फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ४

Submitted by Theurbannomad on 24 January, 2021 - 09:56

बगदादच्या चौकात सद्दामच्या सैनिकांनी पकडलेल्या काही हेरांचा शिरच्छेद होत असताना सद्दामच्या बाजूला पाच वर्षे वयाचा कोवळा उदे उभा होता. आपल्या मुलांना कणखर बनवायची सद्दामची ही खास पद्धत. जनतेला याच वेळी उदेचं पहिलं दर्शन झालं. बापाच्या बाजूला ताठ उभा असलेला हा उदे समोरच्या दृश्याने जराही घाबरला अथवा रडला नाही, असं दृश्य काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याचा आख्यायिका बगदादमध्ये अजूनही ऐकायला मिळतात.

हा उदे शाळेत अतिशय चांगला विद्यार्थी होता. त्याच्या गुणांची टक्केवारी किती खरी किती खोटी हे ते शिक्षकच जाणो, कारण सद्दामच्या मुलाला कमी गुण देण्याची हिम्मत इराकमध्ये कोणत्याही शिक्षकात नव्हती. शाळेत असतानाचे त्याचे काही किस्से बगदादच्या जुन्या लोकांकडून अजून ऐकायला मिळतात. आपण इराकच्या सर्वोच्च नेत्याचे थोरले चिरंजीव आहोत, याची जाणीव आजूबाजूच्यांना करून देणं हा उदेच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग होता. रक्तपाताला सरावलेला उदे शाळेत असल्यापासून बॉक्सिंग, तलवारबाजी अशा खेळांकडे आकर्षित झालेला होता. पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावरच त्याच्यातला ' पुरुष ' आकाराला आलेला होता, कारण सुंदर मुलींबद्दलचं त्याचं आकर्षण शाळेत सर्वश्रुत झालेलं होतं. बरोबरीला होतं अतिशय भडक डोकं. रागावर जराही ताबा नसलेला आणि संतापाच्या भरात कोणत्याही थराला जाऊन हिंसाचार करण्याची क्षमता असलेला हा विद्यार्थी शाळेतल्या शिक्षकांनी कसा सांभाळला असेल याची कल्पनाही अंगावर शहारे आणते. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी हा उदे मद्यपान आणि नशा करायला लागलेला होता, अशी आठवण तेव्हाच्या प्रत्यक्षदर्शींनी पुढे सांगितलेली आहे.

या उदेच्या स्वभावाचा आणखी एक महत्वाचा कंगोरा म्हणजे त्याची बेदरकारी. सद्दामने निर्भीड बनवण्यासाठी आपल्या मुलांना गुन्हेगारांचे गळे कापतानाची दृश्य समोरून बघायला लावली खरी, पण उदे त्या संस्कारांमुळे रक्तपिपासू झाला. सद्दामच्या भीतीमुळे त्याच्या अनेक कृत्यांची वाच्यता फारशी झाली नसली, तरी अनेकांच्या मते शाळेच्या दिवसांमध्येच उदेला रक्तपाताचं आकर्षण होतं. शाळेत पिस्तुल घेऊन येणारा हा बहुदा पहिलाच विद्यार्थी असावा ! या सगळ्यामुळे त्याच्या आजूबाजूला तेव्हापासूनच खुशमस्कऱ्यांचा घोळका असायचा आणि त्याचे शब्द आज्ञेप्रमाणे झेलणारे अनेक लाळघोटे त्याच्या आजूबाजूला जमा झालेले असायचे. तेही त्याच्या आशीर्वादामुळे गुंडगिरी करायला सरावलेले असल्यामुळे शाळेसाठी हा इब्लिस कार्टा म्हणजे एक डोकेदुखी झाली होती हे निश्चित.

पुढे या उदेने बगदादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला. तिथून तीन दिवसातच मर्जी फिरून तो तिथून बाहेर पडला आणि थेट बाजूच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात आला. तिथून पदवी मिळवून पुढे त्याने राज्यशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली. अर्थात या सगळ्या उच्चशिक्षणाच्या मागे त्याच्या मेहेनतीपेक्षा त्याच्या आजूबाजूच्यांची मदत आणि त्याच्याबद्दल असलेली भीती कारणीभूत होती, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही, कारण तेव्हाच्या त्याच्या आजूबाजूच्या कोंडाळ्याबद्दलची माहिती पुढे अनेकांनी लिहून ठेवलेली आहे.
महाविद्यालयीन जीवनातच त्याच्यातला ' पुरुष ' सर्वार्थाने बहरू लागलेला होता. इराकच्या वर्तुळात या उदेची ओळख ' प्लेबॉय ' म्हणून व्हायला लागली, ती याच काळात. शेवटी सद्दामचाच थोरला सुपुत्र तो....इराक म्हणजे आपल्या ' तीर्थरूपांची खाजगी मालमत्ता ' असल्यासारखं त्याचं वागणं झालेलं होतं. महाविद्यालयात याची नजर एखाद्या सुस्वरूप मुलीवर पडली, की तिला आपल्या बिछान्यात आणेपर्यंत हा तिचा पिच्छा सोडत नसे. पुढे पुढे तर आपल्या टारगट मित्रांबरोबर त्याने बळजबरीने मुलींना रस्त्यावरून थेट उचलून न्यायचेही प्रकार केले. सद्दामच्या काळात इराकमध्ये सौदी अथवा इराणप्रमाणे मध्ययुगीन वातावरण नव्हतं. मुलींना बुरख्यात बंदिस्त व्हायची सक्ती नव्हती. याशिवाय इराकच्या तेलकंपन्यांमध्ये काम करणाऱ्या पाश्चात्य अधिकाऱ्यांच्या मुली बऱ्यापैकी मोकळ्याढाकळ्या असायच्या. उदेने आपल्या महाविद्यालयीन जीवनात अशा अनेक मुलींबरोबर मनसोक्त मौजमजा केली होती.

या उदेला आता वेध लागले होते इराकच्या सत्तावर्तुळाचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने आपल्या तीर्थरूपांबरोबर सत्तेच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. सद्दामचा थोरला मुलगा म्हणून पुढे इराकचा सर्वेसर्वा तो होणार होताच. सद्दामनेही आपल्या मुलाला आता हळू हळू तयार करायला घेतलं. उदे सद्दामपेक्षा आपल्या आईच्या जास्त जवळ होता. सद्दामबद्दल त्याला एक आदरयुक्त भीती आणि दरारा होता. अखेर सत्तेच्या राजकारणाच्या दिशेने याची पावलं पडायला लागली आणि सद्दामने घालून दिलेल्या एका पायंड्याप्रमाणे त्याच्यासाठी एका ' आयुष्याच्या साथीदाराचा ' शोध सुरु झाला....हा आयुष्याचा साथीदार म्हणजे त्याची बायको नव्हे, तर त्याचा तोतया. खुद्द सद्दामचे दोन-तीन तोतये तोवर सद्दामने तयार केलेले होते....आता वेळ आलेली होती उदेची.

तोतया व्यक्तींचा शोध घ्यायची सद्दामची एक खास पद्धत होती. त्याचे गुप्तचर खात्याचे लोक इराकमध्ये जागोजागी पेरलेले असायचे. त्यांना एकदा आदेश मिळाला, की ते त्या मनुष्याचा तोतया होऊ शकेल असा 'चेहरा' असलेल्यांचा शोध घ्यायचे. सद्दाम, त्याचा चुलतभाऊ ' केमिकल अली ' , सद्दामच्या काही खास जवळच्या व्यक्ती अशा सगळ्यांच्या चेहऱ्याच्या जवळ जाणारे चेहरे इराकच्या गल्ल्यागल्ल्यांमधून शोधले जायचे. पुढे शरीरयष्टी, उंची, शारीरिक ठेवणं अशा अनेक निकषांवर तावून सुलाखून त्यातले निवडक चार-पाच जण पुढच्या कामगिरीसाठी सद्दामच्या खास लोकांकडे पाठवले जायचे.

हे खास लोक म्हणजे सद्दामची ' तोतयांना पूर्णत्व देण्याची प्रयोगशाळा '. यात भरणा असायचा वैद्यकीय तज्ज्ञांचा. शिवाय आपल्या मालकाप्रमाणे वागण्याचं खास प्रशिक्षण देणारे अनुभवी शिक्षकही त्यात असायचे. या तोतयांची मग चिकित्सा व्हायची. त्यांच्या शरीराची व्यवस्थित तपासणी व्हायची. तेव्हाच्या काही शल्यचिकित्सकांनी सद्दामचे तोतया कसे तयार केले गेले यावर सविस्तर माहिती दिली आहे. सद्दामच्या शरीरावरच्या महत्वाच्या खुणांपासून ते अपघातात अथवा युद्धात त्याच्या शरीरावर झालेल्या आघातापर्यंत सगळ्या गोष्टी या तोतयांच्या शरीरावरही निर्माण केल्या जायच्या. त्यांना सद्दाम कशा पद्धतीने चालतो, बोलतो, उठतो-बसतो, वागतो या सगळ्यात पारंगत केलं जायचं. सद्दामचा खाजगी डॉक्टर असलेल्या आला बशीर यांनी सद्दामचे तोतया असल्याच्या बातम्यांचं ठामपणे खंडन केलं असलं, तरी सद्दामचे कमीत कमी तीन तोतये होते अशी माहिती इराकमधल्याच अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. डॉक्टर डिएटर बुहमान नावाच्या एका जर्मन पॅथॉलॉजिस्टने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हीच गोष्ट पुराव्यांसकट मान्य केली आहे.

सद्दाम हुसेनला अमेरिकेने जेव्हा ताब्यात घेतलं, तेव्हा संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी पकडलेला मनुष्य सद्दामचा तोतया असू शकतो या शंकेखातर त्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली होती. सद्दामच्या जीवाला धोका असू शकणाऱ्या अनेक बैठका, जनसभा, मेळावे यात सद्दामने आपल्याऐवजी आपले तोतया उभे केले होते अशी माहिती इराकमध्ये राहिलेल्या अनेकांनी शपथेवर दिलेली आहे.

राजकारणात सक्रिय व्हायच्या पहिल्या पायरीवर उदे आता उभा होता. ती पायरी होती इराकच्या सैन्यात सामील होऊन तत्कालीन इराकच्या नियमाप्रमाणे तिथे काही काळ काम करायची. याच जागी त्याला भेटणार होता त्याचं प्रतिरूप असलेला लतीफ याह्या. या साध्या सैनिकाच्या आयुष्यात उदेच्या मागे फरफटत जाण्याची वेळ येणार होती ती त्याच्या शरीरयष्टीमुळे आणि दिसण्यामुळे. सहा फूट सहा इंच उंचीचा आणि शिडशिडीत बांध्याच्या उदेला त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा कोणी मिळणं इतकं सोपं जाईल, असं स्वप्नातही वाटलं नसेल...या लतीफ याह्यावर उदे किती खुश झाला, हे यावरूनच समजू शकत, की सद्दाम ज्या कुर्दिश लोकांच्या वंशसंहाराच्या कल्पनेने झपाटलेला होता, त्याच कुर्दिश वंशाच्या लतीफ याह्याला उदे आपला तोतया बनवू पाहत होता !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users