झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या सगळ्यांना :-))))
DJ अजून येऊदे..धमाल येतीय वाचायला..हा हा
दिग्दर्शक डोक्यावर पडलेला दिसतोय....काहीही च्या पुढची स्टेज दाखवत आहेत....total मूर्खपणा

धमाल येतीय वाचायला..हा हा
दिग्दर्शक डोक्यावर पडलेला दिसतोय....काहीही च्या पुढची स्टेज दाखवत आहेत....total मूर्खपणा >>>>>>आज सगळेच पिसे छान काढत आहेत

मी थोडे लांबून बाल्कनीतून टीव्ही बघत होते.. चिन्याला बघितले तर तर मला एकदम घुबडच आले डोळ्यासमोर.. ते कुरळे केस आणि त्यावर तो गोल चष्मा..

मोमो गोड आहे.
नवीन Submitted by चंपा on 18 March, 2021 - 21:39

>>>> इनोसन्ट पन वाटते Happy

नलू टायटल साॅन्ग मधे मात्र रोलमधून बाहेर पडून नाचते. >>>>>> दाखवायला की, एकेकाळी नलू शाळा-़कॉलेजच्या गॅदरिन्गजमध्ये नाचायची, ते गुण तिच्या मुलीमध्ये आलेत.

बादवे, शकू म्हणत होती की नलू आधी श्रीमन्त होती आणि ही गरीब, मग नलूच हे श्रीमन्त टू महादरीद्री ट्रान्सफॉमेशन कस काय झाल?

आज बांगड्याच्या सीनमध्ये स्वीटू अगदी भामट्यासारखी बघत होती. तिने ती बांगडी दिली नसती तर बांगडी चोरल्याचा आरोप तिच्यावर झालाच असता घड्याळासारखा, पण आव तर असा आणला जणू काही ही अगदी भाबडी आहे.

तो लाल रंग पडतो तो भाग बघितला. आधी रंग पडला आणि मग स्वीटूने पाय त्यात बुचकळले Uhoh शकू कोणालातरी जमीन पुसायला बोलावतेय तरी तश्याच रंगाच्या पायांनी घरात शिरली

मध्ये माझ्या एका मैत्रिणीने एका पोस्टवर कमेंट टाकलेली म्हणून मला fb वर प्रोमो दिसला, त्यात sweetu अंबरनाथहून मुंबईत कशी जाणार हा प्रश्न, ती अंबरनाथला होती आणि चहा करत होती बहुतेक आणि gas शेगडी मागे सिल्कचे दोन पडदे त्या खिडकीतून ओम डोकावत होता.

लोकांनी असलं झोडलेले, त्यात मीही हात धुऊन घेतले. इथे पुणे मुंबई रोज येतात जातात लोकं, पार कर्जत कसारा ते वेस्टर्न, पालघर वगैरे पण करणारी आहेत आणि अंबरनाथ पासून प्रवास करते sweetu त्याचं कसलं फालतू कौतुक. त्या पडद्यावर मी काही लिहिलं नव्हतं पण तेही झोडले बऱ्याच जणांनी.

मी पाच माणसांच्या हिशोबाने केलेली भेंडीची भाजी एका वेळेला जेमतेम पुरते.स्वीटूने पाच जणांसाठी केलेल्या भाजीत आणखी तीन जण जेवले आणि आणखी तीन जणांना पुरेल इतकी भाजी कढईत होती.
साळवी कुटुंबाच रडगाणं कधी थांबणार आहे. स्वीटू 4-5 वर्षाची लहानगी आहे का तिला candle light dinner च्या गप्पा सांगतायत जस काय तिला लगेच पटेल.
तायडी जाम माजोरडी आहे. ओम गोड आहे.
स्वीटूला सांगा कीचनमध्ये तरी केस बांधून येत जाग बाई .

स्वीटूला सांगा कीचनमध्ये तरी केस बांधून येत जाग बाई .>> ५ जणांसाठी केलेल्या भाजीत अजून ३ जण कसे जेऊ शकले अन अजून तीन जणांसाठी कढईत भाजी कशी उरली याचं गुपीतच मुळी स्विटूच्या मोकळ्या सोडलेल्या केसांत आहे Wink

आजच्या भागात तो भेंडीच्या भाजीचा सीन प्रसारीत झाला. संदर्भासहित स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :

रात्रीच्या जेवणासाठी... ओह... सॉरी फॉर मिडलक्लास वर्ड. डिनरसाठी.. Wink सगळे खानविलकर्स डायनिंग टेबलवर बसलेले असतात. ओम्या मात्र गायब असतो. मग वेळ टळुन चालली तरी ओम का आला नाही म्हणुन तायडा सर्वांना ओमचे अपडेटस विचारते. त्याचवेळी जेवणाचा बेचव मेनु सर्वांना समजतो. तिकडे स्विटूच्या ऑटहाउस मधे ओम जेवायला बसलेला आतो (हिला आउटहाऊस मधे टाकलेलं मिसलं...). जेवणाची ताटं कमी पडतात कारण नोकर सुद्धा तिथेच जेवायला बसलेले असतात. मग ओम स्विटूला म्हणतो की एकाच ताटात जेउया ... मग क्काय .... लालाला.. लालाला... ला.. ला.. ला.............. लालाला.. लालाला... ला.. ला.. ला............. सुरू होतं Bw
स्विटूने भेंडीची भाजी बनवलेली असते जी खूप चविची आहे असं ओम अन नोकर म्हणतात. ओम त्या भाजीचे फोटो काढून रॉकीला पाठवतो अन ते बघून रॉकीला डिनर टेबलवरचा बेचव मेनु खाण्यापेक्षा भेंडीची भाजी खायची इच्छा होते... अन तो कारण सांगून तिथून सटकतो.. मोमोला पण याची कुणकुण लागते अन तिही मागोमाग आउटहाऊस ला पोचते. मग बाबा खानविलकर देखिल जातात. असे सगळेच गायब होतात अन तायडाचा पारा चढू लागतो. ती मोहितला त्यांच्या मागावर धाडते अन तो ऑटहाऊस मधे डिनर पार्टी चालू आहे याची खबर तायडाला देतो. उपाशीपोटी बसलेली तायडा भयानक चिडते अन आउटहाऊस गाठते. तिथे तिला सर्वजण नाचताना दिसतात. खाऊ की गिळू अशा अवतारातील तायडीला बघून सर्वांची तंतरते अन मोमो देखील जेवायला भेंडीची भाजीच हवी असं सांगते. रागावलेल्या तायडीच्या तावडीतून सुटताना रॉकी, बाबा खानविलकर, ओम, मोमोची मस्त मनीमाऊ होते अन एकेकजण तिथून सटकतो.

तिथून बाहेर आल्यावर मोहीत तायडाचे कान भरतो की ओम अन स्विटूचं 'काहीतरी' चालू आहे Wink . ते ऐकुन तायडी अजुनच चवताळते अन स्वतःचा बुट काढुन तो मोहितला स्वतःच्या गालावर हाणून घ्यायला लावते. त्या असह्य अपमानाने मोहित भविष्यात अपमानाचा बदला घेण्याचा प्लॅन आखत तो बुट हाणुन घेतो Proud

मग पुढच्या सीन मधे ओम रॉकीला तो आता स्विटूशिवय जगु शकत नाही असं ऐकवतो अन त्याचा मोमो सोबतचा साखरपुडा रद्द होइल किंवा लांबणीवर पडेल असं काहीतरी करायची गळ घालतो. रॉकी देखिल त्याला मदत करण्याची तयारी दाखवतो.

त्यानंतर हिरवळीवर पहुडलेला ओम्या स्विटूला तिथं पाहून चांगलाच रंगात येतो अन त्याच वेळी स्विटूला आईला दिलेले वचन आठवत ती लगेच तिथून बाजुला होते अन लालाला.. लालाला... ला.. ला.. ला.............. लालाला.. लालाला... ला.. ला.. ला............. सुरु होता होता रहातं Biggrin

काहीच्या काही एपिसोड..
एकाच ताटात काय जेवायचं.. तेसुद्धा या कोरोना काळात...
नवरा असला तरी एका ताटात जेवण योग्य नाही हो... Wink

स्वीटु ने केलेली भेंडी ची भाजी म्हणजे कसलं गरगटं दिसत होतं..आणि सगळे मिटक्या मारत खात होते. जरा फूड फोटोग्राफी पुरती छान दिसणारी भाजी करयची ना..
भाजी च्या क्वांटीटी बद्दल सहमत... स्वीटु ने जेमतेम पाव किलो भेंडी फोड्णीला टाकली...
हे म्हणजे असं झालं..
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला ||

आणि जपान हुन शिताके मश्रुम मागवायची काय गरज...इथे पुण्या मुंबैत पण मिळतात की. जपान हुन मशरुम पोचेतोवर ते शिळे होतील त्यापेक्षा इथे फ्रेश मिळतील एवढं शिंपल लॉजिक नाही का या लोकांना ?
शिताके म्हणत होते पण मोहीत च्या हातात शेजारच्या सुपर मार्केट मधुन आणलेले बटन मश्रुन च दिसत होते.

छळ मांडलाय .
टीपिकल होतं चाललय सगळं
ते कंगन प्रकरण बघून मैने प्यार किया ची आठवण येतेय .
मोमो ईतकीही मुर्ख नाही आहे , सोन्याच्या बांगड्यानी खेळायला .
स्वीटुचे उदत्तिकरण करण्याच्या नादात काहीही दाखवतात .
आणि सगळे चेहरे पाडून तिच्याकडे बघत काय बसतात , जायचं आणि काढून घ्यायचे तिच्याकडून .

तो स्विटूला फसवणारा, तिला पाहायला आलेला एनआरआय मुलगा स्टार प्रवाह वरच्या 'नवीन लक्ष्य' च्या ह्या रविवारच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे

कसला पोरखेळ चाललायं या मालिकेत.
त्या मोमोच कार्टून केलयं.
इतक्या मोठ्या businessman ची मुलगी , जी त्याच्या businessesमध्ये लक्ष घालते , इतकी बावळट नाही असू शकत.

आणि मुळात स्वीटूच कर्तुत्व काय ?? ती नलू मावशीची मुलगी , इतर उद्धट श्रीमंत लोकांपेक्षा वेगळी म्हणून ओम तिच्या प्रेमात पडतो?
आणि मोहित येऊन गोड गोड बोलतो आणि नलु भुलली.

सगळ्यात गोड तर तो रॉकी आहे. किती गोड बोलतो तो.
"ओम भाई".

काल तायडीने अचानक पार्टी अरेंज केली का तर त्यांच्या फिटनेस व्यवसायाला २५ वर्षं पूर्ण झाली. पार्टीची थीम सर्वांनी काळे कपडे घालायचे. अर्थात पार्टीसाठी अतिशय उत्सुकतेने व्युज सांगणार्‍या स्विटूलाच इज्जत काढत येऊ नको असं घरातील सर्वांसमोर बाणेदारपणे सांगायला तायडी आजिबात बिचकत नाही Proud . असा पाणौतारा झाला तरी ओम स्विटूच्या खोलीत जाऊन निदान त्याच्या आईसाठी तरी पार्टीला यायची गळ घालतो त्यावर स्विटू ती कशी गरीब घरातली अन खानवीलकर कसे उच्च ब्ला ब्ला करुन ती ओम्याला न येण्याचं कारण देऊन कटवते. इकडे कटवा-कटवी सुरु असते तेंव्हा तिकडे खाली चारच्या शेजारी पार्टीला निघण्याच्या तयारीत असणार्‍या तायडा अन शकुचं संभाषण सुरुच असतं. तायडाने नवीन काळा ड्रेस अन शकूने फिकट काळपट सोनेरी काठाची साडी नेसलीली असते. तायडा शकूचा स्विटूला सोबत घेण्याचा मानस ऐकुन जाम चिडते अन शकुला यथेच्छ टोचते अन दुसर्‍या कारने निघुन जाते Proud . मागोमाग ओम्या एकटाच आलेला बघुन शकुही तिच्या कारने पार्टीला जाते.

मग भिकेचे डोहाळे लागलेल्या नलूचा स्विटूला फोन येतो अन मोहित बद्दल विचारु लागते भेटतो क? कस आहे? बोलतो क? अन तरिहि स्विटुला शंका येत नाही. ती पण सगळं पार्टी वगैरे सांगत बसते अन मोहित सर तिथेच असेल असं नलुला ऐकवते. नलुच्या मनात लड्डु फुटतो अन ती शकुच्या सोबत असावी म्हणुन पार्टीला जा असं स्विटुच्या कनपटीलाच बसते.

तिकडे पार्टीत पोचल्या पोचल्याच शकूचा पाणौतार्‍याचा सोपस्कर तायडा पुर्ण करते Proud पण तेवढ्यात शकुच्या जुन्या स्टाफ मेंबर्स तिथे येतात अन शकुबद्दल फार चांगलं चांगलं बोलू लागतात एवढं चांगलं की तायडाला ऐकु वाटेनासे होते. मग ती चर्चेचा रोख फिरवण्यासाठी अनाउंस करते की खानविलकरांची सून आज पार्टीला येतेय. मग काय सगळं पब्लिक त्या होणार्‍या सुनेची वाट बघत बसतं (त्या साठीच तर यांना शुटींगला बोलावलं ना.. नाहीतर एरवी कुठं दिसत नैत ही लोकं Wink )

मग आपली स्विटू सोनेरी पट्टी असणारी काळी साडी घालून येते अन तिथ्लं पब्लिक जणू काय हीच खानविलकरांची होणारी सून असं कुजबुजु लागतं. ओम्याला स्विटू दिसते अन तो तिला ''कडक्क...!!'' असं हाताने अन डोळ्याने खुणावतो Proud त्यावर स्विटु लुटुलुटु मान हलवून ओम्याची कंप्लीमेंट अ‍ॅक्सेप्ट केल्याचं दर्शवते. पुढच्याच क्षणी शकू स्विटूला बघून भयानक खुश होते अन जसं जाय इथे ती वनात पडली होती अन स्विटू आल्यामुळॅ तिचा वनवस संपला अशा अविर्भावात तिला मिठी मारते.

तिकडे साळव्यांच्या घरात नलू अन दादा साळव्यांची यथेच्छ जुंपते अन माठ काका अन दमेकरी काकू नुसतं एकदा इकडं अन एकदा तिकडं असं बघत बसतात Biggrin

लेखक बदलला वाटतं...
काही दिवसा पूर्वी गाजावाजा करत ओम्या आणि मोम्या चा साखरपुडा ठरला म्हणून मोठा फोटो पेपरात दिलेला हे विसरले लोक..
खानविलकर चा सगळा स्टाफ पण बदलला का काय..? कारण पूर्वी स्वीटू तिथेच काम करायची ना ? या लोकांना स्वीटू कोण हेच माहिती नाहीये.. ते तिलाच ओम ची होणारी बायको समजत आहेत..
तायडा च्या ड्रेस वरचा टाय कसला विचित्र दिसत होता.. आणि शकू ला जरा डिसेंट साड्या का देत नाहीत... कसली बेकार साडी दाखवली कालची.. एकदम जुनाट..

बघितला मी भाग आता. नलू गेली होती पार्टीला हे बरोबर आहे. नलू आणि स्वीटू फक्त स्वतःला सोयीस्कर तेवढंच ऐकतात का. स्वीटू तिच्या आईला सांगते मला शकूने बोलावलंय पण मालविकाने नको येउस सांगितलं आहे हे नाही सांगत ती आईला. नलूही काही दिवसापूर्वी त्या लोकांपासून लांब राहा सांगत होती, आता म्हणते तुला जायलाच पाहिजे. शकू आणि मोहित असतील तिथे ओमही असणारच ना. शकूने सगळं उभं केलंय आणि आता तिच्यात बिलकुल आत्मविश्वास नाही आणि काहीही कर्तृत्व नसलेल्या काल परवा आलेल्या मैत्रिणीची मुलीची तिला नेहमी सोबत लागते. मालविकाच्या ड्रेसवर टाय का. साळवी परिवार मालविकाला काहीच किंमत देत नाहीत, तिने कितीही अपमान केला तरी त्यांना जे करायचंय तेच ते करतात. स्टाफ बघून ही एखादी लोणची, मसाला, पापड बनवायची कंपनी असेल असे वाटते. झीच्या मालिकामध्ये कोटीच्या बाता करतात पण कपडे आणि स्टाफ यात अगदीच गरिबी असते. नलू तिचे पिंजरलेले केस घेऊन का बरे पोहोचली तिकडे. ऊठ सुठ मालविकाच्या घरी जातात हे साळवी. विमानाला मालगाडीचा डबा Proud स्वीटू छान दिसत होती काळ्या साडीमध्ये.
ओम आणि स्वीटू यांच्या होळीच्या रोमान्सला सैराटचे गाणे, हे खरोखर सैराटच्या विमानाला साळवीच्या मालगाडीचा डबा लावल्यासारखे आहे.

नाही चंपा, मी चूक बरोबर केली. नलू आज जाईल पार्टीला (रेग्युलर टी.वी. टाईम स्लॉट ला Wink ). आजच्या भागात तसं दाखवतील तेव्हा तायडा तिचा पाणौतारा करेल Biggrin

पुभामध्ये दाखवलं का नलू पार्टीला गेली ते. मी त्या वेटरचे हावभाव बघत होते, बिचारा मधल्यामध्ये अडकला.

आज कळेल ते... नक्की कसा पाणौतारा होणार ते.

दळभद्री साळव्यांना अधुन-मधुन कुणाकडून तरी स्वतःचा पाणौतारा करून घेतल्याशिवाय चैनच पडत नाही.. Proud

स्मिता श्रीपाद +१२३

ओम्या आणि तायडीचे कपडे शाळेच्या gathering चे वाटतं होते. त्यापेक्षा शकुची चुरगळलेली साडी बरी

ओम आणि स्वीटू यांच्या होळीच्या रोमान्सला सैराटचे गाणे, हे खरोखर सैराटच्या विमानाला साळवीच्या मालगाडीचा डबा लावल्यासारखे आहे. >>>>>> हो ते सैराट झालं जी ऐवजी 'याड लागल याड लागलं र' हे गाणं लावलं पाहिजे होत कारण खरंच ओम ने काय पाहिलं त्या स्वीटू मध्ये असे सारखे सारखे वाटते। खरंच त्याला याडच लागलं असणार .

Pages