ढग दाटले आभाळी,
मन घेई हे भरारी,
गंध मातीचा पसरे ,
बरसे धरी वर सरी,
अश्याच काही कवितेच्या ओळी अलगद मनात डोकावल्या. आणि मनाच्या ताणावर अलगद प्रेमाचा गारवा पसरला. आज तब्बल दोन वर्षांनी पाऊसानी जरा चांगली हजेरी लावली होती. यंदा तरी पाऊस नीट बघायला भेटल याची आस लागली होती..
महिनाभर झाला पाऊस येऊन. आमचे विक्या साहेब (विकास) चुलत भाऊ नवीनच प्रेमात पडले होते. पहिला पाऊस प्रेमाचा, म्हटलं चला भाऊसाहेबाना भेटून येऊ, विचारून बघू कसं वाटत तुमच्या प्रेमाचा पहिला पाऊस आहे? म्हणजे लिखाणाला ही थोडी मदत होईल विषय मिळून जाईल. म निघाली माझी स्वारी वीक्या च्या घराकड.
विक्याsss ए विक्याsss काय करतो रsss
विक्या चा बा आला अग पोरी तो गेलाय बाहेर. काहीतरी काम आहे असं बोलून गेला.
झालं म्हणजे विक्या माझ्या यायच्या अगोदर रफुचक्कर ( आमच्या होणाऱ्या वहिनी सोबत फिरायला) .
तेवढ्यात किंचाळी...... गलीतली पोर ओरडत होती विना अक्का पडली... विना अक्का पडली. आम्हीही सगळे त्या दिशेनं धावलो. विनाक्का घराच्या व्हारांड्यावर चक्कर येऊन पडली होती. काय झालं काय झालं म्हणून गावभरात कल्लोळ सुरु झाला. कोणी पाणी आणा रे, कोणीतरी कांदा आणा म्हणू लागले. तोंडावर पाणी मारताच विणाक्का शुध्दीवर आली आणि काय झालं विचारताच हंबरडा फोडला.
माझा नवरा गेला रे.....
सगळे एकदम शांत झाले. एकाने हिम्मत करून विचारलं काय झालं वीनाक्का? अस का बोलते? कुठ गेले अक्का?
विनाक्का रडतच म्हणाली अर मागल्या दारी जाऊन बघा र..
सगळे मागच्या दाराकडे धावले आणि बघतात तर काय अक्कानी परसात असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला होता....
अक्कानी आत्महत्या केली होती ......
पोलिस आले पंचनामा झाला. कारवाई झाली. शेवटीं आक्कानी लिहून ठेवलेलं पत्र सापडल. काळजाला चिरणार...
शिकलो सवरलो पण नोकरी न करता विचार केला जगाचा पोशिंदा शेतकरी म शेतीची कामं करावीत. रखरखत्या उन्हात घाम गाळून मातीच सोन केलं ,रक्त गाळून पिकाला पाजल. या जगाला धान्य पुरवलं, पण शेवटी स्वतःच्या जगण्याला आधार देऊ शकलो नाही. गेली दोन वर्ष पाऊस नाही पडला. होत नव्हते ते सगळं जगण्यासाठी विकल. सावकार कडून बॅंकेतून कर्ज घेतलं. वाटलं यंदा पाऊस आहे पहिला पाऊस आला अन् प्रेमाने धान्य पेरल.... पण... पण ते उगलच नाही...मी आणलेलं समद बियान नकली निघाल...अश्यात मी काय करू? सावकार कर्ज फेडाया सांगतोय बँकेत ल कर्ज फेडायचय. जगाला पोसनाऱ्यावर आज उपाशी राहायची वेळ आलीय. विने तू माझा विमा काढलाय ना तुला पैसे भेटतील ते घेऊन सावकराच कर्ज फेड. आणि माझ्या आत्महत्येनं सरकारला जाग आली तर तेही करतील कर्ज माफ. काळजी घे विणे..
पहिल्या पावसाबरोबर पहिल्या प्रेमाच्या गोष्टी तर खूप ऐकल्या होत्या, पण पहिल्या पावसाबरोबर शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा खेळ आज प्रत्यक्षात बघत होती.
काय चूक होती त्या शेतकऱ्याची. कर्ज घेणं की स्वतःचा जीव घेणं. आणि या सगळ्याला कारणीभूत कोण? अरे बोगस बियाण विकणाऱ्यानो आता तरी स्वतःची लाज बाळगा. अरे तुमच्या घरात येणार धान्य सुध्दा त्याच शेतकऱ्यानं पिकवलय. स्वतःच्या इच्छा स्वप्न मातीत पेरून त्या उगवून तुम्हाला आम्हाला सर्वांना जगायला देतात. म का त्यांना आत्महत्या करायला भाग पाडता. उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी त्याच शेतकऱ्यावर आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली. कधी बियाण बोगस, तर कधी कर्जाचा डोंगर, कधी दुष्काळ, तर कधी अती पाऊसाचा मार या सगळ्या परिस्थितीत ही त्याने पीक घेतलं तर त्या पिकाला त्याला योग्य तो भाव मिळत नाही. शेवटी शेतकऱ्याला किंमत मिळते ती फक्त लिहलेल्या लिखाणात, कवितेत आणि आत्महत्या केल्या नंतर वर्तमापत्रात........