युरोपमध्ये भटकंती करता करता याह्या अखेर आयर्लंडमध्ये येऊन पोचला. लंडनमध्येही त्याच्यावर हल्ला झालेला असल्यामुळे त्याला त्यातल्या त्यात आयर्लंड जास्त सुरक्षित जागा वाटत होती. खिशात दमडाही नसल्यामुळे त्याला लवकरात लवकर कामं शोधणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याने आयर्लंडच्या वेगवेगळ्या भागातल्या रेस्टॉरंट्समध्ये आणि दुकानांमध्ये कामं मागत फिरायला सुरुवात केली. पडेल ते काम पडेल तितक्या वेळासाठी करत त्याने कशीबशी आपली गुजराण करायला घेतली. आयर्लंडच्या सुप्रसिद्ध टेम्पल बारमध्येही त्याने काम मागून पाहिलं. ब्लूम्स हॉटेलच्या समोर एका पथारीवर तो अनेक रात्री झोपला होता. अस्तित्वाचा संघर्ष करत असताना अचानक त्याच्या आयुष्यात बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगलं घडलं.
ब्लूम्स हॉटेलच्या मॅनेजरने त्याला बघून एके दिवशी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. भणंग अवस्थेतल्या याह्याने त्याच्याकडे कामं मागितलं. मॅनेजरने त्याला आपादमस्तक न्याहाळलं. अनेक दिवस अर्धपोटी राहून आणि रस्त्यावर झोपून त्याची अवस्था बिकट झालेली होती. दाढी वाढलेली, केस अस्ताव्यस्त, अंगावरच्या कपड्यांना दर्प येऊ लागलेला अशा अवस्थेतल्या याह्याला नक्की काय कामं द्यावं हेच त्या मॅनेजरला समजत नव्हतं.
त्याने हॉटेलमधून आपल्या एका सहाय्यक मॅनेजरला बाहेर बोलावलं. तिने याह्याला बघितलं. याह्याने पडेल ते कामं आपण करू अशा शब्दात तिला काम द्यायची विनंती केली. संडास धुण्यापासून, फारशा साफ करण्यापासून अगदी बागकामापर्यंत काहीही काम आपण करायला तयार आहोत, या त्याच्या शब्दांचा परिणाम तिच्यावर झाला असावा...तिने त्याला खानसाम्याची नोकरी देऊ केली. याह्याने आपल्या आयुष्यात आजवर साधा चहा आपल्या हाताने बनवलेला नव्हता, पण कामाच्या भाषेमुळे त्याने तिला होकार दिला.
" तुला नक्की जेवण बनावट येतं का? " तिने त्याच्याकडे बघत प्रश्न केला.
" हो...येतं. " याह्याने उत्तरं दिलं.
" ही कॉफी घे. मला माहित आहे तुला काहीही येत नाही...खोटं नको सांगूस मला..."
" मी शिकेन...नक्की...काहीही झालं तरी मला कामं हवंय..." याह्याने पुन्हा गयावया केली.
" उद्या पहाटे ठीक चार वाजता ये, मी तुला आवश्यक ते सगळं शिकवते. " त्या मॅनेजरचे याह्याने मनातल्या मनात पाय धरले.
दुसऱ्या दिवशी चार वाजता याह्या जमेल तितका स्वच्छ होऊन हॉटेलमध्ये हजर झाला. मॅनेजरने त्याला किचनमध्ये नेलं. तिने त्याला किचनची माहिती दिली आणि त्याच्या कामाचं स्वरूप सांगितलं.
" स्क्रॅम्बल्ड एग्स बनवू शकतोस का? " तिने विचारणा केली.
" म्हणजे काय....मला नाही कळलं..." याह्या ओशाळून बोलला.
या महाभागाला काहीही येत नसल्याची तिची खात्री पटली. तिने त्याला आपल्या हाताखाली घेतलं आणि त्याला एक एक करून कामं शिकवायला सुरुवात केली. याह्याने अतिशय मन लावून ढोरमेहेनतीने प्रत्येक काम व्यवस्थित शिकून घेतलं. सहा-सात महिन्यात तो इतका व्यवस्थित तयार झाला, की हॉटेलच्या अनेक कामांसाठी त्याला व्यवस्थापक मुद्दामून बोलवून घ्यायला लागले. आठ महिन्यांनी त्याला जेव्हा पहिली सुट्टी दिली गेली, तेव्हा तो ढसाढसा रडला. अनेक वर्षांनी अश्रू त्याच्या डोळ्यांमध्ये परतले होते. सुट्टी मिळूनही त्याला बिचाऱ्याला त्या सुट्टीचं काय करावं ते कळत नव्हतं.....
पुढच्याच वर्षी त्याला काम देऊन त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात करून देणारी ती मॅनेजर त्याची प्रेयसी झाली आणि पुढे दोघांनी छोटेखानी समारंभात लग्न केलं. एका आयरिश नागरिक असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे याह्याच्या आयरिश नागरिकत्व मिळवण्याच्या आशाही आता पल्लवित झाल्या. त्याने त्या दृष्टीने सरकारदरबारी अर्ज करायला सुरुवात केली. आपल्या बायकोबरोबर त्याने एका छोट्याशा पण नीटनेटक्या घरात आपला संसार थाटला. तिने मात्र याह्याला मनापासून साथ दिली.
याच काळात याह्याला आलेल्या काही अनुभवांनंतर त्याला हे कळून चुकलं, की डोईजड झालेल्या मनुष्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणात कशा पद्धतीने वागवलं जातं...पाच वर्ष घालवल्यावर आयरिश सरकार शरणार्थींना नागरिकत्व देतं. याह्याच्या नावावर काहीही गुन्हे नसतानाही त्याच्या अर्जांवर मात्र कायम लाल शेरेच मिळत होते. सहा-सात वर्षांनीही या देशात तो उपराच होत. तिथे इराकमध्ये २००३ साली धाकट्या बुश साहेबांनी संहारक अस्त्रांच्याच खोट्यानाट्या कारणांच्या आधाराने नाटो देशांच्या एकमताविनाच लष्करी कारवाई केली आणि त्यात उदे आणि कुसे हे दोघेही मारले गेले. सद्दाम काही काळानंतर लपलेल्या अवस्थेत सापडल्यावर त्याच्यावर अमेरिकेत खटला चालला आणि त्याला अमेरिकेने दोषी ठरवून फासावर लटकावला. २००४ साली इराकमध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये होशियार ज़ेबारी विदेशमंत्री झाला....पण १९९५ साली ज्या याह्याबरोबर त्याने सीबीएस वहिनीला मुलाखत दिलेली होती, त्याचं याह्याला त्याने इराकमध्ये परत येण्यासाठी त्याच्या इराकी असण्याचं प्रमाणपत्र मागितलं. याह्याला अजूनही हक्काचा देश मिळालेला नव्हता.....
पुढे २००७ साली भूमध्य समुद्रातल्या सायप्रस बेटांवर त्याने आयरिश सरकारच्या खास परवानगीपत्राच्या आधारे प्रवेश केला आणि तिथे आपल्याकडचे पावणेदोन लाख डॉलर्स एका रेस्टॉरंटमध्ये गुंतवून त्याने तिथलं नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर त्याची बायको आणि मुलगीसुद्धा सायप्रसला आलेले होते. त्याचप्रमाणे त्याची आई आणि भाऊ बगदादहून निसटून कसेबसे तिथे पोचलेले होते. त्याच्या भाऊ अवैध मार्गाने सायप्रसला आलेला होत, कारण त्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता. बरोब्बर याच गोष्टीवर सायप्रसच्या सरकारने बोट ठेवलं आणि याह्याने आपल्या भावाला अवैध प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याची मदत केल्याचा आरोप ठेवून त्याला पुन्हा एकदा आयर्लंडला निघून जायला सांगितलं.
या सगळ्यामागचा करविता धनी कोण आहे, हे बाहेर आलेलं नसलं तरी याह्याने या सगळ्यासाठी थेट अमेरिकेच्या सीआयएला जबाबदार ठरवलेलं आहे. याह्याने त्यांच्या सांगण्यानुसार सद्दामकडे संहारक अस्त्रशास्त्र असल्याच्या खोट्यानाट्या आरोपांना पुष्टी दिली नाही, म्हणून त्याच्या वाट्यात सीआयएने हे काटे पेरून ठेवले आहेत असा त्याचा स्पष्ट आरोप आहे. अमेरिकेच्या आणि युरोपच्या अनेक दृक्श्राव्य माध्यमांनी याह्याला त्याच्या डाव्यांच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करायला सांगितल्यावर याह्याने स्वतःचा जोरदार बचाव केला आहे. अमेरिकेने ज्या खोट्यानाट्या पुराव्यांच्या आधारे इराक उध्वस्त केला, त्यावर अनेक प्रतिथयश पत्रकारांनी अवाक्षरही काढलं नसल्याचे सडेतोड युक्तिवाद त्याने उत्तरादाखल दिलेले आहेत.
अखेर आपल्या बाजूने आयर्लंडच्या सरकारकडे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्जांवर अर्ज करत राहणं आणि आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकं लिहिणं हे कामं याह्या गेली पंधरा वर्ष करतो आहे. आज तो आणि त्याची बायको आपल्या दोन मुलांसह आयर्लंडमध्येच स्थायिक झालेले आहेत.
फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २५
Submitted by Theurbannomad on 2 February, 2021 - 08:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=CaIusLf27oM द डेविल्स डबल