फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ६

Submitted by Theurbannomad on 25 January, 2021 - 08:52

याह्या घराच्या दिशेने निघाला पण पोचला मात्र नाही. त्याची रवानगी झाली उदे हुसेनच्या एका खास तुरुंगात. हा तुरुंग होता बगदाद शहराबाहेर वाळवंटात. तिथे काही दिवस याह्याला जो छळ सहन करावा लागला, तो त्याच्या मनावर आघात करण्यासाठी पुरेसा होता. सद्दामच्या मुलांनी आपल्या तीर्थरुपांच्या आणि काकांच्या सगळ्या छळछावण्या बघितलेल्या होत्या...त्यांना कैद्यांचा कोणकोणत्या पद्धतीने छळ करायचा असतो हे नीट माहित होतं. काही विशिष्ट पद्धतीने कैद्याचा छळ केल्यास तो मनातून पार कोलमडून जातो हे उदेला नीट ठाऊक होतं. त्याचं तंत्राचा वापर करून याच्याच मनोबल त्याने ध्वस्त केलं होतं.
अचानक एके दिवशी आपल्या खास लोकांसह उदे या तुरुंगाबाहेर आला. तुरुंगातल्या अधिकाऱ्यांनी याह्याला बाहेर आणलं. उदेने पुन्हा एकदा हसत हसत त्याच्यापुढे जुनाच ' प्रस्ताव ' ठेवला. हा प्रस्ताव म्हणजे त्याच्या विकृत मानसिकतेचा नमुना होता....त्याला याह्याच्या तोंडूनच होकार ऐकायचा होता.
" दोस्ता, का स्वतःला इतका त्रास करून घेतोस? माझी सावली होऊन राहशील तर ऐषोआरामात जगशील...." उदे याह्याकडे बघत बोलला. " आणि असाच वागत राहशील तर असाच तुरुंगात खितपत पडशील....आज तू, उद्या तुझे घरचे...असेच तुरुंगात खितपत पडाल...आणि त्यात माझी काही चूक नसेल...हो ना? "
" का हे सगळं ? युवराज, मी काय केलंय असं ? का मला त्रास देताय तुम्ही सगळे? " याह्या असहाय्यपणे बोलला.
" त्रास? मुळीच नाही....उदे स्वतःलाच का त्रास देईल? " उदेने पुन्हा एकदा छद्मीपणे हसत उद्गारला.
अखेर आपल्या महालात परत जाताना उदे आपल्याबरोबर याह्याला घेऊन गेला. त्याच्याकडे होकार देण्यावाचून काही पर्यायच उरला नव्हता....
त्याचं दिवशी संध्याकाळच्या वेळी याह्याच्या घरी काही पाहुणे आले. हे पाहुणे होते इराकच्या सैन्यदलात काम करणारे काही अधिकारी. त्यांनी याह्या एका चकमकीत यमसदनाला गेल्याची बातमी त्याच्या घरच्यांना दिली. एका अर्थाने ते खरंही होतं...कारण आता लतीफ याह्या नावाचा कोणताही इसम केवळ इतिहासातच अस्तित्वात असणार होता. लतीफ उदेच्या खास लोकांबरोबर उदेच्या महालात सुन्न होऊन बसलेला होता. ज्या क्षणी त्याने उदेचा प्रस्ताव स्वीकारला होता, त्याच क्षणी तो सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट झालेला होता... उदेच्या अंगरक्षकांच्या आणि खास माणसांच्या चोवीस तासांच्या नजरबंदीत तो आता उर्वरित आयुष्य काढणार होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी याह्या जागा झाला उदेच्याच एका खास जवळच्या माणसाच्या आवाजाने. हा माणूस होता मुनेम. हा उदेच्या आतल्या गोटातील त्याचा अत्यंत विश्वासू ' दोस्त ' होता. उदेच्या इतर माणसांप्रमाणेच हाही काहीसा विक्षिप्त आणि उदेच्या प्रत्येक शब्दाचं तंतोतंत पालन करणारा होता...त्याच्यावर जबाबदारी होती लतीफ याह्याचा ' उदे हुसेन ' करण्याची.
" उठ....चल माझ्याबरोबर. " मुनेमने याह्याला आज्ञा दिली.
" का? कुठे जायचंय? "
" प्रश्न नको...माझ्याबरोबर चल आणि ऐकत राहा." मुनेमने याह्याकडे रोखून बघत उत्तर दिलं. याह्या निमूटपणे मुनेमबरोबर चालायला लागला. मुनेमने त्याला सगळ्यात आधी नेलं महालाच्या बाहेरच्या प्रशस्त बगीच्याकडे. बगीच्याचा विस्तार बघून याह्याचे डोळे दिपले. हिरवळ, त्यात सुरेख फुलझाडं आणि रोपटी, मधूनच डोकं वर काढणारी खजुराची झाडं, बसायला छानशी लाकडी बाकं अशा थाटातली ती बाग याह्याने याआधी बघितलीच नव्हती...त्या बागेच्या आणि महालाच्या मध्ये एक मोट्ठा पोहोण्याचा तलाव होता. तलावात अनेक सुंदर तरुण मुली जेमतेम कपड्यात मनसोक्त पोहोण्याची मजा लुटत होत्या.
" युवराज उदे यांच्या शाही महालाचा थाट पहिल्यांदाच बघत असशील ना? " मुनेमने हसत हसत विचारलं. " सगळ्यांचं असंच होतं....माझीही तुझ्यासारखीच अवस्था झालेली..पण इराकच्या युवराजांचा महाल आहे हा....त्यांनी खास युरोपियन वास्तुविशारदांकडून तयार करून घेतलाय...स्वतःच्या आवडीनिवडीनुसार. " याह्याला या कशात फारसं स्वारस्य नव्हतं...उदे आणि त्याच्या चमच्यांसाठी जरी तो महाल डोळे दिपवणारा असला तरी त्याच्यासाठी तो महाल म्हणजे एक कैदखानाच होता.
" या मुलींकडे हवं तितकं बघ...पण त्यांना परवानगीशिवाय हात लावलास तर युवराजांना आवडणार नाही. " बाजूने चाललेल्या एका तारुण्याने मुसमुसलेल्या गोऱ्यापान तरुण मुलीकडे बघत मुनेरने सांगितलं. " महालाच्या आत तुझ्या राहण्याची, खाण्यापिण्याची जय्यत तयारी केलेली आहे. हा बघ...हा तुझा दिवाणखाना. इथे एक एक वस्तू युरोपमधून खास मागवलेली आहे...प्रख्यात युरोपियन डिझायनर्सनी जातीने लक्ष देऊन तयार केलेलं फर्निचर आहे हे...खाली फारशी बघ...खास इटालियन मार्बल आहे....हा तुझा शयनकक्ष...इथे तुझं न्हाणीघर. आणि हो, न्हाणीघराच्या बाजूला हा तुझा खास वॉर्डरोब. इथले महागडे सूट्स, घड्याळं, बूट...सगळं सगळं तुझं आहे. " इराकी जनतेच्या पैशांतून जमा केलेलं हे ऐश्वर्य याह्याच्या डोळ्याला टोचत होतं. त्याने अतिशय साध्या मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेला होता आणि तशाच वातावरणात तो वाढला होता...या श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा त्याला तिटकारा होता. पण आता तो याह्या नव्हता....' उदे हुसेन ' होता ! उदेप्रमाणे राहायचं तर हे सगळं स्वीकारणं त्याच्यासाठी अपरिहार्य होतं.
" आणि हो...तुझ्या या राहण्याच्या जागेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर युवराजच्या खास माणसांची चोवीस तास नजर आहे हे विसरू नकोस...इथे बाथरूममध्येही कॅमेरा लावलेला आहे. तू काय करतोस याची खबर युवराजांना सतत मिळत राहील....तेव्हा काही कमीजास्त करायचा प्रयत्न करू नकोस..." मुनेरने थंडपणे सांगितलं. " आता लवकर तयार हो, युवराजांना वाट बघायची सवय नाही. पुढच्या अर्ध्या तासात तू त्यांच्यासमोर असला पाहिजेस..." मुनेरने याह्याचा निरोप घेत तिथून काढता पाय घेतला.
याह्याने अंघोळपांघोळ करून अंगावर आयुष्यात पहिल्यांदाच उंची इटालियन सूट चढवला. पायात खास कारागिरांनी तयार केलेले बूट चढवले. मनगटावर महागडं सोन्याचं घड्याळ घातलं आणि आपल्या ' युवराजांना ' भेटायला तो तयार झाला. दोघं अंगरक्षकांनी त्याला उदे हुसेनच्या दालनात नेलं. उदे पाच मिनिटात कुठूनसा त्या दालनात अवतरला. हातात तीच महागडी क्यूबन सिगार आणि चेहेऱ्यावर तेच विकृत हास्य बघून याह्या पुन्हा मनातल्या मनात पुढच्या संकटाची वाट बघत उभा राहिला.
" दोस्ता...वा...बघ स्वतःला आरशात. कोण म्हणेल तू उदे हुसेन नाहीयेस...आजपासून तू माझा भाऊ...जुळा भाऊ...काय..ठीक आहे ना? " उदे मनसोक्त हसत बोलला.
याह्या उत्तरादाखल काहीही न बोलता चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून उदेला बघत उभा राहिला.
" आता तुला उदे हुसेन व्हायची दुसरी पायरी पार करायची आहे...नुसते कपडे घालून तू उदे हुसेन कसा होशील? उदे हुसेन होणं इतकं सोपं आहे का?" स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडालेला उदे हसत हसत बोलत होता.
काही वेळाने उदेने इशारा केल्यावर दोन-तीन डॉक्टर्स तिथे आले. त्यांनी याह्याला आपल्या बरोबर एका खोलीत नेलं. तिथे त्याला पूर्णपणे निर्वस्त्र करून त्याच्या शरीरावर त्यांनी काही खुणा केल्या. दात तपासले. दाढीचं वळण बरोबरच्या एकाला थेट उदेच्या दाढीसारखं करण्याची सूचना केली. याह्या शांतपणे जे होईल ते बघत होता. त्याच्या आतला आत्मा कधीच थिजून गेलेला होता.
पुढे या सगळ्या सोपस्कारामागचा उद्देश कळल्यावर याह्याला आश्चर्याचा धक्का बसला.उदे हुसेनच्या शरीरावर जिथे जिथे जखमांचे व्रण अथवा शस्त्रक्रियेच्या खुणा होत्या, त्या त्या जागी याह्याच्या शरीरावर तशाच खुणा अथवा व्रण त्या डॉक्टरांनी ' तयार ' केले. उदेच्या दातांच्या ठेवणीप्रमाणे याह्याच्या दातांमध्ये आवश्यक ते बदल केले. त्याचे केस, दाढी, मिशी थेट उदेसारखी केली. याच्याच नशीब बलवत्तर, उदेच्या शरीराच्या अंतर्भागातले सगळे अवयव शाबूत होते, अन्यथा त्याच्या शरीरातूनही ते अवयव काढले गेले असते!
चार-पाच दिवसात या सगळ्या ' दिसणाऱ्या ' गोष्टींवर काम केल्यावर पाळी आली उदेच्या मदतनिसांच्या दुसऱ्या गटाची. त्यांनी याह्याला उदेच्या चालण्याची, बोलण्याची, हसण्याची...अगदी खाताना चमचा काटा उदे ज्या पद्धतीने उचलतो. धरतो, ठेवतो त्या सगळ्याची माहिती दिली आणि त्याच्याकडून सराव करून घेतला. उदेच्या आवाजाप्रमाणे आणि बोलण्याच्या ढंगाप्रमाणे याह्याला स्वतःमध्ये बदल करावा लागला. उदेमध्ये सद्दामचा मुलगा असल्याचा एक माज अतिशय लहान वयापासूनच ठासून भरलेला होता...याह्याला तो माज काही जमलं नाहीए. त्याच्या बाह्यरूपात जमेल तितका माज आणून उदेप्रमाणे वागण्याचा त्याने प्रयत्न केलाही, पण तो तेव्हढ्यापुरताच. उदेचा वाण आणि गुण हे दोन्हीही याह्यामध्ये कधीच उतरू शकले नाहीत.
याह्याच्या प्रशिक्षणाचा सगळ्यात खडतर काळ होता इराकच्या तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाचे छायाचित्रण बघण्याचा....अतिशय वाईट पद्धतीने उदेची माणसं तुरुंगात कैद्यांचा छळ करत असत. उदेला आपल्या शत्रूने अशा पद्धतीने मरणाहूनही वाईट आयुष्य जगताना बघण्यात असुरी आनंद व्हायचा. ताकदीने नखं आणि दात उपटून काढणं, पार्श्वभागावर चामडी पट्ट्याने फटके देणं, अंगावरची कातडी सोलून काढणं अशा भयानक शिक्षा त्या बिचाऱ्या कैद्यांच्या नशिबी आलेल्या होत्या....हे छायाचित्रण बघताना याह्या अनेकदा डोळे घट्ट मिटून हात कानावर दाबून ठेवत असे. हळू हळू त्याच्या इंद्रियांना या छायाचित्रणाची सवय झाली....पुढे प्रत्यक्ष तुरुंगात त्याच्या डोळ्यांसमोर हे प्रकार होतं असताना त्याला ते बघावे लागले. याह्याचं मन या प्रकारांमुळे अक्षरशः संवेदनाहीन होऊन गेलं.
आता पाळी होती याह्याच्या उदे हुसेन व्हायच्या सगळ्यात शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्याची. त्याच्या हातात उदेच्या काही मदतनीसांनी एक बाड ठेवलं. त्यात होती ' उदे हुसेन याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याची माहिती '. एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे उदे हुसेन याने आयुष्यात कोणती महान कार्यं केलेली आहेत, याची माहिती त्या कागदपत्रांमध्ये सविस्तर लिहिलेली होती. ती वाचताना याह्या आतून हलला...उदे किती उलट्या काळजाचा आहे, हे त्यातून स्पष्ट होत होत. वीरश्रीयुक्त कामगिऱ्यांच्या रकान्याखाली निरपराध निष्पाप जिवांची हत्या, ज्या कुर्दिश लोकांपैकी याह्याही एक होता, त्या कुर्दिश लोकांच्या संहारात उदेने लावलेला हातभार, इराकी सैनिकांनी पकडलेल्या युद्धकैद्यांच्या आणि हेरांच्या छळाच्या कहाण्या असा सगळा मजकूर त्यात भरलेला होता. याह्याला ते वाचताना उदेविषयी मनापासून घृणा वाटायला लागली. एखादा मनुष्य किती क्रूर असू शकतो, हेच त्या कागदपत्रांमधून स्पष्ट होत होतं...पण याह्याला ते सगळं आपल्या मेंदूत कोरून घ्यावं लागलं. त्याशिवाय त्याचा ' उदे हुसेन ' होणं अशक्य होतं...
अखेर पंधरा - वीस दिवसांनी उदे असाच अचानक कुठूनसा अवतरला आणि याह्या त्याच्या समोर येऊन उभा राहिला. उदेने याह्याकडे बघताच आनंदाने आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढला...त्याच्या समोर चक्क त्याचं सही सही प्रतिरूप उभं होतं.
" अलहमदुलिल्लाह, क्या बात है....दोस्ता, प्रत्यक्ष माझे वडीलसुद्धा ओळखू शकणार नाहीत खरा उदे कोण आहे....तू म्हणजे मीच...माझी प्रतिकृती..."
आनंदाच्या उकळ्या फुटत असल्यामुळे आता उदे त्याच्या ' सुविख्यात ' स्वभावाप्रमाणे अखंड बडबड करत होता.
" बघ स्वतःकडे मित्रा....मित्र नाही, तू भाऊ आहेस माझा...उदे हुसेन आणि उदे हुसेन...बघ, तू किती देखणा आहेस...या सूटमध्ये तू किती रुबाबदार दिसतोयस...याह्या, आधी तयार झाला असतास तर उगीच तुरुंगात मर खावा लागला नसता तुला....नशीब,तिथे तुला अशी जखम झाली नाही जिच्या खुणा शरीरावर राहतील नाहीतर मला माझ्या शरीरावर त्या करून घ्याव्या लागल्या असत्या..." हे बोलून उदे माथेफिरू इसम असल्यासारखा खदाखदा हसायला लागला.
वर्षानुवर्षे त्याच्या शरीराने अतिशय उच्च प्रतीचा कोकेन पचवलेला होता...त्यामुळे त्याचं वागणं अतिशय विचित्र झालेलं होतं. भावनांचा आवेग त्याला आवरता यायचा नाही...आताही त्याच्या त्या सगळ्या चाळ्यांकडे बघून याह्याच्या मनात भीती निर्माण होत होती. या माणसापायी आपल्याला नशा तर करायची वेळ नाही ना येणार या विचारांनी त्याचा मेंदू सुन्न झाला होता.
याह्याला उदेने घट्ट मिठी मारली. त्याला आपल्या पाकिटातली खास सिगार दिली आणि आपल्या खिशातला आपला खास सोन्याचा लायटरही दिला. समोरच्या बगिच्यातल्या ' हव्या त्या मुली ' शयनकक्षात घेऊन जायची मुभा दिली...अर्थात ज्या शयनकक्षात कॅमेरे लावलेले आहेत, तिथे याह्याला एकट्यानेही झोप येत नव्हती हा भाग निराळा. त्याला उदेसारखं बेताल आयुष्य जगण्याची काहीही हौस नव्हती...त्याने उदेला हवं तितकं बोलू दिलं आणि शांतपणे आपल्या दिवाणखान्याची वाट धरली.
उदे हुसेन आणि त्याचा हा प्रति-उदे हुसेन आता इराकच्या इतिहासात अजरामर होणार होते. पुढे पुढे उदेच्या अनिर्बंध वागण्यामुळे खुद्द सद्दामही या प्रति-उदेला आपला मुलगा म्हणून अनेक समारंभात आणि परिषदांमध्ये घेऊन जाणार होता. इथे गमतीचा भाग हा, की सद्दामचाही प्रति-सद्दाम असल्यामुळे याच्याबरोबर खरा कोण आहे हे सद्दामशिवाय कोणालाच समजणारही नव्हतं....इराकच्या हुकूमशाही राजवटीमध्ये केवळ सर्वोच्च नेत्यांसारखे दिसतो म्हणून या तोतयांच्या आयुष्याची राखरांगोळी होणार होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users