फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १०

Submitted by Theurbannomad on 26 January, 2021 - 09:21

साल १९८७.
एके दिवशी सकाळी सद्दामच्या महालातून एक खास संदेश याह्यासाठी आला. त्याला तातडीने सद्दामच्या महालात पाचारण केलं गेलं होतं. याह्याने शिरस्त्याप्रमाणे कपडे चढवले आणि त्याच्यासाठी आलेल्या गाडीत तो जाऊन बसला. मुनेर बरोबर नव्हता, त्यामुळे उदेबद्दलची माहिती मिळणं त्याला शक्य झालं नाही.
महालात तातडीने त्याला सद्दामच्या ऑफिसमध्ये नेलं गेलं. तिथे सद्दामबरोबर बसला होता त्याचं कर्दनकाळ भाऊ - अली हसन अल माजिद अर्थात केमिकल अली.
" याह्या, ये. बस. तुझ्यासाठी आज एक महत्वाचं काम आहे...." सद्दामने याह्याला बसायला सांगितलं. " तुला अली माहित असेलच..." शेजारी बसलेल्या अलीकडे बोट दाखवत सद्दामने विचारलं.
याह्याने होकारार्थी मान डोलावली. अली माहित नसलेला एकही कुर्द इराकमध्ये अस्तित्वात असणं अशक्य होतं. कुर्दांच्या नरसंहाराला कारणीभूत असलेला हा आग्यावेताळ म्हणजे सैतानाचा अवतार होता. याह्या स्वतः कुर्द होता...पण सद्दाम आणि अली यांच्यासाठी तो ' उदेचा तोतया ' असल्यामुळे महत्वाचा होता.
" आपल्याला एक महत्वाचं काम हाती घ्यायचं आहे. इराक देशाच्या मुळावर उठलेल्या काही गद्दार लोकांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे आपल्याला..." सद्दाम शांतपणे बोलत होता. " तुला आत्ताच्या आत्ता हलाब्जा आणि आसपासच्या भागात जायचं आहे. तिथल्या आपल्या शूर इराकी सैनिकांना तुला संबोधित करायचं आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाला हा संदेश स्पष्ट समजला पाहिजे, की देशाच्या विरोधात कोणीही काहीही केलं तर त्याची शिक्षा असेल मृत्यू.."
याह्याच्या मणक्यातून एक शिरशिरी गेली. त्याच्या मेंदूत असंख्य विचारांचं काहूर माजलं. बाजूला बसलेला अली, कुर्दांचं वास्तव्य असलेलं हलाब्जा गाव आणि आजूबाजूचा परिसर आणि ' इराकशी गद्दारी ' करणाऱ्यांचा नायनाट हे बिंदू जोडले तर चित्र स्पष्ट होत होतं....कुर्दांचा नरसंहार करण्याची योजना सद्दामच्या मनात शिजत होती. इराण युद्धातल्या नामुष्कीनंतर मनात साचलेला सगळा राग काढण्यासाठी त्याने कुर्दांची निवड केली होती. हे कुर्द अमेरिकेच्या साहाय्याने स्वतंत्र कुर्दिस्तानाची मागणी अनेक वर्षांपासून करत होते....सद्दामसाठी त्यांचं हे कृत्य म्हणजे ' देशाशी गद्दारी ' होती.
याह्याला आपल्याच लोकांविरुद्ध प्रक्षोभक भाषणं देण्यासाठी इराकी सैनिकांसमोर पाठवलं जाणार होतं. उदे किती आक्रस्ताळा आहे, हे त्याने बघितलं होतं. तशाच आक्रस्ताळ्या शैलीत त्याला चिथावणीखोर भाषण द्यायचं होतं. स्वतःच्या तोंडाने कुर्दिश लोकांच्या विरोधात खोट्यानाट्या गोष्टींची राळ उडवून देऊन इराकच्या सैनिकांना ' प्रेरित ' करण्याच्या हिडीस कामावर त्याची नेमणूक झालेली होती.
याह्याने आपल्या आयुष्यातलं पाहिलं प्रक्षोभक भाषण इराकी सैनिकांसमोर दिलं आणि तो स्वतःच्याच नजरेतून साफ उतरला. त्याच्या मनातल्या भावना हळू हळू मरत चाललेल्या होत्या. सद्दामच्या माथेफिरू मुलाच्या तोतयाच्या रूपात वावरताना तोही संवेदनाहीन होत चाललेला होता.
" इराकच्या शूर सैनिकांनो ,मी उदे हुसेन. सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांचा थोरला मुलगा आणि उद्याचा इराकचा राष्ट्रप्रमुख. मी आपल्या या महान देशाच्या इभ्रतीला धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट कधी सहन करू शकत नाही. हा देश माझे पिता सद्दाम हुसेन यांनी अतिशय शूरपणे उभा केलेला आहे...त्यामुळे हा देश दुभंगेल अशी कोणतीही कृती या देशाच्या विरोधातलं षडयंत्र समजलं जाईल. या देशात राहून, या देशाचं मीठ खाऊन याच देशाशी गद्दारी करणाऱ्या काही लोकांना आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे. त्यांना जर या देशाशी एकनिष्ठ राहता येणार नसेल, तर त्यांना एकच शिक्षा योग्य आहे....आणि ती शिक्षा आहे मृत्यू. बोला, तुम्ही सगळे इराकच्या घरभेद्यांना या देशातून कायमचं संपवायला सद्दाम हुसेन यांना साथ द्याल की नाही? "
इराकच्या त्या सैनिकांनी हवेत गोळीबार करत सद्दामच्या नावाचा जयघोष केला. त्यांच्यात युद्धज्वर संचारलेला बघून याह्याबरोबरच्या सद्दामच्या अंगरक्षकांनीही जल्लोष केला. याह्या या सगळ्या दृश्याकडे बघत थिजून उभा होता. काही दिवसातच कुर्दिश गावांमध्ये मृत्यूचं तांडव सुरु होणार होत आणि त्याने केलेल्या भाषणामुळे त्यात त्याचाही खारीचा वाटा असणार होता....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users