मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ५

Submitted by Theurbannomad on 7 February, 2021 - 14:18

" ४२६१, केले चाकाबुको, ओलिवोस, ब्युनोस आयर्स "
बाउअर यांच्याकडून मिळालेला हा पत्ता इस्सर यांच्या डोळ्यांसमोरच्या कागदाच्या चिटोऱ्यावर होता. अर्जेन्टिनामध्ये याच ठिकाणी ऎचमन सहकुटुंब रहात होता. अर्थात या माहितीची ठोस पुष्टी केल्याशिवाय काहीही करणं शहाणपणाचं नव्हतंच....एका डोळ्याने अंध असलेल्या व्यक्तीच्या मुलीच्या प्रेमप्रकरणातून मिळालेली ही माहिती किती खरी आहे, हे तपासायला शेवटी ' हेराचा तिसरा डोळा ' असलेल्या आपल्या एका मुरब्बी सहकार्याची निवड इस्सर यांनी केली. हा माणूस होता मोसादच्या अर्जेन्टिनामध्ये पेरलेल्या काही खास लोकांपैकी एक - इमानुएल ताल्मोर. अर्जेन्टिनामध्ये अनेक नाझी अधिकाऱ्यांनी शरण घेतल्याची कुणकुण मोसाद्ला असल्यामुळे या देशात त्यांचे अनेक हस्तक होते...हा ताल्मोर त्यातलाच एक.
ताल्मोरने जेव्हा केले चाकाबुको या वस्तीची पाहणी केली, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ही वस्ती अगदीच गचाळ आणि दरिद्री होती. जवळ जवळ झोपडपट्टी वाटणारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किडूकमिडूक घरं असणारी आणि अर्जेन्टिनाच्या शहरी भागात काम करणाऱ्या कामगारांनी गजबजलेली ही वस्ती जर्मनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या राहणीमानाला साजेशी नक्कीच नव्हती. शिवाय ४२६१ क्रमांकाच्या घरासमोर छोट्याशा हिरवळीच्या जागेवर त्याला एक अंगापिंडाने थोराड बाई दिसली. ही बाई ऐचमनची बायको असणं अशक्य होतं. अखेर ताल्मोरने तेल अवीव येथे आपल्या या सगळ्या पाहणीचा अहवाल दिला आणि ऐचमनची माहिती चुकीची असल्याचं मत व्यक्त केलं.
अखेर इस्सर यांनी एक निर्णय घेतला - थेट ही माहिती बाउअर यांना देणाऱ्या व्यक्तीलाच भेटून त्याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा त्यांचा हा निर्णय बाउअर यांना मान्य होईल की नाही, याबद्दल त्यांना शंका होती, पण बाउअर यांनी काहीही खळखळ न करता ते नाव पुरवलं. तो मनुष्य होता लोथार हरमन. सिल्वियाचा जन्मदाता. जर्मनीतल्या ज्यू लोकांच्या झालेल्या नृशंस हत्याकांडातून कसाबसा बचावलेला हरमन दृष्टीहीन होऊन आपले उरलेसुरले दिवस काढत होता.
इस्सर यांनी आता थेट तेल अवीवहून आपल्या एका खास सहकाऱ्याला ब्युनोस आयर्स येथे पाठवलं. तेल अवीव पोलीस खात्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचा प्रमुख एफ्रेम हॉफस्टेटर हा तो सहकारी. तो इंटरपोल या जागतिक अन्वेषण संघटनेच्या एका बैठकीसाठी अर्जेन्टिनाला जाणार होता. इस्सर यांनी बैठकीबरोबरच लोथार हरमनला जाऊन भेटण्याची कामगिरीही त्याच्यावर सोपवली. त्याने ' कार्ल हूपर्ट ' असं जर्मन नाव धारण करून हरमनच्या घरात प्रवेश केला. आपण जर्मनीच्या हेरखात्यांत कामाला असून न्यायाधीश फ्रित्झ बाउअर यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी आहोत अशी त्याने आपली ओळख करून दिली. अंध हरमनने आपल्या मुलीला बोलावून घेतलं आणि आपल्या घरी आलेल्या जर्मन पाहुण्याला थेट तिच्याशी बोलायची सूचना केली.
" ही सिल्विया, माझी मुलगी. हिनेच शोधला ऎचमन...." बापाच्या या उद्गारांनी सिल्विया चांगलीच खुलली. तिने आपल्या तारुण्यसुलभ उतावीळपणाने अथपासून इतिपर्यंत सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा केला.

" ब्युनोस आयर्स शहरातल्या ओलिवोस भागात एका सुखवस्तू वस्तीत साधारण दीड वर्षांपूर्वी आम्ही राहत होतो, तेव्हा माझी ओळख एका तरुण युरोपियन मुलाशी झाली. आमचं कुटुंब अर्ध ज्यू आहे, पण आमच्या आडनावाचा संबंध आर्यन वंशाशी जास्त आहे. तो युरोपियन मुलगाही आर्यन वंशाचा होता. माझ्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करतानाही तो सतत जर्मनीने ज्यू लोकांना संपवायचं काम अर्धवट सोडल्याबद्दल त्रागा व्यक्त करायचा. अशाच गप्पांच्या ओघात त्याने आपले वडील जर्मन सैन्यदलात मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी होते आणि त्यांनी आपल्या पितृभूमीचे ऋण फेडायचा महान कामात ( म्हणजेच ज्यू नरसंहारात ) उत्तम कामगिरी बजावलेली होती अशा बढाया मारल्या. त्याने आपलं नाव ' निक ऎचमन ' असं सांगतलं ….. " सिल्व्हियाने आढेवेढे न घेता सगळं काही सांगून टाकलं.
प्रेमाच्या त्या गुलाबी दिवसांमध्ये प्रेमपत्रांची देवाणघेवाण होतेच...पण सिल्व्हियाला मात्र तिची पत्रं पाठवण्यासाठी निक याने त्याचा घरचा पत्ता सांगितलेला नव्हता. ती पत्रं जायची निकच्या एका मित्राच्या पत्त्यावर. उत्तरही यायचं त्याच पत्त्यावरून. शिवाय निकने आपापल्या कुटुंबियांशी सिल्व्हियाची गाठभेट घालून दिलेली नव्हती. हे सगळं तिने आपल्या वडिलांना सांगितल्यावर त्यांचा संशय बळावला. डोळ्याने अंध असूनही हरमन ओलिवोसला गेला. सिल्व्हियाने आपल्या मित्रमंडळींमध्ये शब्द फिरवून कसाबसा निकचा खरा पत्ता मिळवला आणि बापलेकींनी ते घरं गाठलं. निक घरी नव्हता, पण स्वागताला घरात होता पातळ मिशांचा आणि डोळ्यांवर चष्मा घातलेला एक मध्यमवयीन मनुष्य. त्याने आपली ओळख निकचा जन्मदाता म्हणून करून दिली.
या सगळ्या माहितीमुळे एफ्रेम हॉफस्टेटर याच्या सरावलेल्या मेंदूमध्ये पुढच्या कृतींची जुळवाजुळव सुरु झाली. त्याने सर्वप्रथम हरमनला बऱ्यापैकी पैसे दिले. हरमननेही त्या घरापर्यंत मोसादच्या अधिकाऱ्यांना घेऊन जायचं आश्वासन दिलं. मोसाद्ला ऎचमन मिळावा यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी दाखवली. हॉफस्टेटरला पुढे समजलं, की हरमन स्वतः पूर्वी जर्मन पोलीस खात्यात होता, पण हिटलरच्या काळात त्याला आपल्याच देशातून परागंदा होऊन दूर अर्जेन्टिनाला निर्वासितांसारखं राहावं लागत होतं. हॉफस्टेटर याने खिशातून एक पोस्टकार्ड काढलं, अर्ध फाडलं आणि हर्मनच्या हातात दिलं.
" यापुढे जो मनुष्य उरलेलं अर्ध पोस्टकार्ड घेऊन तुझ्याकडे येईल. त्याला तू जमेल तितकी माहिती दे आणि मदत कर...तो ' आपलाच ' माणूस असेल..."
हॉफस्टेटर याने ऎचमन याची जुनी छायाचित्रं हरमनला दिली. हरमन आणि सिल्व्हियाचा निरोप घेऊन हॉफस्टेटर निघाला तो थेट इस्रायलला परतला आणि इस्सर यांच्या समोर उभा राहिला. इस्सर यांनी सगळा प्रकार ऐकला आणि ते ताडकन खुर्चीतून उठले. त्यांच्या डोळ्यांसमोर होती एक अशी कामगिरी, जी पार पाडण्यासाठी त्यांना आपल्या आयुष्यभराचा अनुभव पणास लावायला लागणार होता. ऎचमन या नराधमाला जिवंत इस्स्राएलला आणून त्याला कोर्टासमोर उभं करण्याची ही कामगिरी आता त्यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न झालेला होता.
काही महिन्यांनी त्यांना हरमन यांनी एक विस्तृत माहितीने भरलेला अहवालच अर्जेन्टिनाहून पाठवला. त्याने अंध असूनही जे काही शोधून काढलं होतं, ते बघून इस्सर चमकले. ज्या घरात ऎचमन राहत असल्याचा संशय होता, ते घर फ्रान्सिस्को श्मिड्ट नावाच्या एका ऑस्ट्रियन माणसाने केले चाकाबुको भागात दहा-बारा बावर्षांपूर्वी बांधलं होतं. या घरात त्याने दोन भाडेकरू बिऱ्हाडं ठेवली होते. त्यांची नावं होती ' डागूतो ' आणि ' क्लेमेंट '. हा श्मिड्ट म्हणजेच ऎचमन असल्याचा खात्रीदायक दावा हरमन याने केला होता. जर्मनीहून भरपूर पैसा घेऊन पळालेला ऎचमन अर्जेन्टिनामध्ये केले चाकाबुको येथेच आरामात राहतो आहे हा त्या अहवालाचा निष्कर्ष होता.
इस्सर यांच्या मेंदूमध्ये अनेक गोष्टींचा गुंता झाला होता. डोळ्याने अंध असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल इतका ठाम कसा असू शकतो, या प्रश्नाने त्यांच्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या होत्या. त्यांनी पुन्हा एकदा अर्जेन्टिनामधल्याच आपल्या दुसऱ्या एका हस्तकला या सगळ्याची स्वतंत्र छाननी करायचा आदेश दिला. त्याने आपल्या परीने त्या घराची आणि वस्तीची पाहणी केली आणि त्या पत्त्यावर राहत असलेला मनुष्य ऎचमन नाही अशी उलट ग्वाही दिली. अखेर इस्सर यांनी आपल्या ' सिक्सथ सेन्स ' ला अनुसरून एक चुकीचा निर्णय घेतला. तो मनुष्य ऎचमन नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांनी या कामाला जुंपलेली सगळी यंत्रणा बाकीच्या कामांकडे वळवली.
पुढे एक-दीड वर्षांनी न्यायाधीश फ्रित्झ बाउअर इस्रायलला आले असताना त्यांनी इस्सर यांची भेट घेण्यास नकार दिला. इस्राएलचे सरन्यायाधीश हैम कोहेन यांना ते भेटले आणि त्यांनी मनातली मळमळ व्यक्त केली. इस्सर यांनी आपण इतकी महत्वाची माहिती देऊनही ऐचमनसारख्या नराधमाला पकडण्यासाठी काहीही केलं नाही ही त्यांची तक्रार ऐकून कोहेन यांनी इस्सर यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. बरोबर त्यांनी ' शबाक ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इस्राएलच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या खात्याच्या प्रमुखांना - झ्वी आहारोनी यांनाही पाचारण केलं. बैठकीत चर्चा सुरु असताना बाउअर यांनी एक खुलासा केला आणि तो ऐकताच इस्सर यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ऎचमन अर्जेन्टिनाला ' रिकार्डो क्लेमेंट ' या नावाने राहत असल्याचा बाउअर यांचा खुलासा ऐकून आपण आपला तपास हरमन यांनी सांगितलेल्या फ्रान्सिस्को श्मिड्ट याच्या दिशेने वळवल्यामुळे झालेला घोळ इस्सर यांच्या ध्यानात आला.
इस्सर यांनी लगेच ऎचमन याला जिवंत पकडून इस्रायलला आणण्याच्या दृष्टीने काम सुरु केलं. त्यांनी आग्रहाने या कामगिरीसाठी आहारोनी यांचीच निवड केली. आहारोनी जन्माने जर्मन ज्यू होते, त्यामुळे त्यांनाही ऎचमनसारख्या राक्षसाला शिक्षा झालेली बघायची होती...फक्त त्यांचा इस्सर यांच्यावर राग होता तो वेगळ्या कारणासाठी. इतक्या महत्वाच्या व्यक्तीचा माग काढण्यासाठी मागच्या वर्षभरात इस्सर यांनी इतकं सगळं केलं, पण आपण स्वतः एका कामाच्या अनुषंगाने खुद्द ब्युनोस आयर्स येथे असूनही त्यांनी आपल्याला काहीही सांगितलं नाही, याच शल्य त्यांच्या मनात घर करून होतं. पण अखेर आपापसातला तंटा बाजूला ठेवायचा सामंजस्याचा निर्णय झाला. काहीही असलं, तरी इस्सर आणि आहारोनी या दोघांचं लक्ष्य एकंच होतं....ऑटो एडॉल्फ ऎचमन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय
नेहेमीप्रमाणेच उत्तम लिखाण!