ठेवलं. त्याला जाग आली तेव्हा त्याला समोर एक माणूस सिरिंज भरताना तितका दिसला...पुन्हा पाच मिनिटात त्याला तशीच गाढ झोप लागली. इटलीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून इस्राएलने वानूनूला बेकायदेशीररीत्या टायरेनियन समुद्रातून इटलीच्या सागरी हददीबाहेर काढलं आणि हैफाच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. ७ ऑक्टोबरला तेल अवीव येथे जहाज थांबलं आणि मोसादच्या मुख्यालयात वानूनूला हजार केलं गेलं. तिथून पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली.
त्याला पुन्हा शुद्ध आल्यावर त्याच्या हातात एकाने ५ ऑक्टोबरच्या तारखेचं ' संडे टाइम्स ' वर्तमानपत्र ठेवलं. त्याच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात एक बातमी होती - ' इस्राएलचा गुप्त अण्वस्त्रकार्यक्रम ' - आणि त्याबरोबर होती त्यानेच काढलेली काही छायाचित्रं. ते बघून वानूनू तशाही अवस्थेत थोडासा सुखावला...त्याच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर त्याला हवी असलेली एक गोष्ट तरी साध्य झालेली होती. कोणी विश्वास ठेवा आगर नको, पण त्याच्याकडची स्फोटक माहिती तरी जगासमोर आली होती. तुरुंगात त्याला मोसादच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. त्याने ही छायाचित्रं कशी घेतली इथपासून त्याने ही माहिती जगापुढे का आणली इथपर्यंत शेकडो प्रश्न विचारून त्यांनी वानूनूला हैराण केलं.
आता आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्राएलच्या या अण्वस्त्रकार्यक्रमाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं...अमेरिकेने ही माहिती मिळताच आपला मोर्चा इस्राएलकडे वळवला. संडे टाइम्स आणि विशेषतः संपादक पीटर हौनाम यांनी आता हा विषय धसास लावला. त्यांनी इस्राएलच्या छुप्या कार्यक्रमावर लेखमालाच लिहायला सुरुवात केली. एक एक लेख इतक्या तपशीलांसकट बाहेर येत होता, की इस्राएलला त्याचं खंडन करणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. इस्राएलने मग साळसूद पवित्र घेऊन वानूनू आणि अण्वस्त्रकार्यक्रम या दोहोंपासून स्वतःला लांब केलं आणि सगळ्या बातमीचं जाहीर खंडन केलं. खुद्द इस्राएलमध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांना याबद्दल माहिती नव्हती...त्यामुळे तेही आता या सगळ्या प्रकारामुळे संतापले.
वानूनू ज्या दिवशी न्यायालयासमोर आणला जाणार होता, त्या दिवशी न्यायालयाबाहेर पत्रकारांची झुंबड होती. वानूनूने या वेळीही एक भलतंच धाडस केलं. आपल्या तळहातावर त्याने आपण कशा प्रकारे रोम येथे आलो आणि तिथून कशा प्रकारे त्याचं मोसादने अपहरण केलं याचे त्याने दोन वाक्यात तपशील लिहिले आणि ज्या पोलिसांच्या गाडीतून त्याला न्यायालयाच्या आवारात आणलं गेलं, तिथे आजूबाजूच्या पत्रकारांना दिसेल अशा पद्धतीने त्याने आपले तळहात गाडीच्या काचेवर टेकवले. या वेळी जीवाची पर्वा न करता खुद्द पीटर हौनाम इस्राएल येथे आले होते. त्यांनी लगेच ब्रिटिश एयरवेजच्या कोणत्या विमानाने वानूनू रोमला गेला याची माहिती काढली आणि त्याच्याबरोबर सिंडी नावाची एक सहप्रवासीही असल्याची महत्वाची खबरही त्याने मिळवली. बरोबरीला त्याच्या कचेरीतल्या काही पत्रकारांनी वानूनू राहात असलेल्या जागांच्या आजूबाजूच्या लोकांची छायाचित्रं मिळवून तीही प्रकाशित केली, ज्यात काही संशयास्पद व्यक्ती दिसत होत्या...त्यांनी या सगळ्याचा आधार घेऊन मोसादने इंग्लंड ते रोम आणि पुढे इस्राएल अशा मार्गाने वानूनूला अनेक आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून पळवून नेलं अशा धर्तीचे अनेक आरोप असलेले लेख लिहायला सुरुवात केली. यातून बराच काळ युरोप आणि इस्राएल यांच्यात वातावरण तापलेलं राहिलं.
किती वेगवेगळ्या कोलांट्याउड्या मोसादने या काळात मारल्या असतील? जनतेला दाखवायला काही ठोस कारण हवं म्हणून मोसादने वानूनू समलिंगी असल्याच्या वावड्याही उठवल्या. त्यासाठी त्याच्या महाविद्यालयीन जीवनात त्याने चित्रकलेच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नग्न मॉडेल्सची चित्र काढल्याच्या छोट्याशा सुतावरून पुढे तो लैंगिकदृष्ट्या विकृत झाल्याचा स्वर्गही गाठायला मोसादने कमी केलं नाही. समलिंगी संबंधांना इस्राएलच्या कर्मठ ज्यू लोकांमध्ये विकृती म्हणूनच बघितलं जाई. पुढे आपल्या ' देवाने ज्यू लोकांसाठी निवडलेल्या ' भूमीवरचं घर विकून वानूनू याने परदेशात वास्तव्य करणं निवडलं यालाही त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणलं. त्याने पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचे दाखले देऊन त्याला ' पॅलेस्टिनी अरबांबद्दल सहानुभूती ठेवणारा ' म्हणूनही बदनाम केलं गेलं. त्याने ज्यू धर्म त्यागून ख्रिस्ती धर्म स्वीकारला यावरही त्यांनी बराच आकांडतांडव केला. मोसाद आपलं कार्य पार पाडण्यासाठी किती वाईट थराला जाऊन एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करू शकतं हे या सगळ्या प्रकारांमधून दिसून येतं.इस्राएलचे राजकारणी, मोसाद आणि प्रसारमाध्यमं यांच्या अभद्र युतीने या काळात वानूनू याला सैतान ठरवायचंच काय ते बाकी ठेवलं होतं.
कोर्टात वानूनूच्या बाजूने वकील म्हणून उभे राहिले अविगडोर फेल्डमन. हा खटला चालला बंद दाराआड, कारण यात केला जाणारा युक्तिवाद राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील होऊ शकत होता. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे अनेक दिवस सुनावणी चालली. फेल्डमन यांनी आपल्या अशीलाचा बिनतोड बचाव केला. इस्राएलच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाला संसदेची - नेसेटची - मान्यता नव्हती, कारण हा कार्यक्रम त्यांच्यापासूनही लपवलेला होता. सबब गोपनीय माहिती जगासमोर आणल्याचा ठपका एकतर्फी वानूनूवर ठेवणं अयोग्य आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय त्याने कोणत्याही शत्रूराष्ट्राला ही माहिती दिली नाही, फक्त इस्राएलच्या काही लोकांनी गोपनीयरित्या चालवलेल्या या प्रकाराला वर्तमानपत्रातून वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले ज्याला देशद्रोह म्हणता येणार नाही हा त्यांचा दुसरा बिनतोड युक्तिवाद. मोसादने परदेशातून चक्क अपहरण करून आणल्यामुळे वानूनूच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली तर झालेली आहेच, शिवाय मोसादने आंतरराष्ट्रीय पातळीचा गुन्हाही केलेला आहे हे त्यांनी निक्षून सांगितलं.
या सगळ्याचा कोर्टावर विशेष परिणाम झाला नाही, कारण कोर्टाने वानूनूला देशद्रोही ठरवून त्याला अठरा वर्षांच्या सक्त तुरुंगवासाची, ज्यात बारा वर्षांचा एकांतवास अंतर्भूत होता, अतिशय अन्यायकारक शिक्षा फर्मावली. २००४ साली ही शिक्षा पूर्ण करून अतिशय वाईट अवस्थेत वानूनू तुरुंगातून बाहेर आला, तरी त्याच्यावर अनेक निर्बंध लादलेले होतेच. अमेरिकेच्या सिनेटने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी आणि अनेक प्रतिष्ठित राजकारण्यांनी आपलं वजन खर्ची घालूनही इस्राएलच्या या दडपशाहीत काहीही बदल झाला नाही. इस्राएल आणि मोसाद यांच्या वागण्यातला हा निष्ठुरपणा त्यांच्यातल्या कट्टर झिओनिस्ट मानसिकतेतून येतो - ज्यात राष्ट्रापुढे काहीही मोठं मानलं जात नाही.
आजही वानूनू इस्राएलमध्येच आपलं उर्वरित आयुष्य घालवतो आहे. अमेरिकेच्या नाकी नऊ आणणाऱ्या एडवर्ड स्नोडेन या ' व्हिसलब्लोअर 'ला त्याने जाहीर पाठिंबाही दिला होता. जे २५ वर्षांपूर्वी त्याने स्वतः केलं, ते आत्ताच्या काळात हा स्नोडेन करतो आहे हे त्याचं वाक्य त्याच्या अजूनही शाबूत असलेल्या सारासारविवेकबुद्धीची साक्ष देतं .
या सगळ्या प्रकारातून इस्राएलला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप नाचक्की सहन करावी लागली. त्यांच्यावर मानवाधिकाराचा उल्लंघन केल्याचा आरोपही अनेकदा झाला, पण त्याची त्या देशाला पर्वा नव्हती...
ऑपरेशन वानूनू त्यांच्यासाठी सफल झालेलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users