याह्या तिथे इराकच्या सैनिकांपुढे ' प्रेरणादायी ' भाषणं देत फिरत असताना इथे उदे मात्र आपल्याच मौजमजेत मश्गुल होता. स्वतःच्या बापाच्या रासलीलांमुळे दुखावला गेलेला उदे आपल्या दुःखाला रासलीलेतूनच वाट करून देत होता. त्याच्या महालातल्या तरुण मुली, अधून मधून जबरदस्तीने रस्त्यातून उचलून आणलेल्या कोवळ्या मुली, वेगवेगळ्या देशांमधून आणलेल्या मुली त्याच्या दिमतीला होत्याच...शिवाय दारू आणि अमली पदार्थ दिमतीला होतेच....बगदादचे सगळे उच्चभ्रू नाईटक्लब्सही तो पालथे घालत होता.
आज उदे याह्याला घेऊन आपल्या अतिशय आवडत्या नाईटक्लबमध्ये आला होता. तिथे त्याच्या आवडत्या ' ललना ' त्याची वाट बघतच होत्या. याह्या एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे उभा होता. उदे सोफ्यावर बसून दोन बाजूंना आपल्या आवडत्या ' ललना ' घेऊन मौजमजेत मग्न झाला. तिथल्या अनेक तरुणींना चुकून याह्याच उदे वाटल्यामुळे त्यांनी आधी याह्याबरोबरच लगट करायला सुरुवात केली....याह्या या सगळ्या प्रकारांमध्ये कधीच रमला नव्हता. त्याच्यासाठी हे असं आयुष्य जगणं अशक्य होतं.
नाईटक्लबमध्ये उदे आपल्या धुंदीत वाट्टेल तशा पद्धतीने नाचत होता. त्याच्या हातात त्याची आवडती मॅग्नम पिस्तुल होती. नाचताना आपण अंधाधुंदपणे गोळ्या चालवत आहोत याचंही त्याला भान नव्हतं. आजूबाजूच्या लोकांची त्यामुळे तारांबळ उडाली....उदेला हे सगळं दृश्य बघून जास्तच चेव चढत होता. त्याने आता मुलींचा गराडा आजूबाजूला गोळा केला. त्या घोळक्याच्या मध्यभागी उभा राहून तो दात विचकून हसायला लागला. याह्याच्या मनावर हे भेसूर दृश्य कोरलं गेलं ते कायमचं...
त्याच्या डोळ्यांसमोर दोन वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा एकदा जागा झाला....साल १९८६. तो आणि उदे हे दोघेही तेव्हा बगदादच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. याह्याचं स्वप्न होतं अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं....तेव्हाच्या अरब देशांमध्ये बांधकामाचा उद्योग जोरात होता. सिव्हिल इंजिनिअर होऊन एखाद्या मोठ्या कंत्राटदाराकडे कामाचे प्राथमिक धडे घ्यायचे आणि पुढे स्वतः कंत्राटदार होऊन बांधकामांचा व्यवसाय सुरु करायचा हे याह्याचं स्वप्न होतं. इराकमध्ये सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य होतं...तेव्हा महाविद्यालयात असताना तो त्या प्रशिक्षणातही सामील झालेला होता. परंतु पुढच्याच वर्षी उदेने त्याला आपल्या महालात बोलावलं आणि तो उदेचा ' फिदायी ' झाला....तेव्हापासून ते आत्ताच्या या नाईटक्लबमधल्या प्रकारापर्यंत त्याने भरपूर सोसलं होतं....त्याच्या घरच्यांसाठी तो ' शहीद ' झालेला होता...जिवंतपणी त्याने जणू पुनर्जन्म घेतला होता...
असाच एक अनुभव याह्याला पुन्हा एकदा येणार होता. दिवस होता उदेच्या वाढदिवसाचा. इराकच्या युवराजांचाच वाढदिवस तो.....त्यानिमित्त आयोजित केलेल्या त्या मेजवानीत मौजमस्तीला कसलाही तोटा राहणार नाही यातअनेक लोक जातीने लक्ष घालत होते. उदेला त्याच्या काही ' मित्रांनी ' येऊन मिठी मारली आणि त्याला नजराणा पेश केला. हे मित्र म्हणजे उदेचे खास ' दलाल ' - जे बाजारातून नवनवा ' माल ' आपल्या युवराजांसाठी हुडकून आणायचे. त्याही दिवशी पन्नासेक सुंदर तरुणींना त्यांनी त्या मेजवानीत आणलं होतं. उदेने त्यांच्याकडे बघून डोळे मिचकावले. याह्याला जवळ बोलावलं आणि त्याला त्या तरुणींचा घोळका दाखवला.
" तुला यातल्या कोण हव्या आहेत ते सांग आणि घेऊन जा....हव्या त्या पद्धतीने त्यांचा उपभोग घे....उदेचा वाढदिवस आहे आज....म्हणजे तुझाही आहे..."
" युवराज, मला यातलं काहीही नको..." याह्या संकोचला.
हे उदेचे मित्र मात्र त्याच्या कानात त्या तरुणीचं रसभरीत वर्णन करत होते. कोण कोणत्या प्रकारच्या 'कामक्रीडेमध्ये ' निपुण आहे याची माहिती देत ते उदेला उकसवत होते. उदे आता आपल्या आवडत्या कामात मग्न झाला. आपली आवडती ' कोनियाक ' , ' सिगार ' आणि कोकेन घेऊन तो एका आलिशान सोफ्यावर बसला. शिरस्त्याप्रमाणे कोकेनच्या पुड्या सोडल्या गेल्या. उदे आणि त्याच्या दोस्तांनी यथेच्छ मद्यपान केलं. कोकेन सुंघून स्वतःला ' स्वर्गात ' नेलं आणि पुन्हा एकदा उदेचा तोल गेला.
उदे आता एका सोफ्यावर हातात मशिनगन घेऊन उभा राहिला. याह्याच्या घशात त्याच्या हातातल्या दारूचा घोट अडकला...आता हा माथेफिरू नक्की काय करणार आहे याचा अंदाज घेत तो सावरून बसला. कोण जाणे, अचानक अंदाधुंद गोळीबार करायला याने सुरुवात केली तर आडोशाला चटकन लपता तरी येईल या उद्देशाने तो सावध झाला. इथे उदेने सगळ्यांना बघून तोंडातून गळणारी लाळ पुसत मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली...
" तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या उदेचा आज वाढदिवस आहे....तुम्हाला त्यामुळे आनंद झाला असेल, हो ना? "
सगळ्यांनी घाबरून अर्थातच होकारार्थी मान डोलावली. उदेने आनंदाचा चित्कार करून आपल्या हातातल्या मशीनगनमधून दणादण गोळ्या झाडल्या. नशिबाने गनची नळी वरच्या बाजूला रोखलेली होती, त्यामुळे छतामध्ये भोकं पडण्यापलीकडे विशेष नुकसान झालं नाही.
" आता मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे...माझी वाढदिवसाची भेट..."
सगळ्यांचे श्वास अडकले. याह्या आता काहीही घडू शकतं या खात्रीने पुढे वाकून बसला....या माथेफिरूने पुन्हा गोळ्या झाडल्या तर जमिनीवर आडवं पाडण्याशिवाय दुसरं काही करणं त्याला शक्य नव्हतं....
" आत्ताच्या आत्ता...सगळ्यांनी...विशेषतः सगळ्या स्त्रियांनी....सगळे कपडे उतरवून टाका....लगेच...." उदे ओरडला. त्याने आता हातातली बंदूक खाली केली.
पुढच्या मिनिटभरात सगळ्यांनी जीव मुठीत धरून आपापले कपडे काढून टाकले. उदे आता जोरजोरात हसायला लागला. त्याने त्याला ' आवडलेल्या ' मुलींना आणि स्त्रियांना वेचून वेचून आपल्या शयनकक्षात नेलं. या मेजवानीमध्ये सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा अनुभव इतका सुन्न करणारा ठरला, की त्यांच्यापैकी अनेकांच्या मनावर या प्रकारचा खोल आघात झाला.
असाच एके दिवशी दिवशी उदे जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर एक निमंत्रणपत्रिका होती. १९८८ सालचा ऑक्टोबर महिना सद्दामसाठी अतिशय महत्वाचा होता. इजिप्तमध्ये त्याच्या जुन्या मित्राच्या बायकोच्या सत्कारासाठी त्याने बगदादच्या आपल्या शाही महालात एक जंगी मेजवानी आयोजित केली होती. हा मित्र म्हणजे इजिप्तचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आणि त्यांची बायको म्हणजे इजिप्तची सुप्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ती सुझान मुबारक. या मेजवानीत उदेने जो काही प्रकार केला, त्यामुळे तो सद्दामच्या मनातून पूर्णपणे उतरला.
फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ११
Submitted by Theurbannomad on 26 January, 2021 - 09:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे..! किती खतरनाक होता
बापरे..! किती खतरनाक होता सद्दामचा मूलगा...
उत्कंठावर्धक लेखमाला ..
वाचते आहे. रोचक आहे ही सीरीज.
वाचते आहे. रोचक आहे ही सीरीज.
बापरे..! किती खतरनाक होता
बापरे..! किती खतरनाक होता सद्दामचा मूलगा...
उत्कंठावर्धक लेखमाला ..----- +1.
छान ओघवते लिखाण! पुभाप्र!!
छान ओघवते लिखाण!
पुभाप्र!!
वाचते आहे. रोचक आहे ही सीरीज.
वाचते आहे. रोचक आहे ही सीरीज.>>+1111