अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)
अमेरिकेतील स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा १८०७ मध्ये लागू झाला. या कायद्यानुसार अफ्रिकेतून अमेरिकेत गुलामांची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली. १८०३ मधल्या लुइझियाना पर्चेस करारानुसार मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेली जवळपास ८,२७,००० स्क्वेअर मैलाची जमीन अमेरिकेने फ्रांसकडून विकत घेतली. मिसिसिपी नदीच्या किनार्यावरची दक्षिणेकडील जमीन खूप सुपीक होती. एवढ्या प्रमाणात सुपीक जमीन उपलब्ध झाल्यामुळे दक्षिणेतील प्लँटेशन्स/शेतामध्ये वाढ झाली. विविध पिकांची लागवड वाढली आणि शेतातील कामांकरता जास्त लोकांची गरज भासू लागली. स्लेव्ह ट्रेड वर बंदी आल्यानंतरही फ्लोरिडा आणि टेक्सास (जे तेव्हा अमेरिकेचा भाग नव्हते) मधून गुलामांची चोरटी आयात चालू राहिली. या गुलामांना आणणार्या जहाजांच्या कॅप्टन्सना पकडले तरी फारशी कडक शिक्षा होत नसे. नवीन कायद्यानुसार गुलामांच्या आयातीवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी अंतर्गत व्यापारावर मात्र बंदी नव्हती. या काळात स्लेव्ह्जची वाढलेली मागणी आणि बाहेरुन स्लेव्ह्ज आणण्यावर आलेली बंदी यामुळे अंतर्गत व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उत्तरेतील स्लेव्ह्ज हे मुक्त झालेले होते, कुटुंबाबरोबर एकत्र राह्त होते. या "फ्री" झालेल्या गुलामांना अनेकदा फसवून पळवून आणून दक्षिणेत दूर कुठेतरी विकून टाकले जात असे. त्यांचा परतीचा मार्ग जवळपास बंदच होऊन जाई. एक तर त्यांच्यावर विकत घेणारे कोणी विश्वास ठेवत नसत, आणि खरे बोलल्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अनेकदा दलालांकडून मारहाण व्हायची त्यामुळे ते सत्य सांगायला घाबरत असत. पळून जाणार्या स्लेव्हजना पकडण्याकरता शिकारी कुत्रे, बंदुकधारी पोलीस, मालकाची माणसे ही मागावर असायची आणि २ पायांवर पळण्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा. जाउन जाउन एवढ्या मोठ्या देशात किती दूर जाणार!
(स्रोत - http://abolition.e2bn.org/ , www.downtoearth.org.in)
या काळात कापुस, ऊस, गहु, कणीस या पिकांची लागवढ वाढली त्याचबरोबर स्लेव्ह्जची मागणी आणि किंमतही वाढली. इलाय व्हिटनीने कॉटन जिन या यंत्राचा शोध लावल्यावर कापसातून सरकी (बी) काढणे सोपे आणि वेगवान झाले. पूर्वी ते काम गुलाम हाताने करत, आणि त्यात खूप वेळ जात असे. पण कॉटन जिनने कापसावर प्रक्रिया करण्याच पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणला आणि कापसाची मागणी प्रचंड वाढली. शेतीत दिवसरात्र काम करण्याकरता चिवट, कामसू स्लेव्ह्ज लागत. निरोगी पुरुष गुलामाची किंमत स्लेव्हरीच्या सुरुवातीला सतराव्या शतकात १० डॉलर्सपर्यंत होती, ती "डीप साउथ"मध्ये (लुइझियाना, मिसिसिपी, अॅलाबामा, जॉर्जिया, साउथ कॅरोलिना) एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत १२००-१५०० डॉलर्सपर्यंत वाढली. किंमत वाढली तशी जास्त कामाची अपेक्षा ठेवली जाऊ लागली. दक्षिणेतील बागायतदार अतिशय श्रीमंत होते. कापसाच्या पिकाने तर त्यांच्या संपत्तीत फार मोठी भर पडली होती. पण त्या श्रीमंतीचं वारंही कधी त्यांच्या स्लेव्ह्जना लागलं नाही. त्यांना दरवर्षी मालकाकडून कपड्यांचा जोड, मोजे, बूट आणि थंडीकरता कोट मिळे. हे त्यांना वर्षभर पुरवून वापरावे लागे. लहान मुलांना बहुतेकवेळा काहीच कपडे मिळत नसत त्यामुळे ते उघडेच असत. या स्लेव्ह्जना दर शनिवारी कणसाचे भरडलेले पीठ, थोडासे डुकराचे मास, काकवी, एखाद्या दोन भाज्या वगैरे अशी आठवड्याभराकरता शिधा मिळत असे. सगळे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असत, प्रमाण कमी असे आणि ते एक आठवडा पुरवावे लागे. ही शिधा दर माणशी मिळत असे. पुरुषांना जास्त, आणि स्त्रिया-मुलांना कमी. राबणार्या माणसांना हे जेवण पुरत नसे त्यामुळे त्यांचे पोषण नीट होत नसे. शेतावर काम करणार्या स्लेव्ह्जना सूर्योदयाच्या आधी घर सोडावे लागे त्यामुळे रोज भल्या पहाटे त्यांना स्वयंपाक करुन, जेवणाचा डबा घेऊन निघावे लागे. थोडी मोठी परंतु अजुन कामावर न जाणारी भावंडे लहानांच्या जेवणाची, संगोपनाची जबादारी घेत. सूर्यास्तानंतरच दिवसाच्या अतीव श्रमानंतर हे स्लेव्ह्ज घरी येत. कुपोषणामुळे बालमृत्यूदर जास्त तर स्लेव्हजचे आयुर्मानही कमी असे.
नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया येथील स्लेव्ह्जची परिस्थिती ही "डीप साउथ" मधल्या राज्यातील स्लेव्ह्जपेक्षा जरा बरी होती. क्वचित काही जणांचे मालक त्यांना माणुसकीनेही वागवत. काम संपल्यावर इतर मार्गाने अर्थाजन करु देत, जवळपास विकल्या गेलेल्या मित्रमंडळी किंवा कुटुंबियांना अधुन मधुन भेटू देत. अर्थात गुलाम हा त्यांचा हा दर्जा तसाच असे, आणि परिस्थिती कधीही बदलू शकते याची त्यांना सतत जाणीव असे. कधी काही दयाळू मालक त्यांना मृत्यूनंतर मुक्तही करत असत. पण स्लेव्ह मुक्त करणे म्हणजे पैशावर पाणी सोडण्यासारखे असल्याने ते फार कमी प्रमाणात केले जायचे. स्वयंपाकघरात, बागेत, घोड्याच्या पागेत, दाई, नोकर, मदतनीस म्हणून काम करणार्या स्लेव्हचे आयुष्य शेतात काबाडकष्ट करणार्या त्यांच्या बांधवांपेक्षा थोडे बरे असायचे. परंतु स्लेव्ह्जना त्यांची जागा दाखवून देण्याकरता त्यांच्यावर वचक ठेवणे आवश्यक आहे आणि त्याकरता त्यांना नियमितपणे मारहाण, अपमान, खच्चीकरण करणे गरजेचे आहे अशा विचाराचे मालक आणि मुकादम सर्वच स्लेव्ह राज्यात जास्त होते.
माणूस हा मोठा चिवट प्राणी आहे, आणि ते या गुलामांच्या बाबतीत वेगळे कसे असेल! या अशा मानहानीकारक जीवनातही कसं पुढे चालत रहायचं, आनंदी रहायचं हे ते शिकले होते. किंबहुना याशिवाय वेगळे आयुष्यच त्यांना महिती नसल्याने असेल त्या परिस्थितीतून चांगल्या गोष्टी घडवण्याचा ते प्रयत्न करीत. चार ठिकाणी विकले जाऊन वेगळं आयुष्य जगून आलेले स्लेव्ह्ज हे बाकीच्या ठिकाणची इतरांना माहिती द्यायचे. रविवार हा त्यांचा सुटीचा दिवस. इतर दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत व्यस्त असलेले हे लोक रविवार सकाळ ही चर्चमध्ये घालवायचे. जवळच्या शेतातील स्लेव्ह्जशी, तिथे विकल्या गेलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींशी भेट होईल. गप्पांना उधाण येई. भक्तीसंगीतात या लोकांना विशेष रस होता. वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचून, त्यांना संगीत देउन ती मिळून गाणे हे त्यांच्या गेलेल्या आठवड्याचा शीण घालवण्याचे साधन असे. हे अफ्रिकन अमेरिकन गुलाम मूळतः भाविक होते. सगळ्या चिंता येशूवर टाकून ते जीवन जगत. याच रविवारच्या कार्यक्रमात बरेचदा चोरुन लिहावाचायला शिकवण्याचा कार्यक्रमही चाले. उत्तरेतून आणली गेलेली मुक्त माणसे ही शिक्षित असत, तसेच काही स्लेव्ह्जही चोरुन लिहावाचायला शिकलेले असत. या रविवारच्या चर्च भेटीमध्ये मग चोरुन लिहावाचायची शाळा चाले. स्लेव्हजच्या झोपडीमध्ये (छोटेसे लाकडी कॉटेज) कुठल्याही प्रकारचे लिहावाचनाचे साहित्य सापडल्यास, तसेच कुठेही ते शिकताना आढळल्यास त्यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा होत असे. या लोकांना अशिक्षित ठेवणे हे त्यांच्या मालकांच्या फायद्याचे होते. पण तरीही त्यांचे शिकणे थांबत नसे. शिकायची, वाचायची, जगात काय चालले आहे हे जाणून घ्यायची, या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची त्यांची धडपड चालू असे.
अमेरिकन ब्लूज या संगीत प्रकाराचा जन्म हा दक्षिणेतील शेतांमध्ये झाला आहे. दक्षिणेतल्या शेतात जेंव्हा अनेक स्लेव्हज एकत्र काम करत तेंव्हा शीण कमी व्हावा, उत्साह वाटावा म्हणून ते समूहाने गाणी गात, तोंडानेच वाद्यांचा आवाज काढीत. या गाण्यांचे विषय हा बहुतांशी येशू, निसर्ग, काम, त्यांची परिस्थिती वगैरे हे असत. ही गाणी सकारात्मक असत. बरेचदा त्यांचे शब्द हे ऐनवेळेला बनत. बरेचदा त्यांच्यातल्याच एखादा आघाडीचा गायक आणि मागे त्याचे शब्द कोरसमध्ये गाणारी इतर मंडळी असा हा कार्यक्रम चाले. या दक्षिणेतल्या गुलामांच्या गाण्यांमधून ब्लूज उदयास आले. जाझ या संगीतप्रकाराचा उदयही न्यू ऑर्लियन्समधील अफ्रिकन अमेरिकन लोकांच्या संगीतातून झाला. R&B, हिप-हॉप, रॅप, सोल या सर्व संगीतप्रकारांवर अफ्रिकन अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव आहे. स्लेव्ह्जनी अफ्रिकेतून ड्रम्स, बाँगो, झायलोफोन आणि इतर अफ्रिकन वाद्य अमेरिकेत आणली. शेतात, चर्चमध्ये किंवा समुहात गाणी गाताना, नाचताना थोड्या काळापुरते ते आपले कष्टप्रत आयुष्य विसरुन जीवनाचा आनंद घेत. संगीत त्यांना सर्व विवंचनांपासून क्षणीक मुक्ती देत असे. या गुलामांनी आपली खाद्य संस्कृतीही अफ्रिकेतून आपल्याबरोबर आणली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं असं एक जग हे या गुलामांनी अमेरिकेत निर्माण केलं.
(स्रोत - gorhamschools.org)
एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अमेरिकेत अॅबॉलिशन मूव्हमेंट सुरु झाली. या चळवळीच्या अंतर्गत उत्तरेतील अनेक श्वेतवर्णीय लोकांनी स्लेव्हरीला विरोध आणि ती रद्द करण्याकरता कायदा करण्यास आग्रह करायला सुरुवात केली. अमेरिकेच्या फाउंडींग फादर्सपैकी बेंजामिन फ्रॅ़कलिन, थॉमस जेफरसन यांचे मत हे स्लेव्हरी बंद करण्याला अनुकुल होते, पण अमेरिका स्वतंत्र झाल्यावर दक्षिणेतील राज्यांच्या दबावामुळे असा काही कायदा बनू शकला नाही. जेफरसनने १८०७ झाली स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा आणला, पण त्याचे इतर प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. स्लेव्हरीला विरोध आणि बंद करण्याकरता प्रयत्न इतरही काही नागरिकांकडून होत होते. १८१६ साली स्लेव्हरी बंद करणे, आणि गुलामांना परत अफ्रिकेत पाठवणे या विचाराने एकत्र येऊन काही नेते आणि नागरिक यांनी American Colonization Society ची स्थापना केली.
१३ राज्यांना घेऊन स्वतंत्र झालेल्या अमेरिकेत एकोणीसाव्या शतकात नवीन राज्यांची भर पडत होती. कोणत्या राज्यात स्लेव्हरी चालू ठेवायची आणि कोणत्या राज्यात तिच्यावर बंदी आणायची यावरुन सतत राजकारण होत होते. उत्तरेतली राजे स्लेव्हरीच्या विरोधात होती तर दक्षिणेतल्या राज्यांना स्लेव्हरी हवी होती. कोणालाही दुसर्याला वरचढ होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे नवीन राज्य देशात सहभागी झाले की ते स्लेव्ह स्टेट ठेवायचे की फ्री यावरुन वातावरण तापत असे. १८२० साली मिझुरी हे राज्य जेंव्हा देशात सामील होणार होते तेंव्हा मात्र परिस्थिती चिघळली. मिझुरी जेंव्हा राज्य झाले तेंव्हा दक्षिण आणि उत्तर दोघांनीही त्या राज्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत होते. या राज्याने स्लेव्ह स्टेट बनण्याकरता परवानगी मागितली. पण त्यामुळे अमेरिकन संसदेत स्लेव्ह राज्यांची संख्या वाढली असती, त्यांचे वर्चस्व वाढले असते, त्यामुळे उत्तरेकडील राज्ये मिझुरी राज्याला स्लेव्ह स्टेटचा दर्जा देण्यास सहमत नव्हते. बरेच राजकारण होऊन शेवटी एक तोडगा काढण्यात आला.या तोडग्या नुसार (मिझुरी काँप्रमाइज) स्लेव्ह आणि फ्री राज्यांची संख्या सारखी ठेवण्याकरता मेन (Maine) या राज्याला फ्री तर मिझुरीला स्लेव स्टेट म्हणून परवानगी देण्यात आली. तसेच देशाच्या मध्यातून एक काल्पनीक पूर्व पश्चिम रेषा आखून (अक्षांश ३६° ३०') यापुढे या रेषेच्या उत्तरेला सामील होणारे राज्य फ्री स्टेट तर दक्षिणेतील राज्य स्लेव्ह स्टेट असेल असा कायदा मंजुर करण्यात आला. तोडगा काढून मिझुरीला स्लेव्ह राज्य बनविल्यामुळे उत्तरेत दक्षिणेबद्दल कमालीची नाराजी आणि असंतोषाची भावना निर्माण झाली. 'मिझुरी काँप्रमाइज' करारामध्ये अमेरिकेतल्या यादवीची बिजे रोवली गेली. या करारानंतर अॅबॉलिशन मूव्हमेंट जास्त शिस्तबद्द, प्रखर झाली. विल्यम गॅरिसन लॉइड याने आपल्या काही साथीदारांबरोबर ही चळवळ सुरु केली. लॉइड हा स्वतः मोठा सुधारक होता आणि त्याच्या वर्तमानपत्रामधून स्लेव्हरीच्या विरोधात सतत लिहायचा. स्लेव्हरी तातडीने रद्द करुन सर्व गुलामांना मुक्त करण्याचा अॅबॉलिशनिस्ट्सचा आग्रह वाढायला लागला. तात्वीक पातळीवर त्यांचा माणसांना गुलाम म्हणून वागवण्यास विरोध होता, आणि एकही नवे राज्य स्लेव्ह स्टेट बनू नये अशी त्यांची इच्छा होती. न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्समध्ये सुरु झालेल्या या चळवळीला संपूर्ण उत्तरेकडून पाठींबा मिळायला लागला. १८३० साली अॅबॉलिशन मूव्हमेंट स्लेव्हरी रद्द करण्यामागील अधिकृत चळवळ बनली.
(स्रोत - http://www.compromise-of-1850.org/missouri-compromise-1820/)
स्वतःच्या फायद्यासाठी स्लेव्हरी सुरु ठेवण्याकरता दक्षिणेकडील राज्ये करत असलेले राजकारण हे उत्तरेकरता क्लेषकारक होते. दक्षिणेकरता स्लेव्ह्ज ही त्यांची मालमत्ता होते, त्यात त्यानी प्रचंड पैसा गुंतवला होता आणि त्यापासून त्यांना फारकत घ्यायची नव्हती. त्यात त्यांचा मोठा तोटा होता. मिझुरी काँप्रमाइज या करारानंतर उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील अविश्वासाचे आणि तिरस्काराचे वातावरण तीव्र झाले. या सगळ्याचे मूळ असलेले गुलाम यापासून अनभिज्ञ होते का? उत्तर दक्षिणेच्या सीमेवर असलेल्या राज्यातील गुलामांना याची कुणकुण लागलेली होती. पण याबद्दल अक्षरही काढण्याची मुभा नव्हती. डीप साऊथमधील गुलामांना तर अशा काही चळवळीची, त्यांना मदत करु इच्छीत असणार्या लोकांबद्दल काहीही कल्पना नव्हती. एक तर त्यांचे आयुष्य शेतामध्ये राबण्यात जायचे, त्यांच्यापर्यंत कुठल्याही बातम्या कोणत्याही मार्गाने पोहोचत नसत, आणि बहुसंख्य गुलाम हे अशिक्षित होते, जे शिक्षित होते त्यांना काहीही वाचण्यास मनाई होती. हे स्लेव्ह्ज उत्तर दक्षिणेच्या मोठ्या राजकारणात फक्त प्यादे होते.
पळून जाउन स्वतःला मोकळे केलेल्या गुलामांमध्ये फ्रेडरिक डग्लस याचे नाव फार मोठे आहे. हा गुलामीच्या जाचाला कंटाळून उत्तरेला फक्त पळून गेला नाही तर तिथे गेल्यावर तो अॅबॉलिशनिस्ट चळवळीमध्ये भरती झाला आणि लॉइडबरोबर ठिकठिकाणी दक्षिणेतील गुलामांच्या आयुष्याबद्दल बोलू लागला. प्रभावी वक्तृत्वाची त्याला देणगी होती. या पूर्वी फक्त श्वेतवर्णिय लोक या चळवळीत भाग घेऊन स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल भाषणे देत पण डग्लसच्या रुपाने लोकांना थेट माजी गुलामाकडून त्यांच्या जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर जगत असलेल्या जीवनाबद्दल कळायला लागले. डग्लसच्या आगमनाने अॅबॉलिशन चळवळीचे रुप पालटले आणि लोकांचा पाठींबा अजुन वाढला. सोजर्नर ट्रुथ, हॅरिअट टबमन ही देखील या चळवळीतील मोठी नावे आहेत. दोघीही जन्मतः गुलाम होत्या आणि पळून जाऊन त्यांनी स्वतःला मुक्त करवले. त्यानंतर सारे आयुष्य त्यांनी इतर गुलामांना पळून जाण्यास मदत करण्यात वेचले. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा याकरता चालू असलेल्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत श्वेतवर्णीयांबरोबरच अनेक कृष्णवर्णीय अॅबॉलिशनिस्ट्स या चळवळीत सहभागी झाले आणि त्यांनी मिळून ही चळवळ पुढे नेली. पळून आलेल्या गुलामांना सुखरुपपणे सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी 'अंडरग्राउंड रेलरोड' म्हणजेच सुरक्षित घरांनी बनलेल्या मार्गाची दरतूद या अॅबॉलिशनिस्ट्सनी केली. या ठिकाणचे लोक पळून आलेल्या स्लेव्ह्जना आपल्या घरी लपवून ठेवत आणि पुढे सुरक्षितपणे पाठवत. अनेक लोकांनी स्वतःला होत असणार्या त्रासाची तमा न बाळगता स्लेव्हनजा पळून जाण्यास मदत करण्याकरता या योजनेत भाग घेतला.
फ्रेडरिक डग्लस, सोजर्नर ट्रुथ, हॅरिएट टबमन
(स्रोत - en.wikipedia.org)
ब्रिटनने १८३३ मध्ये आणि फ्रांसने १८४८ मध्ये स्लेव्हरी रद्द करणारा कायदा आणला. अमेरिकेतही स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल दबाव येत होता, पण त्याकाळात सत्तेवर असणारे प्रमुख हे दक्षिणेतील राज्यांच्याबाबतीत मऊ धोरण असणारे आणि दक्षिणेच्या विरोधात जायला घाबरणारे होते. अशात १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन याची नेमणून झाली. स्लेव्हरीला विरोध करणारा आणि त्याकरता काहीतरी परिणामकारक उपाययोजना करण्याची मनापासून इच्छा असणारा हा नेता अमेरिकेच्या लोकांनी निवडून आणला हे गुलामांचेच नव्हे तर अमेरिकन लोकांचे भाग्य होते. लिंकनच्या कारकिर्दीतली पुढील ५ वर्षे निर्णायक आणि झंझावती असणार होती.
स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org
(maitrin.com या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित)
------
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ३)
हा ही भाग छान !
हा ही भाग छान !
वाचतेय . खूप छान लिहितेस
वाचतेय . खूप छान लिहितेस
उत्तम माहिती मिळतेय. लिहीत
उत्तम माहिती मिळतेय. लिहीत रहा. .
छान
छान
अतिशय माहितीपूर्ण लेख
अतिशय माहितीपूर्ण लेख
वाचतोय.
वाचतोय.
हे गुलामगिरीचे समर्थन करणारे साउथ मधले बहुतेक सदर्न डेमोक्रॅट्स होते. उलट गुलामगिरी नष्ट करायला उत्सुक जी पार्टी होती व जो अध्यक्ष होता( अॅब्रॅहम लिंकन) तो रिपब्लिकन पार्टीचा होता. त्या काळातले बहुतेक कृष्णवर्णिय लोक रिपब्लिकन पार्टीकडे झुकणारे होते.
तिथपासुन आजपर्यंत डेमोक्रॅटिक पार्टी( बहुतांशी क्रुष्णवर्णिय लोक आज डेमोक्रॅटिक पार्टीला पाठिंबा देतात)व रिपब्लिकन पार्टी यांचा क्रुष्ण्वर्णिय लोकांबाबत रोल रिव्हर्सल कसा झाला याचा रंजक इतिहास तुमच्या या लेखमालेतुन वाचकांच्या पुढे येइल अशी आशा आहे.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
मुकुंद, democrats आणि republicans आणि त्याच्या रोल रिव्हर्सलबद्दल लेखमालिकेत पुढे लिहिणार आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर फार इंटरेस्टिंग माहिती आहे ती!
नुकतेच, बायडेन नी २०
नुकतेच, बायडेन नी २० डाॅलरच्या नोटवरून अँड्र्यू जॅकसन काढून हॅरीयेट टबमन चा फोटो छापण्याची प्रक्रिया परत सुरू केली आहे.
वाचते आहे. चांगली माहिती!!
वाचते आहे. चांगली माहिती!!
हा ही लेख छान!
हा ही लेख छान!
सर्व वाचकांचे धन्यवाद.
सर्व वाचकांचे धन्यवाद.
लेखात मागील आणि पुढील भागाची लिंक टाकली आहे.
छान माहितीपुर्ण लेखमाला.
छान माहितीपुर्ण लेखमाला.
पुभाप्र...
माहितीपूर्ण लेखमाला. छा न !
माहितीपूर्ण लेखमाला.
छा न !