मोर्डेकाय वानूनू .
मोरक्को या उत्तर आफ्रिकेतल्या देशात एका सर्वसामान्य ज्यू कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा. त्याच्या जन्म झाला तेव्हा - १९५४ साली - हा देश फ्रेंचांच्या ' मालकीचा ' होता. ब्रिटिशांनी बऱ्याचशा देशांमधून आपलं बस्तान हलवलं असलं, तरी फ्रेंचांनी मात्र अजूनही आपला साम्राज्यवादी खाक्या कायम ठेवलेला होता. आफ्रिकेतले बरेचसे देश त्यांच्या हाताखाली होते. पण पुढच्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर बरीच खळखळ केल्यानंतर त्यांनी या देशाला स्वातंत्र्य द्यायला होकार दिला. या निर्णयामुळे या देशातल्या अरबांना जरी आनंद झालेला असला, तरी अल्पसंख्यांक ज्यू लोकांना मात्र हा निर्णय डोकेदुखी ठरला. फ्रेंचांच्या अंमलाखाली नाही म्हंटल तरी ज्यू सुरक्षित होते, पण फ्रेंच गेले आणि अरब मात्र ज्यू लोकांवर तुटून पडले. ज्यू लोकांच्या घरांवर दगडफेक कर, ज्यू मुलांना शाळेत जात-येता त्यांच्यावर शिवीगाळ कर अशा घटना वारंवार घडू लागल्या आणि अखेर वानूनू कुटुंबाने आपल्या हक्काच्या भूमीत - इस्राएल येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. १९६३ साली हे कुटुंब कायमचं इस्रायलला आलं. मोरक्को देशातून इस्रायलला गेलेल्या ८०,००० ज्यू लोकांमधलं हे एक कुटुंब.
ज्यू लोकांमध्येही अगदीच एकी नव्हती. त्यांच्यातही तीन गट होते - अशकेनाझी , सेफ़र्डिक आणि मिझरहीम. यांच्यात सगळ्यात प्रबळ आणि बहुसंख्य होते अशकेनाझी. वास्तविक या तिन्ही ज्यू गटांमध्ये फरक इतकाच होता, की इस्राएलमधून अठरा-एकोणीस शतकांपूर्वी परागंदा झाल्यावर ते ज्या भूमीवर वास्तव्याला आले, तिथल्या चालीरीती, भाषा आणि प्रथांचा प्रभाव पडून त्यांच्यात काही लहानसहान बदल झालेले होते...सेफ़र्डिक ज्यू युरोपमधल्या स्पेन, पोर्तुगाल आणि उत्तर आफ्रिकेतल्या भागातले. अशकेनाझी होते मध्य आणि उत्तर युरोपीय देशातले, आणि म्हणून पैशाने - प्रतिष्ठेने जरा जास्त...( वाण नाही पण गुण लागतो तो असा...) आणि मिझरहीम होते युरोपबाहेरचे - बरेचसे पूर्वेकडच्या देशातले.
वानूनू कुटुंब होतं उत्तर आफ्रिकेतून आलेलं , म्हणजेच सेफ़र्डिक. इस्राएलमधल्या प्रबळ अशकेनाझी ज्यू लोकांच्या हातात सगळी सत्ता होती. बाहेरून इस्राएलमध्ये आलेले ज्यू कुठे स्थायिक करायचे, हा निर्णय त्यांचा प्रभाव असलेले सरकारी नेते आणि अधिकारी घेत. त्यांनी या वानूनू कुटुंबाला राहण्यासाठी बीरशेवा भागातल्या किबुट्झमध्ये जागा दिली. या भागात अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार राजरोस चालत असे. वानूनू कुटुंबीयांनी आपापल्या परीने इस्राएलच्याच दुसऱ्या भागात जागा मिळवण्यासाठी खूप धडपड केली, पण तेव्हा इस्राएलच्या सरकारातले अधिकारी अशा धडपडीला दाद लागू देत नसत. त्यांच्या डोळ्यांसमोर एकच उद्देश असे - ज्यू वस्त्या विस्तारायच्या आणि देशाच्या सीमा रुंदावत न्यायच्या. लहान वयात हे सगळं भोगावं लागल्यामुळे मोर्डेकाय बराचसा घुम्या झाला. त्याच्या मनात एक प्रकारचा कडवटपणा आला...आधीच आपल्या मूळच्या देशातून निघून यावं लागल्याचे व्रण त्याच्या मनावर खोल उमटलेले होते आणि त्यात आपल्या हक्काच्या 'देवभूमीवर ' हे असं सगळं बघावं लागलेलं होतं...
मोर्डेकाय वाढला तो अशा सगळ्या गोष्टींचं ओझं मनावर वागवत. त्याची शाळा - येशिवा ओहेल श्लोमो - एक कट्टर ज्यू धर्मीय शाळा होती. तिथलं वातावरण कर्मठ. ज्यू प्रथा, धर्म आणि यहुदी भाषा याचा या शाळेत अतिरेक होताच...जोडीला अशकेनाझी ज्यू मुलांकडून सहन करावी लागणारी टिंगलटवाळीही होती. अशा सगळ्यातून जन्माला आलं एक असं बंडखोर रसायन, ज्यामुळे मोर्डेकाय बराचसा सुधारणावादी झाला. त्याला कट्टर ज्यू होण्यामध्ये काहीही रस उरला नव्हता. अठरा वर्षाच्या वयात तो इस्राएलच्या लष्करात सामील झाला आणि त्याने गोलान टेकड्यांच्या भागातल्या चकमकींमध्ये भागही घेतला. तीन वर्षांनी लष्करातून सन्मानाने बाहेर पडून त्याने तेल अवीव विद्यापीठात प्रवेश मिळवला, पण पैशांच्या अभावी त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. अशा भरकटलेल्या अवस्थेत त्याला एकमेव आशेचा किरण दिसला वर्तमानपत्रातल्या एका जाहिरातीत - कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून इस्राएलच्या अणुऊर्जा विभागाला तरुण माणसांची गरज आहे, अशी ती जाहिरात त्याला चटकन आकर्षित करून गेली.
त्याने या जागेसाठी अर्ज केला आणि त्याची निवडही झाली. आता अणुऊर्जा विभागात त्याचं रीतसर प्रशिक्षण सुरु झालं. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , इंग्रजी भाषा अशा अनेक विषयांमध्ये त्याला पारंगत व्हावं लागलं. शेवटी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्यापुढे आले काही कागद, ज्यावर अणुऊर्जा विभागाची गोपनीयतेची शपथ आणि नोकरीच्या स्वरूपाचा अंतिम मसुदा होता. त्यांच्यावर सह्या केल्यावर मोर्डेकाय अखेर इस्राएलच्या एका अतिशय महत्वाच्या आणि गोपनीय कार्यक्रमाचा अविभाज्य हिस्सा झाला. त्याला हवा असणारा मानसन्मान या नोकरीतून त्याला मिळणार होता आणि बरोबरीने समाजात ताठ मानेने जगणं त्याच्या नशिबी येणार होतं...
मोर्डेकाय स्वभावाने कष्टाळू होता. त्याने डिमोना प्रकल्पामध्ये प्रवेश केला एक साधा कनिष्ठ तंत्रद्न्य म्हणून, पण नोकरीव्यतिरिक्त त्याने फावल्या वेळात आण्विक ऊर्जा, अणु - भौतिकी, रसायनशास्त्र आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अभियांत्रिकीचा सखोल अभ्यास केला.
त्याच्यातला हा हरहुन्नरीपणा त्याच्या वरिष्ठांच्या डोळ्यांमध्ये भरला. त्यांनी मोर्डेकायला अधिकाधिक जबाबदाऱ्यांची कामं देऊन त्याला अधिकाधिक अनुभवसंपन्न केलं. काही महिन्यांनी अखेर त्यांनी त्याची निवड केली अणुऊर्जा आयोगाच्या सगळ्यात गोपनीय प्रकल्पावर काम करण्यासाठी......
डिमोना प्रकल्पापासून साथ-सत्तर मैलांवर वाळवंटात उभारलेल्या एका कापड कारखान्यात मोर्डेकाय पहिल्यांदा आला, तेव्हा त्याला आपण कुठे आलो गेलो आहोत याची काहीच कल्पना नव्हती. हा कारखाना अगदी साधा होता... दुमजली इमारत, आजूबाजूला साधीशी भिंत आणि गाड्या पार्क करण्याची जागा अशा थाटातला हा कारखाना बघणाऱ्यांना एखाद्या निर्जन पडीक इमारतीसारखाच वाटे. या कारखान्याचे नाव इस्राएलच्या सांकेतिक भाषेत होतं ' मॅचोन '....ज्याचे दोन भाग होते. जमिनीवरचे दोन मजले - मॅचोन १ म्हणजे दाखवायचे दात आणि जमिनीखालचे सहा-सात मजले - मॅचोन २ म्हणजे खायचे दात. हे तळमजले म्हणजे इस्राएलच्या अति-गोपनीय अणुप्रकल्पाचा गाभारा. येथे आण्विक शस्त्रं तयार करण्याच्या कामावर ज्यू शास्त्रज्ञांची आणि अभियंत्यांची अख्खी फौज कामाला होती. येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर इस्राएलच्या राजकारण्यांपासून गुप्तहेरखात्याचा अगदी बारीक पहारा होता - अगदी २४ तास. इथल्या प्रत्येकाची ओळख गोपनीय ठेवली गेली होती. या गाभाऱ्यात मोर्डेकायला प्रवेश मिळाला आणि अचानक त्याचा समावेश इस्राएलच्या महत्वाच्या कर्मचाऱ्यांमध्ये झाला...
मोर्डेकाय वास्तविक कामाला अथवा कष्टाला भिणारा मनुष्य नव्हता, पण त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कोणीतरी वरिष्ठ सतत लुडबुड करायला लागला तर ते आवडत नसे. तो इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रकल्पाच्याच बसने दररोज ठरलेल्या वेळेला मॅचोन २ येथे येई आणि परत जाई. प्रकल्पाच्याच ठरवून दिलेल्या संकुलात तो राहायला आला होता. हातात चार पैसे आल्यावर त्याने पुन्हा एकदा उच्चशिक्षणासाठी नेगेव्हच्या बेन गुरियन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्याने तत्वज्ञान आणि भूगोल असे दोन टोकाचे विषय घेऊन अर्धवेळ अभ्यासक्रमातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
त्याच्या चौकस बुद्धीला मॅचोन - २ प्रकल्पामध्ये आण्विक ऊर्जेची निर्मिती शांततामय कारणासाठी होतं नसून आण्विक शस्त्रं तयार करण्यासाठी होतं आहे, याची कुणकुण लागली होतीच. खरंही होतं ते...कारण या प्रकल्पात प्लुटोनियम तयार करण्याच्या कामावर मोठा फौजफाटा तैनात होता. पुढे अनेक वर्षांनी या प्रकल्पच सत्य जगासमोर आल्यावर समजलं, की पक्के व्यापारी असलेले ज्यू या प्रकल्पातून इस्राएलसाठीच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेसाठीही येथे अण्वस्त्र तयार करत होते !
बेन गुरियन महाविद्यालयातल्या आपल्या काळात मोर्डेकाय पॅलेस्टिनी अरबांच्या संपर्कात आला. इस्राएलमधले हे अल्पसंख्यांक अरब असल्यामुळे अतिशय वाईट अवस्थेत होते. मोर्डेकाय मात्र त्यांना सढळ हाताने मदत करायचा. वाढत्या वयात आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्याच्यात अल्पसंख्यांक लोकांच्या बाबतीत एक कणव होतीच, शिवाय मोरोक्कोसारख्या अरब देशातून आल्यामुळे इतर कट्टर ज्यू लोकांप्रमाणे त्याच्या मनात अरबांबद्दल टोकाचा मत्सरही नव्हता. लोकशाहीवर विश्वास असल्यामुळे ' समसमान संधी ' या तत्वाचा तो ठाम पुरस्कर्ता होता. त्याचं हे वागणं आजूबाजूच्यांच्या डोळ्यात येत असूनही त्याने त्यात बदल केला नाही.
या सगळ्या वातावरणात मॅचोन २ मध्ये त्याचा बऱ्यापैकी मुक्त वावर सुरु होता. पहिल्या चार मजल्यांच्या कानाकोपऱ्यात त्याला निर्धोकपणे फिरत येत होतं. बाकीच्या २-३ मजल्यांकडे मात्र त्याला फिरकणं निषिद्ध होतं. हे मजले होते अति - गोपनीय भागाचे. पण काहीही असलं, तरी कधी कधी एखाद्याची एक छोटीशी चूकही पुढे चांगलीच महागात पडू शकते हेच खरं, कारण मोर्डेकायला एकदा या अती-गोपनीय मजल्यांवर जा-ये करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या मजल्यांची किल्ली एका टाळं न लावलेल्या कपाटात ठेवलेली दिसली आणि त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. सुरक्षा कर्मचारी संध्याकाळची जेवणाची सुट्टी घेऊन बाहेर पडले, तेव्हा त्याने हळूच त्या किल्ल्या उचलल्या आणि तळमजल्याच्या पाचव्या मजल्यावर त्याने प्रवेश केला.
लहानपणापासून हिणवलं गेलेला, स्थलांतरापासून नोकरी मिळवेपर्यंत सतत संघर्ष करायला लागलेला आणि मनातून धुमसत असलेला मोर्डेकाय नावाचा एक असंतुष्ट मनुष्य आता इस्राएलच्या अतिशय गोपनीय प्रकल्पाच्या अती - सुरक्षित आणि बाहेरच्या जगापासून कटाक्षाने लपवून ठेवलेल्या गाभाऱ्यात येऊन पोचला होता.....बाहेर मोसादने ऑपरेशन प्लम्बट यशस्वी करून दाखवून जगाला धक्का दिलेला असला तरी त्यांच्या बुडाखाली त्यांच्यातलाच एक जण त्याच प्रकल्पाच्या महत्वाच्या दालनात शिरलेला होता, हा एक विचित्र विरोधाभासी योगायोग पुढे अनेक समस्यांना जन्म देणार होता.
मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ८
Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 11:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचतेय
वाचतेय
चांगला भाग. ह्याबद्दल कहीच
चांगला भाग. ह्याबद्दल कहीच माहित नव्हतं.
लिंक तुटल्या सारखी वाटतेय!!
लिंक तुटल्या सारखी वाटतेय!!
आईशमन च पुढे काय झाल?
>>शिवाय मोरोक्कोसारख्या अरब
>>शिवाय मोरोक्कोसारख्या अरब देशातून आल्यामुळे इतर कट्टर ज्यू लोकांप्रमाणे त्याच्या मनात अरबांबद्दल टोकाचा मत्सरही नव्हता.
अरबांनी वाईट वागणूक देऊनही? हे आश्चर्यकारक आहे. ह्या प्रकल्पाबद्दल मी आधी काही वाचलेलं नाहिये तेव्हा जाम उत्सुकता आहे.
@ स्वप्ना राज
@ स्वप्ना राज
वाईट वागणूक देणारे अरब जसे मोरॉक्कोला होते तसेच मदत करणारेही होते. त्याच्या मनात अरब लोकांबद्दल फक्त टोकाचा द्वेष नव्हता, तर अरब असेल तरी ते चांगले असू शकतात यावर त्याचा विश्वास होता. कट्टर Zionism अरब लोकांना काडीचीही किंमत देत नाही.
Makes sense Theurbannomad
Makes sense Theurbannomad
वाचतोय सगळे भाग
वाचतोय सगळे भाग