इस्सर हरेल - इस्राएलचा बहिर्जी नाईक
लात्व्हिया या उत्तर युरोपमधल्या बाल्टिक प्रदेशातल्या छोट्याशा देशाच्या राजधानीत - रीगा शहरात महायुद्धाच्या छायेतच जन्माला आलेला वुल्फ गोल्डस्टीन. पुढे स्वित्झरलँडसारख्या निसर्गरम्य देशात त्या देशाच्या लष्करात उमेदीची वर्षं घालवल्यावर सरतेशेवटी १९४८ साली आजूबाजूच्या हजारो ज्यू बांधवांप्रमाणे यानेही इस्राएलमध्ये स्थलांतर केलं. आपल्या मातृभूमीत पाऊल ठेवल्यावर त्याने आपल्या जुन्या नावालाही तिलांजली दिली आणि वुल्फ गोल्डस्टीनचा झिएव आवनी झाला.
हॅझोरिया नावाच्या ज्यू वस्तीत ( ज्याला हिब्रू भाषेत किबुट्झ या नावाने ओळखलं जातं ) या झिएवने आपलं बिऱ्हाड थाटलं आणि स्विस लष्करातल्या आपल्या अनुभवाच्या जोरावर वर्ष - दोन वर्षातच इस्राएलच्या परराष्ट्र मंत्रालयात आपली जागा निर्माण केली. जोडीला युरोपमधल्या अनेक जागांची झालेली भटकंती, त्यातून मिळवलेले अनुभव आणि अवगत केलेल्या भाषा अशा सगळ्या शिदोरीच्या जोरावर त्याने बेल्जीयम या महत्वाच्या युरोपीय देशाच्या राजधानीत - ब्रुसेल्स येथे इस्रायली दूतावासात चांगल्या पदावरची नोकरी पटकावली. आपल्या अदबशीर वर्तणुकीमुळे अल्पावधीत झिएव आजूबाजूच्या सहकाऱ्यांचा आवडता झाला. जोडीला कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास करून त्या विषयाची खडान्खडा माहिती काढण्याची त्याची हातोटी त्याच्या सहकाऱ्यांच्या आणि वरिष्ठांच्या नजरेत भरली.
हळू हळू झिएव दूतावासातल्या परराष्ट्र अधिकाऱ्यांच्या वेशात गुप्तपणे मोसादसाठी काम करणाऱ्या वरिष्ठांच्या वर्तुळात सामील व्हायला लागला. गुप्त खलित्यांची देवाणघेवाण असो, मोसादच्या महत्वाच्या गुप्तहेरांपर्यंत गुप्त संदेश पोचवण्याचं काम असो की एखादी महत्वाची माहिती अपरिचित लोकांकडून काढण्याची जोखमीची कामगिरी असो, झिएव बेमालूमपणे मोसादसाठी हे सगळं पार पाडू लागला. मुरलेल्या गुप्तहेराचे सगळे गुण त्याच्यात एकवटलेले होते. अखेर मोसादच्या इस्राएलमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला बेल्जीयमपेक्षा महत्वाच्या असलेल्या पूर्व युरोपमधल्या एका देशात पाठवायचा निर्णय घेतला. हा देश होता युगोस्लाव्हिया.
१९५० च्या दशकात अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगात आलेलं होतं. समस्त जगाची या दोन महासत्तांनी वाटणी करून टाकायचा चंग बांधलेला होता. प्रत्येक देशाला आपण नक्की कोणत्या बाजूचे आहोत, हे सांगणं एका अर्थाने सक्तीचंच झालेलं होतं. दोन्ही महासत्ता आपापल्या बाजूच्या देशांना शस्त्र आणि पैसा पुरवून जगाचं ध्रुवीकरण करत होत्या. युगोस्लाव्हिया हा देश मूळचा रशियाचा भाग, पण १९४८ साली स्थानिक नेता मार्शल युसीप ब्राज टिटो याने रशियन सर्वेसर्वा जोसेफ स्टालिनशी उभा दावा मांडत आपली वेगळी चूल मांडली. अर्थात त्याला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी अमेरिकेने आपले हात पुढे केलेच ! जगापुढे या मार्शल टिटो यांनी आपल्या पंडित नेहरू आणि इजिप्तच्या गमाल अब्दल नासर यांच्याबरोबर ' अलिप्ततातावादी ' धोरण स्वीकारल्याची भूमिका घेतली असली, तरी या तिन्ही देशांवर साम्यवाद आणि पर्यायाने रशियाचा प्रचंड प्रभाव होताच.
इस्राएल आणि अमेरिका हे दोन देश एकमेकांचे सख्खे मित्र. ज्यू लोकांची इतकी प्रबळ लॉबी अमेरिकेत होती ( आणि आजही आहे ) , की इस्राएलच्या रक्षणासाठी हि लॉबी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरही वेळप्रसंगी दबाव आणू शकते. मोबदल्यात युरोप आणि मध्यपूर्व देशांच्या मधोमध असलेला इस्राएल अमेरिकेच्या या भागातल्या राजकारणातला वजीर म्हणून आजवर काम करत आलेला आहे. युगोस्लाव्हियासारख्या महत्वाच्या देशात मोसाद्ला व्यवस्थित काम करता यावं, म्हणून त्यांना तेथे बेरकी आणि हुशार माणसांची गरज होतीच. झिएव या कामासाठी सुयोग्य माणूस होता.
मोसादच्या अपेक्षेपेक्षा हा झिएव हुशार निघाला. त्याने युगोस्लाव्हियाच्या राजधानीत - बेलग्रेडमध्ये अल्पावधीत स्थिरस्थावर होऊन परिस्थितीचा अंदाज घेतला आणि मोसादच्या इस्राएलमधल्या मुख्यालयात त्याने एक प्रस्ताव पाठवला. बेलग्रेडमध्ये मोसादच्या शाखा सुरु करण्याचा त्याचा प्रस्ताव सुरुवातीला खुद्द मोसादच्या वरिष्ठांनाही पचवायला जड गेला. आजवर युरोपमध्ये आपली कामं दूतावासाच्या प्रशिक्षित आणि विश्वासू कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायची मोसादची पद्धत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या विशेषाधिकारांमुळे सुरक्षित होती, पण या प्रस्तावात सुचवल्याप्रमाणे मोसाद युगोस्लाव्हियासारख्या देशात प्रत्यक्ष कार्यरत होऊन काम करायला लागली, तर कामातली जोखीम शतपटींनी वाढणार हे उघड होतं.
झिएव फार दूरचा विचार करणारा मनुष्य होता. कधी ना कधी मोसाद्ला शत्रूदेशात अथवा इस्राइलबाहेरच्या देशात थेट कारवाया करण्यासाठी उतरावं लागणार, हे तो ओळखून होता. या कारवायांमध्ये मोहीम फत्ते होणं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचं नसलं, तरी दबदब्याचं लक्षण म्हणून नक्कीच ओळखलं जातं हे त्याला ठाऊक होतं. शेवटी तो स्वतः जातीने १९५६ सालच्या एप्रिल महिन्यात इस्राएलमध्ये मोसादच्या कार्यालयात आला आणि त्याने तेव्हाचे मोसादप्रमुख इस्सर हरेल यांच्या भेटीसाठी शब्द टाकला.
कितीही झालं, तरी झिएव एव्हाना मोसादच्या आतल्या वर्तुळात परिचयाचा झालेला होता. त्याला अखेर हरेल यांची भेट घेण्याची परवानगी मिळाली. ठिकाण होत तेल अवीव शहरातल्या जुन्या जर्मन वस्तीतलं एक घर. गुप्तचर विभागाच्या प्रमुखाला साजेसं. हरेल यांना इस्राएलमध्ये 'लिटिल इस्सर' या नावाने ओळखलं जात असे. ते जरी उंचीने जेमतेम असले, तरी त्यांचा आसमंतातील दरारा जबरदस्त होता. अतिशय मुद्देसूद, थंड डोक्याचे आणि आपल्या म्हणण्यावर ठाम राहणारे इस्सर आपला निर्णय विचारपूर्वक घेत असत. चार वर्षांपूर्वी मोसादचा कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी विटेविटेने या संघटनेची बांधणी केली होती. ते स्वतः अतिशय कडक शिस्तीचे भोक्ते. शिवाय कोणत्याही कामगिरीची योजना विचारपूर्वक आणि काटेकोर आखण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी आपल्या हाताखालच्या अनेक सहकाऱ्यांना 'तयार' केलं होतं. अशा या वामनमूर्तीपुढे झिएव उभा राहिला तेव्हा त्याच्या उंच शिडशिडीत शरीराला आदरयुक्त भीतीमुले कंप सुटला होता.
झिएवच्या अपेक्षेविरुद्ध इस्सर अतिशय मृदू आणि शांत निघाले. त्यांनी झिएवचा चांगला पाहुणचार केला.त्याच्या आजवरच्या कामाची प्रशंसाही केली. झिएव इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागल्यावर काही वेळ त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी मुद्द्याला हात घातला.
" तुम्ही इथे जो प्रस्ताव घेऊन आला आहात, तो मला पटलेला नाही. युगोस्लाव्हियामध्ये मोसादची गुप्त शाखा तयार करण्याच्या तुमच्या आग्रहाला माझ्याकडून नकारार्थी उत्तरच मिळेल, कारण हा प्रस्ताव व्यावहारिकदृष्ट्या जोखमीचा आहे... " इस्सर यांनी आपल्या सुविख्यात ठाम स्वभावाला अनुसरून झिएवला आपला निर्णय स्पष्टपणे सांगितला.
झिएव अखेर निराश होऊन उठला. जाता जाता त्याला इस्सर यांनी दोन दिवसांनी पुन्हा एकदा भेटायला येण्याची सूचना केली. या भेटीचं ठिकाण मात्र इस्सर यांनी वेगळं ठेवलं होतं. कदाचित आपल्या प्रस्तावावर इस्सर विचार करत असावेत आणि कदाचित त्यांना यावर अधिक खोलात जाऊन चर्चा करायची इच्छा असावी, असं वाटून झिएव थोडासा खुलला. त्याच्या डोळ्यांसमोर आशेचा किरण दिसायला लागला.
काही दिवस गेल्यानंतर अखेर तो दिवस आला. झिएव शहरापासून थोडं लांब असलेल्या त्या खास जागी ठरल्याप्रमाणे इस्सर यांना भेटायला गेला. एका जुन्या वस्तीतल्या एका सध्या अपार्टमेंटमध्ये ही भेट ठरलेली होती. मुख्य दारातून आत शिरताच झिएव काहीसा गोंधळला. दोन खुर्च्या, एक दणकट लाकडी टेबल, मोडक्या खिडक्या आणि बोडक्या भिंती अशा थाटातलं ते अपार्टमेंट विचित्रच भासत होतं. एका खुर्चीवर बसून तो इस्सर यांची वाट बघायला लागला. इस्सर आले. ज्वालामुखी फुटायच्या आधीची धुमस त्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती.
" तू रशियाने पाठवलेला हेर आहेस हे मान्य कर. तू इथे फक्त आणि फक्त रशियाच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी हेरगिरी करायला आलेला आहेस, हो की नाही? गपगुमान खरं बोल..."आपली पोलादी मूठ दाणकन टेबलवर आपटून इस्सर आपल्या कमावलेल्या आवाजात बोलले. धूम्रपानामुळे जड झालेल्या त्या घोगऱ्या आवाजातली जरब झिएवला जाणवली. त्याच्यासाठी हे इतकं अनपेक्षित होतं , की तो एकदम गांगरून गेला.
" सगळं खरं खरं सांगितलंस तर तुझ्यासाठी ते चांगलं असेल, अन्यथा..." इस्सर पुन्हा एकदा गरजले.
झिएव आता घामाने डबडबला होता. शरीराला कंप सुटून तो जागच्या जागी थिजून गेला होता. तोंडातून शब्दही फुटणं अवघड होऊन गेलं होतं. शेवटी आपलं उरलं सुरलं धैर्य कसंबसं गोळा करून तो थरथरत्या आवाजात बोलायला लागला...
"होय, मी कबूल करतो....मी रशियाची हेरगिरी करतो आणि त्याच कामगिरीवर मी इथे आलो आहे..."
इस्सर यांच्या हाती झिएवच्या विरोधात काहीही पुरावा नव्हता. किंबहुना झिएव याच्याविरुद्ध साधी तक्रारही त्यांच्याकडे नव्हती. पण इस्सर बारा गावचं पाणी प्यायलेले अनुभवी राजकारणी होते. त्यांचा आतला आवाज त्यांना कधीच दगा देत नसे. याही वेळी त्यांनी फक्त आपल्या आतल्या आवाजाला स्मरून हा सगळा प्रकार केला होता. अनेक वर्षांपूर्वी राहत्या 'किबुट्झ'मधून झिएव आपल्या कम्युनिस्ट विचारसरणीमुळे हाकलला गेला होता, ही एकमेव माहिती इस्सर यांच्यापाशी होती. असं असलं, तरी इतक्याशा सुतावरून झिएव हा थेट रशियाचा हेर असल्याचा स्वर्ग गाठणं कोणाच्या मनातही आलं नसतं, पण इस्सर या सगळ्याला अपवाद होते. त्यांच्या तीक्ष्ण नजरेने आणि कुशाग्र बुद्धीने अनेक गोष्टी 'बघितलेल्या' होत्या.
झिएव मोसादच्या आतल्या गोटात शिरायचा इतका प्रयत्न का करत असेल, जोखमींच्या मोहिमा बेमालूम कशा पार पडत असेल आणि अल्पावधीत वरपर्यंत ओळख वाढवून युगोस्लाव्हियासारख्या कम्युनिस्ट देशात मोसादची शाखा उघडायचा बेत का आखात असेल, या सगळ्या प्रश्नांतून इस्सर यांना काही वेगळ्याच शंका आलेल्या होत्या. तशात पहिल्या भेटीत झिएव याला इस्सर यांनी तातडीने इस्रायलला भेट देण्याचं कारण विचारल्यावर त्याने आपल्या आठ वर्षाच्या मुलीने तातडीने भेटायला बोलावलं असल्याचं कारण दिलेलं होतं. इतक्या लहान मुलीने तातडीने भेटायला बोलावणं आणि त्यासाठी झिएवचं लगोलग इस्रायलला पोचणं या घटनाक्रमात इस्सर यांना बऱ्याचशा गोष्टी खटकल्या. अखेर त्यांच्या 'सिक्सथ सेन्स ' ने त्यांना या माणसाच्या मनसुब्यांमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याची खात्री पटवून दिली आणि त्यांनी थंड डोक्याने पुढच्या चाली खेळल्या.
झिएव अखेर कोर्टासमोर उभा राहिला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानेच दिलेल्या जबानीप्रमाणे तो रशियन एजंट म्हणून काम करत होता. खूप लहान असल्यापासून त्याला साम्यवादाचं सुप्त आकर्षण होतं. पुढे स्वित्झर्लंडमध्ये त्याच्यावर GRU ( रशियाच्या कुविख्यात रेड आर्मीची तेव्हाची गुप्तहेर संघटना, जिच्यातून पुढे KGB जन्माला आली ) साठी काम करणाऱ्या काही रशियन हेरांची नजर पडली. त्यांनी झिएवला आपल्या बाजूला ओढून त्याला हेरगिरीचं प्रशिक्षण दिलं. दुसऱ्या महायुद्धात झिएवने या उपकाराची परतफेड केली ती रशियाने सोपवलेल्या हेरगिरीच्या अनेक कामगिऱ्या फत्ते करून. शेवटी रशियाने त्याला एका खास कामगिरीसाठी निवडलं - इस्राएलच्या विरोधात हेरगिरी करून महत्वाची माहिती रशियाला पुरवणं अशी ती कामगिरी जोखमीची होती, पण झिएवसाठी तुलनेने सोपी होती....कारण एकंच, या कामगिरीसाठी ज्यू असण्याचा फायदा करून घेणं त्याला शक्य होतं.
त्याने बेल्जीयमला वकिलातीत प्रवेश मिळवेपर्यंत रशियाने त्याला भरपूर वेळ दिला. वकिलातीमध्ये जम बसवल्यावर झिएवने रशियाला हळू हळू बरीच मौल्यवान माहिती पुरवली. बेल्जीयमच्या शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या ज्या ज्या कंपन्या इस्रायलला आपला माल विकत होत्या, त्यांची भरपूर माहिती त्याने रशियाला दिली.....अगदी इस्राएलच्या परराष्ट्र खात्याच्या सांकेतिक मजकुरांसकट. शिवाय नाझीवादाच्या विरोधातल्या दोघा जर्मन हेरांची - जे इजिप्तसारख्या इस्राएलवर वाकडी नजर ठेवून असलेल्या महत्वाच्या देशात इस्राएलसाठी हेरगिरी करत होते - भरपूर माहिती त्याने रशियाला पुरवली. अशा या आपल्या महत्वाच्या हेराला मग रशियाने अजून अवघड कामगिरी सोपवायचं ठरवलं...इस्राएलच्या नाकावर टिच्चून मोसादमध्ये शिरकाव करायचा आणि आतून मोसाद्ला खिळखिळं करायचं ही ती कामगिरी.
इस्सर हरेल ही व्यक्ती काय चीज आहे, हे झिएवला शेवटपर्यंत कळलं नाही. वास्तविक इस्सर यांच्याकडे झिएवच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नव्हता. पुरावा सोडा, साधा संशय यावा अशीही कोणती माहिती कोणाकडे नव्हती. पण इस्सर यांचा ' सिक्सथ सेन्स ' अतिशय जबरदस्त होता. वरवर विस्कळीत वाटू शकतील असे बिंदू एकत्र जोडून त्यातून ठोस निष्कर्ष काढणं हे इस्सर यांचं वैशिष्ट्य.
झिएव याला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली न्यायालयात आणलं गेलं. १४ वर्षाची शिक्षा होऊन त्याची रवानगी अखेर इस्राएलच्या तुरुंगात झाली. इस्सर यांच्या हातात मोसाद किती सुरक्षित आहे, याची ग्वाही देणारी ही घटना. पुढे या इस्सर यांच्या शिरपेचात खोवला जाणारा एक एक तुरा त्यांचं नाव इस्राएलच्या इतिहासात अजरामर करून जाणार होता. त्यांच्या अशा अनेक कामगिरींमधली एक तुलनेने कमी प्रकाशझोतात आलेली पण इस्राएलच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कामगिरी म्हणजे ‘ ऑपरेशन फिसिबल ‘.
युगोस्लाव्हिया एव्हढा
युगोस्लाव्हिया एव्हढा महत्त्वाचा का ते समजलं नाही लेखातून. झिएवचा background check झाला नव्हता की तो करायची तेव्हा पध्दत नव्हती?
बाकी लेख आवडला आणि पुढच्या लेखाची वाट पहातेय हे वेगळं सांगायला नको.
@ स्वप्ना राज
@ स्वप्ना राज
युगोस्लाविया तेव्हाच्या रशियाच्या हातातला देश, आणि तो युरोपमध्ये असल्यामुळे त्याचं महत्त्व जास्त होतं. शीतयुद्धाच्या महत्त्वाच्या काळात भौगोलिक दृष्ट्या जे देश महत्त्वाचे होते त्यात हा देश होता.
Background check आता जितक्या detail मध्ये करणं शक्य आहे, तितक्या प्रमाणात तेव्हा शक्य नव्हतं...आणि दोन दोन महायुद्धात युरोप आणि मध्यपूर्व पूर्णपणे उध्वस्त झाल्यामुळे तेव्हा लोक सतत एकीकडून दुसरीकडे जायचे....अशा वातावरणात एखाद्या मनुष्याची काटेकोर चौकशी अशक्य होती.
मस्त
मस्त
दअर्बननोमॅड- तुमच्या फिदायीची
दअर्बननोमॅड- तुमच्या फिदायीची आणि ह्याचीही लेखमाला करायला सांगा अॅडमिनना म्हणजे लिंक शेअर करणं सोपं होईल.
हा भाग पण मस्त !!
हा भाग पण मस्त !!
मस्त चालू आहे सिरीज
मस्त चालू आहे सिरीज
सुरूवात चांगली झाली आहे.
सुरूवात चांगली झाली आहे. मोसादबद्दल अनेक ठिकाणी वाचलं गेलं आहे यापूर्वी. तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळं काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अॅडॉल्फ आईकमन प्रकरण नाही लिहीलंत तरी चालेल.
Explanation बद्द्ल धन्यवाद
Explanation बद्द्ल धन्यवाद
अॅडॉल्फ आईकमन प्रकरण नाही
अॅडॉल्फ आईकमन प्रकरण नाही लिहीलंत तरी चालेल.
>> लीहू द्या हो. या प्रकरणातली नविन माहीती किंवा नवा पैलू कळेल.
बाकी नेहमीप्रमाणे ही लेखमाला मस्त चालू आहे.
लीहू द्या हो. या प्रकरणातली
लीहू द्या हो. या प्रकरणातली नविन माहीती किंवा नवा पैलू कळेल.>>>> आले पुढचे भाग त्यावरच. मी स्किप करेन.
आईकमॅन, एटुंबे वगैरे वाचले
आईकमॅन, एटुंबे वगैरे वाचले आहे पण त्या प्रकरणांमध्ये इतका थरार आहे की परत वाचायला आवडेल.
छान आहे लेखमाला.