किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी)

Submitted by अस्मिता. on 6 January, 2021 - 17:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन ते अडीच वाटी कच्चा किन्वा , हिरव्या मिरच्या , आलं , तूप /तेल किंवा दोन्ही , जिरे , उकडलेल्या( दोन) बटाट्यांच्या फोडी , दाण्याचा कूट(पाऊण वाटी) , शेंगदाणे, मीठ, साखर.
*आलं व हिरव्या मिरच्या भरपूर कारण किन्वाला स्वतःची अशी चव नाही.

क्रमवार पाककृती: 

**वि. सू. बऱ्याच माबोकर मैत्रिणींनी (तीन) ही पाककृती मागितली त्यापैकी दोघींना विपु सुद्धा केला. आता एकीसाठीच हा धागा काढतेयं असं होऊ देऊ नका. Proud

सकाळी भाज्यांचे सूप व रात्री फ्राइज खाणाऱ्या कधीकधी 'हेल्थ कॉन्शस' मित्रांनो घ्या. Wink

१. मी एका मोठ्या बोलमध्ये किन्वा घेतला.

२. त्याला दोन तीनदा पाणी बदलून व्यवस्थित धुतले.

३. वर थोडं पाणी घातलं.

४. मायक्रोवेव्हमध्ये झाकण न ठेवता दोन दोन मिनिटे असं करतं तीन चार वेळा मधून मधून 'आइस एज' बघत बघत मधून थोडं थोडं पाणी घालत शेवटी किंचित तूप टाकून फिरवले. सगळं लक्ष टिव्हीकडे होतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मायक्रो काय ते बघा. (कुकरमध्ये मी कधी केलं नाही.)

५.मगं अर्धा तास झाकून ठेवले. त्याने किन्वा फुलतो व मऊ आणि मोकळा होतो. ही पायरी आली की अर्धी लढाई जिंकलीच !

६. काट्याने मोकळा करून घ्या. थोडा थंड होऊद्या. हे पुष्कळ आधीही करता येईल.

७. सढळ हाताने तूप टाकून (थोडे तेल सुद्धा म्हणजे तूप करपत नाही) , तापल्यावर जिरे मगं तडतडं वगैरे झाले की आलं , हिरवी मिरची पेस्ट फार बारीक नको.

८. हे बहुतेक एखाद्या मिनिटात होईल , मगं उकडलेल्या बटाट्यांंच्या फोडी , हे सगळं तूप तेल गट्ट करतात. वाटलं तर इथे फोडणीत पुन्हा तेल &/तूप टाका .मगं शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतून घ्या. (आच मध्यमपेक्षा कमी, नाही तर आलं करपतं. )

९. यात शिजवलेला किन्वा , दाण्याचा अर्धबोबडा कूट, मीठ , किंचीत साखर घालून व्यवस्थित मिसळून घेत , परतत रहा.
(आच वाढवून)

१०. परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा.

११. झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा काढा. (आच मध्यम)

१२. लिंबू पिळून &/ दह्याशी खायला घ्या.

बऱ्यापैकी 'हाय फायबर हाय प्रोटिन' पाककृती आहे. ही अगदी साबुदाण्यासारखी काही लागत नाही पण छानच लागते , त्यामुळे महागडा 'किन्वा' आणून निराशा झाली तर माझा राग राग करू नका. ही मला आधीच लिहायची होती पण कोरोनाकाळात महाग घटक पदार्थ असलेली पाककृती देणे प्रशस्त वाटत नव्हते. आता दिली , झालं. चुभुद्याघ्या.

'किन्वा' कसा दिसतो , त्यातील पोषणमूल्यं कुठली याची ढोबळ माहिती देणारा हा एक फोटो


हा मी केलेल्या किन्वा खिचडीचा फोटो

कुणी मागेल असे न वाटल्याने स्टेप बाय स्टेप फोटो नाहीत.
धन्यवाद. Happy

वाढणी/प्रमाण: 
शिजवलेला सहा सात वाटी झाला बहुतेक , नक्की लक्षात नाही . साधारण दुप्पट किंवा थोडा जास्त होईल.
अधिक टिपा: 

* महाग वाटत असेल तर आवर्जून आणून खावं असं किन्व्यामध्ये काहीही नाही. हे एक हेल्दी सबस्टिट्यूट आहे.
१.गरमगरम खावा.
२.साबुदाणा, साबुदाणा करत हळहळत राहू नये.
३. ही खिचडी आणि कोशिंबीर किंवा एखादे Salad बऱ्यापैकी समतोल आहार होईल असं वाटतं. मी तरी तसंच करते.
४.'आइस एज-1' धमाल आहे.

माहितीचा स्रोत: 
सकस खाण्यासाठी केलेली धडपड.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोथरुड मधे वाण्याकडेच मिळालं पाकीट. ५०० रु किलो. चांगली झाली होती सा. खि. थोडी बटाट्याच्या किसा सारखी चव होती.
हा भिजत घालता येतो का ... त्याचे धिरडे वगैरे पण करता येईल ना?

मीरा , अमा , मानव , मी अनु थँक्स . सुपर मार्केटस मध्ये आहे म्हणजे इथेही मिळेलच.
मी मुंबईत असते.
अमा , नेचर्स बास्केटची लिंक दिलीत हे बरे झाले. ऑनलाइन मागवता येईल. ६०० रुपये म्हणजे महाग आहेच.

स्टार बझार मध्ये पण मिळतो. २२५ रुपयात अर्घा किलो.

स्टार बझार बर्याच वेळा India Gate चा किंन्वा एका वर एक फुकट असतो त्यावेळी २२५ रुपयाला किलो मिळतो. हा किंन्वा भारतात उत्पादित आहे. ह्याची चव दक्षिण अमेरिकेतल्या किंन्वा सारखीच चव लागते पण आकारने लहान आहे आणि रंग थोडासा गव्हाळ आहे.

आभार आंबटगोड.
हा भिजत घालता येतो का ... त्याचे धिरडे वगैरे पण करता येईल ना?>>>
मी फक्त पुलाव, सैलड व ही खिचडी केली आहे. धिरडे कसे जमतील कल्पना नाही.

मी किन्वा उत्तप्पा केलायं :कपाळाला हात:
पण तांदूळ दाळ सुद्धा घातले होते , नुस्त्या किन्वाचा नव्हता.
भिजवून , आंबवून .... नेहमीसारखेच.

पुलाव येतो मला. बिर्याणी कुणी एक्सपर्ट असेल तर करून पहा व सांगा.

भारी लागत असणार हे नक्की.
कारण माझ्या आवडीचे बटाट आणी शेंगदाणे आहेत म्हटल्यावर बोलायलाच नको.

किन्वाचे पॅटीस, उपमा, खीर, सा. खिचडी, डाळ खिचडी, दही किन्वा, पुलाव, डोसे, इडली, धिरडे करता येतात तसेच ते सॅलड, सूप मधेही ढकलता येतात. मी फक्त उपमा अन पुलाव केला आहे.

सगळ्या देशी-विदेशी पदार्थांसाठी दोराबाजी>> दोराबजी मध्ये तास दीड तास आरामात जातो. शुक्रवारी ऑफिस सुटलं की जायचं मस्त टाईमपास. हा किन्वा तिथे पाहिला आहे. कुस्कुस फारफार वर्षांपूर्वी आमच्या फ्रेंचच्या मादामने खायला घातलं होतं क्रेप ओ फ्रॉमाज (चीज डोसा) आणि कुस्कुस असा काहीसा बेत होता. कुस्कुस अजिबात आवडलं नव्हतं.

धन्यवाद जेम्स बॉन्ड व लंपन.

-----
आज salad केलं , त्यादिवशी जास्त शिजवला गेला होता तो फ्रिज मध्ये ठेवून लगेच मूग भिजवले. कॉस्कोत तो ट्रे मिळतो तसे काही तरी केले. टमाटे, कांदा, कोथिंबीर, मोड आलेले मूग थोडे वाफवून, मिरपूड, दाणे, भरपूर लिंबू पिळून....
Screenshot_20210108-125057_Gallery.jpgScreenshot_20210108-125146_Gallery.jpg

मस्त दिसतेय गं हे!

किन्वा डायबेटीक लोकं खाऊ शकतात का?
>>बिलकुल खाऊ शकता. Quinoa has low GI: 53>>>>>>>>>>>> धन्यवाद अस्मिता आणि मानव!

किन्वा पहिल्यांंदा करणाऱ्यांनी किन्वा उपमा करून पहावा आणि तो आवडला तर इतर बरेच प्रकार आवडतील असे माझे वैयक्तिक मत व अनुभव.
मी पहिल्यांदा किन्वा खिचडी (साबुदाण्या सारखी नव्हे, तांदळा सारखी) केली. बायको किन्वा आणला पाहुनच "काय काय आणतो हा प्राणी!" या मूडमध्ये होती खिचडी चमचा भर खाऊन तिने "उगाच बोलते का मी?" कटाक्ष दिला. मला ही तिचे म्हणणे पुरेपूर पटले. पण उरलेला किन्वा काय फेकुन द्यायचा का म्हणुन मी चार दिवसांनी युट्युबवर पाहुन किन्वा उपमा केला. आणि तो छान झाला. माझा यूरेकोत्साह पाहुन बायकोने साशंकतेने एक चमचा, मग दुसरा खाऊन पाहिला आणि तिलाही आवडला. आता ती तिच्या पद्धतीने अजून चांगला उपमा करते. मग आम्ही अजून थोडे वेगवेगळे प्रकार करू लागलो. खिचडीच्या (तांदळासारख्या) वाटेला मात्र परत गेलो नाही अजून.

मी पण काल घेऊन आले .. किन्वा १०० रूपये २००ग्राम.. मी किनवा नीर डोसा करणार आहे..

जाई आपल्याकडे स्टेशनजवळ शांती दाल मिल मध्ये मिळतोय किन्वा..

Pages