इराकने कुवेतचा घास घेतल्यावर अर्थात सद्दामच्या वतीने कोणीतरी कुवेतमध्ये जाणं गरजेचं होतं. आपल्या फौजांसमोर विजयाचा उन्माद साजरा करण्यासाठी सद्दामने अर्थात याह्यालाच कुवेतमध्ये पाठवलं. तिथे त्याने उदे हुसेन म्हणून फौजांसमोर भाषणंही केली. अशाच एका भाषणात त्याच्या दिशेने काही कुवेती लोकांनी बॉम्ब भिरकावले. बॉम्बच्या स्फोटामधून उडालेले शार्पनेलचे तीक्ष्ण तुकडे याह्याला चांगलेच जखमी करून गेले. त्याच्या डोक्याला आणि छातीला मार लागलेला होता. या घटनेनंतर कुवेतमध्ये ' उदे हुसेन मरणासन्न अवस्थेत ' असल्याच्या वावड्या उठल्या. काही दिवसांनी खुद्द उदे प्रसारमाध्यमांसमोर आला आणि त्याने विजयी थाटात आपण मृत्यूला कधी हुलकावणी दिली याच्या बढाया जगासमोर मारल्या.
याह्या या हल्ल्यातून सावरत असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक वादळ आलं. त्याची काही वर्षांपूर्वीची प्रेयसी त्याच्या आयुष्यात परत आली आणि त्याच्या कोरड्या पडलेल्या भावनांना अचानक पुन्हा एकदा धुमारे फुटले. उदेने तिला स्वतःच्या दिमतीला कधीच रुजू करून घेतलं होतं, पण तिचा ओढा आपल्या जुन्या प्रियकराकडे होता. याह्याच्या घरच्यांना आणि तो ' फिदायी ' व्हायच्या आधीच्या त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यांना हेच सांगितलं गेलं होतं, की याच्याच मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्याची प्रेयसी त्याच्या आयुष्यात परत येणं उदेला रुचलं नाही. शिवाय आपल्याऐवजी आपलीच एक ' रखेल ' याह्याकडे कशी आकर्षित होऊ शकते, हे त्याच्या मनाला टोचत होतंच....
" दोस्त, काय कमी आहे तुला? हवी ती सुंदरी तुझ्या समोर मी आणतो...काय आहे त्या भिकार मुलीमध्ये?" उदे याह्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
" युवराज, माझी प्रेयसी आहे ती....माझ्या आयुष्यात तिचं स्थान अतिशय महत्वाचं आहे....माझ्यासाठी ती महत्वाची आहे...."
" तुला चांगलं माहित आहे, की तू उदे हुसेन आहेस....उदे हुसेनला या असल्या मुली आवडत नाहीत...."
" युवराज माफ करा, पण मलाही काही इच्छा - आकांक्षा आहेत....मी..."
" तू काय? " उदे छद्मीपणे हसत उद्गारला. " तू तर उदे आहेस ना? उदे हुसेन....तुझ्या इच्छा त्याच, ज्या मला योग्य वाटतील....तुझ्याकडे तुझं असं अस्तित्व नाही....विसरू नकोस "
" युवराज, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती तरी माझी अशी असू दे..."
उदे खळखळून हसला. त्याच्या डोळ्यात आता एक प्रकारचा खुनशीपणा उतरायला लागला. ओठांवर ते भेसूर हसू तसंच होतं.
" अच्छा...तर उदे हुसेन आता याह्या व्हायच्या मार्गावर आहे तर...पण तसं असेल तर याह्याला पुन्हा उदे व्हावं लागेल...हो ना? "
उदेने आपल्या अंगरक्षकांना खून केली. लतीफ याह्या त्या शाही महालातून थेट उदेच्या ' खास ' तुरुंगात रवाना झाला. इथे उदेने त्याचा पाहुणचार अगदी आपल्या ' खास ' पद्धतीने केला. इथे सकाळी ६ वाजता याह्याचा छळ जो सुरु व्हायचा, तो थेट संध्याकाळी ६ वाजता संपायचा. हा छळ अतिशय निर्घृण होता. उलट्या काळजाच्या उदेने याह्याच्या शरीरावर आणि मनावर जे काही अत्याचार केले, त्यातून त्याची विकृत मानसिकता पुरेपूर दिसून येत होती. तीन आठवड्यांनी ' मन भरल्यावर ' याह्याला पुन्हा एकदा उदेने आपल्या महालात आणलं. एव्हाना याह्या पुन्हा एकदा ' उदे हुसेन ' झाला असल्याची उदेची खात्री पटलेली होती.
याह्याची या तीन आठवड्यांमध्ये झालेली अवस्था खुद्द सद्दामलाही बघवली नाही. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याह्याला सद्दामच्या या संवेदनशीलतेमुळे सुखद धक्का बसला. सद्दाम जगाला जरी क्रूरकर्मा म्हणून माहित असला, तरी त्याच हे रूप याह्यासाठी नवं होतं.
" आत्ताच्या आत्ता उदेला माझ्या समोर हजार करा " सद्दामच्या तोंडून आदेश निघाला. उदे आपल्या बापासमोर उभा राहिला. त्याच्या अविर्भावातला तो माज, डोळ्यांमधला बेमुर्वतखोर भाव, अर्धवट नशेतलं त्याचं बरळण हे सगळं बघून सद्दाम संतापला.
" काय गरज होती याह्याशी असं वागायची? " सद्दाम कडाडला. उदे थंडपणे तसाच उभा होता.
पुढच्याच क्षणी सद्दामच्या भक्कम पंजाची एक सणसणीत चपराक उदेच्या कानशिलावर पडली. उदे अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळला. आपला बाप आपल्याला तिसऱ्या माणसासमोर मुस्काटात मारेल असा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता.
" तू कधी सुधारणार? हे सगळं करून काय मिळत तुला? माझा बेजबाबरदार ,माजोरडा आणि नशेबाज मुलगा म्हणून तुझी इतकी ख्याती पसरलेली आहे, की लोक माझा उत्तराधिकारी म्हणून तुझ्यासारख्याला कसं स्वीकारतील हा साधा विचार तुला करता नाही येत? " सद्दाम संतापाने थरथरत बोलला. त्याच्या डोळ्यात आता अंगार पेटला होता.
बराच वेळ सद्दामने आपल्या दिवट्याची कानउघाडणी केली. अखेर आपले शब्द चिरंजिवांच्या कानाच्या पडद्यांवर आपटून परत येत आहेत, पण मेंदूपर्यंत पोचत नाहीयेत हे दिसल्यावर सद्दामने उदेला निघून जायचा आदेश दिला. हा अपमान उदेच्या मनात ठसठसत होता. त्याच्या नशेमुळे भिरभिरलेल्या मेंदूला हा अपमान म्हणजे त्याच्या आत्मसन्मानाला लागलेली ठेच वाटत होता. शेवटी या सगळ्यातून व्हायचं तेच झालं. उदेने पुन्हा एकदा याह्याला धडा शिकवायचा निर्णय घेतला. याह्याच्या दुर्दैवानेतशी संधीही त्याला लवकरच मिळाली
फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १५
Submitted by Theurbannomad on 27 January, 2021 - 09:44
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचतोय पु भा प्र
वाचतोय
पु भा प्र
ह्या मालिकेतले सगळे लेख वाचले
ह्या मालिकेतले सगळे लेख वाचले. मस्त लिहिता.
पु भा प्र
पु भा प्र
छान
छान
पु भा प्र
पु भा प्र
पुढील भाग कधी येणार
पुढील भाग कधी येणार
पु भा प्र
पु भा प्र