मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १४

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:08

हेरगिरीमध्ये काही सांकेतिक शब्द प्रचलित आहेत. हनी ट्रॅप हा त्यापैकी एक. एखाद्या सावजाला अडकवायचं असेल तर त्याच्या स्खलनशीलतेला लक्ष्य करायचं हा शतकानुशतकं जुना प्रकार म्हणजे हनी ट्रॅप. मोसादच्या लोकांमध्ये मानसोपचार तज्ज्ञसुद्धा आहेत, जे अशा वेळी खूप बारकाईने विचार करून सापळा कसा लावायचा याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांनी हे अचूक हेरलं, की मोर्डेकाय वानूनू हा लहानपणापासून काहीसा अलिप्त राहिलेला एकलकोंडा माणूस आहे... मायभूमीतून परागंदा होऊन अनेक देशांमध्ये फिरलेला, ऑस्ट्रेलियामध्येही टॅक्सी चालवून चरितार्थ चालवणारा असा हा माणूस मनातून चांगलाच कावलेल्या अवस्थेत असणार......अशा वेळी त्याच्या आयुष्यात एखादी स्त्री आली, तर तो तिच्याकडे आकर्षित नक्कीच होईल हे त्यांनी ताडलं.
संडे टाइम्सने मोर्डेकाय वानूनू याला एका छोट्याशा लॉजमध्ये सुरक्षित ठेवलं होतं. तिथे ठेवताना त्याला त्यांनी सक्त ताकीद दिली होती, की एकटंदुकटं कुठेही बाहेर पडायचं नाही.....पण संध्याकाळच्या वेळी जवळच्या माउंटबॅटन हॉटेलच्या परिसरात तो एकटाच पाय मोकळे करायला बाहेर पडला. शिणलेल्या अवस्थेत बरेच दिवस काढल्यावर आज त्याला मोकळी हवा खायला मिळत होती. अचानक त्याच्या समोर त्याला एक सोनेरी केसांची , किंचित स्थूल बांध्याची आणि जेमतेम पंचवीस वर्षाची अशी एक अतिशय सुंदर तरुणी दिसली. नजरानजर झाल्यावर तिने त्याच्याकडे जे नेत्रकटाक्ष टाकले, त्यातून त्याला जे संकेत समजायचे ते समजले. तो नकळत तिच्याकडे आकर्षित झाला. त्याची पावलं तिच्या दिशेला वळली.
बोलाचालीला सुरुवात झाल्यावर तिने आपली ओळख ' सिंडी हानीन ' म्हणून करून दिली. दोघांनी एका कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा सुरु केल्या. मूळचा आतल्या गाठीचा असूनही वानूनू आपल्या या नव्या मैत्रिणीसमोर खुलला....ज्याला कारणीभूत होती सिंडीचं लाघवी बोलणं. ती मोसादची एक प्रशिक्षित ' हनी ट्रॅप स्पेशालिस्ट ' होती. मूळची अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये वाढलेली. कट्टर झिओनिस्ट ज्यू. तिचं खरं नाव होतं ' चेरील बेन्टोव '. विशेष म्हणजे ही कामगिरी तिने स्वीकारली तेव्हा ती विवाहित होती.....तिचा नवरा इस्राएलच्याच लष्करी हेरखात्याचा कामाला होता. तिने इस्राएलचं नागरिकत्व स्वीकारल्यावर खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं आणि मोसादसाठी हेरगिरीची कामंही केली होती. हे असे ध्येयवेडे राष्ट्रभक्त कोणत्याही कामगिरीसाठी कधीही तयार असणं हीच मोसादची खरी ताकद होती.
सिंडीने पहिल्याच भेटीत वानूनूवर चांगलीच जादू केली. आता दोघांच्यात दररोज गाठीभेटी आणि संवाद सुरु झाले. सिंडीने वानूनूला सहानुभूती, प्रेम, मानसिक आधार अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या पूर्णपणे कह्यात घेतलं. वास्तविक सिंडी काही स्वर्गातून अवतरलेल्या अप्सरेसारखी लावण्यवती नव्हती, पण मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास वानूनूसारख्या आतल्या गाठीच्या माणसाला अशी सौंदर्यवती दिसली असती तर कदाचित तो तिच्याशी पटकन बोलायला गेलाही नसता....सर्वसामान्य मुलींपेक्षा जास्त आणि एखाद्या व्यावसायिक मॉडेलपेक्षा कमी आकर्षक असल्यामुळे वानूनू सिंडीशी बोलायला उद्युक्त होईल हे मोसादच्या तज्ज्ञांनी ताडलेलं होतं.
वानूनूला आपली ही मैत्रीण आता चांगलीच आवडायला लागलेली होती. त्याने भाबडेपणाने संडे टाइम्सच्या लोकांनाही तिच्याबद्दल सांगितलं. सिंडीने आपण अमेरिकन नागरिक असल्याचं सांगितल्यावर वानूनूच्या डोळ्यासमोर आशेचे किरण तरळून गेले. त्याला अमेरिकन नागरिक होऊन शांतपणे पुढचं आयुष्य जगायची इच्छा होतीच...सिंडीने आपल्या सगळ्या प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करून वानूनूला आपल्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटून टाकलं. तो आता तिच्याबरोबर दररोज अनेक तास घालवायला लागला. सिंडीने त्याला शारीरिकदृष्ट्या थोडंफार जवळ येऊ दिलंही, पण त्याच्याबरोबर शय्यासोबत करायला मात्र तिने ठाम नकार दिला. याचा परिणाम असा झाला, की वानूनूला ती अधिकच आवडायला लागली.
मोसादने या सगळ्या प्रकरणातून ब्रिटिश हेरखात्याला - MI - ६ ला - कटाक्षाने लांब ठेवलं. एक तर त्यांना ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना या सगळ्यात लक्ष घालू द्यायचं नव्हतं. त्या ' आयर्न लेडी ' म्हणून जगात प्रसिद्ध होत्या. त्यांनी या प्रकरणात हात घातला तर कदाचित गोष्टी हाताबाहेर जातील ही मोसादची भीती अगदीच अनाठायी नव्हती. त्यासाठी सावजाला ब्रिटनच्या हद्दीबाहेर काढून त्याला इस्स्राएलमध्ये नेणं जास्त सोयीचं होतं. मोसादने यासाठी निवड केली इटलीची. इटलीच्या समुद्रकिनाऱ्यापासून इस्राएलच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत भूमध्य समुद्र ओलांडून कमीत कमी वेळेत आणि जोखमीत वानूनूला मायदेशी नेणं मोसादसाठी सोपं कामं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वानुनु फारच भाबडा आहे की. एवढा मोठा माहितीचा खजिना आपल्याकडे असताना कुठे आणि किती तोंड उघडावं/उघडू नये हे ही कळू नये म्हणजे अतीच.

वानुनु फारच भाबडा आहे की. एवढा मोठा माहितीचा खजिना आपल्याकडे असताना कुठे आणि किती तोंड उघडावं/उघडू नये हे ही कळू नये म्हणजे अतीच>>> लडकी का चक्कर बाबूभाईया .. Remeber Herapheri सायो Proud

@सायो
हनी ट्रॅप हा जगभरातल्या spy agencies चा अतिशय लाडका trap यासाठी असतो, कारण त्यात अडकलेला मनुष्य आपली इभ्रत वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. जर मनुष्य सीधा असेल तर प्रेमासाठी वेडा होऊन सगळ्या गोष्टी उघड करतो....आजही investigate केलेल्या cases पैकी ८०% cases हनी ट्रॅपच्याच सापडतात.

खरच कळत नाही, या लोकाना honey trap असेल याची शंका येत नाही का कोणी असम एकदम गप्पा मारायला वगैरे लागलं की?
वानुनुचं वाईट वाटलं.
बाकी लेखमाला छान चालली आहे.

@झेलम
Honey trapping खूप विचारपूर्वक केलं जातं. सावजाचा इतिहास, स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी अशा सगळ्या गोष्टींचा खोल विचार करून अतिशय मुरलेले तज्ञ त्याचं ' emotional mapping ' करतात आणि त्यानुसार जाळं टाकतात. यामागे गुन्हेगारी मानसिकतेचा आणि मानवी स्वभावाचा खोल विचार केलेले मानसशास्त्रज्ञ असतात.

कसलेले, निष्णात हेर हनी ट्रॅप टाकतात तेव्हा त्यांना सावजाला त्यात कसं अडकवावं हे माहित असणारच. पण वानूनू नवीन ऑस्ट्रेलियात तेव्हाही तो असंच भाबडेपणाने त्याच्याकडची माहिती कुणाशीतरी शेअर करतो हे वाचल्याचं आठवतंय म्हणून म्हटलं.

वानूनूने निघतांनाच कॅनडीयन पत्रकाराला सगळं सांगितलं होतं, त्यामुळे तो भाबडा असणारच किंवा माकडाच्या हाती कोलीत असं झालं असावं...
चांगल्या उद्देशालाही तितक्याच चांगल्या आचार-विचारांचं अधिष्ठान असावं लागतं, किंवा मग तितकीच प्रबळ इच्छाशक्ती...

@ सायो
वानूनु भाबडा होता की नाही, यावर काही इस्रायली मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेलं मत असं -
एखादा मनुष्य लहानपणापासून अवहेलना, त्रास आणि एकलकोंडेपणा अनुभवतो, तेव्हा त्याचा एक तर तानाशहा होतो किंवा स्वतः मध्ये गुंतलेला एककल्ली घुम्या. हे दुसऱ्या प्रकारचे लोक दूरचा विचार करत नाहीत, त्या क्षणाला त्यांना जे जवळचे वाटतात त्यांना ते सगळं सांगून मोकळे होतात, करणं मनात साठलेलं बाहेर यायला त्यांना एक मार्ग हवा असतो. आपण करतो तितका खोल विचार हे लोक नाही करू शकत.
अशा लोकांना नजरकैदेत किंवा अलिप्त ठेवलं तर ते जास्त ' vulnerable' होतात. हेच मोसादच्या तज्ज्ञांनी ताडलं. मानसिक अवस्थेचा विचार तज्ञांना करता येतो...आपल्याला ते बघून आश्चर्य वाटतं पण तज्ञ लोक अचूक अंदाज लावतात.